Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on May 1, 2017 in जीवन प्रकाश

मोफत अश्लीलतेची महागडी किंमत

मोफत अश्लीलतेची महागडी किंमत

ओवेन स्ट्रेशन

( मोबाईलचे बटन दाबताच अश्लील चित्रे समोर उभी करणारा हा  काळ आहे. या व्यसनामध्ये  फक्त तरुण पिढीच नव्हे तर प्रौढ जन व लहान मुलेही अडकलेली दिसतात. ख्रिस्ती लोकही याला अपवाद नाहीत. मंडळी याची दखल घेत नाही. हे पाप आपल्या मंडळीतून काढून टाकण्याची नितांत गरज आहे.)

टेरी क्रूझ ही एक यशस्वी व्यक्ती आहे. पूर्वीचा यशस्वी खेळाडू, टी व्ही स्टार, त्याचे कमावलेले स्नायू ! पण इतर काही कारणांमुळे तो निराळा ठरतो. सध्याच्या लैंगिकतेने भरलेल्या संस्कृतीत त्याने अश्लीलतेच्या व्यसनाने होणाऱ्या हानीबद्दल पुढील उद्गार काढले, “ जेव्हा जेव्हा मी ते पाहिले तेव्हा तेव्हा मी दडपला गेलो,. जणू त्यामुळे माझ्यात आणि माझ्या पत्नीमध्ये आडभिंत उभारली जात होती.” त्याने हे उघडपणे कबूल केले.
क्रूझ च्या ह्या साक्षीमुळे सामाजिक माध्यमांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अश्लीलतेच्या वैयक्तिक नाशकारक परिणामांची कित्येकांनी दखल घेतली. हे परिणाम नाकारणे अशक्य होते. पण अश्लीलतेच्या विध्वंसकतेची दुसरी एक बाजू आहे. मोफत अश्लीलता ही फार महागात पडते. तिचे मानसिक आणि सामाजिक परिणाम तर आहेतच पण त्यापलीकडे ती येशूच्या या जगातील कार्याला अडखळण करते. हे खालील तीन प्रकारे घडत जाते.

 • अश्लीलता आपल्या जीवनातील देवाच्या कार्याला अडखळण करते.
  देवाला त्याच्या लोकांच्या जीवनातून खूप काम करायचे आहे. तो त्याच्या राज्यात परिपूर्ण लोकांचा वापर करत नाही. नवीन स्वभाव मिळालेल्या (२ करिंथ ५:१७) प्रत्येक विश्वासीयाने आपल्या जुन्या स्वभावाशी दररोज झगडत राहिले पाहिजे (कलसै ३:९-१०). आपले पाप सोडून टाकण्याची आपली तीव्र इच्छा असते पण देव हे आपल्या जीवनात पूर्ण करीपर्यंत आपण सतत सावध असतो. आपल्या देहाला आपण कुठलीच सवलत देत नाही.
  पण जेव्हा आपण अश्लीलतेमध्ये स्वत:ला ओढून घेतो तेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक संवेदना बोथट होऊ देतो. जेव्हा जेव्हा विश्वासी बेकायदेशीर इच्छांमध्ये पुन्हा पुन्हा पडले तेव्हा त्या दिवसांत बायबल व प्रार्थनेसाठी प्रखर ओढ वाटते असे ते कधीच म्हणाले नाहीत. आपल्या वैयक्तिक जीवनात पाप आपल्याला पराजयाकडे नेते; फक्त लैंगिक शुध्तेबाबतच नव्हे तर संपूर्ण पवित्रतेबाबत (रोम १२:२; १ थेस.४:३). आपण आपल्या जोडीदार/जोडीदारीणीशी एकसूर नसतो. आपण आपल्या मुलांची विशेष  फिकीर करत नाही. कारण आपण एक लबाडीचे जीवन जगत आहो याची आपल्याला जाणीव असते. आपल्या वासना शमवण्याचा आपला प्रयत्न हा आपल्या देवाबरोबरच्या चालण्यात नेहमीच अडथळा आणतो.
 • अश्लीलतेने आपल्या मंडळीतील देवाच्या कार्याला अडथळा येतो
  जेव्हा मंडळीचे निरनिराळे लोक आपल्या दैहिक इच्छांना बळी पडतात तेव्हा नकळत मंडळीच्या शक्तीचा ते ऱ्हास करतात. जे वडील या अश्लीलतेच्या जाळ्यात अडकतात ते आता त्यांच्या मेंढरांकडे लक्ष पुरवण्याचे सोडून देतात कारण आता ते स्वत:कडेच लक्ष देत नसतात. सेवकाच्या वृत्तीचे सभासद जे अश्लीलतेत अडकतात त्यांना समजते की आता त्यांना हरवलेल्यापर्यंत पोचण्याचे किवा त्यासाठी मदत करण्याचे ओझेच येत नाही.  मंडळीचे नेतृत्व व सभासद जेव्हा वहावत जातात तेथे गरजू लोकांना आधार मिळत नाही.
  मंडळी लहान असो व मोठी व ती कोठेही असो तिने प्रभूचा महान आदेश (मत्तय २८:१८-२०) पूर्ण करण्यात भाग घेतलाच पाहिजे. पण जेव्हा विश्वासी त्यांच्या वासनांनी आकर्षित होऊन मोहात पडतात तेव्हा मंडळीचा शुभवर्तमानाच्या साक्षीचा झगझगता दिवा अंधुक होऊ लागतो. सभासदांच्या दुर्बलतेमुळे मंडळीचे अविश्वासी लोकांमध्ये असलेले काम पुढे जात नाही.
 • अश्लीलतेने देवाच्या जागतिक कार्याला अडथळा येतो
  जेव्हा मंडळ्या कबूल न केलेल्या पापांनी भरून जातात तेव्हा त्या मंडळ्या ज्या मिशनरी कार्यात गोवलेल्या असतात ते थोपवले जाते. जे तरुण पुरुष व स्त्रिया शुभवर्तमान पोचवण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणार ते सर्व उत्साह गमावून त्याऐवजी घरी बसून स्वत:च्या जगात हरवले जातात. जे वडील सभासदांना मिशनरी कार्याकडे लक्ष पुरवून अधिक देण्याकरता उद्युक्त करणार ते आता शांत राहतात व आपले गुप्त पाप इतरांना समजेल या भीतीमध्ये जगतात. एकत्रितपणे सर्वच मंडळी स्वकेंद्रित होईल. आणि सुवार्ता न पोचलेले जगाचे लोक त्या सुवार्तेची साक्ष एका शब्दानेही न ऐकल्याने नाश पावतील.
  पण अशी ही मोठी दु:खद असली तरी त्याहून सर्वात मोठी समस्या म्हणजे देवाला जगामधील राष्ट्रांमध्ये जी स्तुती मिळायला हवी ते गौरव त्याला दिले जात नाही. ज्या देवाने आपल्या मंडळीला “जा आणि शिष्य करा” ही आज्ञा दिली तिचे लोक आता जाण्याऐवजी घरी बसतात व त्यांच्या देहाचे त्यांच्यावर अधिराज्य चालवले जाते, आणि “स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार असलेल्या प्रभूला ते बाजूला सारतात.

येशूला परवानगीची गरज नाही
येशूच्या मंडळीसाठी चांगली बातमी आहे: आपण देवाचे कार्य आपल्या सामर्थ्याने चालवत नाही. मंडळी ही ख्रिस्ताने स्थापन केली आहे तोच तिला चालवतो व तिला आधार देतो. आपले पाप उलगडण्यास आपल्याला एकटेच सोडून दिलेले नाही. तर बायबल ज्या ख्रिस्ताला दाखवते तो कच न खाता निर्धाराने आपल्या लोकांकडे जातो.
येशू आपल्या परवानगीची वाट पाहत नाही. तो काही एक कमकुवत वकील नाही की आपण त्याच्याकडे जाऊ अशी आशा तो करीत राहतो. तो सामान्य लोकांकडे जातो व त्यांना त्याचे शिष्य होण्याचा आदेश देतो. येशू रोग्यांकडे जातो व त्यांना बरे करतो. तो मेलेल्यान्कडे जातो व त्यांना उठवतो. पाप्यांसाठी तो वधस्तंभावर जातो व त्यांचे तारण करतो आणि त्यांना स्वत:शी जोडून घेतो. अश्लीलताची फार यातनामय किंमत भरावी लागते- आपल्यासाठी, आपल्या कुटंबासाठी, मंडळीसाठी, आणि देवाच्या कार्यासाठी- पण जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला अनुसरतील त्यांच्यासाठी ख्रिस्ताने ही किंमत भरलेली आहे.

अश्लीलतेशी झगडा करतात ख्रिस्ताबद्दलचे जे ज्ञान आपल्याला आहे ते महत्त्वाचे आहे. आपण जसे असायला हवे तसे नाहीत हे येशूला ठाऊक आहे.पण तो आपल्याला सोडून देत नाही. तो एका भटकणाऱ्या मेंढराला जाऊन शोधतो (लूक १५:१-७). तो आपल्याला ताकद पुरवतो. आपल्याला दोष दाखवतो, तरी तो आपल्याला नवजीवन देतो. सैतान आपल्याला दोष देतो व आपल्यावर हल्ला करून निकामी करू पाहतो. पण येशू आपल्यासाठी प्रार्थना करतो व त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला शक्ती देतो (रोम ८:३७; इब्री ७:२५; प्रगटी. १२:१०-१२). आपले त्याच्यासाठीचे कार्य कदाचित क्षीण झाले असेल पण येशू ते जोमदारपणे पुन्हा पुन्हा पुनर्जीवित करतो.

अश्लीलतेपेक्षा समर्थ

जी ख्रिस्ती व्यक्ती अश्लीलशी झगडत आहे तिला नव्या किंवा अधिक चांगल्या सूचनांची, युक्तींची किंवा साधनांची  गरज नसते . तिला ख्रिस्ताची गरज असते. ज्या ख्रिस्ती व्यक्तीच्या आध्यात्मिक नाडीचे स्पंदन मंद होत चालले आहे तिच्यासाठी ख्रिस्त हे एकच उत्तर आहे. येशू निद्रीस्ताला जागे करील व दुर्बलांना सामर्थ्य देईल. जी मंडळी आपला जोम गमावून बसली आहे तिला येशू हे एकच उत्तर आहे. देवाच्या पुत्राला नव्याने समजून घेऊन पित्याने दिलेल्या त्याच्या कार्याचे आज्ञापापालन करण्याने हे घडते (योहान ६:३८). मंडळीच्या वडिलांचे व सभासदांचे हात दृढ होतील. ज्या मिशनरी कार्याची गती मंद होऊन उत्साह गमावला आहे तिची आशा व हेतू येशू प्रस्थापित करील. जी  मंडळीमध्ये अश्लीलता चालवून घेते  ती दुर्बल होत जाईल. पण प्रभूची स्तुती असो येशू हा अश्लीलतेपेक्षा समर्थ आहे.