Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Nov 27, 2018 in जीवन प्रकाश

देवाची प्रीती                                   लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

देवाची प्रीती लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

देवाची कौटुंबिक प्रीती
ख्रिस्ताला आपण तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा त्याचे मूल होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो (योहान १:१२). आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य बनतो. आम्ही त्याचे लोक व तो आमचा देव असा आपला त्याच्याशी करार झाला आहे (इब्री ८:१०). ख्रिस्ताद्वारे आपली मुले म्हणून त्याने आपल्याला दत्तक घेतले आहे. त्याचा पवित्र आत्मा आपल्या ठायी राहण्यासाठी पाठवला. तो आपल्या ठायी साक्ष देतो की आपण त्याची मुले आहोत. अब्बा बाप्पा अशी हाक मारताना पवित्र आत्मा ही साक्ष पटवतो (रोम ८:१५, १६). यहूदी घरातील गुलामाला अब्बा शब्द वापरण्याची मनाई होती. तो शब्द फक्त त्याच्या मुलांसाठीच राखलेला असे. हा शब्द वापरण्यास उद्युक्त करून पवित्र आत्म्याने आपली खात्री करून दिली आहे की, आपण स्वर्गीय पिता जो देव त्याची मुले आहोत. तो पिता आपल्या मुलांवर विशेष प्रीती करतो. तो त्यांना निवडलेले, पवित्र व अत्यंत प्रिय मानतो (कलसै ३:१२). “तो तुजविषयी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुजविषयी उल्हास वाटून तो गाईल” (सफन्या ३:१७). आपल्या मुलांवर प्रेम करणे देवाला फार आवडते कारण आपण त्याचे आहोत. “जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे (स्तोत्र १०३:११). जसे देवाचे ज्ञान, त्याचे मार्ग उंच आहेत तशीच त्याची प्रीतीही इतकी उंच आहे की आपण तिचे मापन करू शकत नाही. ती पूर्ण आहे. तिचा विस्तार अमर्याद आहे. म्हणून आपल्यावर कितीही मोठी आपत्ती आली तरी पित्याच्या प्रीतीपुढे ती अत्यंत अंधुक आहे.

देवाचे ख्रिस्तामधील प्रेम

आपण कोणीतरी आणि काहीतरी आहोत म्हणून देवाच्या प्रीतीचा आपल्यावर वर्षाव झाला असे नव्हे. तर आपण
ख्रिस्तामध्ये आहोत म्हणून. रोम ८:३९ नुसार देवाच्या ख्रिस्त येशूमधील प्रीतीपासून आपल्याला काहीच विभक्त करू शकत नाही. ती प्रीती ख्रिस्ताद्वारे व ख्रिस्तामधून वाहते. “ख्रिस्तामध्ये” हा शब्दप्रयोग जेव्हा जेव्हा वापरलेला असतो तेव्हा तो आध्यात्मिक अवयवांच्या ऐक्यासंबंधात वापरलेला असतो. हेच ऐक्य योहान १५ मध्ये द्राक्षवेल व फाटे यांच्या रूपकात साकारले आहे. द्राक्षवेलाला फाटे जडलेले असतात. ते जीवन देणारे ऐक्य असते. तसेच आध्यात्मिक
अर्थाने विश्वासी लोक ख्रिस्ताशी जडले आहेत. जसे शरीराचे अवयव परस्परांना जडून त्यांचा सबंध असतो तसाच ख्रिस्ताशी जडल्याने आपला सबंध असतो. ख्रिस्तामध्ये आमच्यावर देवाची प्रीती केली जाते हे समजावे. देवाची त्याच्या पुत्रावरील प्रीती बदलू शकत नाही तशीच देवाची आपल्यावरील प्रीतीही बदलू शकत नाही. कारण ज्या येशूवर तो प्रीती करतो त्या येशूला आपण जडलेले आहोत. त्यामुळे जसे त्याचे पुत्रावर प्रेम आहे, तसेच त्याचे आपल्यावर प्रेम आहे. देव आमच्यावर का प्रीती करतो याचे कारण शोधण्याचा आपल्याला सतत मोह होतो. हा शोध निराशामय होतो. देव आपल्यावर का प्रीती करत नाही याचीच करणे आपण शोधतो. हे वचनाला धरून नाही कारण देवाचे वचन स्पष्ट दाखवते की, आपल्यावर प्रेम करायला त्याला काहीच लागत नाही. आपण ख्रिस्तामध्ये आहोत  म्हणून तो आपल्यावर प्रेम करतो. जेव्हा तो आपल्याकडे पाहतो तेव्हा तो स्वतंत्रपणे एकेकाकडे पाहत नाही. किंवा झकाकत्या सत्कर्मांकडे पाहत नाही तर तो आपल्याकडे पाहताना त्याच्या प्रिय पुत्रामध्ये आपण जडले गेलो आहोत आणि त्याच्या नीतिमत्तेने आच्छादले गेले आहोत हे पाहतो. आपण देखणे आहोत म्हणून तो आपल्यावर प्रीती करत नाही तर आपण ख्रिस्तामध्ये आहोत म्हणून प्रीती करतो. देवाच्या प्रीतीवरील प्रश्नाला किंवा शंकेला तोंड देताना पुढील सत्य ह्रदयाशी बाळगावे. जसे देवाचे ख्रिस्तावरील प्रेम अपयशी ठरत नाही तसेच त्याचे आमच्यावरील प्रेमही अपयशी ठरत नाही. ख्रिस्ताशी झालेल्या ऐक्यातून आपण आपत्तीकडे पाहावे. स्वतंत्र व्यक्ती म्हणून देव आपल्याला हाताळत असला तरी ख्रिस्ताशी जडलेल्या नात्यातून तो आमच्याकडे पाहतो.

देवाची सार्वभौम प्रीती

संपूर्ण विश्वावर सार्वभौम देवाचे नियंत्रण आहे हे आपण पाहिले. ते सार्वभौमत्व त्याच्या गौरवार्थ चालते. पण आपण ख्रिस्त येशूमध्ये असल्याने त्याचे गौरव आणि आमचे कल्याण ही परस्परांशी सबंधित आहेत. जे काही त्याच्या गौरवार्थ आहे ते सर्व आपल्या कल्याणार्थ आहे. आणि जे काही आपल्या कल्याणार्थ आहे ते सर्व त्याच्या गौरवार्थ आहे. इफिस १:२२,२३ म्हणते, “देवाने सर्वकाही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वकाही व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर. जो सर्वांनी सर्व भरतो त्याने ती भरली आहे.” याचा अर्थ ख्रिस्त त्याचे शरीर जी मंडळी तिच्या कल्याणार्थ व फायद्यासाठी संपूर्ण विश्वावर अधिराज्य चालवतो. पृथ्वीवर तसेच आध्यात्मिक शक्तीवर देवाचे साम्राज्य आहे. जीवनाचे बारकावे व ऐहिक बाबींचे त्याला तपशीलवार आकलन होते. मंडळीच्या वतीने देवाचे सामर्थ्य विश्वात वापरले जाते. मंडळी ही ख्रिस्ताचे शरीर आहे. तिच्या वतीने ख्रिस्त सार्वभौमत्व वापरतो. तो मंडळीशी एवढा सखोलतेने घनिष्ठ प्रीतीने जडलेला आहे की, तिच्यावर त्याचे एवढे अमर्याद प्रेम आहे की तिच्याप्रीत्यर्थ तो आपले अमर्याद सामर्थ्य विश्वावर वापरतो. आणि विश्वात जे आहे त्याला तो स्वेच्छेने अगर निरिच्छपणे सहकार्य करण्यासाठी उद्युक्त करतो. देव आपल्या वतीने सार्वभौम रीतीने कार्य करतो याची खात्री पटली, आपण ख्रिस्ताला जडले आहोत हे कळले म्हणून जीवनात आपत्ती येणार नाही अशी अपेक्षा करायची नाही. याची प्रचीती मेंढपाळ व मेंढरे या चिन्हातून प्रत्ययाला येते. यशया ४०:१० म्हणते, “पहा प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे. त्याचा भुज प्रभुत्व चालवील. मेंढपाळाप्रमाणे तो आपला कळप चारील. कोकरे आपल्या कवेत उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यांस सांभाळून नेईल.” देवाचे सार्वभौमत्व आणि तो कोकराची घेत असलेली हळूवार देखभाल किती उल्लेखनीय आहे! देवाचा भुज त्याच्या बलाचे व पराक्रमाचे चिन्ह आहे. मेंढपाळ देवाला उल्लेखून म्हटले आहे. मेंढपाळ हा मायेने काळजी घेण्याचे व सातत्याने पहारा देण्याचे द्योतक आहे. देवाच्या लोकांच्या कल्याणार्थ सार्वभौम देवाचे सामर्थ्य व मायेची काळजी यांचा मिलाफ झालेला दिसतो. जो भुज संपूर्ण विश्वावर प्रताप दाखवतो तोच भुज त्याच्या मेंढरांना एकत्र करतो. मेंढरांना कवेत घेतो. ह्रदयाशी धरतो. आपण सार्वभौम देवाच्या कवेत असतो. देव आपल्या लोकांप्रित्यर्थ त्याचे सार्वभौमत्व प्रीतीने व सुज्ञतेने वापरतो हाच मानव व देव यांच्या सार्वभौमत्वातील फरक आहे. मानवी सार्वभौमत्वात आपल्याला भीती वाटते. कारण त्यात दयामाया, न्याय, सुरक्षितता नसते.

पण देवाच्या सार्वभौमत्वात हर्ष असतो. त्यातून आपले कल्याणच होणार अशी खात्री असते. देवाच्या तरतूदीतच फक्त दैवी अजिंक्यता व सामर्थ्य नसते तर त्याच्या प्रीतीत अजिंक्यता व सामर्थ्य असते. या दयाळू देवामध्ये असलेली दया सतत आपल्या सेवेला हजर असते. त्या पित्याकडे आपण विश्वासाने स्वत:ला झोकून देऊ शकतो. तो आपल्याशी सार्वकालिक कृपेचा करार करतो. त्याची मुले व वारस म्हणून तो आपल्याला दत्तक घेतो. म्हणून प्रत्येक चांगल्या गोष्टीचा तो आपल्याला वारीस करतो. त्याची मुले बनवतो. आपल्या कल्याणार्थ तो सर्व पुरवतो. सर्व अधमतेला कलाटणी देऊन आपल्या कल्याणासाठी वापरतो. स्तोत्र ११९:११ म्हणते, “मी पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. देवाविरुद्ध कुरकुर करणे व त्याच्या चांगुलपणावर आक्षेप घेणे खरोखर  पाप आहे. जितक्या आस्थेने त्याचे आज्ञापालन करावे तितक्याच आस्थेने आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा. जर देवाच्या प्रीतीवर भरवसा ठेवायचा असेल तर वचनातील सत्ये आपण मनात जपून ठेवली पाहिजेत. देवाची कालवरीवरील प्रीती, आपले ख्रिस्ताशी जडणे, देवाचे प्रेमळ सार्वभौमत्व हे सर्व देव मानवाच्या कल्याणार्थ वापरतो. देवाच्या प्रीतीला कोणी उलट आव्हान करू शकत नाही. पण हे सत्य आपण मनात जपून ठेवायला हवे. त्याचा वापर विपत्तीत, शंकेच्या वेळी सैतानाशी द्वंद्व करताना देवाचे गौरव होण्यासाठी केला पाहिजे आणि देवावर भरवसा ठेवला पाहिजे.