Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 11, 2020 in जीवन प्रकाश

आत्म्याचे फळ                                   स्टीफन विल्यम्स

आत्म्याचे फळ  स्टीफन विल्यम्स

   (लेखांक १)

“आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ; प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही” (गलती ५:२२,२३).

ख्रिस्ती व्यक्ती ही “कृपेमध्ये वाढत” जाते. जर तुम्ही सजीव मानव असाल तर तुमची वाढ व्हायलाच हवी. तसेच ख्रिस्ती असून वाढ न होणे अशक्य आहे.

ख्रिस्ती प्रौढता तुम्ही कशी मोजाल? ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये तुम्ही अधिक आणि अधिक वाढत आहात हे तुम्हाला कसे कळते? प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीची दोन चिन्हे मला आठवतात.

पहिले ज्ञानामध्ये वाढ
. “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे” (इब्री ५:१४). ही प्रौढता देवाचे वचन आणि सुवार्ता समजणे आहे.

दुसरे फळ देण्यामध्ये प्रौढता.  गलती ५:२२ – आत्म्याचे फळ.

ही दोन्ही चिन्हे परस्परांपासून विभक्त करता येत नाहीत. तुम्हाला फळाशिवाय ज्ञान असू शकते, पण तुम्हाला ज्ञानाशिवाय फळ देता येणे शक्य नाही.
समस्या अशी आहे की मंडळीमध्ये बहुतेक करून प्रौढता ही ज्ञानानुसार मोजण्याकडे आपला कल असतो आणि हे चूक आहे. कारण त्यामुळे अनेक आध्यात्मिकदृष्ट्या न वाढलेले लोक प्रौढ असे समजले जातात, कारण त्यांना ज्ञान असते. परंतु ते त्यांच्या फळासबंधी प्रौढ नसतात.

ख्रिस्ती जीवन समजून घेणे  (गलती ५:१६-२४)

गलतीकरांस आणि रोमकरांस पत्रांमध्ये पौल ख्रिस्ती जीवन हे एका युद्धासारखे आहे असे म्हणतो. ते आहे देह आणि आत्मा यांचा परस्परांतील संघर्ष.
“कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत” (गलती ५:१७).
परंतु ज्यांना देवाचा आत्मा आहे, ज्यांना पापापासून मुक्ती मिळाली आहे, त्यांच्यावर देहाची सत्ता नाही ते देवाच्या हातात आहेत आणि ते जुन्या बंधनाखाली नाहीत.
“आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही” (गलती ५:१६).

हे एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल. जीवन हे एका खोलीसारखे आहे असे चित्र उभारा. त्या खोलीत सर्व प्रकारच्या वस्तू आहेत पण उजेडासाठी काहीच साधन नाही. ही तारण न पावलेली व्यक्ती आहे. तेथे प्रकाश नाही आणि पापाचा अंधार आणि देहाचे साम्राज्य आहे. त्यांनी काहीही केले तरी ते पापामध्ये मृत आहेत. पाप त्यांचा धनी आहे आणि बदलण्यासाठी ते काहीही करू शकत नाही. अंधार राज्य करीत आहे.

जेव्हा देव व्यक्तीचे तारण करतो तेव्हा या खोलीमध्ये प्रकाश आणला जातो. तेथे अजून अंधार आहे का? आहे. जे भाग प्रकाशापासून दडलेले आहेत तेथे आहे. पण आता अंधार राज्य करत नाही तर प्रकाश राज्य करतो.

प्रेषित योहानाने जे म्हटले त्याची मला आठवण होते. “तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही” (योहान १:५).

देह आणि आत्म्यासबंधी असेच आहे. जेव्हा देव आपले तारण करतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहू लागतो. तो आपल्या पापाच्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाशासारखा आहे. पण त्याचा अर्थ असा आहे का की आपल्यामध्ये आता पाप नाही? नाही. आपल्या जीवनात जेथे जेथे प्रकाशाला मज्जाव केला जातो तेथे देह अजूनही आहे. अजूनही असे भाग आहेत जे अंधारमय आहेत, पापी आहेत.
पण जसजसे आपण आपले जीवन अधिकाधिक प्रकाशात आणू लागतो तसे प्रकाश अंधारावर मात करतो. आता आपली व्याख्या प्रकाशाद्वारे केली जाते. आत्म्याचे जीवन आपल्यावर राज्य करते.

जेव्हा आपण ख्रिस्ती जीवनाबद्दल बोलतो तेव्हा पौल त्यासाठी कोणती कल्पना वापरतो? “आत्म्याने  चाला” (गलती ५:१६),  “आत्म्याने चालवले जा”  (गलती ५:१८),   चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा असे नाही तर “आत्म्याबरोबर चाला”  (गलती ५:२५).

जसे खोलीतील वस्तू अधिक आणि अधिक रीतीने प्रकाशात आणल्याने अंधार दूर केला जातो तसेच आत्म्याच्या अधीन होण्याने देहावर विजय मिळवला जातो.

प्रौढ ख्रिस्ती असणे म्हणजे आपला नैतिक बदल होण्याचे कार्य नव्हे पण ख्रिस्त जो प्रकाश आणि जीवनाचा उगम आहे तो त्याने आपल्याला  दिलेल्या त्याच्या आत्म्याद्वारे आपल्यामध्ये जीवनाचे कार्य करतो.

योहान १५:५ “मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.”

मग हेच प्रकाशाचे उदाहरण पुढे चालू ठेवले तर जसजसे आपल्या जीवनातले अधिक विभाग त्या प्रकाशाकडे आणले जातील तसतसे आपण त्या प्रकाशासारखे म्हणजे येशूसारखे दिसू लागू.

पौल गलती ४:१९ मध्ये त्याच्या सेवेचे वर्णन अशा रीतीने करतो, “माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.”

येथेच प्रथम ज्ञानामधील प्रौढता पुढे येते. देवाच्या वचनामधून मिळणारी ख्रिस्ताच्या ज्ञानाची प्रौढता. जसजसे तुम्ही ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढण्याची इच्छा करता तसतसे तुम्ही त्याचा स्वभाव आणि त्याची इच्छा यामध्ये एकसूर होता. जर तुमची आणि येशूची अधिकाधिक ओळख होत नाही तर तुम्ही त्याच्यासारखे होऊ शकत नाही. आणि वचनाशिवाय तुम्ही त्याला समजू शकत नाही.

तथापि फळामध्ये प्रौढ होत जाणे ह्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. येथे गलती ५:२२ येते. आणि आत्म्याचे फळ हाच या मलिकेचा पाया आहे.

आता आपण थोडे निरीक्षण करू या.

जर आपण १९ व २२ वचने पहिली तर “देहाची कामे’ व आत्म्याचे फळ यातील परस्परविरोध दाखवला आहे. हा फरक काय आहे?

पहिले- देहाच्या बाजूला तुम्ही कामे पाहता तर दुसऱ्या बाजूला तुम्ही व्यक्ती पाहता – व्यक्ती म्हणून तुम्ही काय आहात हे पाहता.

दुसरे – आता १९ व्या वचनात देहाची किती कामे आहेत त्यांची नोंद करा. – पंधरा

आता २२व्या वचनात आत्म्याची किती फळे आहेत यांची काळजीपूर्वक नोंद करा. – एक.
आत्म्याचे फळ आहे – ते सर्व एकच फळ आहे. आत्म्याच्या जीवनातील एकच वास्तव.

जसे मी अभ्यास करू लागलो तसे मला एका गोष्टीने टोला बसला. आत्म्याचे फळ हे एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचे वर्णन करत नाही. ते खऱ्या रीतीने फक्त येशूचे वर्णन करते. हे सर्व पैलू फक्त त्याच्यामध्येच आहेत. आपण सर्व निरनिराळ्या प्रमाणात येशूसारखे दिसतो पण पूर्णपणे कधीही नाही. या जीवनामध्ये आत्म्याचे फळ कोणीही पूर्णत्वाने प्रदर्शित करू शकणार नाही.

मग आपल्याला त्याचे वर्णन करून का दाखवले आहे? कारण त्यामुळे आपण मोजू शकू की आपण आत्म्याच्या किती अधीन आहोत. आपण येशूसारखे किती दिसतो. आत्म्याचे फळ हे आंतरिक प्रौढपणाचा आरसा आहे.

आता प्रकाशाचा पुन्हा विचार करू या. जर आपण प्रिझम वापरून प्रकाशाच्या किरणाचे विभाजन केले तर आपल्याला सात फितींचा वर्णपट (स्पेक्ट्रम) दिसतो. तानापीहिनिपाजा.

येशूचा स्वभाव हा परिपूर्ण शुभ्र प्रकाशासारखा आहे. – परिपूर्ण फळ. येथे वचनाचे प्रिझम आपल्याला नऊ पैलू किंवा कृपा दाखवते.

सात फितींच्या वर्णपटामध्ये एक जरी कमी असेल तर तुम्हाला शुभ्र प्रकाश मिळू शकणार नाही.
या नऊ पैलूंपैकी एक जरी कमी असेल तर तुम्हाला आत्म्याचे फळ मिळणार नाही. आणि अशा रीतीने आंतरिक फळाच्या संदर्भात तुमची स्वत:ची वाढ आणि प्रौढता तुम्ही मोजू शकता.

तुम्ही प्रेमळ व्यक्ती असाल पण तुमच्यामध्ये शांतीचा अभाव असेल. किंवा धीर असेल पण इंद्रियदमन नसेल. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती काही पैलूमध्ये मजबूत असेल आणि इतर बाबतीत अपरिपक्व असेल.

पौल आपल्याला दाखवत आहे की वर्णपटाच्या कोणत्या भागात आपण जास्त अधीन व्हायला हवे. उदा. काही प्रकाश लालसर असतो तर काही निळसर तर काही हिरवट, पण पूर्ण शुभ्र नसतो. तसेच प्रत्येक जण येशूसारखा नसतो. पण जसजसे आपण आत्म्याच्या फळात वाढत जातो तसतसे  आपण त्याच्यासारखे होण्यात वाढत जातो. आणि जर तुमच्यामध्ये यापैकी एकही पैलू नसेल तर तुमचे तारण झाले नाही. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा नाही. आजच आपले तारण साधून घ्या. त्याला मागा आणि तो तुमचे तारण करील!

तर या एका फळातील नऊ कृपांना जवळून निरखताना तुमच्या जीवनात तुम्ही पुढील प्रकारे उपयोग करा. सर्वसाधारणपणे प्रौढ, अपरिपक्व अशी विधाने वापरून तुम्हाला मदत होणार नाही. आपण सर्वच जण यापैकी काही पैलूत अपरिपक्व आहोत. प्रथम तुम्ही स्वत:चे निदान करा आणि कोणत्या भागात तुम्ही अपरिपक्व आहात हे कबूल करा.
मग यावर उपाय हा नेहमी हाच असेल की येशू या व्यक्तीवर व त्याच्या कार्यावर मनन करणे. पवित्रीकरण हे देखील नेहमीच ख्रिस्तकेंद्रित असायला हवे. हा नातेसंबंध आहे.

आत्म्याच्या फळाच्या प्रत्येक पैलूचा उगम ख्रिस्त आहे, उदाहरण ख्रिस्त आहे आणि तसे होण्याचे सामर्थ्य ख्रिस्तापासूनच आहे.

 (पुढे चालू)