Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 27, 2022 in जीवन प्रकाश

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक ३

मरण व अविश्वासी व्यक्ती  

ज्यांची देवाशी ओळख नाही त्यांना मुळातच मरणाचे भय वाटते. पण सध्याच्या जीवनाचा शेवट मृत्यूने होतोच.  “माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे” (इब्री ९:२७). या जगात जीवन जगत असताना विश्वासी, अविश्वासी सर्वच लोक देवाची कृपा व आशीर्वाद सूर्यप्रकाश, अन्न, वस्त्र, पाऊस, नातीगोती यांद्वारे उपभोगत असतात. म्हणून रोम २:४-५ मध्ये प्रश्न केला आहे, “देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतो काय? आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंत;कारणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वत:करता क्रोध साठवून ठेवतोस का?”

देवाचे आशीर्वाद भोगूनही त्याचा सन्मान न करण्याने मनुष्य त्याचा आपल्यावरील क्रोध वाढवत राहतो. अशा व्यक्तीला न्यायानंतर सार्वकालिक मरणाचा अनुभव घेत असताना तेथून सुटण्याची किवा सुधारण्याची संधी मिळणार नाही. आणि अग्निसरोवराची शिक्षा तर अंतिम टप्प्यात सुरू होणार आहे. याचा अर्थ हा अंतिम न्याय अविश्वासी व्यक्तीच्या मरणाच्या वेळीच मुक्रर होतो.

मरण व विश्वासी व्यक्ती – विश्वासी व्यक्तीलाही शारीरिक मरण चुकलेले नाही. त्यांनाही अपघात, आजार, दुखणी यांनी मरण कधीतरी गाठते. एकीकडे त्यांच्या अंत:करणातील पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे त्यांचा अंतरात्मा रोज नवीन होत जात असतो, तर दुसरीकडे त्यांचा बाह्यदेह क्षय पावत असतो (२ करिंथ ५:१७ ; ४:१६). मरण कायमचे नाहीसे करणे देवाने भावी काळासाठी राखून ठेवले आहे कारण अजून अनेक लोकांचे तारण होण्यास तो वेळ देत आहे.

विश्वासी व्यक्तीचा मरणाशी कसा संबंध असतो? मरण हा पापाचा परिणाम आहे. येशूवरील विश्वासाने तारण पावल्यामुळे विश्वासी व्यक्तीच्या सर्व पापांची क्षमा झालेली असते. त्यामुळे तिचा नाय होणार नाही. “म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच.” (रोम ८:१). पतित जगात राहत असल्याने तिला शारीरिक मरण आले तरी ती मरणातून पुनरुत्थानाची वाट पाहत असते. खंगत जात असता, मरण जवळ आले असतानाही ती देवावर अवलंबून राहते. दु:खे, क्लेश, संकटांकडे ती ख्रिस्ताशी समरूप होण्याच्या नजरेने पहाते (फिलिपै ३:१०). ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाल्याने ती मरणाला भीत नाही (इब्री २:१४,१५). मरण, जीवन, अगर कोणतीही गोष्ट तिला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही (रोम ८:३८,३९). मरण व पापाचे सामर्थ्य ख्रिस्ताने त्याच्या मरण व पुनरुत्थानाने मोडून टाकले आहे. म्हणून तिला माहीत असते की मरण हा आपला शेवट नाही, ती केवळ एक मोठी झोप आहे.

मधली अवस्था – हा शब्दप्रयोग शारीरिक मरण व पुनरुत्थान यांच्या मधल्या काळासाठी वापरला आहे. ह्यासाठी वापरलेला मूळ शब्द ‘अस्तित्वात असणे’ यासाठी वापरला आहे. ही अवस्था विश्वासी व अविश्वासी या दोहोंसाठी आहे.       

अविश्वासीयांची मधली अवस्था – ते जाणीवावस्थेमध्ये  अधोलोक (हेडीस) म्हटलेल्या यातनेच्या स्थळी असतात. जो अंतिम न्याय पुढे अग्निसरोवरात होणार आहे त्यापूर्वीची ही अवस्था आहे (प्रकटी २०:१३). अविश्वासी लोक त्यांचा न्याय होईपर्यंत ह्या यातनामय ठिकाणी असतील.

येशू स्वत: श्रीमंत मनुष्य व भिकारी लाजार यांच्या कथानकात नावे वापरून नरकाचे तपशीलवार वर्णन करतो (लूक १६:२२-२५). श्रीमंत माणूस तेथे तहानेने पाण्याच्या एका थेंबासाठी तरसताना दिसतो. त्याची स्मरणशक्ती जागृत आहे. तो अब्राहाम व लाजाराला ओळखतो. तो आपल्या पृथ्वीवरील भावांना मदत करायची इच्छा करतो. आपल्याला योग्य शिक्षा होत आहे हे तो मान्य करतो. पण त्याला पश्चात्तापाची इच्छा होत नाही.    

विश्वासीयांची मधली अवस्था – शारीरिक मरणानंतर लागलीच तो निरामय शांतीत येशूसोबत स्वर्गात असतो.  “शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते” (२ करिन्थ ५:८);  येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे (फिलिपै १:२४). स्तेफनाचे उद्गार वाचा. त्याचा आत्मा थेट येशूकडे जात आहे. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर” (प्रे.कृ. ७:५९). पश्चात्तापी चोराला येशू काय म्हणाला? “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील” (लूक २३:४३). तो लागलीच सुखलोकात असणार होता. शरीर मृत पावताच त्यांचा आत्मा स्वर्गात जातो. या पतित जगातील जीवनापेक्षा ही अवस्था उत्तम आहे. पौलालाही ती हवीहवीशी वाटते (२ करिंथ ५:१-२). या जगातील कष्टांपासून विसावा मिळाल्याने मनुष्य तेथे जाण्याने धन्य होतो (प्रकटी १४:१३). 

येशूवरील विश्वासासाठी छळ झाल्याने रक्तसाक्षी झालेल्यांचे आत्मे देवाच्या वेदीखाली (प्रकटी६:९-११) मध्ये दिसतात. यानुसार या संतांना –

(१) स्वत:विषयी, इतरांविषयी व जगातील परिस्थितीविषयी जाणीव होती. पृथ्वीवर न्याय व्हावा यासाठी त्यांना
      उत्कट इच्छा आहे. जो न्याय ते येशूसोबत  पृथ्वीवर येतील तेव्हाच त्यांना मिळेल.
(२) त्यांना स्वर्ग व पृथ्वीमधील भेद समजत असतो.
(३) ते कायम स्वर्गात नसणार. प्रकटी. १९:११-२१. ते या पृथ्वीवरील लोकांवर येशूबरोबर एक हजार वर्षेराज्य
      करणार.
(४) तेथील अवस्थेत त्यांना एक शारीरिक आकार होता. योहान त्यांना पाहू शकत होता व त्यांना वस्त्रे  दिली
      गेली.

मधल्या अवस्थेचे महत्त्व – देवाच्या या विस्तृत वैश्विक योजनेत या अवस्थेची काय भूमिका आहे? येशू व निवर्तलेले जन स्वर्गात आहेत. ही मध्यावस्था नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. कारण स्वर्ग हे त्यांचे अंतिम भविष्य नसून त्यांचे पुनरुत्थान होऊन गौरवी शरीराने या जगात, स्वर्गात नव्हे, ते येशूसोबत एक हजार वर्षे या भूतलावरील लोकांवर राज्य केल्यावर त्यांना कायम नवे आकाश व नवीन पृथ्वीवर राहायचे आहे (२ पेत्र ३:१३). म्हणून ते न्यायाची वाट पाहताना दिसतात (प्रकटी २०:४). हे राज्य दृश्य व प्रत्यक्षात असणार आहे.

                                                      प्रश्नावली
  

  प्रश्न १ ला – खालील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                                            
१.रोम २:४-५ वरून मानव आपल्यावरील देवाचा क्रोध कसा वाढवत साठवून ठेवतो?                               

२.  मधली अवस्था हा शब्दप्रयोग कोणत्या काळासाठी वापरला आहे?        

प्रश्न २  रा – चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.                              

  • सार्वकालिक मरणाची शिक्षा भोगत असता त्यातून सुटण्याची देव अविश्वासीयांना संधी देईल. —–      
  • अंतिम न्याय मरणाच्या समईच मुक्रर होत असतो. ———-                                 
  • विश्वासी व्यक्तीचा देहाबरोबर अंतरात्माही क्षय पावत जातो. ——– २ करिन्थ  ४: १६
  • अनेक  लोकांचे तारण व्हायचे असल्याने देवाने मरणाचा कायमचा नायनाट करणे भावी काळासाठी राखून ठेवले आहे. ————                                                                            
  • विश्वासी व्यक्तीसाठी मरण ही मोठी झोप आहे. ——– १ थेस्स ४:१३                                 
  • अधोलोकात असणे ही अग्निसरोवरात जाण्यापूर्वीची अवस्था आहे. ———                            
  • विश्वासी जन मरणानंतर कायम स्वर्गात असणार. ————२ पेत्र ३:१३; प्रकटी २०:४         
  • कोणालाच अग्निसरोवरात प्रेमळ देव राहू देणार नाही असे वचन शिकवते. ——–प्रकटी.२१:१-८, २०:११-१५.                                                                        
  • अग्निसरोवरात टाकताच दुर्जनांचे अस्तित्व नष्ट होईल.———–योहान ३:३६; मत्तय २४:५१; २५:३०

१०- देव सध्या प्रीतीच्या स्वभावाद्वारे तारण करत आहे, सहन करत आहे, पण भावी काळी पावित्र्य व
             न्यायत्वाद्वारे कठोर न्याय करील ——-