Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 13, 2016 in जीवन प्रकाश

यावर विचार करा

यावर विचार करा

अशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला नक्कीच मिळाले असतील “हा संदेश १२ लोकांना पाठवा आणि येशू तुमच्यासाठी काय करेल याचा प्रत्यय घ्या…” किंवा “ तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहे . ही साखळी मोडू नका. १० मिनिटात हा संदेश १४ लोकांपर्यंत पोचवा…”

हे बायबलला धरून नाही. अशा दृष्टीकोनामध्ये विश्वास हा एक जादूचा ताईत बनवला जातो. तुम्हाला हवे ते प्राप्त होण्याचे साधन बनवले जाते देवाबद्दलच्या हीन दृष्टीकोनातून अशा प्रकारचा विश्वास उत्पन्न होतो व असा देव  आमच्या गरजा पुरवणारा एक जादुगार आपल्या इच्छेनुसार कधीही आपली इच्छा पुरवायला उभा असतो!

पण आपल्या देवाचा असा स्वभाव नाही किंवा जो विश्वास तो आपल्याला बहाल करतो तो ही असा नाही. आपला देव हा सर्वज्ञानी, सर्वसुज्ञ, सर्वव्यापी, सर्वदर्शी असा हा आहे. या देवाला कोणी आज्ञा देऊ शकत नाही किंवा हाताळू अथवा चालवू शकत नाही. आपल्या निर्मितीवर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे. आपल्याला त्याने दिलेला विश्वास तोच टिकवतो अन तो पूर्णपणे त्याच्याकडेच केंद्रित आहे. आपला विश्वास परिस्थीतीमुळे बदलत नाही कारण त्याद्वारे आपण भौतिक  जगाच्या पलीकडे आध्यात्मिक आणि सार्वकालिक पाहू शकतो. आपला विश्वास ही एक अमूल्य देणगी आहे आणि अंधश्रधेने आपण त्याची किमत कमी करू नये.

इस्रायेलच्या स्त्रियांना देव काय म्हणाला हे लक्ष देऊन ऐका “म्हणून परमेश्वर, प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो, तुम्ही बांगड्यासारखे कापडी पट्टे करुन लोकांना सापळ्यात पकडू बघता पण मी त्यांना मुक्त करीन. तुमच्या हातातील ते कापडी पट्टे मी फाडून टाकीन, म्हणजे ते लोक पिंजऱ्यातून सोडून दिलेल्या पाखराप्रमाणे स्वतंत्र होतील.  “ यहेज्केल १३:२०. असा हीन विश्वास देवाचा गौरव न करता त्याची नाराजी ओढवून घेतो.

आपल्या आध्यात्मिक रक्ताभिसरण संस्थेचे विश्वास हे जीवन आहे, रक्त आहे व आपल्या अस्तित्वाच्या कानाकोपऱ्यात ते आपल्याला आशा देते. आपल्याला त्याच्यामध्ये विश्वासच टिकवून ठेवतो. आणि हे करीत असताना तो आपल्याला देवाचे सामर्थ्य, भव्यता, पुरवठा दाखवतो . आपल्या विश्वासाचा हेतू आपल्या जीवनात  देवाला उंचावणे  हा असून त्याचा परिणाम “येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो (विश्वास ) खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुती , गौरव व सन्मान मिळावा   (१ पेत्र १:७ ) यामध्ये होईल.
देवाने दिलेल्या विश्वासाच्या देणगीला आपण खूप मोल देऊ या आणि त्याच्या गौरवासाठी त्याचा उपयोग करू या.