जनवरी 5, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कृपा आणि वैभव: ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव –  लेखांक २

स्टीव्ह फर्नांडिस

अ) त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव

आपण आता ख्रिस्ताच्या देहधारित व्यक्तित्वामधील तिहेरी गौरव पाहणार आहोत. पहिले म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव . येशू त्याच्या देहधारणामुळे पूर्णपणे एकमेव अपवादात्मक व्यक्ती असा घडला गेला. याचा अर्थ काय? याचा अर्थ, तो जरी एक व्यक्ती असला तरी दोन भिन्न स्वभाव धारण करतो. मी आधी म्हटले आहे की ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाला व्यक्तिमत्व नव्हते म्हणून नासरेथकर  येशू नामक व्यक्तीवर विशेष प्रकारे देव उतरून आला असे नव्हे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर देव आणि येशू अशा त्या दोन व्यक्ती नाहीत. तर तो एकच व्यक्ती आहे. ती व्यक्ती खुद्द देव आहे. त्याने स्वत: मानवी स्वभाव धारण केला आणि त्या स्वभावाला व्यक्तिमत्व दिले. अशा प्रकारे या सनातन देवाने नवीन अस्तित्व धारण केले. मानव म्हणून अस्तित्व धारण केले. अनेक शास्त्रलेख हा मुद्दा स्पष्ट करतात. उदाहरणार्थ शुभवर्तमानात आपल्याला स्पष्ट सांगितले आहे की , मरिया पवित्र आत्म्याने गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. जो जन्मला त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे संबोधण्यात आले (लूक१:३५).  एका कोणत्या तरी विशिष्ट समयी आपल्याला नक्की सांगितले नाही अशा वेळी ख्रिस्त आला आणि मरीयेच्या उदरातील शरीराचा  ताबा घेऊन त्याला व्यक्तिमत्व दिले. पुढे इब्री १०:५ मध्ये येशूविषयी म्हटले आहे की , ‘तो जगात येते वेळेस म्हणाला…तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे.’ हे लक्षात घ्या  की आधी शरीर तयार करण्यात आले नंतर सनातन पुत्राने त्याचा ताबा घेतला. देवाचे वचन असेही सांगते की मरिया त्याला स्तनपान करीत असताना त्याने देवावर विश्वास ठेवला. स्तोत्र २२:९ मध्ये म्हटले आहे , ‘मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला आपणावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिली.’ स्पष्टच आहे की मरिया त्याला स्तनपान देत असतानाच आपण कोण आहोत याविषयी त्याला पूर्ण जाणीव होती! नवजात बाळक असतानाच तो सर्व काही जाणणारा , सर्वज्ञ , सनातन देव असाच राहिला. मानवी स्वभावाने मात्र तो वाढून मोठा झाला व शिकला. परंतु  त्याच्या दैवी स्वभावाने जो स्वभाव त्याच्या ठायी पूर्वीपासूनच होता त्या स्वभावानुसार त्याला काहीच शिकावे लागले नाही.

या अनुषंगाने विचार करीत असता देवाचे वचन असे शिकवते की प्रभू येशू लोकांचे विचार ओळखून त्यांच्या वैचारिक जीवनावरून त्यांना प्रतिसाद देत असे. तो आपल्या सार्वकालिक, सर्वज्ञ, दैवी गुणवैशिष्ठ्यानुसार नेहमी बोलत असे. उदाहरणार्थ एका पापी स्त्रीला सुगंधी द्रव्याने येशूच्या चरणास तैल्याभंग केल्यास परवानगी दिली म्हणून एका परूश्याने त्याच्यावर टीका केली. लूकामध्ये नोंद आहे की त्या परूश्याने आपल्या मनात म्हटले; ‘हा संदेष्टा असता तर याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे , म्हणजे ती पापी आहे हे याला कळले असते’ (लूक ७: ४०). येशू त्याचे विचार ओळखून त्याच्या वैचारिक जीवनावरून त्याच्याशी बोलला. असे घडल्याने काय होते याची कल्पना तुम्हाला येते का?

केवळ उदाहरणादाखल कल्पना करा की , नवे कपडे घालून तुम्ही चर्चला आला . तुम्ही आपल्या मित्राकडे पाहून मनात विचार करता , याला माझा आजचा पेहराव आवडेल असे वाटत नाही, आणि ती व्यक्ती वळून तुम्हाला म्हणते ,’अरे, मुळीच नाही ; मला तुझा पेहराव खरंच खूप आवडला’. तुम्ही तर फक्त मनातल्या मनात विचार केला होता आणि तरी ती व्यक्ती जणू तुम्ही त्याच्याशी प्रत्यक्षात बोलल्याप्रमाणे तुम्हाला उत्तर देते! यामुळे तुम्ही किती भयग्रस्त व्हाल! ख्रिस्ताने अगदी असेच केले. लोकांचे विचार ओळखून येशू त्यांच्याशी संवाद साधत असे.

म्हणून अशी एकच व्यक्ती आहे , तो दैवी सार्वकालिक पुत्र आहे. त्यानेच मानवी स्वभावाला व्यक्तिमत्व दिले. मी अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे  ‘देवाचा पुत्र’ या शीर्षकाचा ख्रिस्ताला आरंभ आहे असा अर्थ होत नाही. तर त्याला अगदी पित्यासारखाच तंतोतंत स्वभाव आहे असा त्याचा अर्थ होतो.  हा अभ्यास करीत असताना आपण यावर खोलवर अभ्यास करू. अशा प्रकारे ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व एकमेव व अपवादात्मक आहे व त्यातून त्याचे गौरव होते. त्याने स्वत:वर मानवी स्वभाव धारण केला तरीही त्याचवेळी तो सनातन देवाचा पुत्र राहिला हेच तर आश्चर्य आहे.

आता योहान १:१ मध्ये योहान ख्रिस्ताविषयी  काय म्हणतो ते लक्षात घ्या. ‘प्रारंभी शब्द होता . शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.’ योहान उत्पत्तीकडे जायला सांगतो. अर्थातच तुम्ही म्हणाल, उत्पत्ती १:१नुसार देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली आणि त्याचाच उल्लेख ह्या वचनात आहे यात शंकाच नाही. त्या उत्पत्तीच्या घटनेकडे जा. विश्वाचा आरंभ , प्रत्यक्ष निर्मितीचा आरंभ ..आणि तेथे शब्द होता.! ‘शब्द होता’ असे योहान म्हणतो. –तो आधीपासूनच अस्तित्वात होता. मूळ ग्रीक भाषेमध्ये इंग्रजीत वापरल्याप्रमाणे ‘द’ या आर्टिकलचा वापर न करता ‘इन  बिगीनिंग’ असे म्हटले आहे. ‘इन द बिगिनिंग’ असे इंग्रजीप्रमाणे लिहिलेले नाही. यामुळे योहान ‘प्रारंभी’ म्हणताना ज्ञात असलेल्या एका विशिष्ट बिंदूपाशी सुरुवात झाल्याबद्दल बोलत नाही. तर तो कोणत्या तरी  एका प्रारंभाविषयी बोलतो. इंग्रजीत आपण ‘द’ आर्टिकल वापरून एक निश्चित गोष्ट सूचित करतो. उदाहरणार्थ एखाद्याची बायको म्हणते ‘मी तुम्हाला त्या बँकेत भेटेन’. तेव्हा कोणत्या बँकेत ते पतीला ठाऊक असते. त्या बँकेत ते नियमितपणे भेटत असतात. त्याशिवाय त्या ‘द’ बँकेत असे ती म्हणणार नाही. पण जर ती म्हणाली मी तुम्हाला एका बँकेत भेटेन तर तो म्हणेल , ‘एक मिनिट थांब . गावात एवढ्या बँका आहेत. मला नक्की कोणत्या बँकेत भेटशील ते सांग.’ योहान देखील प्रारंभी  हा शब्द वापरताना कोणत्या बिंदूपाशी प्रारंभ , हे सांगत नाही. म्हणून तो विशिष्ट सुरवातीविषयी बोलत नाही. तर ज्या कशाला तुम्ही प्रारंभ म्हणाल अशाविषयी बोलतो. हाच अगदी ठामपणे व्यक्त करणारा मुद्दा ठरेल की ख्रिस्ताला आरंभ नाही. त्या पूर्वी ख्रिस्त होताच असे आढळेल. म्हणजे तो त्या पूर्वीच आहे. कोणत्याही आणि सर्व प्रारंभापूर्वी तो सतत अस्तित्वात आहे. त्याला स्वत:ला प्रारंभच नाही.तो सनातन आहे सदासर्वकाळ आहे असे सांगण्याचा हा एकच पक्का, निश्चित मार्ग आहे. शिवाय योहान म्हणतो ख्रिस्त देवासह होता. हे पित्याच्या संदर्भात म्हटले आहे. ‘सह’ हा प्रत्यय त्याची पित्याशी सर्वकाळ असलेली सहभागिता असल्याचे सूचित करतो. म्हणून देह्धारणाचे महान सत्य हेच आहे की : जो सार्वकालिक पुत्र ,प्रारंभ नसलेला , सतत अस्तित्वात असलेला, तो जगात येण्यासाठी जाणीवपूर्वक कृतिशील झाला आणि मानवी स्वभावाशी जडून जावे म्हणून त्याने मानवी देह स्वरूपाचा देह धारण केला. योहान १:१४ मध्ये आपण पाहतो की योहान म्हणतो, “शब्द देही झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली.”

आपण यशया ७ व ९ अध्यायांकडे अवलोकन करून त्यातील प्रसिध्द भाकितांचा अभ्यास केला तर जास्त सहाय्यकारी होईल. प्रथम यशया ९:६ मध्ये म्हटले आहे ,’ कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांस पुत्र दिला आहे.’ येथे आपल्याला कळविले आहे की , ‘एक बालक जन्मेल ..तो पुत्र …दिला जाईल.’ पुढे काय म्हटले आहे ते नीट पाहा. ‘त्याला अद्भुत …म्हणतील.’ याचा अर्थ ती व्यक्ती अद्भुत असेल. आश्चर्यकारक असेल , वैशिष्ट्यपूर्ण असेल आणि एका अपवादात्मक आश्चर्याने युक्त असेल. त्याला अद्भुत ठरवणारी बाब म्हणजे त्याचे देहधारण होय. तो मनुष्यांमध्ये देवमानव  असणार. त्याला सर्वसमर्थ देव , सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील.’ असे पुढे म्हटले आहे . ते बालक सर्वसमर्थ देव आणि सनातन पिता आहे. लक्षात घ्या, हे एकाच व्यक्तीविषयी म्हटले आहे , दोन व्यक्तींविषयी नव्हे. हे एकच बालक सर्वसमर्थ देव व सनातन पिता आहे. किती नवलाची गोष्ट! इब्री २:२४ मध्ये म्हटले आहे, “ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला.” याचा अर्थ त्याच्या इच्छेने त्याने मनुष्य होण्याचे निवडून तशी कृती केली. तो मानवी स्वभावाने जसा अस्तित्वात आहे तसाच तो दैवी स्वभावाने अस्तित्वात आहे. त्या स्वभावांद्वारे व त्या  स्वभावांमध्ये तो अस्तित्वात आहे. जेव्हा तो मानवी स्वभावाने अस्तित्वात आहे तेव्हा तो दैवी स्वभावात असून दैवी स्वभावाने कृती करण्याचे थांबवत नाही. एकाच वेळी तो दोन्ही स्वभावांनी अस्तित्वात असतो.

याचा अर्थ तो जेव्हा पृथ्वीवर बसलेला असून भोजन करीत होता ; मानवांशी एखाद्या विषयावर चर्चा करीत होता , त्याच वेळी विश्वात व जगात सर्वत्र काय चालले आहे याचे ज्ञान त्याला होते. जरी तो मानव असला तरी तो सर्वज्ञ , सर्वोपस्थित असल्याचे थांबत नाही. तो कोठे भेटीदाखल बसलेला असताना जगातील सगळीकडील सर्व गोष्टींवर व संपूर्ण विश्वावर नियंत्रण करीत असतो. मानवी देह असल्याने त्याला भूक लागते, तहान लागते ,त्रास होतो ; पण त्याच वेळी त्याच्या ठायी दैवी स्वभाव देखील असतो . त्याद्वारे तो सर्व काही जाणतो व सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो . तो सर्वांवर नियंत्रण ठेवतो आणि सर्वांची काळजी घेतो. त्याच वेळी तो एकटा बसलेला असतो अगर भेटी घेत असतो. हे खरोखर अद्भुत विलक्षण आहे! त्याला अद्भुत संबोधणेच रास्त आहे! दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याच्या मानवी देहातून दिसणारे त्याचे नेत्र फक्त मानवी व्यक्तीचे नेत्र नाहीत . तो मानवी देह मानवी नेत्रांसह असला तरी तुमच्याशी संपर्क साधणारी ती व्यक्ती डोळ्यांना नवचैतन्य देणारी आहे. शरीराला नवचैतन्य देणारी व्यक्ती आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रारंभ नसलेला तो पुत्र आहे . खरोखर तो किती गौरवी आहे!

फिलीपै २ मध्ये हाच मुद्दा चर्चिलेला दिसतो. फिली. २:८ मध्ये म्हटले आहे की; ‘(तो) मनुष्यप्रकृतीचा असा प्रगट होऊन  त्याने मरण आणि ते ही वधस्तंभावरचे मरण सोसले , येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले.’ त्याने गुन्हेगाराचे मरण सोसले . सनातन, सार्वकालिक देव मेला ! हा विचारच स्तंभित करून सोडणारा आहे. मग स्वर्गाने आणि सुर्यानेही त्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे. आणि त्यांनी प्रतिसाद दिलाही ! सूर्य व आकाश अंधारून गेले. पृथ्वीनेही प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून पृथ्वी कांपली. तो खरोखर अद्भुत आहे . तो तुमचा तारणारा आहे. पण जर तुम्ही त्याच्याकडे वळून माघारे आला तरच ! तो तुमचा मित्रही आहे. तो सर्व सामर्थ्याने युक्त आहे. तो ज्ञानी आहे. त्याच्या मनात तुमच्याविषयी उत्तम सदिच्छा आहेत. त्याचा पुरावा त्याने वधस्तंभावर दिला यात काही शंकाच नाही.                             

क्रमशः

 

Previous Article

लेखांक ३: जेव्हा देव अन्यायी वाटतो

Next Article

वराला भेटण्याची तयारी

You might be interested in …

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १२  दानिएलाचे सत्तर सप्तकांचे भाकीत –  दानीएल ९:२४-२७. हे भाकित बायबलच्या बहुतेक भाकितांचा कणा आहे. येशूने मत्तय २४:१५ मध्ये केलेले, २ थेस्स. २ मधील पौलाने केलेले, योहानाने प्रकटी ११-१३ अध्यायांमध्ये […]

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना

स्कॉट हबर्ड वाट पाहा. यासारखे काही शब्द असतात जे आनंद देणारे नसतात. अगदी थोडे लोक धीराने आशा उंचावतात आणि मग सोडून देतात. “आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते” (नीती १३:१२). जेव्हा एखाद्या मोलवान गोष्टीसाठी […]

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]