Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 1, 2017 in जीवन प्रकाश

प्रभू काहीही कर पण मला शिस्त लाव

प्रभू काहीही कर पण मला शिस्त लाव

जॉन ब्लूम

.  जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखी माझी बुद्धी असे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत ( १ करिंथ १३:११). याचा अर्थ; मला सुधारणारे  आणि शिस्तीचे वातावरण मी टाळत असे. मी लहान असताना व्यवस्थित घर, नीटनेटका परिसर , वेळेवर जेवण, स्वच्छ कपडे, प्रेमळ उबदार वातावरण हे सर्व मला आवडत असे. पण हे मिळण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त मला साहजिकच आवडत नसे. मी ती टाळायचा प्रयत्न करीत असे. शाळेत, खेळात आणि संगीतात यश मिळण्याची कल्पना मला आवडत असे पण त्यासाठी लागणारे काम आणि परिश्रम करून कौशल्य संपादन करण्याची कल्पना मला स्वाभाविकपणे आवडत नसे. मी बहुधा त्याची टाळाटाळ करत असे.

जर माझ्या अधिकाऱ्यांनी – माझे आईवडील, शिक्षक, प्रशिक्षक – यांनी जर सुज्ञतेने, प्रेमाने मला अप्रिय
आणि इच्छा नसणाऱ्या गोष्टींची माझ्यावर सक्ती केली नसती तर त्यांच्यामुळे मला झालेले फायदे मी कधीच समजू शकलो नसतो. आणि जर त्यांची शिस्त आवडायला आणि आपलीशी करायला जर मी प्रगल्भ आणि सुद्न्य असतो तर तिचे फायदे मला अजूनच चांगले समजले असते. अल्पकाळाच्या वेदनांचे दीर्घकालीन फायदे मला दिसत नव्हते आणि त्यावर तेव्हा माझा विश्वासही नव्हता.

प्रौढता शिस्तीचे स्वागत करते

पण आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत ( १ करिंथ १३:११). आता हे विधान जरा पलीकडचेच वाटते. तरीही आता मी लहान असताना जरी मला कळली नाही तितकी आता शिस्तीच्या स्वाधीन होण्याची किंमत मला समजलेली आहे – विशेषत: प्रभूची शिस्त.

मी २० वर्षांचा असताना मला स्पष्ट्  जाणीव झाली की माझ्या स्वभावामध्ये व वृत्तीत जो बदल व्हावयास हवा तो करण्यास मी असमर्थ आहे. मला शिस्त लावण्याचे माझे प्रयत्न जरी आवश्यक होते तरी बायबल जसे वर्णन करते त्यात व माझ्या अनुभवात फारच मोठी तफावत होती. म्हणून मी माझ्या स्वर्गीय पित्याकडे कळकळीची विनवणी करू लागलो की काहीही कर आणि  मला शिस्त लाव. देवाने मला प्रीतीने उत्तर दिले. मी कधी विचार किंवा योजना करू शकलो नसतो अशा घटनांचा रोख माझ्यावर चालून आला. याचा परिणाम बराच काळ मी अत्यंत कठीण व वेदनामय  आध्यात्मिक लढ्याला तोंड देऊ लागलो. ज्या बाबतीत मला बदल हवा होता त्यातच फक्त नव्हे तर मला जाणीवही नव्हती अशा बाबतीत देव माझ्यामध्ये कार्य करू लागला. सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे देवाने माझा विश्वास खोल आणि बळकट करताना  वैयक्तिक रीतीने आणि सामर्थ्याने माझी भेट घेतली. नंतर मला दिसून आले की मला जे फायदे झाले ते माझ्या वेदनामय संघर्षाच्या फार पलीकडचे होते.
या अनुभवामुळे पुढील काही वर्षात जेव्हा मला पुढे जाण्याची  गरज होती तेव्हा तेव्हा मी वारंवार प्रार्थना करू लागलो व प्रसंगी उपवासही करू लागलो. आणि त्याने प्रेमाने मला उत्तर दिले. त्याची काही शिस्त पहिल्यापेक्षा अधिक कडक असे तर काही कमी . काहीही असो, त्या प्रार्थंनाचा मला कधीही पस्तावा झाला नाही किंवा प्रार्थना करणे मी बंद केले नाही.  कारण त्यांच्याद्वारे देवाने माझी त्याच्यासाठी असलेली प्रीती इतकी खोलवर वाढवली की नाहीतर ती मला  कधीही समजली नसती.
जी ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या सान्निध्याचा उपभोग घेते, त्याच्यामध्ये आनंद करते  तीच देवाला मला शिस्त लाव अशी प्रार्थना करू शकते. देवामध्ये अधिक आनंद मिळण्याची पात्रता वाढण्याची ही प्रार्थना आहे.

प्रभू ज्याच्यावर प्रेम करतो त्याला शिस्त लावतो

इब्री १२:३-११चा हाच मुद्दा आहे. जेव्हा देव आपल्याला शिस्त लावतो तेव्हा जे शुद्ध आणि  चांगले आपल्याला मिळते त्याचे हे खरे स्पष्टीकरण आहे.

जेव्हा देवाची शिस्त जेव्हा आपल्याला लागू होते तेव्हा  जरी आपण तिच्यासाठी प्रार्थना केली असेल तरी आपल्याला त्याची जाणीवही नसते. याचे कारण आपल्या अपेक्षेपेक्षा ती फारच वेगळी दिसते. मग आपल्या दु:खात आणि गोंधळात आपण त्याच्याकडे आरोळी करतो . आणि देव उत्तर देतो: “माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको.
 कारण ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो.” इब्री १२:५-६

दुसऱ्या शब्दात “घाबरू नकोस. हे माझ्याकडून आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून हे आहे.” बहुधा आपण म्हणतो “पण बापा हे फार कठीण आहे ! हे प्लीज थांबव “ आणि देव म्हणतो:
“शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?  जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.  याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?  आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.”  इब्री १२:७-१०

दुसऱ्या शब्दांत “ मी तुझ्यावर आतिशय प्रेम करतो आणि या शिस्तीद्वारे तुझ्यामध्ये जे चांगले घडणार आहे त्यामुळे मी हे थांबवू शकत नाही.” आपण कदाचित प्रतिसाद देऊ, “मला तुझ्याकडून चांगले हवे आहे बापा, पण यात मी तग धरू शकेन असे मला वाटत नाही. मला अतिशय वेदना होतात” याला देव त्याच्या  सुद्न्य आणि दयाळू आणि प्रीतीच्या खंबीरतेने म्हणतो “शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दु:खाची वाटते पण नंतर ज्या लोकांना तिच्याकडून वळण लागले आहे, त्यांना ती पुढे नितीमत्त्व हे शांतिकारक फळ देते.” इब्री १२:११
दुसऱ्या शब्दांत “माझी शक्ती तुला पुरे आहे कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. २ करिंथ १२:९ आणि नंतर या वेदनामय शिस्तीबद्दल तुला पस्तावा होणार नाही.

काहीही कर प्रभू..

देवाचा आनद उपभोगणारी व्यक्ती प्रार्थनापूर्वक पित्याच्या शिस्तीचे स्वागत करते तर कधी या शिस्तीची मागणी करते. हे आध्यात्मिक प्रौढत्वाचे लक्षण आहे. जे नाशवंत सुख आहे त्याच्यापेक्षा ती खऱ्या संपत्तीची आशा करते (इब्री ११:२५-२६).

जर आपल्या पित्याची शिस्त टाळण्याचा आपण प्रयत्न केला, आणि देवाने खरेच उत्तर दिले तर काय या भीतीने आपण त्यासाठी मागत नाही तर आपण आध्यात्मिक लहान बालकांसारख विचार करतो देवाच्या देणगीला  आपण म्हणतो “ मला नको प्रभू” आणि ही देणगी तर कल्पनेपलिकडची  , आत्म्याचा शोध घेणारी विश्वास दृढ करणारी आनंद वाढवणारी –  व बुद्धीस अगम्य अशी देवाची प्रीती समजण्यास मदत करणारी असते. (इफिस ३: १८,१९) पण आपल्याला अल्पकाळ होणार्या वेदनांच्या विचाराने आपण ती देणगी नाकारतो.