दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

योहानाचे  १ ले पत्र : प्रस्तावना

योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात घेता त्याला पत्र म्हणणेच उचित ठरते. यावेळी प्रेषित योहान हयात असताना मंडळ्यांत सर्वांच्या परिचयाचा होता, तो अधिकारवाणीने आपल्या वाचकांना पूर्ण आज्ञापालनाचे आव्हान करत होता. तो वाचकांना व वाचक त्याला इतके परिचित होते. हे त्यानेच आपल्याला पत्र लिहिले असल्याबद्दल कोणालाही शंका नव्हती त्यामुळे योहानाला आपल्या नावाचा उल्लेख करायची गरजही वाटली नाही.

याकोब व योहान हे जब्दीचे पुत्र. येशूने त्यांचे नाव ‘गर्जनेचे पुत्र’ असे ठेवले होते (मार्क ३:१७; मत्तय १०:२-४). पेत्र, याकोब व योहान येशूचे निकटवर्ती शिष्य होते (मत्तय १७:१). त्यामुळे योहान येशूच्या सेवेचा प्रत्यक्ष साक्षी होता (१:१-४). योहानाचे शुभवर्तमान त्यानेच लिहिले. त्यात तो स्वत:चा उल्लेख ‘ज्याच्यावर येशूची प्रीती होती’ असा करतो. शेवटल्या भोजनाच्या वेळी येशूच्या उराशी टेकलेला असा त्याचा उल्लेख आहे (योहान १३:२३; १९:२६; २०:२; २१:७,२०). प्रकटीकरणाचे पुस्तक त्यानेच लिहिले (प्रकटी १:१).

या पुस्तकात ऐतिहासिक नोंद नसल्याने लिखाणाचा अचूक कालावधी सांगणे कठीण आहे. तरी पहिल्या शतकाअखेर ते लिहिले याबद्दल वाद नाही. योहान आपल्या वृद्धापकाळी आशिया मायनरमधील इफिसात राहून सेवेत व लिखाणकामात  कार्यरत होता असे मंडळीच्या आख्यायिका सांगतात. ‘माझ्या लेकरांनो’ (२:१,१८,२८) असे संबोधून वाचकांपेक्षा आपण वृद्ध असल्याचे तो स्पष्ट सूचित करतो. योहानाच्या शुभवर्तमानाचा सूरही असाच आहे. त्यामुळे शुभवर्तमानानंतर लगेच ही पत्रे लिहिल्याचे संकेत मिळतात. शिवाय अज्ञेयवादाला सुरुवात झाली तेव्हाच  योहान लिखाणात कार्यरत असताना ते लिहिल्याचे त्यातील आशयावरून दिसते. दोमितीयनने ९५ साली छळ सुरू केला. त्याचा उल्लेख पत्रात नसल्याने ९० -९५ सालादरम्यान ते लिहिल्याचे सूचित होते.

पार्श्वभूमी
जरी योहान तेव्हा फार वृद्ध होता तरी तो मंडळीच्या कामात जोमाने सहभागी होता. येशूचा भूतलावरील संपूर्ण सेवाकाल, मरण, पुनरुत्थान व स्वर्गारोहणाचा तो जवळचा प्रत्यक्ष साक्षी होता. त्यानंतर आशिया मायनरमध्ये राहून त्याने व्यापक सुवार्ताकार्य केले;  नवीन मंडळ्यांची देखभाल केली व मोठ्या प्रमाणात लिखाणकाम केले. नव्या करारातील पाच पुस्तके लिहिली. त्याच्याशी थेट संबंध असलेल्या मंडळीच्या पपियास या वडिलाने त्याचे वर्णन ‘जिवंतपणे वास्तव्यास असणारी वाणी ‘ असे केले आहे. या शेवटच्या प्रेषिताची मंडळीतील साक्ष  मंडळ्यांमध्ये अत्युच्च अधिकृत मानली जात होती. त्याच्या तोंडून येशूविषयी प्रथम दर्शनी साक्ष ऐकायला लोक सतत अतिशय उत्सुक असत.

इफिस हे आशिया मायनर मधील बौद्धिक केंद्र होते. पौलाच्या भाकिताप्रमाणे ( प्रे. कृ. २०:२८-३१) मंडळीतूनच खोटे शिक्षक उठत होते. तेव्हाच्या वाढत्या प्रचलित तत्त्वज्ञानाकडे झुकत होते. मंडळ्यांना खोट्या सिद्धांतांची लागण होत होती. प्रेषितांच्या मूलभूत शिक्षणाला ते भ्रष्ट करत होते. खोट्या शिक्षकांच्या नवीन कल्पनांना कालांतराने “अज्ञेयवाद” म्हणून ओळखले जाऊ लागले. पौलाने नियमशास्त्र मुक्तीचा मोठा लढा दिल्यानंतर पहिल्या तीन शतकांत आरंभीच्या मंडळीला अज्ञेयवादाच्या धोकादायक पाखंडाने मोठी दहशत घातली. मंडळीच्या मूलभूत विश्वासाला धमकी देणाऱ्या या जहाल पाखंडाशी प्रारंभीच योहान द्वंद्व युद्ध करतो.

प्लेटोचा या अज्ञेयवादावर प्रभाव पडला होता. त्याचा द्वैतवादाचा दावा असा होता की भौतिक गोष्टी मुळात पाप आहेत व आत्मा चांगला आहे. ही कल्पना गृहीत धरून परिणामी हे खोटे शिक्षक येशूचे देवत्वाचे काही गुण मान्य करीत असले तरी त्याचे मानवत्व निष्पाप राहू शकत असल्याचे मानत नव्हते. खोल गोष्टींच्या उच्च सत्यांचे आकलन होणाऱ्यांचेच ज्ञान वरचढ असते असा त्यांचा दावा होता. ते म्हणत की रहस्यमय सत्याचे ज्ञान देवाच्या वचनापेक्षाही उच्च आहे.

मानवी कल्पनांचा न्याय करायला देवाच्या वचनाला उभे राहू देण्याऐवजी मानवी ज्ञान देवाच्या प्रकटीकरणाचा न्याय करायला उभे राहात होते (२:१५-१७). त्यांचे एक मत होते की येशूचे शरीर खरे नसून ते वरवर तसे वाटत होते. म्हणून योहान ठामपणे त्याच्या शरीराचे खरेपण ठासून सांगताना आपल्या वाचकांना प्रत्यक्ष साक्षी म्हणून आपण त्याला पाहिले, ऐकले, न्याहाळले, स्वहस्ते चाचपले असल्याचे ‘येशूख्रिस्त देह धरून आला’ असे सागतो (१:१-४; ४:२,३). त्यांचे दुसरे मत होते की मानवी देहाच्या येशूवर बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र आत्मा उतरला पण तो वधस्तंभी जाण्यापूर्वी त्याला सोडून गेला. योहान त्याला प्रत्युत्तर देताना म्हणतो की सेवेच्या आरंभी बाप्तिस्मा घेताना येशू जशी व्यक्ती होता तशीच व्यक्ती तो वधस्तंभी गेला तेव्हा होता (५:६).

असली पाखंडी मते येशूच्या खऱ्या मानवधारी होण्याच्या सत्याचा विध्वंस करतातच एवढेच नव्हे तर त्याचे बदलीच्या प्रायश्चित्ताच्या मरणाच्या सत्याचाही विध्वंस करतात. यासाठीच तर येशू खरा देव व शरीराने खरा मानव असणे अगत्याचे होते. म्हणूनच खरोखरचे त्याने दु:खसहन केले व आपल्या पापांबद्दल बदलीच्या मरणाने पित्याला मान्य होणारे असे आपल्या शरीराचे वधस्तंभावर अर्पण केले (इब्री २:१४-१७). बायबलचा दृष्टिकोन येशूचे पूर्ण मानवत्व व पूर्ण देवत्व ठामपणे मांडतो.

अज्ञेयवाद भौतिक गोष्टी वाईट व आत्मा चांगला आहे असे मांडत असल्याने लोकांची अशी कल्पना होऊ लागली की शरीराचे अनैतिक लाड करायला हरकत नाही; कारण शरीराने केलेल्या पापाचा आत्म्याशी काही संबंध नाही व त्यावर त्याचा काही परिणामही होत नाही. मग अनैतिक वर्तनाला आपल्याला परवानगी आहे, पाप अस्तित्वात नाही असे म्हणण्याची कल्पना रुजू लागली होती (१:८-१०). देवाच्या नियमांचा लोक अनादर करू लागले होते (३:४). देवाच्या नियमांचे पालन करण्यावर योहान जोर देतो. कारण देवावरील प्रीतीची व्याख्या तो देवाचे आज्ञापालन करण्याशी करतो (५:३). विश्वासी बंधुजनांबद्दल प्रेम न वाटणे हे खोट्या शिक्षकाचे लक्षण आहे. विशेषत: त्यांची नवी विचारप्रणाली धिक्कारणाऱ्यांचा ते प्रतिकार करतात (३:१०-१८). जे प्रेषितीय शिक्षणाला धरून राहिले त्यांच्या सहभागितेपासून फसलेल्या अनुयायांना त्यांनी वेगळे केले होते. त्याला उत्तर देताना योहान म्हणतो की त्यांच्या या विभक्त होण्यातून हेच निर्देशित होते की ह्या खोट्या शिक्षकांमागे जाणाऱ्या अनुयायांचे खऱ्या अर्थाने तारणच झाले नव्हते (२:१९). त्यांच्या जाण्याने प्रेषितीय शिक्षणाशी विश्वासू राहिलेल्या विश्वासीयांना मोठा धक्का बसला होता. या परिस्थितीला प्रतिसाद देताना हा वृद्ध प्रेषित उरलेल्या विश्वासीयांना खात्री देतो व मंडळीला असलेल्या या गंभीर धाकाशी द्वंद्व करतो. या पाखंडाची तीव्रता भयानक धोक्याची होती आणि तो काळ मंडळीसाठी फारच महत्त्वाचा होता कारण या खोट्या शिक्षणाने अतिशय जोर धरला होता. त्यामुळे योहान सौम्यतेने, प्रेमाने प्रश्न न करता प्रेषितीय अधिकाराने मंडळ्यांना हे पत्र पाठवतो व मरीप्रमाणे फैलावत चाललेल्या या खोट्या शिक्षणावर आपला प्रभाव पाडतो.

ऐतिहासिक व ईश्वर विज्ञानाचे विषय
पत्रामागची परिस्थिती विचारात घेता १ ले योहानाचा सर्वसाधारण विषय “मूलभूत विश्वासाचे स्मरण” किंवा” ख्रिस्ती मूलभूत सिद्धांतांकडे परतणे” हा आहे. प्रेषित मतप्रणाली किंवा तर्क नव्हे तर खात्री असण्यावर जोर देतो. अगदी सोप्या भाषेत तो शुद्ध ख्रिस्ती चारित्र्य स्पष्ट करतो. त्याची भाषा सुस्पष्ट, समजेल अशी अचूक व  त्या सत्याच्या मूलभूत स्वरूपाविषयी शंका राहू देणार नाही अशी आहे. उबदार, संवादात्मक भाषेत हा मृदू बाप हळूवार व प्रेमळ स्वरात आपल्या मुलांशी घनिष्ठ संवाद साधत आहे असा अनुभव येतो.

आपल्या लोकांविषयीच्या ऱ्हदयपूर्वक काळजीतून एका पाळकाने आपल्या मंडळीला लिहिलेले हे पाळकीय पत्रही आहे. मेंढपाळ म्हणून योहान आपल्या कळपाला काही मूलभूत, पण अत्यावश्यक मूलभूत विश्वासाविषयीच्या सिद्धांतांची पुन्हा खात्री करून देतो. खोट्या शिक्षकांच्या शिकवणीमुळे व काही जण सोडून गेले म्हणून अस्वस्थ न होता त्यांच्या विश्वासाच्या खात्रीविषयी त्यांनी आनंद करावा अशी योहान इच्छा करतो (१:४).

पुस्तकाचा दृष्टिकोन पाळकीय तर आहेच पण सकारात्मक व नकारात्मक वादविवादाचाही आहे. जे सुशिक्षणाला सोडून गेले ते चुकले असल्याचे तो सिद्ध करतो. दैवी सत्याचा विपर्यास करणाऱ्यांचे खपवून घेतले जाणार नाही हे प्रदर्शित करतो. सत्यापासून बहकून जाणाऱ्यांना तो “खोटे संदेष्टे ” (४:१), “बहकवणारे”( २:२६;३:७),
“ख्रिस्तविरोधी” (२:१८) असे संबोधतो. सुशिक्षणापासून अशा बहकणाऱ्यांची ओळख करून देताना त्यांचा उगम सैतानात असल्याचे तो मार्मिकपणे सांगतो (४:१-७).

या प्रमुख विषयाला धरून तो तीन उपमुद्दे ख्रिस्ती विश्वासाचा मूलभूत पाया मजबूत  करायला सांगतो: आनंद (१:४), पावित्र्य (२:१) व  संरक्षण (५:१३). या मूलभूत विश्वासूपणामुळे त्याचे वाचक आपल्या जीवनात हे तीन परिणाम सातत्याने अनुभवणार होते. या पत्रात खऱ्या आत्मिकतेच्या चक्राची किल्ली या तीन गोष्टी प्रकट करतात.

येशूख्रिस्तावरील योग्य विश्वास त्याच्या आज्ञांचे पालन करणे निपजवतो; आज्ञापालनातून देवावरील  प्रीती व इतर विश्वासीयाशी सहभागिता ही व्यक्त होतात (३:२३,२४). जेव्हा सुशिक्षणावरील दृढ विश्वास, आज्ञापालन, प्रीती या तीन गोष्टी एकत्रितपणे कार्यरत असतात तेव्हा त्याचा परिणाम आनंद, पावित्र्य व खात्री हा असतो. खऱ्या ख्रिस्तीत्वाचा हाच पुरावा होय.

विचार करा
खोट्या संदेष्ट्यांची विचारप्रणाली न मांडता योहान ख्रिस्ती मूलभूत विश्वासाचे पुन्हा प्रतिपादन करून पाखंडी मतांचे खंडन करीत आपला वाद मांडतो. योहान फक्त २:१,२ मध्ये परिस्थिती उदाहरणादाखल घेऊन सिद्धांत मांडतो. बाकी संपूर्ण पत्रात काळ्या दगडावरील पांढऱ्या रेघेप्रमाणे सुस्पष्ट रीतीने सिद्धांत सांगतो. उदा. प्रकाशा विरुद्ध अंधार (१:५-७;२:८-११), सत्य – असत्य (२:२१,२२;४:१), देवाची मुले व सैतानाची मुले (३:१०). जे ख्रिस्ती म्हणवतात त्यांनी खरी ख्रिस्ती लक्षणे जीवनातून दर्शवलीच पाहिजेत: ती म्हणजे सिद्धांत शिक्षणाचे दृढ ज्ञान, प्रीती व आज्ञापालन. जे नव्याने जन्मले आहेत त्यांना देव नवीन स्वभावच देतो. स्वभावात बदल हाच मोठा पुरावा होय. जे नवीन जीवनाची लक्षणे आपल्या जीवनात दर्शवीत नाहीत त्यांच्या ठायी तो नवीन स्वभाव नसतोच; म्हणजे त्यांचा खरोखर नवीन जन्मच झालेला नसतो. एखाद्या व्यक्तीचे खरोखर तारण झाले आहे की नाही हे निश्चित करण्यास मूलभूत कसोट्यांचे लागूकरण करायला हे पत्र सांगते. शुद्धतेचे वेगळेपण हे योहानाच्या शुभवर्तमानाचे देखील विशेष लक्षण आहे. योहान पुन्हा पुन्हा खऱ्या ख्रिस्ती जीवनाच्या मूलभूत सत्यांची पुनरावृत्ती करतो. प्रत्येक वेळी ते सत्य विस्ताराने मांडत जातो व मोठे क्षेत्र व्यापत राहतो.  प्रत्येक वेळी ते सत्य अंतर्यामाला खोलवर भोसकून जाते. अशाने तो या सत्यांना किती महत्त्व आहे हेच दाखवून देऊन आपल्या वाचकांना ती समजून घेऊन लक्षात ठेवायला  मदत करतो.

रूपरेषा
(।) चक्राचा पहिला वेढा: खऱ्या सहभागितेच्या मूलभूत कसोट्या (१:१-२:१७). (अ) सिद्धांताची मूलभूत कसोटी (१:१-२:२), ख्रिस्ताविषयी व पापाविषयी बायबलचा दृष्टिकोन (ब) नैतिकतेच्या मूलभूत कसोट्या (२:३-१७). आज्ञापालनाचा व प्रीतीचा बायबलचा दृष्टिकोन; देवाला अपेक्षित असणारी प्रीती (२:१-७) व देवाला द्वेष्य वाटणारी प्रीती (२:१२-१७).

(।।) चक्राचा दुसरा वेढा: खऱ्या सहभागितेच्या मूलभूत कसोट्या (२:१८-३:२४). (अ)सैद्धांतिक कसोट्या (२:१८-२७). ख्रिस्तविरोधी ख्रिस्ती सहभागिता सोडून देतात (१८-२१); ख्रिस्ती विश्वास नाकारतात (२२-२५); विश्वासू ख्रिस्ती लोकांना फसवतात(२६,२७). (ब) नैतिक कसोट्या २:२८-३:२४. प्रभूच्या पुनरागमनाची आशा शुद्धीकरण करत राहते (२:२८-३:३). ख्रिस्ती व्यक्तीची पापाशी स्पर्धा नाही (३:४-२४). नीतिमत्वाची अपेक्षा (३:४-१०); प्रीतीची अपेक्षा (३:११-२४).

(।।।) चक्राचा तिसरा वेढा: खऱ्या सहभागितेच्या मूलभूत कसोट्या (४:१-२१). (अ) सैद्धांतिक कसोटी (४:१-६);  सैतानी खोट्या शिक्षणाचा उगम (४:१-३); सुशिक्षणाची गरज (४:४-६). (ब) नैतिक कसोटी (४:७-२१); देवाचा प्रीतीचा गुणविशेष (४:७-१०); देवाची प्रीतीविषयी अपेक्षा (४:११-२१).

(।v) चक्राचा चौथा वेढा: खऱ्या सहभागितेच्या मूलभूत कसोट्या (५:१-२१). (अ) ख्रिस्तामध्ये विजयी जीवन (५:१-५); (ब) ख्रिस्ताविषयी देवाची साक्ष (६-१२). (क) ख्रिस्तामुळे मिळणारी खात्री (१३-२१). सार्वकालिक जीवनाची खात्री (व.१३); प्रार्थनेचे उत्तर मिळाल्याची खात्री (१४-१७); पाप व सैतानावर विजय मिळाल्याची खात्री (१८-२१).

 

Previous Article

भारतात सुवार्तेवर झालेले हल्ले

Next Article

धडा १    पाहणे आणि विश्वास ठेवणे   योहान १:१   – स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो…”

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” योहान ७:३८. येशूने असे म्हटले नाही की,जोमाझ्यावर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाचा अनुभव येईल. तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून त्याला जे काही […]

माझा पुनर्जन्म नक्की झाला आहे का? विल्यम फार्ली

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जी व्यक्ती माझा पुनर्जन्म झाला आहे असा दावा करते ती ख्रिस्ताची खरीखुरी अनुयायी असते. लाईफ वे रिसर्च या संस्थेने २०१७ मध्ये एक सर्वेक्षण केले. त्यात त्यांना आढळले की अमेरिकेतील २४% […]

 स्तोत्र १३३ – उपासना (॥)

वर्षातून तीन वेळा देवाने नेमून दिलेल्या सणांसाठी सीयोन डोंगरावरील यरुशलेमातील मंदिरात जाहीर उपासनेसाठी एकत्र जमून डोंगर चढून जाताना उपासक जी स्तोत्रं आळीपाळीनं म्हणत चढण चढत असत; त्या १२० ते १३३ या पंधरा आरोहण स्तोत्रांच्या विषयांची […]