दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवावर विश्वास (मार्गदर्शनासाठी) लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

रोजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तो देवाने नेमला आहे. जर आपण जीवनाला कंटाळलेले असू तर काहीतरी चुकले आहे. देवाच्या संकल्पनेविषयी आपण गल्लत केली आहे. देवाची आपल्या जीवनातील गुंतवणूक आपल्याला समजलेली नाही. अगदी उदासवाणे, दमणूकीचे दिवसही देव त्याच्या गौरवार्थ वापरतो. पौल म्हणतो; तुला स्वतंत्र व्हायचंय? हो. तुला पाचारण झाले तेव्हा तू गुलाम होतास का? अस्वस्थ होऊ नकोस. आपली परिस्थिती सुधारायला आपण देवभीरू वृत्तीने प्रयत्न करायचे. ती परिस्थिती आहे तशी स्वीकारायची. ती आपण नव्हे तर देवच बदलू शकतो. आपण प्रार्थना केल्याशिवाय काही आवश्यक बदल होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला देवाच्या सांत्वनाची गरज आहे. यिर्मया२९:११ पाहा. “परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात संकल्प आहेत, ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत”  हे  वचन त्या काळात बंदीवासात गेलेल्यांसाठी असले तर त्यातून देवाचे ह्रदय आपल्या मुलांसाठी कसे आहेत ते व्यक्त होते. जशी त्यांच्यासाठी त्याने योजना आखली तशीच तो आपल्या कल्याणासाठी आखतो. त्याने आखलेली योजना आपल्या कल्याणासाठी आहे. आपल्या भरभराटीसाठी आहे. इजा व्हावी म्हणून नाही. काही बाबतीत त्याची योजना इजा करणारी वाटते. आशावादी वाटत नाही. पण आपण विश्वासाने त्या आपत्तीतून वाटचाल करायची. अखेर आपले कल्याणच होणार.

देवाने आपल्यासाठी योजना आखली आहे आणि ती आहे तशी स्वीकारण्यात आपले हित आहे. हे आपल्या लक्षात आले तरी प्रश्न येतो की मी यासाठी देवावर भरवसा टाकावा का? समजा मी चूक केली, माझा मार्ग चुकला तर? मग त्यासाठी देवाचे मार्गदर्शन घेणे व देवाची इच्छा समजून घेणे यातील फरक लक्षात यायला हवा. “तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो आपल्या नामास्तव मला नितीमार्गाने चालवतो” (स्तोत्र २३:२,३). मेंढपाळ मेंढरांना चालवतो, हे चित्र या स्तोत्रात आहे. मेंढपाळ पुढाकार घेताना दिसतो. तो पाण्याच्या जागा ठरवून तेथे नेतो. मेंढरासाठी काय उत्तम ते त्याला समजते. त्याचप्रमाणे देवाने आपल्यासाठी उत्तम मार्ग ठरवले आहेत. सार्वभौमत्वाने तो त्या मार्गाने चालवतो. रोजचे अनुभवही देवाने ठरवले आहेत.

एखाद्या गोष्टीसाठी देवाची इच्छा समजून घेणे आणि सुज्ञतेने निर्णय घेणे यात भिन्नता आहे. तो अभ्यास आपण करणार नाही. पण देव मार्गदर्शन करण्यात विश्वासूपणे पुढाकार घेतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याची नेमलेली योजना आपण पूर्ण करतो. आपल्याला वाटते देवाची इच्छा शोधणे आपली जबाबदारी आहे. आपण निर्णय घ्यायचे असतात. पण देवाचे वचन शिकवते की देव आपल्याला मार्गदर्शन करत असतो. यहूदा इस्कार्योतच्या जागी मत्तयाची निवड करताना शिष्य देवाची इच्छा समजून घेताना दिसतात. पुढे देव मार्गदर्शन करण्याविषयीच्या नोंदी दिसतात. प्रे. कृ. १६ मध्ये पौल सुवार्ताफेरीला एका मार्गाने जात असता देवाचा आत्मा त्याला दोन वेळा थांबवतो. अखेर देव त्यांना मासेदोनीयात जायला सांगत असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे थोपवले गेले, दुसरीकडे ‘जा’ सांगितले गेले. पवित्र आत्म्याने कसे मार्गदर्शन केले ते दिले नाही. पण पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केले. देवाची इच्छा शोधणे पौलावर सोडले नाही. तर पौल पुढे वाटेने जात असता देवाने त्याला मार्गदर्शन केले. आपल्या प्रत्येकासाठी देवाची योजना आहे. विविध वरदाने देऊन त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या मंडळीत रोपले आहे. आपल्याला निवड करण्यास जागा ठेवली नाही. म्हणजे आपल्याला त्याच्या शरीरात योग्य स्थानी तो ठेवणार आणि त्याचा हेतू सफळ करणार… देवाची इच्छा ओळखून योग्य निर्णय घेण्याची आपली जबाबदारी असतेच. पण देवाची इच्छा सार्वभौम असते. ती अकस्मात घडत नसते. त्यात आपले सुज्ञतेचे आणि मूर्खतेचे दोन्ही प्रकारचे निर्णय समाविष्ट असतात. आपण जीवनातील कितीतरी निर्णय आपल्याला आत्मिक सुज्ञता येण्यापूर्वीच घेतले आहेत. तरीही देव त्याच्या मार्गदर्शनात स्वत: पुढाकार घेतो. मागे वळून पाहिल्यास आता आपल्या लक्षात येईल की, कित्येक निर्णयात देवाचे मार्गदर्शन स्पष्ट दिसते. “हे देवा तुझे संकल्प किती मोलवान आहेत. त्यांची संख्या किती मोठी आहे (स्तोत्र १३९:१७). आपल्याला तपशीलवार मार्गदर्शन करण्यात देव कार्यमग्न आहे. आपण काही चुकीचे निर्णय घेतले असतील तरी त्या चूक, बरोबर निर्णयातून देवाने विश्वासूपणे त्याच्याच वाटेवर आणले. मी सुज्ञतेचे निर्णय घेतले म्हणून आज जेथे मी असायला हवा तेथे आहे असे मुळीच नाही. तर मी देवाच्या मार्गावर राहावे म्हणून देवाने मला विश्वासूपणे मार्गदर्शन केले. देवाचे मार्गदर्शन एकेका पावलागणिक असते. आपण फक्त त्याच्यावर विश्वास टाकायचा. याचा अर्थ आपण निष्क्रिय राहायचे असे नाही. देवाने आपल्याला विचार करणारा प्राणी बनवले आहे. तो आपल्या मनाला मार्गदर्शन करतो आणि त्याच्या सान्निध्यात येऊन समस्या सोडवायला उद्युक्त करतो. आपण विचारप्रक्रियेतून जात असतानाच देव आपले मार्गदर्शन करतो. तो आपल्याशी खेळ खेळत नाही. त्याची इच्छा शोधण्यासाठी चाललेली आपली धडपड गंमत म्हणून तो पाहत नाही. तर म्हणतो, “तू योग्य निर्णय घेशील असे मला वाटते,” त्याच्यावेळी त्याच्या पद्धतीने त्याच्या मार्गावर तो आपल्याला चालवतो. मार्गदर्शनासाठी आपण देवावर भरवसा टाकू शकतो. त्याच्या सिंहासना समोर उभे राहून आम्ही देवाची इच्छा शोधली असे पालुपद आपण म्हणू नये. तर येशूने मला त्याच्या मार्गात चालवले असे म्हणावे.

विपत्तीद्वारे वृद्धी
“माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हांस ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो. आणि धीराला आपले काम करू द्या. ह्यासाठी की, कशातही उणे न पडता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी” (याकोब १:२-४). रेशमाचा कोश आपल्या आपण उघडू न देता एकाने तो जबरदस्तीने उघडला. तेव्हा त्यातून फुलपाखरू बाहेर आले पण ते दुर्बल होते. उडू शकत नव्हते. मग ते शेवटच्या घटका मोजू लागले. उघडण्यासाठी त्याचे स्नायू बळकट होण्यापूर्वीच त्याला त्याची धडपड करून बाहेर येऊ न देता जबरदस्तीने बाहेर काढल्यामुळे ते अपंग बनले, अखेर त्याचे अस्तित्वच नष्ट झाले. जीवनातील विपत्ती अशाच असतात. देव त्यांचा वापर आपले स्नायू बळकट करण्यासाठी करतो. विश्वासाच्या कसोटीमुळे धीर येतो. धीरामुळे परिपक्वता येते. विपत्तीशिवाय हे निष्पन्न होत नाही. आपल्याला कोणी अन्यायाने वागवल्याशिवाय ख्रिस्ताची खरी प्रीती कळणार नाही. अनपेक्षित घटनामुळे आपल्या जीवनाची शकले उडल्याशिवाय व दु:ख झाल्याशिवाय आनंदाचा अनुभव आपल्याला येणार नाही. विपत्ती आपली शांती हरण करते तेव्हाच आपल्याला सहनशीलता व धीर  यांचा अनुभव येतो. या विपत्ती पाठवून देव आपली वृद्धी करतो. म्हणून त्याच्या पुत्रासारखे होण्यास आपण त्याच्याकडे धाव घ्यावी.. देवाला आपल्यापेक्षा अधिक ज्ञान व सुज्ञता आहे. आपल्याला त्या विपत्तीचा फायदा होतो. आपली वृद्धी होईपर्यंत देव ती विपत्ती काढून घेत नाही. दु:खात आनंद करण्याविषयी पौल व याकोब सांगतात (रोम ५:३-४; याकोब १:२-४). ते आपल्याला कठीण वाटते. एखादे वेळी सहनशील राहू. पण आनंद? ही अवास्तव, तर्कहीन अपेक्षा वाटते. आपण वेदनेत आनंद मानून घेत नाही. पण त्या संकटांत फायदेशीर परिणामासाठी आनंद करा असे ती वचने सांगतात.

विपत्ती ही आनंदाची पार्श्वभूमी नसते तर चारित्र्यविकास व्हावा अशी परिणामी अपेक्षा असते. म्हणून विपत्तीत आनंद करायचा. काम गमावले म्हणून आनंद करायला देव सांगत नाही. आजार आले, प्रियजन गेले, मूल रोगी जन्मले म्हणून आनंद करायला देव सांगत नाही. तर तो सूत्रधार आहे, परिस्थिती त्याच्या नियंत्रणखाली आहे, म्हणून आनंद करायला सांगतो. ख्रिस्ती जीवन सातत्याने विकास पावण्याचे जीवन आहे, वृद्धी होणे आपल्याला आवडते पण त्यासाठी ही प्रक्रिया आपल्याला नको असते. कारण आपले लक्ष विपत्तीवर केंद्रित असते. त्यापलीकडे जाऊन देव त्या घटनेद्वारे काय करीत आहे ते आपण पाहत नाही. “ जो आनंद येशूपुढे ठेवला होता त्याकरता लज्जा तुच्छ मानून त्याने वधस्तंभ सहन केला” (इब्री १२:२०). मानवी पापावर आलेली सर्वात मोठी आपत्ती म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. तरीही पुढे ठेवलेल्या आनंदाकडे पाहत त्याने ते दु:ख सहन केले. त्याच वचनात म्हटले आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याजकडे पाहत असावे” तो आपला कित्ता आहे. विपत्तीपलीकडे पाहून देव आपल्या जीवनात कार्य करीत असल्याबद्दल आपण आनंद करू या.

 

 

Previous Article

आनंदाचा विजय लेखक : डेविड मॅथिस

Next Article

सात वचनांमध्ये विवाहाची कहाणी लेखक : डेविड मॅथिस

You might be interested in …

एक गोष्ट तुम्ही कधीही गमावू नका लेखक : जॉन ब्लूम

देवाने तुम्हाला सर्वात प्रथम जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तुम्ही दक्ष कारभारी असावे. यामध्ये सर्व गोष्टींहून अधिक राखायची एक प्रमुख बाब आहे. तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ती म्हणजे: तुमचा जीव राखणे. आत […]

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

क्रिस विल्यम्स   “दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण विश्वासू मनुष्य कोणास मिळतो? जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.” निती २०:६-७ हे फळ नीति. ३१ सारखे आहे. जसे  सुद्न्य स्त्री मिळणे […]

 प्रेषितांची उमटलेली पावले

प्रकरण ४ काळ इ.स.३०० ते १५०० या सुमारे १००० वर्षांच्या कालखंडातील ख्रिस्ती मंडळीच्या उत्कर्षाची माहिती फारच तुटपुंजी असल्याने आपण ती एकदमच सलग पहाणार आहोत. पंतैनस अलेक्झान्द्रियास परतल्यानंतर भारतावर पुन्हा पडदा पडला. नंतरच्या शतकात तो पुन्हा […]