Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 17, 2019 in जीवन प्रकाश

लैंगिक पापाशी लढण्याचे चार मार्ग                                                  सॅम अॅलबेरी

लैंगिक पापाशी लढण्याचे चार मार्ग सॅम अॅलबेरी

देवाने मानवाला जसे असावे तसे केलेल्या निर्मितीविरुध्द लैंगिक पाप आहे. हा धडा बायबल आपल्याला नीतिसूत्राच्या ५व्या अध्यायामध्ये देते. येथे सुज्ञ मनुष्य तरुण विवाहित पुरुषाला व्यभिचारिणी विरुध्द सांगत आहे.

तुम्ही तरुण असाल, विवाहित असाल किंवा पुरुष असाल. पण ह्या शास्त्रभागातील सुज्ञता इतरांसारखीच तुम्हालाही लागू आहे. एखाद्या स्त्रीशी व्यभिचार करणे हा लैंगिक पापाचा एकच प्रकार नाही. पण हा नमुना सर्वसामान्य आहे. हा शास्त्रभाग ऐकल्याने आपल्या सर्वांनाच मदत होणार आहे. हा शास्त्रभाग जसा उलगडत जातो तसे तो आपल्याला लैंगिक पाप टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या चार पायऱ्या सादर करतो.

१. मोहापासून दूर पळा

लेखक सुरवातीलाच ऐकण्यासाठी एक बोध करतो:
“माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते” (५:१-३).

लैंगिक पाप हे बहुधा आकर्षक असते. त्याला एक मोहिनी असते आणि ते मोहक आणि गोड भाषणाने आकर्षित करून आमंत्रण देते. “दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो”
(५:२२). कोणत्याही भुकेप्रमाणेच लैंगिक भुकेला जितके आपण भरवतो तितकी ती वाढतच जाते. जितके आपण ते करत राहू तितके आपल्याला त्याची गरज आहे असे आपल्याला वाटत जाईल, आणि ते करायला अधिक सोपे वाटेल व ते थांबवणे अधिक कठीण होत जाईल. म्हणून आपल्याला त्यापासून पळण्याची गरज आहे.

“तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस” (५:७-८)

लैंगिक पापापासून पळणे म्हणजे ते टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. आपल्यातील काहीजणांसाठी याचा अर्थ होईल की ऑनलाईनवर किंवा मोबाईलवर जे आपण पाहतो त्यावर बंधन घालणे, किंवा टीव्ही वरचे काही शो न पाहणे, किंवा ज्या सामाजिक ठिकाणी आपण जातो तेथे अधिक दक्षता बाळगणे किंवा कोणाशी असलेले सबंध तोडून टाकणे (मग ती व्यक्ती आपल्याला सर्वस्व वाटत असली तरी) किंवा आपली नोकरी बदलणे.

जर ह्यातील काही अतिशयोक्तीची कृती वाटत असेल तर ह्या सर्वाचा शेवट काय होतो ते ऐका: “त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो” (५:२३). लैगिक पाप हे आकर्षक आहे आणि व्यसन लावणारे आहे आणि ते एकत्रितपणे गहरे विष आहे. त्यासाठी घेतलेली कोणतीही कृती व त्याग हा योग्यच आहे.

२. भविष्याचा विचार करा

लेखकाला आपल्याला दाखवायचे आहे की याचा अखेर काय आहे. “आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील”  (५:११). हे लैंगिक पापाचे परिणाम आहेत. आपण त्याबद्दल कदाचित त्याला एक ‘झेप’ किंवा ‘एका रात्रीपुरते’ असे म्हणू. पण सत्य असे की अशी पापे सहज तृप्त करणारी नसतात. “तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस; गेलास तर तुझी अब्रू दुसर्‍यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्‍याच्या घरात जाईल” (५:८-१०).

सध्या लैंगिक पाप खूप आकर्षक वाटत असेल पण ते शेवटाकडे फास्ट फॉरवर्ड करा. ते फारच वेगळे दिसेल. आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील : “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले? मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही” (५:१२-१३). जे शहाणे असतात ते तेथे जाण्यापूर्वीच शेवटाचा विचार करतात.

३. तुमचा विवाह उचलून धरा

येथे ज्या तरुणाला उद्देशून हे लिहिले आहे त्याने हे समजून घेण्याची गरज आहे की लैंगिक तृप्ती ही विवाहातच अनुभवणे किती जबरदस्त होकारात्मक बाब आहे.

“तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय? ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्‍यांना त्यांचा उपयोग न घडो. तुझ्या झर्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा” (५:१५-१८).

विवाहामध्ये लैंगिक तृप्ती अनुभवणे याबद्दल बायबल मुळीच संकोच बाळगत नाही. येथे दिलेले चित्र कल्पनेला फारच थोडा वाव देते. टाकी आणि विहीर हे दोन्ही स्त्रीलिंगाचे दर्शक आहे व झरा हे पुरुषलिंगाचे दर्शक आहे. असे चित्र बायबलमध्ये दिले म्हणून आपण आपण चकित होण्याचे काहीच कारण नाही. मानवी लैंगिकता ही देवाने निर्माण केली आहे. आणि पती व पत्नी यांच्या शारीरिक संबंधाने त्यांची तृप्ती व्हावी अशी त्याची इच्छा आहे.

या परिच्छेदामध्ये पुरुषाला उद्देशून लिहिले आहे. “तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो” (व. १९). हे त्याच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. परंतु ते त्याच्या पत्नीसंबंधानेही तितकेच खरे आहे. तिचे पण आपल्या पतीसाठी चित्त मोहित व्हायला हवे. पौल हे नव्या करारात स्पष्ट करतो:
“पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे” (१ करिंथ ७:३-४).

व्यभिचार  याविरुध्द  आहे; “ माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे” (५:२०)?  हे कदाचित विवाहातील प्रणयाराधनासारखे कितीही उन्मादक वाटले तरी व्यभिचाराचा अखेर कसा होतो हे आपल्याला ठाऊक आहे. तो संपूर्ण आयष्य भावनिकदृष्ट्या, शारीरिक व आध्यात्मिक रीतीने व आर्थिकदृष्ट्याही उध्वस्त करून टाकतो.

म्हणून आपण आपल्या वैवाहिक जीवनातील संबंधाकडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी पतीपत्नीने आपले नातेसबंध, संवाद उभारण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे हे सांगायला नकोच. विचारांची देवाणघेवाण, खोल मैत्री हे त्याच्या केंद्रस्थानी आहे.

माझ्यासारखे आपल्यापैकी जे एकटे आहेत त्यांचे काय? आपल्याला लैंगिक तृप्ती, उन्मादक असे शब्द ऐकायला संकोच वाटतो. आपण बायबलमधले शिक्षण उचलून धरायला हवे आणि शुद्धतेने राहून आपल्या अंथरूणाचा मान ठेवायला पाहिजे  (इब्री १३:४). ख्रिस्ताबरोबर त्याच्या मंडळीचा असलेला आपला विवाह आपण दृढ करायला हवा.  आपण त्याला वाहून घेतले आहे आणि त्याच्याशी विश्वासू राहून आपण त्याच्याशी असलेल्या आपल्या नात्याचा सन्मान करायला पाहिजे.

४. लक्षात ठेवा देव पाहत आहे.

आपण जे काही करतो, बोलतो, ते सर्व देवाच्या पूर्ण नजरेखाली घडते. “मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो”  (५:२१). ही धोक्याची सूचना आहे. आपण कदाचित इतर लोकांना फसवू. पण देवाला कधीच फसवू शकणार नाही. असा कोणताच विचार नाही जो त्याला पूर्णपणे माहीत नाही. आपण ऑन लाईनवर शोधण्यासाठी जो प्रत्येक शब्द टाईप करतो तो देवाला ठाऊक आहे .

देव आपले पाप पाहतो. पण आपण आपल्याला देवभीरू व  शुद्ध राखण्यासाठी जो प्रत्येक प्रयत्न करतो तोसुद्धा देव पाहतो. आपण केव्हा लढा देतो ते त्याला माहीत आहे. आपण कशातून जातो ते त्याला माहीत आहे. तुम्ही मोहाशी झगडताना कशा प्रकारे तोंड देता किंवा कोणत्या वेदनांतून जाता हे कदाचित कोणाला समजणार नाही पण येशूला ते समजते. जसे आपण त्याच्याजवळ जातो तसे तो आपल्याजवळ येतो.  त्याच्यासाठी आपण करीत असलेले काम कधीच दुर्लक्षित होणार नाही. शुद्धतेसाठी जसे आपण झगडा करतो तसा तो आपल्यासोबत व आपल्यासाठी झगडतो.