दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाला तुमचा कमकुवतपणा हवा आहे वनिथा रीसनर

मी शूर नाहीये.

नुकतेच मी कोणाला तरी शौर्य आणि धाडस यातला फरक सांगताना ऐकले. त्याने म्हटले, शौर्य म्हणजे कठीण परिस्थितीला न भीता सामना देणे; तर धाडस म्हणजे तुम्हाला भीती वाटली तरी कठीण परिस्थितीला सामना देणे. धाडसाचा विचार केला तर मला गिदोनाची आठवण होते.

मला गिदोन आपला वाटतो; तो भीतीमध्ये जीवन जगत होता. त्या वेळी गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता (शास्ते ६:११). जेव्हा देवाचा दूत त्याच्याकडे आला तेव्हा लगेचच त्याने देवाच्या इस्राएलाशी असलेल्या विश्वासूपणाबद्दल शंका व्यक्त केली. “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे” (६:१३). जेव्हा त्याच्याशी कोण बोलत आहे हे त्याला समजते तेव्हा तो यावर भर देतो की “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ ” (६:१५) असल्याने मला हे काम देऊ नये.

आपण स्वत: काही करू शकतो असा गिदोनाला आत्मविश्वास नव्हता. वस्तुस्थिती किती वाईट आहे ही त्याची तक्रार रास्त असली तरी जेव्हा त्याला ही परिस्थिती सुधारायला काही करायला सांगितले तेव्हा गिदोन माघार घेतो. कृती करण्यापेक्षा तक्रार करणे सोपे असते.

जेव्हा देव स्पष्ट करतो की खुद्द तोच गिदोनाला बोलावत आहे, तेव्हा खात्री करण्यासाठी गिदोनाला एक चिन्ह हवे असते (६:१७). ते चिन्ह त्याला मिळाल्यावर गिदोन देवाची आज्ञा पाळतो व बालाची वेदी मोडून टाकतो. पण ते दिवसाढवळ्या, उघडपणे न करता गिदोनाला गावातल्या लोकांची व त्याच्या कुटुंबाचीही भीती वाटते. म्हणून तो ते रात्री नष्ट करतो (६:२७). जेव्हा गावातले लोक क्रोधाने त्याच्यासाठी आले तेव्हा तो आपल्या वडिलांना त्याचा बचाव करायला लावतो. गीदोन शूर नव्हता

आपण माती आहोत हे देवाला ठाऊक आहे

गिदोनाच्या शंकाबद्दल त्याची टीका करणे सोपे आहे, पण मी सुद्धा संशय बाळगला आहे. देव माझ्या जीवनात कार्य करतो, मला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मला पूर्ण करायला त्याने समर्थ केले आहे. पण तरीही पुढची गोष्ट मी करू शकेन का याची मला शंका वाटते. मी माझ्याकडे व माझ्या साधनसामग्रीकडे पाहते आणि मला पुन्हा असमर्थ / अपुरे वाटू लागते व माझ्यापुढे जे आहे ते मी पूर्ण करू शकणार नाही असे मी मनाशी ठरवते. मला शारीरिक अशक्तपणा हा सततचा आहे.  जेव्हा मी पुढचा विचार करते तेव्हा मी बहुधा प्रभूकडे आरोळी करते, “प्रभू, हे मला जमणार नाही, तुला वाटते तेवढी बलवान मी नाहीये.”

देवाला गिदोनाच्या हातून इस्राएलाची सुटका करायची आहे. पण गिदोनाला पुरावा हवा आहे. दोनदा. प्रथम त्याला कोरड्या जमिनीवरची लोकर भिजलेली हवी होती, आणि नंतर अधिक खात्रीसाठी ओल्या जमिनीवर कोरडी लोकर हवी होती. आपल्या दृष्टिकोनातून गिदोन खूपच संशयखोर असावा. इतके पुरावे तो का मागतो? मग मला आठवते की मी देवाकडून सतत खात्री मागत असते. जेव्हा एखाद्या बाबीचा मुकाबला करण्यास मला अपुरे वाटते तेव्हा मी चिन्ह मागते: मित्रमैत्रिणींकडून उत्तेजन, माझ्या परिस्थितीला लागू असणारी वचने. देवाला माझा अशक्तपणा समजतो, गिदोनासारखेच तो माझ्या कमकुवतपणाशी मुकाबला करतो – उपहास किंवा शिक्षा न करता. देव आठवण करतो की मी माती आहे.

गिदोनाला त्याने मागितलेली सर्व चिन्हे दिल्यावर देव त्याला मिद्यांनी लोकांशी लढाई करण्यास तयार करतो. लढण्यासाठी बावीस हजार लोक आले. देव म्हणाला ते खूपच आहेत (शास्ते ७:२-३). नाहीतर त्या सैन्याने जिंकण्याचे सर्व श्रेय स्वत:ला दिले असते. देवाने गिदोनाला सांगितले की जे भितात त्यांना घरी जाऊ दे. गुडघे टेकून पाणी न पिता जे चाटून पाणी प्याले फक्त त्यांनाच लढाईसाठी निवड. परिणामी फक्त ३०० लोकांचे सैन्य उरले. आता विजयाचे श्रेय इस्राएलाकडे जाऊ शकणार नव्हते. फक्त देवाच्या सामर्थ्यानेच लोकांची सुटका होणार होती.

देव तुमच्यामध्ये काय पाहतो?

जेव्हा गिदोनाकडे फक्त ३०० पुरुष उरले तेव्हा तो घाबरला. जरी तो आपली भीती व्यक्त करत नाही तरी देवाला त्याचे ह्रदय ठाऊक आहे आणि तो त्याला धीर देऊन म्हणतो, तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिंमत येईल (७:१०-११). कोणाला वाटेल की देवाने थेट तुम्हाला तो काय करणार हे सांगितले तर तुम्ही बिनशर्त त्याच्यावर विश्वास ठेवाल. पण गिदोनाने नाही ठेवला. अर्थातच तो ताबडतोब छावणीकडे गेला कारण आपल्याला विजयाची खात्री का दिली हे त्याने ऐकायचे होते. अखेरीस आता गिदोनाने विश्वास ठेवला आणि तो पुढे गेला (७:१५).

या सर्व सामन्यामध्ये गिदोन संशय धरतो, घाबरतो आणि त्याला अपुरे व कमकुवत वाटते. तो यशस्वी होणार याचा त्याला पुरावा मिळाला तरच तो कृती करणार होता. त्याला देवावर भरवसा ठेवायला हवे होते पण तो स्वत:बद्दल शंका बाळगतो. तरीही आरंभापासून देव त्याला “बलवान वीर” असेच पाहतो (६: १२). आणि हे गिदोनाचा असुरक्षितपणा आणि संशय याच्याविरुद्ध वाटते. आपण देवामध्ये जे आहोत तसे देव आपल्याला पाहतो, आपल्यामध्ये काय आहे ते पाहत नाही. म्हणून आज जर तुम्हाला अपात्र, अशक्त आणि भीती वाटत असेल तर उभारी धरा. “जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले” (१ करिंथ १:२७). बायबलमध्ये काही महान कार्याची जबाबदारी कमकुवत लोकांनी घेतली आहे, ज्यांना या पाचारणाला आपण असमर्थ आहोत असेच वाटत होते.

देवा, दुसऱ्या कोणाला तरी निवड

मोशेने तांबडा समुद्र दुभागला आणि इस्राएल लोकांची मिसरी लोकांच्या पाठलागापासून सुटका केली. पण जेव्हा देवाने मोशेला प्रथम बोलावले तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव” (निर्गम ४:१३). आणि हे देवाने त्याला “मी तू काय बोलायचे ते तुला शिकवीन” (निर्गम ४:१२) अशी खात्री दिल्यावर लगेचच घडले. जेव्हा देवाने यिर्मया संदेष्ट्याला बोलावले तेव्हा त्याचा पहिला प्रतिसाद होता “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे” (यिर्मया १:६).

पौलाला देवाने त्याच्यामध्ये असलेला काटा काढावा अशी इच्छा होती पण देवाने त्याला आठवण दिली की, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे” (२ करिंथ १२:९-१०).

त्याला एवढेच हवे आहे

आज जर देव तुम्हाला काही कार्यासाठी बोलावत आहे आणि तुम्हाला आपण त्यासाठी अपुरे आहोत असे वाटत असेल तर लक्षात घ्या की देव तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे पाहत नाही किंवा तुम्ही किती शूर आहात, तुम्हाला किती कौशल्ये, दाने आहेत हे तो पाहत नाही. त्याला तुम्ही त्याच्यावर संपूर्णपणे अवलंबून राहायला पाहिजे. आपल्या अशक्तपणामध्ये त्याचे सामर्थ्य पूर्णत्वास येते. आपल्याला समजते की देवाने गिदोनाला  बलवान असे पाहिले. विश्वासाच्या वीरांच्या यादीमध्ये आपल्याला आठवण करून दिली आहे की, त्याने राज्ये जिंकली आणि त्याच्या कमकुवतपणामध्ये देवाने त्याला बलवान केले (इब्री ११:३२-३४).

जेव्हा आपण देवावर भरवसा ठेवतो तेव्हा आपल्याला पण आपल्या अशक्तपणामध्ये समर्थ केले जाईल.

Previous Article

माझा पुनर्जन्म नक्की झाला आहे का? विल्यम फार्ली

Next Article

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

You might be interested in …

प्रत्येक पापात एक लबाडी दडलेली असते

स्कॉट हबर्ड “ वाचकांनी लक्षात ठेवावे की सैतान हा लबाड आहे.” असे सी एस लुईस यांची त्यांच्या “स्क्रू टेप लेटर्स” या पुस्तकाच्या आरंभीची सूचना आहे. आणि ही सूचना सर्वत्र असणाऱ्या प्रत्येक काळच्या लोकांसाठी आहे. आपण […]

धडा १४.           १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स

    त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक  व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान […]

धडा २२.   १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स

  तुमचे आध्यात्मिक अन्न – कोण खात आहे? प्रत्येक पावसाळ्यात आपल्याला कॉलरा, कावीळ अशा त्या मोसमातील रोगांचा इशारा दिला जातो आणि सतर्क लोक लगेच त्याबाबत प्रतिबंधक उपायांची तजवीज करायला सुरुवात करतात. त्यात पुढील दोनपैकी एक […]