दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर  

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

 अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

 

प्रकरण ६ वे

परिश्रमांचा उगम

बायबल स्टडीच्या खिडकीबाहेर हेपेल, इसा व मी पाहात होतो. डोळ्यांचे पारणे फिटेल असा क्षितिजाला भिडलेल्या घनदाट जंगल अच्छादित डोंगराळ पर्वतराजीच्या खोल दरीचा देखावा दिसत होता. त्यांची देखभाल करणारे निघून गेल्यानंतरच्या एदेन बागेप्रमाणे तो भासत होता.

संपूर्ण सकाळ आम्ही आदाम हवेसोबत होतो. देव शापाची वाटणी करत तेथे हजर होता.

आम्हाला सडकून भूक लागली होती. जेवणाची सुट्टी आवश्यक होती. तरी आम्ही कामात भान हरपून गेलो होतो.

आदामाचे पतन झाले होते. त्याने फळ खाल्ले होते. सर्पाचे पतन झाले होते त्याने माती खाल्ली होती.

आपले प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा मोडली होती. त्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात देवाची मुळीच चूक नव्हती. मानवजातीला आपले डोळे उघडण्याची गरज वाटली होती – बऱ्या वाईटाचे ज्ञान हवे होते- आणि आता त्याची किंमत त्यांना भरावी लागत होती.  जेव्हा वाईट म्हणजे काय हे त्यांना समजले तोपर्यंत आपल्याला किती चांगले मिळाले याची जाणीव त्यांना झाली नव्हती. आता आपल्याला वाईट काय आहे हे माहीत आहे आणि देवाची आज्ञा मोडण्याचे परिणाम सर्व काळासाठी लागू केले गेले.

देवाने जाहीर केल्याप्रमाणे हवेच्या वाट्याला प्रसुतीच्या वेदना आल्या होत्या. शिवाय देवाने तिला सांगितले होते, “तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील” (उत्पत्ती ३:१६).

हे ऐकून हेपेल व इसा हे दोघे चकितच झाले. पण आम्ही काम पुढे चालू ठेवले. देव आदामाला म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले; म्हणून तुझ्यामुळे भूमिला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील” (उत्पत्ती ३:१७). यावर काम करत असता इसा व हेपेलचे लक्ष खिडकीबाहेर गेल्याचे मी पाहिले. त्यांच्या मनांत काहीतरी घालमेल चालू होती. माझ्या पोटात कावळे ओरडत होते. दमट हवेमुळे उष्णता वाढत होती.

मी घड्याळाकडे पाहिले व काम पुढे चालू ठेवले. “ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील”
( उत्पत्ती ३:१८). काटे कुसळे तर त्यांच्या परिचयातील असून तो रोजचा वास्तव अनुभव होता. वाटेने जा- ये करताना अनेक ठिकाणी वाट खूप अरुंद व आडवळणाची असे. मग शरीराला काटेरी झाडेझुडपे चाटून जात. मग कित्येक तास तुम्हाला वेदना सहन कराव्या लागत. अनवाणी चालणाऱ्या फोलोपांच्या पायांना आता हे सवयीचे झाले होते. आणखी एक वचन करून मग जेवायला जावे असे आम्ही ठरवले व काम चालू केले.

“तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस; आणि मातीला परत जाऊन मिळशील” (उत्पत्ती ३:१९). येथवर सकाळपर्यंतचे काम संपवून मी उठू लागलो. पण इसा खिडकीबाहेरच टक लावून पाहात होता, तर हेपेल आताच केलेल्या कामावर नजर रोखून होता. त्याने मोठ्याने वाचले, “तू निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील.”

मी म्हटले, “हो, तुला याचा काय अर्थ समजला?”

हेपल म्हणाला, “काहीच अर्थबोध होत नाही.”

इसा म्हणाला, “मलाही काही समजले नाही.”

“तुम्हांला काय समजत नाही?”

“हेच ते. निढळाच्या घामाने? त्याचा येथे काय संबंध? निढळाच्या घामाने तू अन्न खाशील, हे कसे?”

मी पुन्हा वाचले. शब्द , व्याकरण तर बरोबर होते. कदाचित ती म्हण समजत नसावी. मी स्पष्ट केले.

“ तुम्ही कपाळाच्या घामाने अन्न खात नसता. तर असा घाम गाळल्याने तुम्हाला अन्न प्राप्त होत असते.”

“अरेच्चा! अस्से होय?”

“आता समजले का?”

“नाही.”

आम्ही पेचात पडलो होतो. मला तर सारे सरळसोट वाटत होते, काहीच अडचण वाटत नव्हती. यापेक्षा आणखी स्पष्ट करून यांना कसे सांगू? हे लोक घामाचा कामाशी संबंध लावत नसतात. मी मण्यांप्रमाणे घामाचे थेंब दोघांच्या कपाळावर पाहिले. येथील दमट हवामानात उष्णता वाढेल तसा तुम्हाला घाम येतो. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत. घरात बसल्या बसल्याही घाम येतो. आम्ही आतापासूनच घामाने डबडबले होतो. मग मी आणखी स्पष्ट करू लागलो. “जमीनीला शाप आला. म्हणजे पीक काढायला प्रचंड अंगमेहनत करावी लागणार.”

मला माहीत होते; फोलोपांची एक प्रमुख विचारप्रणाली असते की ते कोणत्या तरी शापाखाली असून कशाची तरी शिक्षा भोगत आहेत. पण त्याचा उगम कोठे झाला हे त्यांच्यासाठी एक रहस्य होते. त्याबाबत त्यांच्या दंतकथाही आहेत पण त्यांनी त्यांचे समाधान होत नाही.

हेपल म्हणाला, “तुमचे म्हणणे खरे आहे. ही दूरवरची बागाईत दिसते ना? त्यासाठी प्रचंड कष्ट पडले. पण आम्हाला ते करावेच लागतात. अन्न आपोआप कसे मिळेल? जंगलातून काही फळे मिळतील पण मुख्य अन्न रताळी, तारो, याम यांचे काय? ही आपोआप पिकत नाहीत. त्यासाठी अपार कष्ट पडतात. मोकळी जमीन मिळवण्यासाठी अवाढव्य वृक्ष तोडून फांद्या कापाव्या लागतात. डुकरांनी बागेची नासधूस करू नये म्हणून खोड घरंगळत नेऊन कुंपणापाशी रचावे लागते. खरेच ह्यात खूपच कष्ट आहेत.”

“अगदी बरोबर. आणि हे करताना तुम्ही घाम गाळता.”

“हो. पण आम्ही हे शब्द वापरत नाही.”

“ मग तुम्ही काय म्हणता?”

“आम्ही म्हणतो, डेपो टुको वालापो. पोट फुटेपर्यंत.”

आता त्यांचा हा वाक्प्रचार मी वचनात बसवायचा होता. तो चपखल बसणार होता. बागकाम करताना पुरुष लाकूडतोड करताना ओरडतात, किंचाळतात, जड उचलपाचल करतात, तेव्हा स्नायु ताणतात, दात खातात, शिरा फुगतात, घसा ताणतात, पोट फुटेपर्यंत जोर लावतात. आधीचे लिहिलेले आम्ही खोडले व त्यांना समजेल असे लिहिले:

“आता तुम्हाला आपोआप खाद्य मिळणार नाही. तर पोट फुटेपर्यंत कष्ट करून तुम्हाला पीक काढावे लागेल. मरेपर्यंत तुम्हाला असेच जीवन जगावे लागेल. आणि मग तुम्ही पुन्हा मातीचाच भाग बनून जाल” (उत्पत्ती ३:१९). घाम गाळून आम्ही आता जेवायला आपापल्या घरी निघालो. आमच्या दिशा बदलत असता, इसा व हेपेलला वाटेत लोक भेटत होते. घोळका करून ते जमले. त्यांचा संवाद माझ्या कानावर पडत होता.

ते दोघे सांगत होते, “तुम्हाला माहीत आहे का, आपण देवाच्या शापाखाली आहोत. आज आम्ही तेच भाषांतर केले. पहिल्या माणसांमुळे हे झाले. त्यांनी आज्ञा मोडली. फुकट अन्न मिळत असता जे खायची मना होती, तेच त्यांनी खाल्ले. त्यामुळे देवाने त्यांना शिक्षा दिली. आता काहीही फुकट मिळणार नाही. त्यामुळेच आपण पोट फुटेपर्यंत काम केल्याशिवाय आपल्याला अन्न मिळत नाही.” एवढेच मी ऐकले. पण मला कळून चुकले की त्या दिवशी गावाला एक महत्त्वपूर्ण नवीन ज्ञान झाले होते. त्यांच्या ज्ञानाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्यासाठी हा नवीन उगम  ‘बेटे’ होता. मानवाच्या चमत्कारिक अवस्थेचे मूळ त्यांना समजले होते.

मी घरी कॅरलसोबत जेवताना ही हकिगत सांगितली. मी थकलो होतो तरी समाधानी होतो. मी पूर्ण सकाळ भाषांतर करण्यात तर कॅरलने मुलांना शिकवण्यात घालवली होती. पण देवाने केले तसेच आम्ही केले. त्याने काम झाल्यावर आपल्या कामावर चौफेर नजर टाकून म्हटले, हे चांगले आहे. आणि तो समाधान पावला. आम्ही काम संपवले नव्हते पण समाधानी होतो. अजून मोठा पल्ला गाठायचा होता.

 

 

 

Previous Article

ख्रिस्तजन्म- गव्हाणीचा अर्थ जॉन पायपर

Next Article

२०२० मध्ये कुठे चालता याकडे लक्ष द्या स्कॉट हबर्ड

You might be interested in …

अनपेक्षित व गैरसोयींसाठी देवाची योजना

जॉन ब्लूम जेव्हा लूकाने (लूक११:२-४) मधील प्रभूची प्रार्थना नमूद केली तेव्हा त्याने येशूने केलेला त्या प्रार्थनेचा उलगडाही नमूद केला. यावेळी येशूने एक जुना दाखला वापरला. तो ऐकून त्यावेळचे त्याचे  श्रोते आतल्या आत दचकले असतील: “मग […]

आत्म्याचे फळ – आनंद

डेरिल गुना जेव्हा बायबल आपल्याला आनंदित राहायला सांगते तेव्हा त्याच अर्थ असा होतो का की आपला चेहरा सतत हसरा दिसावा? जर एखादी व्यक्ती दु:खातून जात असेल तर ती हे कसे करू शकेल? बायबल आपल्याला शोक […]

प्रभूमागे एकाकी आणि दु:खित जनांकडे जा

स्कॉट हबर्ड आमच्यापुढे असलेली मुले गटारात, उकिरड्यावर, गल्लीबोळात आणि इतर काही शहराच्या कोपऱ्यात सापडलेली होती. बहुतेकांना जन्मत:च शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व होते.  – आधीच गरिबीने पिचलेल्या त्यांच्या पालकांना हा भर खूपच जड होता म्हणून त्यांनी […]