एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण १२
कोणाला भ्यावे (लूक १२)
“इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांस तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा” (लूक १२:१).
आम्ही अनुवाद करत असता ‘तुम्ही आपणांस …..सांभाळा’ अगदी अचूक जमले. पण सर्वांची चुळबुळ सुरू झाली. त्याच्याशी यांचा काहीतरी संबंध लागत होता. पुढचे येशूचे बोल ऐकताच ते घाबरले, “जे उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही, व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही”(लूक १२:२). दोन वृद्ध पारंपरिक पेहराव करून बायबल खोलीवर येऊ लागले होते. त्यांना खुर्च्या बाकांची सवय नव्हती ते मांडी घालून जमिनीवर बसायचे. दाढीतील व केसातील उवा पण काढत बसायचे. भाषांतरावर चर्चा पण करायचे. त्यांची माझी खूप जवळीक होती. गावकरी त्यांना माझे पूर्वज म्हणायचे. त्यातील एक विश्वासी होता. दुसरा नव्हता. त्यांना गोष्टी फार आवडायच्या. पण धोक्याची काही त्यात असले की त्यांचे उद्योग थांबवून ते म्हणायचे, “मला भीती वाटते.” ते सतत भयातच लहानाचे मोठे झाले होते. तो काळ ‘मारामाऱ्यांचाच’ होता. ते नेहमी पूर्वीच्या मारामाऱ्या किंवा लढ्याच्या गोष्टी सांगायचे. १९६० च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने हस्तक्षेप करून अखेर ते थांबवले होते. त्यावेळी मी तर कॉलेजात होतो. माणूस चंद्रावर जात होता. अमेरिका व्हिएतनामशी मुकाबला करत होती आणि पापुआ गिनीच्या फुकुटाओचे लोक शेजारच्या सेटे गावाशी भांडून लढत होते.
आपल्या पलीकडे एक जग आहे आणि आपण ह्या भांडणतंट्यांपासून आपली सुटका करून घ्यावी याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती.
अवियामे अली मला या तंट्यांविषयी सांगू लागला:
“फुकुटाओचा एक माणूस जंगलातून आला आणि अचानक खूप आजारी पडून तिसऱ्या दिवशी मरण पावला.
तो जादुटोण्यामुळेच मेला असाच सर्वांनी निष्कर्ष काढला. मंतरलेला दगड व वेताने ते आप्ताच्या भुताला पाचारण करत व त्यांची इच्छा त्याला सांगून बदला घेत. ज्या दिवशी मेघगर्जनेचा प्रतिसाद मिळेल तो बदला घेण्याचा दिवस मुक्रर होत असे. तिघे या कामाला निघत व दबा धरून बसत. एकजण मंत्रतंत्राच्या जादूने स्वत:ला अदृश्य करून हिलिपिली झाडाचे पान चावत हळू आवाजात जप करत असे. मित्राच्या सहाय्याने तो शत्रुला गावाबाहेर काढत असे.
दुसरे दोघे त्याच्यावर झडप घालून त्याला मारून टाकत. मग तो अदृश्य झालेला त्याचे सांडलेले रक्त मंतरलेल्या वेताने शोषून घेऊन त्या प्रेताशी संवाद करत असे:
“ आज तू बरा होऊन आपल्या गावी जाशील. उद्या तू आजारी पडशील आणि परवा मरशील. मग तिसऱ्या दिवशी तू खरोखर मरशील.” त्यानंतर खाजखुईलीची पाने त्याच्या मृत चेहऱ्यावर तो रगडत असे. लगेच तो मनुष्य जिवंत होत असे.”
“काय? तो माणूस जिवंत होत असे?” मी.
“हो. कारण त्याच्यावर जादुटोणा केलेल्या असतो ना, त्याला आपल्याला काय झाले होते ते त्याला काही माहीत नसते. त्याला ती दोन माणसे नजरेला दिसतात. ती अनोळखी असतात. उलट त्यांनाच तो शत्रुंच्या गावाबाहेर पडायचा रस्ता दाखवून मदत करतो, आणि आपल्या गावी जातो आणि चार दिवसांनी मरतो.”
“फोलोपाच्या माणसाला असे झाले होते?” मी.
“हो. गावकऱ्यांनी त्याला मरताना पाहिले. पण ते काहीच करू शकले नाहीत. तो मरताना त्याचे खुनी कोण आहेत हे त्याच्या तोंडून काढून घेण्याचा वरिष्ठांनी खूप प्रयत्न केला पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. हाच त्याच्यावर जादूटोणा झाल्याचा पुरावा होता.”
“मग त्यांनी त्या प्रेताकडून उत्तर मिळवायला त्याच्या छातीतून हवा बाहेर काढून काही शब्द कानी यावेत या आशेने ते प्रेत गदागदा हलवले. एका वयस्कर व्यक्तीनं त्याच्या प्रेतावरून काठी ओवाळून जप करीत म्हटले कोणी केले हे? कोणी केले हे? तेव्हा ती काठी फिरली व तिने अपराधी गाव सेटेच्या दिशेने इशारा केला.
काही दिवसांनी सेटेहून काही लोक खुनाच्या निमित्ताने छापा घालायला आले असता झुडुपात आम्ही त्यांना पाहिल्याचे कळताच ते पळाले आणि तेथूनच आमच्या लढ्याच्या तयारीला सुरुवात झाली. आम्ही तेथे गेलो. एक दोन तास सेटेपासून जवळच मुक्काम ठोकला. आमचा पहाटपर्यंत दबा धरून बसण्याचा बेत होता.
पण सेटेच्या पहारेकऱ्याने आमच्या चुलीचा जाळ पाहिला. त्याने सेटेच्या लढवय्यांना सावध केले. त्यांनी आम्ही बेसावध असताना आमच्यावर हल्ला केला. त्या रात्री आमची काही माणसे गतप्राण झाली व बाकीची जखमी झाली. आम्हाला खूप बेदम मारले. त्यातून बरे व्हायला आम्हाला बरेच महिने लागले. आमच्यात बदला घेण्यासाठी राग खदखदत होता. योग्य सापळा रचून सेटे गावच गिळंकृत करायचा आम्ही निर्धार केला.
ठरल्या दिवशी सर्व गाव जमला. आम्ही आमची तोंडे कोळशाने रंगवून चुन्याने त्यावर रेघोट्या काढल्या. नाकावर लाल रंग थापला. केसात पिसे खोवली. छातीवर मोठे शंख टांगले, नाकातून रानडुकरांचे दात टांगले. शत्रूंना भेडवण्यास आम्ही तयार झालो होतो. आम्ही त्यांना ठार करणार होतो.
रात्रभर आम्ही जप करत कूच करत होतो. सेटेच्या सीमेवर आम्ही दबा धरून बसलो. आमच्याजवळ कुऱ्हाडी, भाले, तीरकमठे अशी शस्त्रे होती. सकाळपर्यंत आम्ही सेटेला वेढा घातला. आम्ही हल्ला केला आणि यावेळी आमची सरशी झाली. जे दिसेल ते मारून टाकण्याचा आम्ही सपाटा लावला. स्त्रिया, पुरुष, मुले, डुकरे, कुत्री.
लढाई संपवण्यापूर्वी आम्ही ते गाव लुटले. त्यांच्या कुऱ्हाडी, अस्त्रे, रंगबिरंगी मणी. मग त्यांच्या बागांचा धुव्वा करून, मोठे वृक्ष तोडून सर्व गाव आम्ही जाळून टाकला. आणि त्यांच्या सर्व शरीरांचे तुकडे करून ती आम्ही पाठीवर लादून फुकुटाओला माघारी आलो. त्यांच्या तुकड्यांचा रस्सा करून आम्ही गावजेवण दिले.”
अवियामे आलीने गोष्ट संपवली.
“ते सर्व भयानक होते. माझा विश्वासही बसत नाही आम्ही हे सगळे केले.”
कित्येक शतके पापुआ न्यू गिनीमध्ये जीवन-मरणाचा अशाच पद्धतीने खेळ चालायचा. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमीच राहायची. त्यांच्या जमातींचे गट विखरून एकएकटे राहायचे. लोकांमध्ये सुसंवाद नसल्याने त्यांच्या सामाईक मूळ भाषेलाही फाटेच फुटत गेले.
फुकुटाओवर सेटे सूड उगवू शकले नाहीत. नंतर ॲास्ट्रेलियन आले. जरी ते तोंडे रंगवून, दागिन्यांप्रमाणे शस्त्रे
धारण करून आले नाहीत, तरी त्यांना अजून ज्या लढ्याची ओळख झाली नव्हती त्याहून अधिक
तंटेबखेड्यांना ते कारण झाले. अवियामे अलीने यापूर्वीही मला ही गोष्ट सांगितली होती:
जेव्हा पहिले दोन सरकारी पेट्रोलमन फुकुटाओत चढून आले तेव्हा सगळे लोक झाडाझुडपात पळून गेले.
त्यांना वाटले आपण भूतच पाहात आहोत. ते गोरे होते. ते त्यांना मुळीच सामान्य लोक वाटले नाहीत. ते भूमीखालून येऊ घातलेल्या संकटामुळे पांढरे फटक पडल्यासारखे त्यांना वाटले. ते मृत पूर्वज असून आपल्याला झपाटून, बेदम मारून विकलांग करून आपल्याला खाऊन टाकायला आले आहेत असे त्यांना वाटले.
त्या गोऱ्या लोकांच्या मागून पन्नास गाडया व बंदुकधारी राष्ट्रीय पोलिस आले होते. ते निदान रंगाने काळे
तरी होते पण त्यांनी विचित्र पोषाख केला होता – तो झाडांच्या सालींचा नव्हता. पण आघाडीचे ते दोघे
गोरे भयानक होते. गणवेशामुळे त्यांना त्याचे केस खवल्यासारखे, त्यांचे चेहरे, बाहू, पाय रंगहीन व घृणास्पद वाटले. त्यांनी बूट कधी पाहिले नसल्याने त्यांना वाटले त्यांच्या पायांचे चवडे शिवले आहेत. रात्री त्यांनी गावात मुक्काम केल्याने गावात भीतीचे वातावरण होते. दुभाष्याद्वारे त्यानी जाहीर केले की, “आता या प्रांतात नवीन कायदा लागू होणार आहे. लढाया, तंटे- बखेडे येथून पुढे चालवून घेतले जाणार नाहीत. मृत शरीराच्या अस्थी काढून घेता येणार नाहीत, किंवा प्रेताचे भक्षण करता येणार नाही. आतापासून मृत शरीरे दोन दिवसांच्या अवधीत जमिनीत दफन करण्यात येतील. ह्या नियमाकडे दुर्लक्ष करून भंग करणाऱ्यासाठी सर्व नातलगांपासून, कुटंबियांपासून दूर असलेला पिंजरा तुरुंगवासाची शिक्षा देण्यास वाट पाहात आहे.”
आपल्या बोलण्याची सत्यता पटवण्यासाठी त्यांनी गावातून एक पुष्ट डुक्कर आणून ५० मीटर दूर खांबाला
बांधले आणि आपल्या बंदुकीने गोळीबार केला. त्या आवाजाने लोक घाबरून लपून बसले. डुक्कर
गोळीबाराने छिन्नविछिन्न होऊन पडले होते. त्या ॲास्ट्रेलियन लोकांनी गावकऱ्यांना त्या डुकराची चिरफाड
करून त्यांचे हे बाण काय अवस्था करू शकतात याची खातरजमा करून घ्यायला सांगितले.
त्या क्षणापासून नरभक्षण, सूड, तंटेबखेडे तातडीने लागलीच थांबले. भांडणतंट्याच्या काळाचा तेव्हा अंत
झाला. पण त्या काळाच्या आठवणी मात्र विशेषत: जुन्या लोकांमध्ये अजून जिवंत आहेत. लोकांना माहीत
आहे की तसे काही झाले तर परतफेड वाट पाहात आहे. एका दृष्टीने नव्या कायद्याने एका स्तरावर हे
थांबवले असले तरी त्यात याहून अधिक काहीतरी होते.
परत भाषांतराकडे आम्ही वळलो. शास्त्री व परूशी अजूनही येशूला विरोध करत होते. त्याला बोलण्यात
पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमीराविषयी
सांभाळा.” म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. एक बोलून दुसरेच वागू नका. शेवटी खरे उघड होतेच.
माझ्या वडिलांसमान असलेले ते दोन वृद्ध टक लावून वर पाहू लागले. वचनातून एखादा इशारा समोर आला
की ते जमिनीवर बसले असता अधिक घट्ट मांडी घालून पुढे सरसावायचे.
आम्ही भाषांतर पुढे चालू ठेवले. “जे काही तुम्ही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकण्यात येईल. आणि जे काही तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगितले, ते धाब्यावर गाजवले जाईल” ( लूक १२:३).
त्यातील एक म्हणाला, “मला भीती वाटते.”
दुसरा गुरगुरला, “तू भ्यायलाच हवे. तू म्हातारा झाला आहेस. तू कोणाचे काही बोलणे ऐकू नकोस. तुला काय करायचे आहे त्याचे?”
त्या पहिल्या वृद्धाचा थरकाप झाला. त्याने छताच्या कोपऱ्यावर आपली नजर खिळवली. तोंडातून शब्द काढला नाही. धाड पडण्याच्या भीतीने खुनाखुनी संपुष्टात आली. पण जादुटोणा चहुकडे चालू होताच. जुन्या विचारसरणीचा पाठपुरावा अजून चालूच आहे. सूड घेण्याची जीवनरहाटी ठार करणे अवघड आहे. वधामुळे एखादा मृत्यू झाला
तरी बहुतेक मृत्यू जादुटोण्याने झाल्याचेच म्हटले जाते. त्याचा अगदी साधा पुरावा देतो. जर एखादी व्यक्ती आजारी पडली, पण ती बरी झाली तर ती आजारी होती असे म्हणतात. पण एखादी व्यक्ती आजारी पडली पण ती मरण पावली तर ती जादुटोण्याने मरण पावली असे म्हणतात.
भीती ही फोलोपांची सतत सोबतीण असते. पिढ्यानपिढ्या रोज नित्याच्या कार्याची तीच त्यांची प्रेरणा असते.
नवीन कायदा येऊनही अनेकांनी हाच मूळ दृष्टिकोन ठेवलेला आहे.
विश्वासी लोकांनाही जादुटोण्याविषयी खात्रीने बोलता येत नाही. ते फार काळ हेच विचार जतन करीत जगत आले आहेत. पुष्कळ लोकांचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याचे त्यांनी पाहिले आहे. त्यात काहीतरी शक्ती आहे
हे ते जाणतात. पण ते मरणाचे कारण आहे की नाही हा प्रश्न त्यांना नेहमीच पडतो. पण ते आशाहीन नाहीत.
त्यांना हे स्पष्ट कळते मरण कोणत्याही कारणाने येवो, स्वर्ग आमची वाट पाहात आहे. त्यांना तेथे घेऊन जाण्यासाठी कोणते माध्यम वापरायचे हे सर्वस्वी देवाच्या हातात आहे. हे समाधान यापूर्वी त्यांना नव्हते.
आम्ही पुढच्या वचनाच्या भाषांतराकडे वळलो. “माझ्या मित्रांनो मी तुम्हास खचित सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका” (लूक १२:४).
या बिंदुपाशी संवाद ऐकणाऱ्या वृद्धांपैकी एक म्हणाला, “भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही.” सर्व
पुरुषांनी त्याच्याकडे नजर लावली. पण तो पुन्हा गप्प झाला. आणि आम्ही पुढील भाषांतराकडे वळलो.
“तुम्ही कोणाची भीती बाळगायची हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला
अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हास सांगतो, त्याचीच भीती बाळगा” ( लूक १२:५).
त्याच वृद्धाने जमिनीवरील आपल्या जागेवरून पुन्हा वर पाहिले. आणि सत्याची खात्री देताना गळ्यावर हात
ठेऊन फोलोपांच्या खास शैलीत म्हटले, “आम्ही देवाला भितो. आणि देवाचे भय आमची इतर सर्व भये
ठार करते.”
हा महान ‘बेटे’ (मूळारंभ) आहे.
Social