दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

सुधारलेल्या जगाची सन्मान्य पापे टिम चॅलीस

जेरी ब्रिजेस या लेखकाने मंडळीला दिलेल्या देणग्यांमध्ये  “रिस्पेक्टेबल सिन्स” (सन्मान्य पापे) हे एक पुस्तक आहे. ही पापे म्हणजे बायबल त्यांना पाप मानत असले तरी ख्रिस्ती जन, वैयक्तिक अथवा सार्वजनिकरित्या काही वेळा अशी पापे मान्य करतात. ही इतकी सुसंस्कृत अथवा चतुर असतात की आपण त्यांना एक प्रकारचे गुण मानू लागतो. ब्रिजेस याची अनेक उदाहरणे देतात : चिंता आणि निराशा, उपकार न मानणे, अधीरता आणि चिडचिड, जगिकता इ.

या सन्मान्य पापाच्या यादीची फसवी बाब म्हणजे काळानुसार याचा मजकूर बदलू शकतो. एके काळी जे सन्मान्य होते ते दुसऱ्या काळात कलंक लावू शकते आणि पुन्हा सन्मान्यसुद्धा होऊ शकते. आज २०२० मध्ये काही मान्य होणाऱ्या पापांसंबंधी सूचना द्यायला मला आवडेल आणि त्यातल्या त्यात ऑनलाईनवर पसरणाऱ्या व जोपासल्या जाणाऱ्या बाबींवर मी जास्त भर देणार आहे.

शंका

न्यूज आणि सामाजिक माध्यमांनी कळस गाठलेल्या या काळात जे आपल्यासोबत आहेत त्यांची स्तुती केली जाते व जे बाहेर आहेत त्यांना खोटे ठरवले जाते. वस्तुनिष्ठपणाचा आदर्श मागे सारून मनात शंका पेरली जाते. बायबल हे सुज्ञता व समंजसपणा यांची स्तुती करत असले तरी आपल्या सहविश्वासीयांच्या विरुद्ध शंका घेण्यास ते मना करते. दुसरे चूकच आहेत अशी शंका, किंवा जोपर्यंत ते निर्दोष आहेत हे सिध्द होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी अत्यंत दक्षतेने वागणे. आपल्या प्रभूमधील भावंडांच्या कृतीची, वृत्तीची  शंका धरणे हे आपण करू नये. अखेरीस प्रीती ही फक्त कृतीनेच प्रकट होत नाही तर वृत्तीनेही प्रगट होते.  “प्रीती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते” (१ करिंथ १३:७). आपल्या मंडळीमध्ये खोटे शिक्षक व शिक्षण याविषयी आपण नेहमी दक्ष राहायला हवे, तसेच आपल्या अंत:करणात कोणाविरुद्ध शंका निर्माण होऊ नये यासबंधीही. त्यामध्ये सन्मान्य असे काही नाही.

चहाड्या

आपली सर्वव्यापी डिजिटल उपकरणे आणि प्रसारमाध्यमे यांनी आपल्याला अफाट वेगाने आणि मोठ्या प्रमाणात संवाद साधण्याची क्षमता दिली आहे. पण इतक्या मोठ्या सामर्थ्याबरोबर एक मोठी नम्र करणारी जबाबदारी येते. कारण बायबल अनेक वेळा आपल्या शब्दांचे सामर्थ्य व ते अयोग्य रीतीने वापरण्याचा धोका दाखवते. “जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत” (नीती १८:२१). इतरांबद्दल फक्त सत्यच बोलण्याची आपल्याला जबाबदारी आहे इतकेच नाही तर जे तसे करत नाहीत त्यांच्यापासून दूर राहायचे आहे. नाहीतरी चहाड्या करायला दोघांची गरज असते. आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे हे जसे पाप आहे तसेच समंजसपणे न ऐकणे हे सुद्धा आहे. आणि तरीही ख्रिस्ती जगत हे चहाड्यांनी गजबजले आहे. पुलपीटपासून बाकांपर्यंत, आपल्या अनेक परिषदांमधून चहाड्या भरून वाहत असतात. महत्त्वाची बातमी म्हणून तिची कुजबुज केली जाते आणि समजायला हवे म्हणून ब्लॉग लिहिले जातात- दोन्ही प्रकारे सन्मान्य वेष धारण करून. पण जर ते खरे नसेल आणि त्याने कोणाची उन्नती होणार नसेल तर त्याची आवश्यकता नाही. ती चहाडी आहे. ह्या डिजिटल माध्यमात हेच पाप मूळ धरत आहे आणि येणाऱ्या ऱ्हासात त्याचा खूप मोठा भाग असणार आहे.

निंदा

चहाडीचे दुसरे भावंड आहे निंदा. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीची निंदा करतो तेव्हा तिची प्रतिष्ठा  बिघडवून टाकणारी खोटी विधाने करतो. हे पाप सन्मान्य करण्याचा मार्ग म्हणजे आपण एखाद्या खोट्या शिक्षकासबंधी इतरांना धोक्याची सूचना देत आहोत किंवा भोळ्या व असहाय मेंढरांचे रक्षण करत आहोत असे भासवणे. आपल्याला इतरांबद्दल इतके प्रेम आणि कळकळ आहे की आपण फक्त त्या व्यक्तीची प्रतिष्ठा बिघडवत आहोत! अशा वेळी आपण काय करत असतो की आपण चहाडीद्वारे ऐकलेली माहिती खात्री करून न घेता दुसऱ्यांना फॉरवर्ड असतो. आणि कुरूप अशा वृत्तीने ज्या लोकांनी ही माहिती तयार केलेली असते ती आपण खरी म्हणून इतरांपर्यंत पोचवतो. कदाचित आपली प्रेरणा योग्य असेल (किंवा अगदी भ्रष्ट नसेल) तरीही आपली करणी ही पापीच आहे. हा धोका लक्षात घ्या, “मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल” (मत्तय १२:३६).

लुडबूड

नील पोस्टमन यांनी एकदा हा प्रश्न विचारला: “तुम्ही सकाळी रेडीओ व टीव्ही वर ऐकलेली अथवा वृत्तपत्रात वाचलेली बातमी तुमच्या दिवसभरचे बेत तुम्हाला बदलायला लावते किंवा तुम्ही घेतली नसती अशी कृती तुम्हाला करायला लावते किंवा तुम्हाला तुमची समस्या सोडवायला काही नवी दृष्टी देते का?”

बहुतेकांच्या बाबतीत याचे उत्तर “सहसा नाही” असेच येईल. हाच प्रश्न सामजिक माध्यमे किंवा ख्रिस्ती साधनांद्वारे मिळालेली महिती याबाबत विचारता येईल. माझी खात्री आहे की आज आपल्याला अशा बातम्या मिळतात की ज्याबाबत आपण काहीही करू शकत नाही. मग आपण इतकेच करतो की ती दुसऱ्यांना पुरवत राहतो. आपली मते, आनंद किंवा राग  प्रगट करतो. पण ती पुढे करणे ही तटस्थ कृती नसते. खरंतर ही लुडबूड करणारी कृती होऊ शकते. गडबड निर्माण करणाऱ्याची कृती. आपल्याला काही करता येत नाही, आपल्याशी संबंध नाही आणि आपल्याला विशेष माहिती नाही अशी कुठंतरी लांबवर घडलेली घटना इतरांना सांगत बसणे ही लुडबूड करण्याची व्याख्या सार्थ ठरवते.

आळस

प्रत्येक नवी यंत्रणा सोबत तिचे फायदे आणि तोटे दोन्ही आणते आणि याला सामाजिक माध्यमे अपवाद नाहीत. लोक सामाजिक माध्यमांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात उत्पादनक्षम होतात. त्यांच्या कला, दाने, वेळ, शक्ती आणि उत्साह इतरांसाठी वापरून देवाचे गौरव होण्यासाठी वापरतात. पण लोक सामाजिक माध्यमे वापरल्याने अत्यंत अकार्यक्षमसुद्धा होऊ शकतात. त्याच्या सामाजिक माध्यमाच्या वापराने आळस आणि उदासीनता, सुस्ती दाखवली जाते. सामाजिक माध्यमांचा उपयोग आपण एक व्यासपीठ मिळण्यासाठी उभारू शकतो अथवा सामंजस्य व्यक्त करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी वापरू शकतो. पण जर आपण स्वत:शी प्रामाणिक असू तर कबूल करू की, आपल्यातील कितीतरी जणांसाठी ते वास्तव जगापासून आणि आपल्या वास्तव जीवनापासून पळवाट असते. ही उत्पादनक्षमता नाही तर आळस आहे आणि बायबल वारंवार जे आळशी आहेत त्यांना गंभीर सूचना देते. (उदा उपदेशक १०:१८, नीती १९:१५, १ थेस्स. ५:१४). जे लोक सामाजिक माध्यमांमध्ये जास्त कार्यमग्न असतात ते बहुधा खूप आळशी असतात.

टीकेची झोड

याचा अर्थ सत्याशी वाद घालणे. एखाद्या व्यक्तीचा सच्चेपणा,  हेतू याबद्दल शंका उपस्थित करणे. एखाद्याच्या वृत्तीबद्दल वाद घालणे म्हणजे असे सुचवणे की तुम्हाला यामागचे सत्य माहीत आहे. आज ख्रिस्ती जगात हे इतके पसरले आहे की कोणी हे चुकीचे आहे असे म्हणत नाही. म्हणजेच हे सन्मान्य झाले आहे. तरीही बायबलद्वारे जर आत्मनिरीक्षण केले तर ते आपल्याला समजेल की आपले स्वत:चे हेतूच आपल्याला समजत नाहीत. आणि जर आपलेच हेतू आपल्याला समजत नाहीत तर दुसऱ्यांचे कसे समजू शकतो? याकोब. ३:१७, आपल्याला  सांगते  की, “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.”

१ करिंथ ४:५ सूचना देते की, “त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.” जर आपल्याला दुसऱ्या कोणाच्या हेतूची कल्पना करायची असेल तर आपण त्यांचे अगदी चांगलेच हेतू समजून घ्यावे; अगदी वाईट नाही. जेव्हा ख्रिस्तामधील भावंडासंबंधी ही बाब असेल तर त्यांचे हेतू वाईट आहे असे समजणे हे पाप आहे. त्यांचे चांगले हेतू समजून न घेणे हेही पाप आहे.

आपण प्रत्येक जण ख्रिस्तामध्ये संत आहोत तरीही आपण अजूनही पापी आहोत. आपण काही पापे घेऊन राहतो आणि त्यांना सन्मान्यतेचा साज चढवतो. तेव्हा आपण आपल्याला अशी शिस्त लावावी की आपल्याला कुरूप वाटतात तीच पापे लक्षात घेऊ नये तर आपल्याला जी सुंदर वाटतात त्याबाबतही स्वत:चे परीक्षण करावे. हे करताना आपण हे समजून घ्यावे की आपले सर्वात सन्मान्य पाप हे देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे आणि त्यामुळे लोकांच्या दृष्टीनेही तितकेच ओंगळ आहे.

 

 

Previous Article

आत्म्याचे फळ लेखांक २ स्टीफन विल्यम्स

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

You might be interested in …

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा

दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर  

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  अनुवाद : क्रॉसी उर्टेकर   प्रकरण ६ वे परिश्रमांचा […]