दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पूर्ण झाले आहे

स्कॉट हबर्ड


त्या पहिल्या उत्तम शुक्रवारी यरुशलेमेच्या वेशीच्या बाहेर एका टेकडीवर समुदाय जमला आहे आणि वधस्तंभावर टांगत असताना येशूला ते पाहत आहेत.

परूशी एका चळवळीच्या आंदोलकाला आणि देवनिंदकाला अखेरीस देवाच्या न्यायाला तोंड देताना पाहत होते. सैनिक एका सामान्य गुन्हेगाराला दोन चोरांच्या मध्ये पाहत होते. पिलात एका निर्दोष पुरुषाचा अन्यायाने होणारा वध पाहत होता. शिष्य त्यांचा प्रभू त्याच्या राज्याच्या बाहेर मरताना पाहत होते.

तथापि येशूला जे दिसत होते ते या समुदायातील एकानेही पाहिले नाही. देवाचा पुत्र त्या गुलगुथा टेकडीच्या एकाकी उंचीवरून पाहत होता. त्याला दिसत होते की त्याला नेमून दिलेली कामगिरी पार पडली आहे, त्याचे कार्य पूर्ण झाले आहे. त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण झाली आहे. खिळे आत रुततच होते, रक्त ओघळत होते, त्याचा श्वासोच्छवास मंद होत असताना त्याने वधस्तंभाची खरी कहाणी सांगितली: “पूर्ण झाले आहे” (योहान १९:३०).

पूर्ण झाले आहे: नियमशास्त्र पूर्ण झाले आहे, सैतान निशस्त्र केला आहे, क्रोधाचा प्याला रिकामा झाला आहे आणि पाप्यांचे तारण झाले आहे.

नियमशास्त्र पूर्ण झाले आहे

        जेव्हा आपला प्रभू आपल्यामध्ये वस्ती करायला आला तेव्हा त्याने पुरातन भविष्य काढले आणि म्हटले,  “पाहा, मी आलो आहे; ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, ‘हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे’” (स्तोत्र ४०:७-८; इब्री. १०:५-७).

बेथलेहेमाच्या गव्हाणीपासून तर कालवरीच्या क्रुसापर्यंत येशूचे अन्न हेच  होते की पित्याची इच्छा पूर्ण करणे (योहान ४:३४). जरी तो आपल्यासारखा पारखला गेला होता (इब्री ४:१५) तरी कोणताही अविश्वास त्याचा विश्वास हादरू शकला नाही, कोणताही द्वेष त्याच्या समाधानावर सावट घालू शकला नाही, कोणताही स्वार्थ त्याच्या जिवाला डाग देऊ शकला नाही. नियमशास्त्राखाली जन्मलेल्या सर्व सर्व स्त्री पुरुषांमध्ये त्याने एकट्यानेच देवावर सर्व ह्रदयाने, जिवाने, मनाने व शक्तीने प्रीती केली (अनुवाद ६:४). पतन न होता तो एकटाच ह्या पृथ्वीवर चालला.

“नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे” (मत्तय ५:१७), त्याने शिष्यांना सांगितले. आणि त्यासाठीच तो आला होता. येशूमध्ये प्रत्येक संदेष्ट्याचे स्वप्न गौरवाने साकार झाले; प्रत्येक प्राचीन अभिवचनाला त्याचे अंतिम ‘होय’ मिळाले; नियमशास्त्रातील प्रत्येक सावली प्रकाशात आली. त्याच्या शेवटच्या तासातही त्याचा निर्णय कायम होता “शास्त्रलेख माझ्याठायी पूर्ण   झाला पाहिजे” (लूक २२:३७).

कोणतीही मात्रा अपूर्ण राहिली नव्हती आणि कोणताही बिंदू अधूरा राहिला नव्हता. त्याने नियमशास्त्राकडे पाहिले आणि म्हटले; “पूर्ण झाले आहे.”

सैतानाला निशस्त्र केले

सैतानाच्या नाशाचे अभिवचन अगदी आरंभी दिले गेले. एदेनेच्या सीमेवर देवाने वचन दिले की, हव्वेची कन्या एके दिवशी एका महान आदामाला जन्म देईल. तो विजेता सैतानाचे ऐकणार नाहीत तर त्याचे डोके ठेचील (उत्पत्ती ३:१५). प्रत्येक पिशाच्चाने हे ऐकले आणि ते थरथर कापले (मत्तय ८:२९).

जेव्हा येशू अखेरीस आला तेव्हा वचन दिल्यानुसार सैतानाची कामे नष्ट करायला तो आला (१ योहान ३:८). सैतानाने अंध केलले डोळे त्याने उघडले (लूक ४:१८). सैतानाने वाकवलेल्या पाठी त्याने सरळ केल्या (लूक १३:१०-१६); त्याने कैद केलेले गुलाम येशूने मुक्त केले (लूक ४:१८). आणि नंतर येशूच्या शेवटच्या घटकेस जी घटका अंधकाराच्या सत्तेची होती (लूक २२:५३), त्याच घटकेस सैतान पराभूत झाला.

वधस्तंभावर खिळला गेलेला असताना त्याने बलवान माणसाला बांधले आणि आणि त्याची चीजवस्तू लुटली (मत्तय १२:२९). येशूला यरुशलेमच्या बाहेर टाकले गेले असताना त्याने सैतानाला त्याच्या राज्याबाहेर काढून टाकले (योहान १२:३१). येशूच्या पायाला खिळे ठोकले जात असताना त्याच्या पायांनी सैतानाच्या डोक्यावर वार केला (उत्पत्ती ३:१५). आणि जेव्हा सर्वांनी पाहावे म्हणून येशूला उंचावले गेले तेव्हा त्याने सैतानाला नाडून त्याच्याविरुध्द जयोत्सव केला (कलसै २:१५).

जसे अंधाराची घटका संपू लागली तसे येशूने पाहिले की सैतानाचे डोके त्याच्या टाचेखाली ठेचले गेले होते आणि येशूने म्हटले; “पूर्ण झाले आहे.”

प्याला रिकामा झाला

येशूच्या सर्व सेवाकाळात त्याच्या जिवावर एक सावट पसरले होते. त्याचा अंधार नियमशास्त्रामुळे आला नव्हता आणि ही त्याच्यासाठी आनंदाची बाब होती (स्तोत्र १४:३०). किंवा तो सैतानामुळेही  नव्हता कारण येशूवर त्याचा काहीही अधिकार नव्हता (योहान १४:३०). नाही; हे सावट दुसऱ्या कशामुळे तरी त्याच्यावर आले होते, त्यामुळे सांगता येणार नाही अशा तो दु:खाने व्यापून गेला होता – देवाच्या क्रोधाचा प्याला!

दुसऱ्या कोणत्याच विचाराने आपल्या तारणाऱ्याला इतक्या मनोयातना झाल्या नव्हत्या.  तो यरुशलेमेच्या वाटेवर रडत म्हणाला, “मी मोठ्या पेचात आहे” (लूक १२:५०). जेव्हा त्याची शेवटची घटका जवळ आली तेव्हा तो म्हणाला “माझा जीव व्याकूळ झाला आहे” (योहान १२:२७). गेथशेमाने येथे तो आणखीनच दाट काळोखात बुडून गेला तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय, अति खेद झाला आहे” (मार्क १४:३३,३४).  हा प्याला टळून जाण्याचा दुसरा काही मार्ग आहे का असे त्याने विचारले (मत्तय २६:३९). आणि त्याच्या पित्याचे उत्तर त्याने शांततेत ऐकले. म्हणून जो आनंद त्याच्यापुढे ठेवला होता त्यासाठी त्याने आपले हात पुढे केले आणि तो भयानक प्याला हाती घेतला.

येशू जसजसा तो प्याला क्रूसावर पिऊ लागला तसे आकाश थरारले, दिवसाच्या प्रकाशाने पलायन केले (मत्तय २७:४५) तरीही त्याने तो आपल्या तोंडाला लावला. न्यायाचा भस्म करणारा अग्नी त्याने पिऊन टाकला. सर्वसमर्थाचा बाहेरचा अंधार हा देवाचा पापाविरुद्ध असलेला क्रोधाचा अथांग डोह, येशू  पीतच राहिला आणि त्याचा थेंब न थेंब  त्याने पूर्ण रिकामा केला.

जेव्हा आपली सर्व शक्ती यासाठी त्याने पणाला लावली तेव्हा त्याने तो रिकामा प्याला बाजूला सारला आणि म्हटले; “ पूर्ण झाले आहे.”

पाप्यांचे तारण झाले

येशूने हे शेवटचे शब्द बोलण्यापूर्वी ७०० शतके आधी यशया संदेष्ट्याने त्याच्याबद्दल म्हटले, “त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल” (यशया ५३:११). आपले कार्य वधस्तंभावर पूर्ण केल्यावर येशूचा जीव कशामुळे समाधान पावणार होता? यशया पुढे म्हणतो, “तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील; त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल” (यशया ५३:११).

फक्त नियमशास्त्र पूर्ण झाल्यामुळे, सैतान निशस्त्र झाल्याने, प्याला रिकामा झाल्याने येशू समाधान पावणार नव्हता तर पाप्यांचे तारण झाल्यामुळे सुद्धा. वराने वधूसाठी आपल्या स्वत:ला देऊन टाकले यासाठी की ती निष्कलंक व दोषरहित व्हावी (इफिस ५:२५-२७). मेंढपाळाने आपल्या मेंढराकरिता आपला जीव दिला यासाठी की त्यांनी त्याच्या कळपात सुरक्षितपणे राहावे (योहान १०:११). याजकाने स्वत:ला वेदीवर अर्पून दिले यासाठी की त्याच्या रक्तामध्ये जे झाकले गेले आहेत त्यांनी परमपवित्र स्थानामध्ये त्याच्याकडे धैर्याने प्रवेश करावा (इब्री ७:२७).

आपल्या जिवाच्या वेदनांमध्ये येशूने पाहिले की त्याचे लोक त्याची नीतिमत्ता ल्याले आहेत आणि समाधानाने त्याने म्हटले; “पूर्ण झाले आहे.”

आपण पूर्ण झालेल्या भूमीवर सुरुवात करत आहोत

या उत्तम शुक्रवारी येशूच्या वधस्तंभाखाली तुम्ही पुन्हा उभे राहत असताना तुम्हाला काय दिसते? तारणाचे पूर्ण झालले कार्य तुम्ही पाहून आनंदाने पित्याची मर्जी स्वीकारता का? की हे कार्य जवळ जवळ पूर्ण झाले असे पाहता?

आपल्यातील बरेच जण उत्तम शुक्रवारी कृसाचे अद्भुत वर्णन गायल्यावर दुसऱ्या दिवशी असे वागतो की, येशूने आपल्यासाठी जे पूर्ण केले आहे त्याचा आनंद घेण्यापूर्वी आपल्याला काही आज्ञापालन, सद्भावनेची भर घालण्याची गरज आहे. पण पूर्ण झालेल्या कार्यामध्ये आपण भर टाकू शकत नाही. पूर्णतेमध्ये आपण मदतीचा हात देऊ शकत नाही. आपण फक्त विश्वासाचे हात पुढे करू शकतो आणि नम्रतेने व आनंदाने ते स्वीकारू शकतो.

निश्चितच आपल्याला एक शर्यत धावायची आहे, चांगली कर्मे करत चालायचे आहे आणि पवित्रतेचा पाठपुरावा करायचा आहे. पण आपण पूर्ण झालेल्या भूमीवर सुरुवात करतो. देवाचे कोणतेही मूल एखादे वचन वाचण्यापूर्वी, एक विनंती करण्यापूर्वी, किंवा देवभीरूपणाची भावना जाणवण्यापूर्वी आपण “पूर्ण झाले आहे” या शब्दांनी वेढले गेलेले असतानाच उठतो. आणि आपल्या दिवसाची कालवरीपाशी सुरुवात करताना आपली शर्यत स्वातंत्र्याने धावण्यास सैतानाला विरोध करून आव्हान देत,  उत्साहाने चांगली कृत्ये करायला, आणि आनंदाने पवित्रीकरणाचा पाठपुरावा करायला आपल्याला सामर्थ्य मिळते.

तर या उत्तम शुक्रवारी आपल्या तारणार्‍याने मरताना म्हटलेले “पूर्ण झाले आहे” हे शब्द गा. आणि जेव्हा उद्या येईल तेव्हा तेच गीत पुन्हा पुन्हा गात राहा.

Previous Article

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

Next Article

आत्म्याचे फळ – चांगुलपणा

You might be interested in …

प्रभू चांगला शेवट करण्यासाठी माझी तयारी कर जॉन ब्लूम

“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो; जन्मसमय व मृत्युसमय; रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो…शोधण्याचा समय व गमावण्याचा समय असतो” (उपदेशक ३:१-२,६) जेव्हा एक नवीन बाळ जन्माला येते, नवे […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १५ प्रभूचा दिवस देवाच्या भावी प्रकटीकरणाचे ज्ञान होण्यासाठी ‘प्रभूचा’ दिवस हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. जुन्या करारातील या शब्दाच्या वापराच्या आधारावरच नव्या करारात हा शब्द वापरला आहे. देवाच्या क्रोधात घडणार्‍या भावी […]