दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

माझी चोरी माझ्या आत्म्याबद्दल काय सांगते?

जॉन पायपर

चोरी ही निरनिराळ्या प्रकारे दिसून येते. लुटणे, दुकानातून उचलगिरी करणे,  कामामध्ये टाळाटाळ, टॅक्समध्ये घोटाळा. पण अशी चोरी करण्यामागची आतील धारणा आपल्याबद्दल काय सांगते? त्यासाठी प्रथम इफिस ४:२८ वाचू या.

“चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.” हे वचन स्थानिक मंडळीतील ख्रिस्ती लोकांना लिहिले होते.

अरण्यामध्ये येशूची सैतानाकडून परीक्षा झाली. त्याने येशूला म्हटले,  “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर”(मत्तय ४:२-३). खऱ्या अर्थाने तो असे म्हणत होता, “हे बघ, तू वधस्तंभाचा मार्गाचा शॉर्टकट का घेत नाहीस? एवढा स्वनाकार, कठीण परिश्रम आणि दु:ख सहन करण्याची का गरज आहे? तुला सामर्थ्य आहे आणि ही तुझ्यासाठी किती साधी गोष्ट आहे.”

सैतान तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, “बघ ते घेऊन टाक. इतके कष्ट, प्रामाणिकपणा, परिश्रम संपवून टाक. हे तू घेऊ शकतोस. घेऊन टाक, कुणाला समजणारही नाही.”

* सैतान मालकांनी कर्मचार्‍यांना अन्यायी वेतन देऊन चोरण्यासाठी मोह घालतो.

* तो आपल्याला गबाळे काम करून, चहाच्या मोठ्या ब्रेक घेऊन, आपल्या मालकाची चोरी करण्याचा मोह घालतो.

* तो आपल्याला दुकानात उचलगिरी करण्याचा मोह घालतो.

* तो तुम्हाला तुमच्या इन्कमटॅक्ससाठी सर्व मिळकत न दाखवण्याचा मोह घालतो.

चोरी कोठून होते? येशूने म्हटले, “कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्‍या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात” (मत्तय १५:१९). ती थेट तुमच्या ह्रदयातून होते. यामुळे मी चोरी करतो. माझे ह्र्दय भ्रष्ट आहे. माझ्या इच्छा वाईट आहेत. आणि माझ्या इच्छा वाईट का आहेत? कारण पापामुळे मी आंधळा आहे, माझे ह्रदय कठीण झाले आहे. यामुळे सैतानाला पूर्ण मोकळीक मिळते. मग तो मला या जगात काय मोलाचे आहे याबद्दल फसवतो. यामुळे मी असा विश्वास धरतो की शुध्द विवेकभाव आणि देवाची आज्ञा पाळणे, त्याच्या लोकांवर प्रेम करणे यापेक्षा थोडी मजा आणि सुरक्षा अधिक मोलाच्या आहेत.

जगामध्ये भयानक फसवणूक आहे. हे जर आपण स्पष्ट रीतीने पाहिले तर आपण चोरी करणार नाही. चोरीबद्दल आपण पहिली गोष्ट म्हणू शकतो की: ती आपल्या जुन्या फसलेल्या स्वभावाचा भाग आहे.

नवी व्यक्ती

चोरी करणाऱ्या बहीण भावंडांची क्षमा होऊ शकते. इफिस ४:२८ मध्ये हे स्पष्ट लिहिले आहे;  “चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये;”   हे तो इफिसमधील चोरांविषयी लिहीत आहे. इफिसच्या मंडळीमध्ये चोर आहेत. ते मंडळीतील बाकांवर बसलेले आहेत आणि त्या मंडळीचे वडील जसे हे पत्र वाचत आहेत तसे ते ऐकत आहेत. आणि तो म्हणत आहे, “पुरुष आणि स्त्रियांनो, हे परत करू नका.” याचा अर्थ स्पष्ट आहे, “तुमचे आता तारण झाले आहे. तुमची क्षमा झाली आहे. आता तुम्हाला चोरी करायची नाही. नवी व्यक्ती झाल्याची ही शक्यता आहे.”

आणि मी कल्पना करू शकतो की दुर्व्यसनी आणि चोरीच्या जीवनातून परिवर्तित झालेला, उपासनेमध्ये उभा राहून म्हणतो, “वडीलभाऊ, जरा थांबा. मी माझ्या सर्व आयुष्यभर चोरी केली आहे. त्यातून मला सुटता येत नाही ती माझ्या विवेकातून मला दूर करता येत नाही. मला बाजारात, दुकानात तिचा मोह टाळता येत नाही. मला वाटतंय आता खूप उशीर झालाय.”

आणि तो वडील त्याला काय म्हणणार तुम्हाला ठाऊक आहे? तो म्हणणार, “इथे जेव्हा प्रेषित आले तेव्हा त्यांनी  काही आठवड्यांपूर्वी सांगितलेली गोष्ट तुला आठवत नाही का? येशूला वधस्तंभावर शेवटी  काय झाले होते? तेथे तो चोर होता. त्याच्या सर्व जीवनभर तो एक भ्रष्ट चोर होता आणि त्यासाठीच त्याला मारण्यात आले. त्यासाठी त्याला वधस्तंभावर खिळले. आणि त्याच्या जीवनाच्या अखेरच्या श्वासाच्या वेळी तो येशूकडे पाहून म्हणतो, “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा” (लूक २३:४२). आणि डोळ्याचे पाते लवेल अशा निमिषात देवाच्या अधिकाराने आणि वधस्तंभाच्या सामर्थ्याने येशू त्याला म्हणतो,  “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील” (लूक २३:४३). उशीर झालेला नाही. चोराची क्षमा अकराव्या ताशी सुद्धा होऊ शकते.

चोरीला हरवणारा विश्वास

तुमच्या इच्छाशक्तीने केवळ तुम्ही चोरीवर विजय मिळवू शकत नाही; त्यामुळे परूशी निर्माण होतो. बढाई मारणारे लोक पाप्यांच्यावर शिरजोर जाऊन म्हणतात “हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो” (लूक १८:११). परूशी हे स्वत:च्या इच्छाशक्तीने निर्माण होतात. भग्न आणि नम्र संत हे कृपेने विश्वासाच्या द्वारे निर्माण होतात. आता चोरीवर विजय मिळायला तुला कोणत्या सत्यावर विश्वास ठेवायला हवा?  तुझ्या ह्रदयातील चोरी ठार मारतील अशी अभिवचने तू सांगू शकशील. इब्री १३:५-६ हे त्यातील एक: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” म्हणून आपण धैर्याने म्हणतो “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”

आता हे वचन काय म्हणते ते तुला समजतंय का? हे वचन सांगते की प्रत्येक वेळा तू चोरी करतोस तेव्हा या वचनावर तू विश्वास ठेवत नाहीस. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू जो सर्व जग चालवायला समर्थ आहे, इतका ज्ञानी आहे की डी एन ए आणि आकाशगंगा यांची रचना तो करू शकतो, आणि इतका सार्वभौम की पक्षाचे मरून पडणे त्याच्या नियंत्रणाखाली आहे, त्याने त्याच्या प्रत्येक मुलाला म्हटले आहे,  “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”

याच्यावर विश्वास ठेवून तू चोरी करू शकतो का? नाही, तुला देवाच्या अभिवचनावर विश्वास न ठेवूनच चोरी करता येईल. यामुळेच ते भीषण आहे. यामुळेच पौलाने म्हटले, चोरांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही; कारण ते दररोजच्या जीवनात चालताना देवावर विश्वास ठेवत नाहीत. ते त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवत नाही (१ करिंथ ६:९,१०).

देवाने विजय मिळवला आहे

आता मला एक उदाहरण देऊ दे की या आठवड्यात मला खऱ्या रीतीने चोरी करण्याचा मोह कसा झाला होता आणि मी विश्वासाचा लढा कसा दिला. सप्टेंबर महिन्यात मला पाणीपट्टीच्या खात्याचे  बिल आले. ते ८४.२० डॉलरचे होते. आणि खाली एका चौकटीत छापलेले होते, ३० सप्टेंबरनंतर भरण्याची रक्कम ८८.४१ डॉलर्स. म्हणजे ४.२१ डॉलर्स अधिक. मी म्हटले, आताच भरून टाकायला हवे. पण मी ते इतर पत्रांच्या ढिगाऱ्यात ठेवले आणि विसरून गेलो. ३ ऑक्टोबरला मला त्याची आठवण आली.

मी माझ्या सर्व बिलांसाठी चेक्स लिहीत होतो आणि मी ह्या बिलापर्यंत आलो आणि माझ्या मनातला आवाज जे म्हणत होता ते अगदी ऐकण्याजवळ आलो, “तू तर नेहमीच तुझी बिलं भरतोस. तू एक सज्जन नागरिक आहेस. जर तू तुझ्या चेकवर ३० सप्टेंबर तारीख घातली तर ते तुझा चेक चालवून घेतील. ते काही त्याची पर्वा करणार नाहीत. आणि तू देवाचे ४ डॉलर्स गमावणार नाहीस.”

आणि मग एक हळूवार आवाज नव्या जॉन पायपरचा, जो अशा वेळी श्वास रोखून  नेहमी जिवंत राहण्यासाठी झगडतो तो म्हणू लागला, “तुझी चूक आहे की तू तो वेळेवर पाठवला नाही. आणि उशिराच्या पेमेंटला अधिक चार्ज लावणे ही काही त्यांची चूक नाही. जेव्हा सरकारी अधिकारी न्यायाने वागत असतील तर ख्रिस्ताचा आत्मा नेहमी त्यांच्या अधीन राहण्यास सांगतो (रोम १३:१, तीत ३:१; १ पेत्र २:१३).  शुद्ध विवेक हा ४ डॉलर्सपेक्षा अधिक मोलाचा आहे. आणि तुझ्या धन्यानं तुला चोरी करण्यास मनाई केली आहे. तो तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही. आणि तो सर्व गोष्टी तुझ्या कल्याणासाठी करील (रोम ८:२८).” आणि मग एक विचार माझ्या मनात आला : जर  देवाला तुझ्या कल्याणाचे वाटले असते तर त्याने तुझ्या दातामधली कॅव्हीटी बरी करून तुझे ४० डॉलर्स वाचवले असते. जेव्हा देवाची मुले प्रामाणिक असतात आणि आज्ञा पाळतात तेव्हा तो त्यांची काळजी हजारो प्रकारे घेतो.

तेव्हा मी ही दररोजची टिपिकल लढाई लढत होतो : देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवण्याची लढाई. जर मी योग्य केले तर तो माझी काळजी घेईल का? जर मी ४ डॉलर्स न ठेवता भरून टाकले तर तो माझे जीवन अधिक चांगले करील का? अर्थातच तो करणार. तो देव आहे.  देवाने लढाई जिंकली. आणि आता मला त्याच्याबद्दल चांगले आणि स्वच्छ वाटते. दोन दिवसांचा स्वच्छ विवेक हा ४ डॉलर्सहून मोलाचा आहे.

Previous Article

तुम्हाला स्वर्गात का जायला हवंय

Next Article

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

You might be interested in …

वधस्तंभ – देवाची वेदी

 डॉनल्ड मॅकलोईड प्रत्येक विश्वासी व्यक्तीचा प्रायश्चित्तासबंधीचा काही तरी सिद्धांत असतो. अखेर विश्वास हा वधस्तंभावर गेलेल्या तारणाऱ्यावर भरवसा आहे आणि ह्यासबंधी काही समजले नाही तर विश्वास हा अशक्य आहे. विश्वासाला पहिल्यापासून माहीत असते की वधस्तंभावर कोणी […]

जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा लेखांक २                             (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये […]

सुधारलेल्या जगाची सन्मान्य पापे टिम चॅलीस

जेरी ब्रिजेस या लेखकाने मंडळीला दिलेल्या देणग्यांमध्ये  “रिस्पेक्टेबल सिन्स” (सन्मान्य पापे) हे एक पुस्तक आहे. ही पापे म्हणजे बायबल त्यांना पाप मानत असले तरी ख्रिस्ती जन, वैयक्तिक अथवा सार्वजनिकरित्या काही वेळा अशी पापे मान्य करतात. […]