दिसम्बर 28, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा जीवन चिरडून टाकले जाते

वनिथा रिस्नर

\

“ हे आम्हाला अगदी चिरडून टाकत आहे” माझे प्रिय मित्र सॅम आणि मिलींडा यांच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले. ते एका अगाध दु:खातून जात होते. त्यांनी नुकतीच त्यांची मुलगी गमावली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी तिला रशियन अनाथालयातून दत्तक घेतले होते. तिला आत्महत्त्या करण्याकडे प्रवृत्ती होती. त्याच्याशी ती झगडत होती व पूर्वी तिने असे प्रयत्न केले होते याची कल्पना त्यांना होती. ती आता सुधारत आहे असे त्यांना वाटत होते.  तिचे भविष्य बदलावे अशी त्यांची आशा होती. पण आता तिच्या आत्महत्त्येमुळे त्यांच्या मनात प्रश्न आणि शंकांचे काहूर माजले: दत्तक घेऊन तिच्या जीवनात काही फरक पडला का?

त्यातच भर म्हणजे ही त्यांची मुलगी मरण्यापूर्वी एकटी आई होती आणि आता चार वर्षांच्या नातवाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. ह्या दु:खाला कसे तोंड द्यावे हे न समजण्यास तो अगदी लहान असल्याने, तो सर्वाना हवे तसे बोलत होता व मारत होता. आपले दु:ख कसे पेलावे, आपल्या दुसर्‍या मुलांना त्यांचे दु:ख पेलण्यास कशी मदत करावी आणि ह्या नातवाला बिनशर्त स्वीकारून त्याच्यावर प्रेम कसे करावे हे ते शिकत होते. खूप थोड्या लोकांना हे समजते आणि त्याहून थोडे लोक अशा जीवनात उतरतात. हे फार थकवणारे असते. मिलिंडाला कॅन्सर सुद्धा आहे त्यामुळे दररोज तिला थकव्याला तोंड द्यावे लागते आणि त्यातच कोविडमुळे विलगीकरणाचे ताण काही कमी नाहीत. त्यांचा एकही दिवस काहीच सुटका देत नव्हता. परिस्थिती आटोक्याबाहेरची आणि कधीकधी अशक्य वाटत होती.

दु:खावर दु:ख. एकावर एक येत असलेले दु:ख बऱ्याच जणांना समजत असेल. असे काही मोसम जेव्हा आपण मुकाबला करत असलेल्या समस्या अधिकच बिकट बनत जातात आणि नंतर तर अशक्य बनतात. असे मोसम जेव्हा चिरडणे हा एकच  शब्द आपल्या परिस्थितीचे योग्य वर्णन करू शकतो. जेव्हा जीवन निर्दय वाटू लागते असे मोसम.

सॅम म्हणाला वाईन कशी बनवली जाते ह्यावर तो विचार करत होता आणि ती प्रक्रिया त्याला त्याच्या जीवनासारखी वाटत होती. चिरडून गेल्यावर अंधारात वाट पाहत बसायची की, यातून काही चांगले निष्पन्न होते का – आणि हे वाट पाहणे अनंतकालासारखे वाटते. मी प्रार्थना करत त्यांच्यासोबत वाट पाहिली आहे – हे समजून की देवाला सुटका न करण्यासारखी कोणतीच परिस्थिती नाही. वाट पाहत की देव याचा वापर कसा करून घेईल.

सॅम माझ्याशी बोलल्यावर वाईन कशी करतात यावर मी संशोधन केले. त्याची तुलना मला नीट समजून घ्यायची होती. मला समजले की उत्तम वाईन करताना अशी द्राक्षे निवडतात की जी कठीण वातावरणातून गेलेली असतात आणि ज्यांना पाणी सुद्धा अगदी मोजून दिले जाते. ज्यांना भरपूर पाणी मिळते असे दुर्लक्षित द्राक्षवेल आपली ऊर्जा पाने उपजवण्यात व पसरण्यात घालवतात. ते कमी फळ देतात. ते सुंदर आणि पानांनी बहरलेले दिसत असतील पण ते खरे फलदायी नसतात. काळजीपूर्वक पाण्याची कपात करून वाढवलेले द्राक्षवेल भरघोस द्राक्षे देतात. त्यांची फळे दर्जेदार बनतात कारण प्रत्येक पोषक द्रव्याचा कण त्यांनी झगडून घेत शोषलेला असतो.

त्यानंतर द्राक्षवेल झपाट्याने कापले जातात, बहुधा रिकाम्या खोडापर्यंत. उत्तम वाईनरींना (वाईन बनवणारे) हे चांगल्या फळासाठी किती महत्त्वाचे आहे हे ठाऊक असते. शिकाऊ लोक असे मूलगामी काम करण्यास कचरतात. त्यांना ते अनावश्यक वाटते. कुशल वाईन-ड्रेसरला अगदी ठाऊक असते की द्राक्षवेल आणि द्राक्षे टिकून राहिलेली आहेत पण तरीही तो अशी मूलगामी काटछाट करायला तयार असतो कारण ते भावी वाढीसाठी आणि फलद्रूप होण्यासाठी आवश्यक असते. त्याला माहीत असते की रसभरीत फळासाठी काटछाट आवश्यक असते.

तरीही आता वाईन होण्यापूर्वी द्राक्षांना पुढील प्रक्रियेतून जावे लागते: चिरडले जाणे. इथे द्राक्षांवर प्रचंड दाब टाकला जातो त्यामुळे त्यांच्यात आहे ते तो सर्व रस पिळून काढला जातो. हा रस नंतर लाकडी पिपात ओतला जातो व तेथे तो जुना होण्यासाठी ठेवला जातो. त्यासाठी ती पिपे अंधाऱ्या कोठडीत दडवली जातात. अशा मॅच्युरेशन प्रक्रियेमुळे वाईन नितळ आणि कमी अॅसिडिक बनते – जितकी जास्त ठेवली जाते तितकी वाईन अधिक चांगली बनते.

जसे वाईन एका लांबलचक आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून गेल्यावरच एक चवदार पेय बनते तसेच ब्रेडचेही आहे. त्याचे जीवन सुरू होते ते दाण्याचे भरडणे आणि दळले जाणे याने. आणि मग आपल्याला पोषण करणारा एक चवदार घास तो बनतो. दाणा जोपर्यंत भरडत नाही तोपर्यंत तो निरुपयोगी असतो.

द्राक्षाचे चिरडले जाणे आणि दाण्याचे भरडणे यातून एक मेजवानी तयार होते जी ख्रिस्ती लोक – प्रभुभोजन म्हणून ओळखतात. भाकरी मोडली जाते एकेक तुकडा तोडला जातो आणि उघड्या हातावर ठेवला जातो. वाईन प्यालामध्ये ओतली जाते. भाकर आणि द्राक्षारस आपल्याला दिले जातात त्यावेळी आपण इतिहासातील जीवन बदलणाऱ्या चिरडण्याची आठवण करत असतो. त्याने त्याचे शरीर आणि रक्त आपल्यासाठी दिले – “त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले” (यशया ५३:१०). ख्रिस्त हा “आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले” (यशया ५३:५). येशू आपल्यासाठी ठेचला गेला  ज्यामुळे आपल्याला जीवन मिळाले, आपल्यामध्ये शांती आली आणि आपले जीव वाचले गेले.

ख्रिस्ताचे ठेचणे आपल्याला खात्री देते की आपल्या पापामुळे आपल्याला शाबीत असलेल्या शिक्षेचे दु:ख आपण कधीच भोगणार नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण दु:ख कधीच भोगणार नाही.

शास्त्रलेखातून आपण सर्वत्र पाहतो की देवाने त्याच्या लोकांना त्यांच्या निराशेतून व दु:खातून कसे वाचवले आहे. लेआ तिच्या नवऱ्याची नावडती होती पण देवाने तिला ख्रिस्ताच्या वंशावळीत निवडले. योसेफाने कित्येक वर्षे आपली परिस्थिती कशी वाईट होत आहे हे पाहिले पण तरीही देवाने त्याला विपत्तीच्या देशात देवाने फलद्रूप केले (उत्पत्ति ४१:५२). देवाने प्रेषित पौलाला वापरले. त्याच्या  जीवनाचे चिन्ह  सुवार्तेसाठी दु:खसहन करणे हेच होते व त्याद्वारे देवाने त्याची कृपा दाखवून दिली (२ करिंथ १२:९). देवाने  ते चांगल्यासाठीच योजले होते हे आता आपण  पाहत असलो (उत्पत्ति ५०:२०) तरी त्यामधून जाताना ते फारच हताश आणि निराशाजनक वाटले असते. दु:खाच्या दिवसात जेव्हा दु:खसहन हे कठोर वाटते तेव्हा हे आता कधीच संपणार नाही असे वाटते. ते संपणार आहे. देवाला माहीत आहे की किती काळ, कोणत्या क्षणापर्यंत आपण दु:ख सोसावे. बायबल म्हणते, “कोणी भाकरीच्या धान्याचा भुगा करतो काय? नाही. तो त्याची मळणी सतत चालवत नाही, तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालत नाही, तो त्याचा भुगा करत नाही” (यशया २८:२८).

प्रभुभोजनातील देवाशी सहभागितेचे घटक  द्राक्षारस आणि भाकरीप्रमाणेच, देवाने आपला उपयोग करण्यापूर्वी आपणही कित्येकदा चिरडून जातो. आपण दु:खावर दु:ख सहन करत असतो. आपण संकटातून जातो. आपली काटछाट केली जाते. आपल्याला जमिनीवर दडपून ठेवले जाते आणि मग आपण अंधारात वाट पाहत राहतो, असा विचार करत की खरंच काही घडत आहे की नाही. पण आपल्या देवाला नक्की काय घडत आहे हे सर्व ठाऊक आहे. तो आपल्या जीवनात काहीतरी असामान्य घडवून आणत आहे. असे काही की ज्यामुळे आपण बदलून जाऊ आणि देवाचे गौरव होईल. ख्रिस्तासाठी दु:खसहन हे नेहमीच काहीतरी भव्य घडवते. देव आपल्याला अन्न  भरवतो आणि इतरांना पण.

या प्रक्रियेमध्ये देव आपल्याला कधीच सोडणार नाही. आपण केवळ माती आहोत आहोत हे त्याला माहीत आहे. आपण ह्यातून टिकून राहणार हे त्याला माहीत आहे. “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो”  (स्तोत्र ३४:१८). तो आपल्या जवळ येईल आणि त्याच्या सान्निध्याने व प्रीतीने आपले समाधान करील. जी प्रत्येक गोष्ट तो आपल्या जीवनात आणतो ती त्याच्या प्रेमळ काळजीचाच परिणाम आहे.

आपण चिरडले जात आहोत असे तुम्हाला वाटतंय का? तुमचे दु:खसहन शक्तीपलीकडचे वाटतंय का? तुम्ही एकटेच अंधारात वाट पाहत आहात का?

माझी खात्री आहे सॅम व मिलिंडा यांना असेच वाटत असणार. तरीही त्यांच्यासोबत आपण विश्वास धरतो की त्यांच्या जीवनात व जीवनामधून देव काहीतरी उत्कृष्ट घडवून आणत आहे. तुम्ही कदाचित साधे पाणी असाल आणि शांतपणे व कोणाला दिसत नसताना एका उत्तम द्राक्षारसामध्ये तुमचे रूपांतर होत असेल. ते त्याच्या खोलवर आणि अदृश्य कामामुळे आता होत आहे. पण जेव्हा ते प्रकट होईल तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी त्यामुळे आनंद करील आणि ते अप्रतिम सुंदर असेल.

आज जर तुम्हाला आपण चिरडले जात आहोत असे वाटत असेल तर खात्री बाळगा की तुमचे दु:खसहन निरर्थक नाही आणि एक दिवस देवाने त्याच्यातून जे सौंदर्य निर्माण केले आहे ते तुम्ही पाहाल. जे काही तो निर्माण करत आहे ते अशा कठोर दिसणाऱ्या परिस्थितीशिवाय, अंधाऱ्या पिपाशिवाय,  दळणाऱ्या चक्कीखाली, लांबलचक वाट पाहिल्याशिवाय  घडू शकले नसते ही खात्री बाळगा.  आणि एक दिवस जेव्हा स्वर्गात आपण त्याचे ऐश्वर्य पूर्णपणे चाखू तेव्हा देव चांगला द्राक्षारस शेवटपर्यंत का राखून ठेवतो हे आपल्याला नीट समजेल (योहान २:२).

Previous Article

आत्म्याचे फळ – इंद्रियदमन

Next Article

विस्कटलेल्या कुटुंबातील मुलांसाठी आशा

You might be interested in …

या ख्रिस्तजन्मदिनी तुमच्या मुलांना पुढील पाच गोष्टी शिकवा

ख्रिस्टीना फॉक्स मम्मी, ह्या ख्रिसमसला मी घराचे डेकोरेशन करणार.” सणाचा वेळ आता परत आलाय. दुकाने लाल आणि हिरव्या रंगांनी सजवलेली आहेत. रस्ते, फेसबुक, इमेल जाहिरातींनी भरून गेलेली दिसतात. मुलांच्या डोळ्यांसमोर मात्र सुंदर वेष्टणात गुंडाळलेले बॉक्सेस […]

ख्रिस्ताचे वधस्तंभावरील सात उद्गार

प्रस्तावना – दोनच ख्रिस्ती सणांतील हा ख्रिस्ताच्या दु:खसहनाच्या स्मरणाचा सण आहे. जयंत्या, पुण्यतिथ्या जगात पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा सण? ही तर ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाची गोड जोडगोष्ट आहे. त्या दु: खाला महान मोल व ध्येय […]

प्रभूमागे एकाकी आणि दु:खित जनांकडे जा

स्कॉट हबर्ड आमच्यापुढे असलेली मुले गटारात, उकिरड्यावर, गल्लीबोळात आणि इतर काही शहराच्या कोपऱ्यात सापडलेली होती. बहुतेकांना जन्मत:च शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व होते.  – आधीच गरिबीने पिचलेल्या त्यांच्या पालकांना हा भर खूपच जड होता म्हणून त्यांनी […]