दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्तासाठी थोडे दिवस कष्ट करताना

ग्रेग मोर्स

येशूच्या मागे जाणे सोपे आहे की कठीण? एका बेघर (आणि प्यालेल्या) माणसाने माझ्या पत्नीला काही वर्षांपूर्वी प्रश्न केला. खरं तर त्याला स्वत:शिवाय इतर कुणाचेही उत्तर ऐकण्यात स्वारस्य नव्हते. त्याने स्वत:च आपला प्रश्न लगेच सोडवला: “जर तुम्ही स्वत:ला पूर्णपणे त्याला वाहून टाकले असेल तर ते सोपे आहे. जर तुमची भक्ती दुभंगलेली असेल, त्याच्यावरील प्रेम जगातील इतर गोष्टींच्या प्रेमामध्ये विभागलेले असेल तर ते कठीण असणार.”

त्याच्या मूर्खपणामध्येही तो मनुष्य एका खोल सत्याशी धडकला. महान प्रीती ओझे हलके करते. ख्रिस्ती जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी व समर्पण यांना जेव्हा आपण ख्रिस्तावरील प्रीतीने तोंड देतो तेव्हा जीवन हलके होते नाहीतर ते कठीण बनते.

प्रीती ओझे हलके करते

त्या मनुष्याच्या उद्गाराने आम्हांला आठवण करून दिली जाते की प्रेमासारखी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला कठीण परिस्थितीत सामर्थ्य देते आणि शौर्याची कृत्ये करण्यास समर्थ करते?

प्रेमी जोडप्याचे उदाहरण घ्या. ज्या माणसाचे ह्रदय एका स्त्रीने जिंकले आहे त्याला कोणती गोष्ट कठीण अथवा गैरसोयीची वाटते का? तिच्यासाठी तो पर्वत चढून जाईल, समुद्र पोहून जाईल, श्वापदांशी सामना करेल. प्रीती, खरी प्रीती त्याला त्याच्या सामान्य कुवतीच्या पलीकडे घेऊन जाते त्याच्या मर्यादांची नवी व्याख्या करते, त्याच्या सीमा विस्तृत करते. प्रीती त्याचे रक्त प्रबल करते, त्याच्या बाहूंना शक्ती देते, त्याच्या मनाला कधी नव्हे एवढे केंदित करते.

प्रीतीचे असले मादक सामर्थ्य आपल्याला बायबलमध्येही दिसते. “तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली”  (उत्पत्ती २९:२०). प्रेमाची जादू पाहा. सात वर्षांच्या परिश्रमांचे तिने “केवळ थोड्या दिवसांमध्ये” रूपांतर केले. तिच्यावरील त्याच्या प्रीतीने त्याचे ओझे हलके केले आणि त्याचा वेळेचा अनुभवही बदलून टाकला.

जरी तुम्ही त्याला पाहिले नाही

याकोबाने जसे राहेल मिळवण्यासाठी काम केले तसे ख्रिस्त मिळवण्यासाठी काही आपण काम करत नाही. पण आपला सेवेचा भर हलका करण्यासाठी आपल्याला महान प्रीती मिळाली आहे. ख्रिस्तासाठीची प्रीती आपल्याला खडतर कष्टाचे ओझे हलके करणारी, लांबलचक नसणारी अशी वाटू लागते. आणि अशा लोकांच्या सत्याने वाखाणणी करणाऱ्या स्मृतीचा लोकांना हेवा नाही का वाटणार?  ती अशी असेल – ‘श्री व सौ. विश्वासू यांनी अथकपणे मृत्यूपर्यंत ५० वर्षे ख्रिस्ताची सेवा केली आणि हे पाच दशकांचे त्यांचे कष्ट व समर्पण त्यांना केवळ थोडे दिवस असे भासले कारण त्यांचे प्रभूवर असलेल्या त्यांच्या प्रीतीमुळे.’

ख्रिस्तासाठी असलेली ही जिवंत व उत्कट प्रीती आपल्या संकटात आपल्याला आनंद देते आणि कठीण परिस्थितीत टिकून राहायला सामर्थ्य देते. हाच मुद्दा पेत्राने छळ सहन करत असलेल्या मंडळीला लिहिला. जरी ते निरनिराळ्या कठीण संकटात होते तरी इतर सर्वांना स्पष्ट दिसणारे सत्य असे होते:
“त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता” ( १ पेत्र १:८-९). ते आनंदी होते व प्रीतीने बहरलेले होते कारण त्यांची ख्रिस्तावरील प्रीती त्यांच्या परीक्षांच्या वर आणि आणि पलीकडे होती. त्यांच्या सर्व संकटात लोक पाहू शकत होते की त्यांचे ह्रदय त्यांना न दिसणाऱ्या वरावर स्थिर होते. त्यांचा आनंद हा अवर्णनीय होता व त्याला पेत्र “गौरवयुक्त” असे म्हणतो.

त्यांचा आनंद हा जोमदार होता. त्याला अंत नव्हता. तो विरून जाऊ शकत नव्हता. कोणापुढेही नमू न शकणारा त्यांचा विश्वास हा त्या सर्वसमर्थावरील त्यांच्या प्रीतीच्या गाढ खोलीतून उफाळून वर येत होता. त्यांच्या संकटांच्या सात वर्षांवर त्यांचे लक्ष केंद्रित नव्हते तर ह्या परीक्षा त्यांना जेथे नेणार होत्या त्या परमसुंदर येशूवर ते केन्द्रित होते. संकटात असतानाही त्यांच्या प्रीतीमुळे ख्रिस्ताला अनुसरणे त्यांना सोपे वाटत होते.

प्रीती जड वधस्तंभ हलके करते

ख्रिस्तासाठीची आपली प्रीती आपल्या दैनंदिन अडचणी, सततची दु:खे, कठीण परीक्षा, थकवून टाकणारे परिश्रम यांना भारावून टाकते का? हे सर्व केवळ काही दिवसांचे असे आपल्याला वाटते का? त्याच्याशी तुलना करताना आपल्या जखमा, हानी, श्रम हे अगदी क्षुल्लक वाटतात का? आपले उत्तम कामकरी आणि महान सहन करणाऱ्यांसोबत आपले ह्रदय म्हणू शकते का की “आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते” (२ करिंथ ४:१६-१८).

आपल्याला जे पलीकडे दिसते त्यामुळे इथली आपली संकटे हलकी आणि क्षणिक वाटतात का?

माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास, मला हे नक्की ठाऊक आहे की ज्या क्षणी माझे खिस्तासाठीचे प्रेम थंड होऊ लागते तसा दिवस लांबच लांब वाटू लागतो, रात्र अंधारी होऊ लागते, आणि मोह वाढत जाऊ लागतात. विभागलेल्या ह्रदयाची कठीणता मला ठाऊक आहे. माझ्या प्रभूसाठी कमकुवत प्रेम असेल तर मी कमकुवत होतो. जेव्हा माझे ह्र्दय त्याची भक्ती करते तेव्हा मी पाण्यावर चालू शकतो – मग भोवताली कितीही वादळे उठोत. तथापि जेव्हा उसळलेल्या लाटा माझी प्रीती थंडावू लागतात तेव्हा मी बुडू लागतो.

आपल्या प्रीतीचा कमी प्रकाश

आता आपली ख्रिस्तासाठीची प्रीती आपल्याला कष्ट करायला आणि दु:ख आनंदाने सहन करायला कशी सामर्थ्य देते याबद्दल बोलल्यावर आपण आठवण करायलाच हवी की आमचे ख्रिस्तावरील प्रेम कसे वाढत जाते:
त्याच्याकडे आणि त्याची आपल्यासाठीची प्रीती पाहत राहण्याने.

त्याला व्यवस्थित समजून घ्या की तो आपला याकोब आहे. ज्याने स्वर्ग सोडला आणि तीन दशकांहून अधिक आपल्यामध्ये त्याने परिश्रम केले, मरणापर्यंत त्याने आज्ञापालन केले. पण आपण पाहतो की आपल्या प्रिय वधूसाठी क्रोध आणि लज्जा त्याने सहन केली: जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला (इब्री १२:२). ती – सुरक्षित, खंडणी देऊन सोडवलेली,  समेट केलेली, तो आहे तिथे असलेली आहे– हा त्याच्या आनंदाचा मोठा भाग होता.

आपली प्रीती जेव्हा तिच्या उगमाकडे परत जाते तेव्हा तिचा प्रकाश नेहमीच कमी दर्जाचा असणार. आपल्या प्रेमाचा चंद्र स्वत:हून प्रकाश देऊ शकत नाही. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाल्यानेच आपण प्रकाश देऊ शकू (रोम ५:५). त्याची ज्वाला  मृत कोळशांना स्पर्श करतो आणि नव्या जीवनाची ठिणगी उडते. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो (१ योहान ४:१९).

अशा रीतीने योहानाने हा महान सूर्य त्याच्या जीवनाचे केंद्र आणि ओळख म्हणून निवडला: त्याचे ख्रिस्तासाठीचे प्रेम नाही तर ख्रिस्ताचे त्याच्यासाठीचे प्रेम. ख्रिस्ताने ज्याच्यावर प्रीती केली असा तो शिष्य होता (योहान १३:२३, ३५, १९:२६). आणि जेव्हा आपल्यावर या अद्भुत तारणार्‍याने प्रीती करावी म्हणून आपली दु:खित ह्रदये कण्हतात तेव्हा तो आपल्याला आठवण करून देतो की,  “प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले” (१ योहान ४:१०).

दहा हजार जीवनानंतर

याकोबाने राहेलसाठी काबाडकष्ट केले आणि त्याच्या तिच्यावरील प्रीतीमुळे त्याचे ओझे हलके झाले. प्रीतीने त्या दोघांमध्ये असलेले उभे असलेले महिने फास्ट फॉरवर्ड केले, त्याचे काम सोपे झाले. देवाने आपल्याला त्याच्यासाठी अशी प्रीती देणे ही किती महान देणगी आहे, ज्यामुळे त्याचे येणे जवळ येत असताना आपले काम आणि समर्पण हे हलके बनते.

हे जीवन आपल्या सर्वांना ओलांडून जाईल. त्याच्या आणि आपल्या मधला वेळ लांबलचक करण्याऐवजी पौलासारखे आपल्याला निश्चित ठाऊक असावे की “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे” (फिली. १:२३). आपल्या जीवनाचे डोंगर आपण चढलो आणि खोल दऱ्या पार केल्या आणि हा सर्व वेळ आपण देवाचा इर्षेने शोध केल्यामुळे आपण त्याची सेवा आनंदाने केली तर किती बरे?

कापणीच्या वेळी जेव्हा आपला नेमलेला समय येईल तेव्हा आपले खरबरीत हात आणि दुखणाऱ्या पाठी असताना स्पर्जनसोबत आपल्यालाही म्हणता यायला हवे की, “मला असे वाटते की जरी मी आणखी दहा हजार जीवने जगू शकलो तरी ती सर्व मला ख्रिस्ताकरता जगायला आवडेल. आणि तरी तेव्हाही मला असे वाटायला हवे की, त्याने माझ्यावर केलेल्या त्या महान प्रीतीसाठी ती खूपच कमी असतील.”

Previous Article

अठरावे शतक : झिगेन्बाल्ग कालवश

Next Article

जेव्हा देव अन्यायी वाटतो

You might be interested in …

माझ्यातला पशू जागा होतो

स्कॉट हबर्ड कधीकधी देवाचा हात त्याच्या इच्छेने तुमच्या जीवनात काही चित्र काढत आहे असे तुम्ही पाहत असतानाच ती पेन्सिल अचानक  वळण घेते आणि जे फूल होणार असे तुम्हाला वाटले होते त्याचे काट्यात रूपांतर होते. न […]

आत्म्याचे फळ – शांती

सॅमी विल्यम्स आपल्यामध्ये संघर्ष कोणकोणत्या गोष्टींवरून होतात? नातेसंबंध, जमीन, पैसा, खाणेपिणे, पार्किंग.इ.देवाला त्याच्या लोकांमध्ये झालेला बेबनाव आवडत नाही. जीवन तर संघर्षानी भरलेले आहे. आणि हे पापाचे लक्षण आहे. या सर्वामध्ये आपल्याला ऐक्य कसे मिळेल?ऐक्य हे […]