दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा देव अन्यायी वाटतो

 जॉनी एरिक्सन टाडा 

    लेखांक १

(लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये घेऊन व अशाच स्थितीमध्ये असलेल्यांना मदत करण्याच्या निर्धाराने ती पुढे आली. १९७९ मध्ये तिने जॉनी अँड फ्रेंड्स ही संस्था स्थापन केली व अशा विशेष गरज असलेल्या कुटुंबांना व मंडळ्यांना ख्रिस्तकेंद्रित कार्यक्रम देऊ लागली. या संस्थेद्वारे अनेक अपंगामध्ये सेवा करणाऱ्या ख्रिस्ती संस्था व विद्यापीठांना शिक्षण दिले जात आहे.)

                                                  
                                                       विकीची कथा

२६ मार्च १९७६ ची  सकाळ जरी सुंदर होती तरी  विकी ओलीवास साठी ती तशी नव्हती. नवरा सोडून जाण्याअगोदरचे सुखी दिवस तिला आठवले. आता घरी फक्त ती आणि तिचा २ वर्षांचा मुलगा. अनिश्चित भविष्याला तोंड देण्यासाठी ती एका नोकरीच्या मुलाखतीला निघाली होती. कुठेतरी सुरुवात करण्याची आता तिला गरज होती.

एजन्सीने दिलेला पत्ता शोधणे विकीला कठीण गेले. त्या विभागात  फक्त कारखाने  होते. मुलाखतीला जाऊ नये असे तिला वाटू लागले. पण रस्त्यावरील एका व्यक्तीने उजव्या हाताला असलेल्या गल्लीतील शेवटचा दरवाजा तिला  दाखवला.  एका अंधुक कार्यालयात तिने प्रवेश केला. आत दमट वास येत होता. तिथे स्वागतकक्ष नव्हता. तिने सभोवार पाहिले व एका कोपऱ्यातून हाक दिली “कोणी आहे का इथं?” आता  ती पुढे असलेल्या हॉलकडे काळजीपूर्वक चालू लागली. हॉलच्या पुढे एक गोदाम होते. दोन माणसे एका टेबलापाशी बसली होती.

काहीतरी बरोबर नव्हते

परिचय करून दिल्यांनतर बॉस वाटणारा एक इसम मागे टेकून बसला व विकीला निरखू लागला. तिला खूपच अस्वस्थ वाटू लागले. त्याने तिला काही फॉर्म भरण्यासाठी मागच्या  कार्यालयात यायला सांगितले. फॉर्म भरताना तिला वाटले आपण इथे यायला नको होते. काहीतरी बरोबर नाही. त्याचवेळी त्या माणसाने दरवाजा बंद करून तिला पुढच्या हॉलकडे येण्याचा इशारा केला. पुढे काही कळण्यापूर्वी त्याने तिला दोन्ही  हातांनी धरून भिंतीवर आपटले.
“मी त्यांना सांगितले होते मला तुझ्यासारखीच बाई पाहिजे होती” तो फुत्कारला.  तो तिचे कपडे ओढून फाडू  लागला. विकीने त्याला जोराने ढकलण्याचा प्रयत्न केला – अचानक बँग – ती खोली व तो मनुष्य विकीभोवती गरकन फिरला आणि विकी जमिनीवर कोसळली- विकीच्या मानेला  गोळी लागली होती.

घाबरून त्या माणसाने तिला ओढून बाथरुममध्ये ओढत ओढत नेले. विकीच्या चेहरा जमिनीला फरफटत होता . काहीतरी गरम ओले तिच्या मानेवरून चालले होते. रक्त! आता तो मला मारून टाकणार? तिला कारकडे फरफटत नेत असताना ती विचार करत होती. अचानक याला वेगळेच वळण मिळाले. त्या माणसाने तिला जवळच्या दवाखान्यातील इमर्जन्सी च्या खोलीत टाकले आणि तो पळून गेला. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असताना जवळ असलेल्या  पोलीस-स्त्री ला ती सर्व कहाणी सांगत होती. तिच्यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नव्हते. नंतर  ते त्या गोदामात गेले आणि जेव्हा तिची पर्स, रक्त  आणि कचऱ्यात फेकलेली बंदूक दिसली तेव्हा सर्वांची खात्री झाली. त्या मनुष्याला अटक करण्यात आली.

ही कहाणी टी.व्ही वर दाखवलेल्या चित्रपटासारखी वाटते, पण ती खरीखुरी घडलेली आहे. आणि त्यावरच्या निर्णयाचा शेवट तर अजूनच दु:खाचा! या हल्लेखोरावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आणखी तीन आरोप होते. पण तरी त्याची तीन वर्षानंतर  सुटका झाली. आणि आता विकी तिचे जीवन ( पक्षघातामुळे) निचेष्ट स्थितीत घालवत आहे.

एका पुनर्वसनाच्या क्लिनिक मध्ये मी प्रथम विकिला भेटले. तिच्या चेहऱ्यावर लिहिलेल्या वेदना पाहून माझे मन हेलावले. आपल्याला दिसते की गुन्हेगार विशेष काही न होता सहीसलामत सुटला. याउलट तिला दोन्ही हातापायांना झालेल्या पक्षघातामुळे जन्मठेपेची सजा मिळाली आहे. स्तोत्र ७३:३-४ ही वचने ती स्वत: लिहू शकली असती –

“दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गर्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.  ते लोक आरोग्य संपन्न आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही.” कदाचित तुम्हीही ही वचने लिहू शकाल –आणि कदाचित तुमच्या सभोवतालचे लोक तितके गर्विष्ठ किंवा उद्दाम नसतीलही.

कदाचित तुम्ही ती एकटी स्त्री असाल, काही दशके देवाची सेवा तुम्ही मनोभावे केली असेल आणि देवाने तुम्हाला योग्य जोडीदार द्यावा म्हणून मनापासून इच्छा असताना तुमच्या जवळच्या मैत्रिणीला देवभीरू जोडीदार  मिळताना तुम्ही पहिले असेल.

तुम्ही कदाचित ती तरुण आई असाल  आणि आपला दोन वर्षांचा मुलगा कॅन्सरने हळूहळू मरताना तुम्ही पहिला असेल आणि त्यावेळी तुमच्या मैत्रिणी आपल्या मुलाच्या मोडलेल्या हाताबद्द्ल किंवा अभ्यासाबद्दल चिंता करत असतील.

तुम्ही कदाचित एक कष्टाळू विक्रेता असाल व आपल्या नैतिक मूल्यांना धरून असाल. पण त्याच वेळी लांड्यालबाड्या  करून तुमचा सोबती वर चढतो आणि त्याचे कौतुक होऊन त्याला बढती मिळते.

लहानपणी झालेल्या अत्याचाराच्या किंवा पूर्वीच्या विवाहाच्या ह्रदयद्रावक खुणा तुम्ही सतत बाळगून असाल.

जीवन हे न्यायी नाही. ते अन्यायाने भरलेले आहे आणि त्यामुळे आपले मनोधैर्य खचले जाते…नवरे आपल्या बायकांचा विश्वासघात करतात… दारू पिऊन गाडी चालवताना ड्रायव्हर चौकातील रस्ता ओलांडणाऱ्या मुलांना चिरडून टाकतात…बलात्कारी तुरुंगातून सुटतात आणि दुसऱ्या राज्यात जाऊन आपले जीवन पूर्ववत सुरू करतात. या सर्व विध्वंसामध्ये देव कोठे आहे? दुष्टाईला नेहमी वरचा हात का मिळत राहतो? आणि याबद्दल आपण काय करू शकतो?

स्तोत्रकर्त्याच्या वेदना

“हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस?

दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.

कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.

दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.

गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो; त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात.

जाळीत जसा सिंह तसा तो गुप्त स्थळी टपून बसतो; दीनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो.

लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो, आणि त्याच्या बळकट पंजांत तो सापडतो.

तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही” (स्तोत्र १०:१-४, ८-११).

 दोन प्रतिसाद

 देव अन्यायी दिसतो असा विचार (एक धोकादायी पण पूर्णत: स्वभाविक)  मनात येणे हे स्वाभाविक  आहे. जेव्हा आपल्यावर अन्याय घडला जातो  तेव्हा आपला राग व्यक्त करणे, दोष दाखवणे हे योग्य आहे असे आपल्याला वाटते. जर तुम्ही लोकांना त्यांचे कटुत्व अथवा दोष दाखवण्याची वृत्ती दाखवली तर ते लगेचच तुम्हाला सांगतील की लोकांनी त्यांना कशी चांगली वागणूक दिली नाही, अपमान केला अथवा दुखावले. पण अन्यायाला तोंड देण्याचे दुसरे मार्ग आहेत का? विचार करा…

नैसर्गिक प्रतिसाद: “देव, जर तो देव असेल तर त्याने अन्यायाचा द्वेष करायला हवा, तो खपवून घेऊ नये. आणि म्हणूनच मला दिलेली भयानक वागणूक थांबवण्यास तो असहाय्य झाला असावा. देवाची  निष्क्रीयता मी भरून काढायला पाहिजे. आणि जर ह्या व्यक्तीला मी उजेडात आणले नाही, तिचा न्याय केला नाही किंवा तिला शिक्षा मिळाली नाही तर हा सर्व मामला मी माझ्या हातात घेऊन निंदा, टीका वापरून किंवा तिच्याविषयी मनात आढी बाळगून तिची परतफेड केली पाहिजे.

दैवी  प्रतिसाद: देव अन्यायाचा द्वेष करतो आणि हो, मला वाईट वागणूक देणाऱ्या त्या व्यक्तीला उजेडात आणणे, तिचा न्याय होणे, तिची खरडपट्टी काढणे उचित आहे. पण ते होवो अथवा न होवो मी कटू होणार नाही किंवा बदला घेणार  नाही. मी वाईटाची फेड बऱ्याने करीन आणि शाप न देता आशीर्वाद देईन.

क्रमश:

Previous Article

ख्रिस्तासाठी थोडे दिवस कष्ट करताना

Next Article

कोमट जन माझ्याकडे येवोत

You might be interested in …

चांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल? कोल डाईक

लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी काय बोलतात याबद्दल तुम्ही कधी  विचार करता का? कधी कधी तुम्ही जवळ असताना लोक आपसात कुजबुज करतात तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. आणि वाटते: मी काहीतरी केले की काय? आपले मन […]

धडा १७.     १ योहान ३: ११- १५ स्टीफन विल्यम्स

  प्रीती की द्वेष; काईन की खिस्त काही वेळा एखादी व्यक्ती कशाचे तरी  चिन्ह बनते. उदाहरणार्थ, अहिंसा म्हटले की गांधीजींचे नाव समोर येते. किंवा समाजसेवा  म्हटले  की मदर टेरेसा, तर अॅडॉल्फ हिटलर म्हटले की अत्यंत […]

वाया गेलेले जीवन कसे वाचवावे

ग्रेग मोर्स न उमललेले फूल, न पिकलेले फळ, गर्भधारणा न झालले उदर, न उबवलेले अंडे: एक वाया गेलेले जीवन. जे तुम्ही बोलला नाहीत आणि केले नाहीत ते बोलायला, करायला, फारच थोडा वेळ उरला आहे. तुम्ही […]