दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पक्षांपासून सावध राहा

ग्रेग मोर्स

दर रविवारी सकाळी ते आमच्यामध्ये येतात. काळजीपूर्वक ऐकले तर त्यांचे पंख फडफडणे तुम्हाला ऐकू येईल. गाण्याचा आवाज बंद होतो , पाळक पुलपिटवर येतात. पुस्तक उघडले जाते. या मानवाद्वारे देव आज आपल्याशी काय बोलणार हे ऐकण्यासाठी लोक तयार होत असतानाच कावळे व घारी उत्सुकतेने पाहतात. छप्पराच्या वाशांवर सौम्य काकरव होतो तर काहींचा मंद कलकलाट.

येशू उपदेश करायला उठला आणि त्याने हे ऐकले.

 “ऐका! पाहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला. आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले” (मार्क ४:३-४).

जसे उपदेशक देवाच्या वचनाचे चांगले बीज सभासदांमध्ये विखरू लागतो तसे ते वाटेवर पडते – कठीण, तुडवलेली, न नांगरलेली. आणि नम्र नसलेले ह्रदय, आवड नसलेले, विचलित, बेफिकीर, आळशी, अज्ञानी, ह्या सर्व गोष्टी बी बाहेर ठेवतात. ख्रिस्त, पाप, तारण यांचे सत्य व्यक्तीच्या कानावर पडते ते ह्रदयावरच राहते कधीच आत उतरत नाही. ऐकूनही ते ऐकत नाहीत. पाहूनही पाहत नाहीत. ते वचन कधीच पुरेसे ऐकत नाहीत किंवा क्षमा पावत नाहीत.

होय बीज हे कठीण वाटेवर कधीच पडून राहत नाही. येशू पाहतो की ते पक्षांनी खाल्ले आहे.


ते वरून पाहत असतात. वर खाली, उजवीकडे डावीकडे मान वळवून. त्यांचे डोळे खाली असतात. असहाय उघडे बी  पाहण्यास. तिथे… एक दाणा… काही क्षण उघडा पडलाय. भरार- विजेसारखा वरून एक काळा किरण – बी गायब होते. आपल्यासाठी मरणाऱ्या देवाविषयीचे वचन, जीवनाचे वचन, धोका दाखवणारे वचन, गायब. फस्त. कदाचित तेथे एक पंख पडला असावा.


दुष्ट डाव


येशूने दिलेल्या पेरणाऱ्याच्या दाखल्यातले पक्षी कोण? त्याने शिष्यांना जे सांगितले ते ऐकू या:

“पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते. तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो” (मार्क ४:१४-१५).

संदेश ऐकणाऱ्याने नाकारलेले बीज तेव्हा आणि आता कोण खाऊन टाकतो? सैतान. तो आणि त्याचे हस्तक आपल्या डोक्यावर घिरट्या घालत असतात. आपल्या ह्रदयाच्या जमिनीला टोचा मारतात. त्यांची वाकडी चोच ते अद्भुत बीज चोरून नेते. त्यांचे चमकणारे डोळे पुढे मागे पाहतच असतात – सुवार्तेचे सत्य गिळून टाकण्यास.

हे भयानक सत्य आहे. पण येशू शिष्यांना अधिकच धोक्याचे, अधिक अस्वस्थ करणारे काहीतरी सांगतो: हे पक्षी त्या तारणाच्या शब्दाबद्दल पातक्याच्या मनात द्वेष निर्माण करतात.

चर्चला नेहमी वेळेवर जाणारा

आपल्यातील कित्येक जण सैतानाचा फारसा विचार करत नाहीत. तरीही तो आपला खूप विचार करतो. तुम्हाला वाटत असेल की रविवारी सकाळी तो खुनी, व्यभिचारी, खोट्या धर्माच्या लोकांमध्ये असेल – चर्चमध्ये नाही. तरीही ऐका की, खलनायक म्हणून रविवारी त्याचा रोख हाच असतो ख्रिस्ताला उंच करणाऱ्या, सत्याने भरलेल्या उपदेशांची ह्रदयातून चोरी करणे.
तुम्ही आणि मी कदाचित रविवारीचा संदेश चुकवू – पण तो नाही. तुम्ही आणि मी कदाचित देवाच्या वचनाचा आस्वाद घेण्याकडे दुर्लक्ष करू – पण तो नाही. सैतान हा सर्वात नियमित आणि सर्वात जागरूकतेने चर्चमध्ये हजर असतो. तो पोषणासाठी सेवन करत नाही. तो खातो कारण तुम्ही खाऊ नये, पाप्यांना ख्रिस्त मिळू नये किंवा लोकांनी ख्रिस्ताबरोबर चालू नये. 


लूक हे सांगताना म्हणतो, “वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो” (लूक ८:१२). पौल म्हणतो, “त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये” (२ करिंथ ४:४). आपण ऐकावे आणि त्याद्वारे विश्वासाने त्याचा गौरव पहावा अशी येशूची इच्छा होती. “ पहा , ऐका” अशी त्याने आपल्या उपदेशांची सुरुवात केली, तर  “ सोडून द्या! दुर्लक्ष करा” असे पक्षी ओरडतात.

पण हे ते कसे करतात?


ते कसे फस्त करतात


भुते देवाचे वचन ह्रदयातून कसे चोरतात? हे पक्षी वचन कसे फस्त करतात? हे ते पुनर्जीवन न झालेल्या आणि उपदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये तर नक्कीच करतात. पण माझा दु:खद अनुभव आहे की त्याने देवाच्या मुलांच्या मुखातून सुद्धा अर्धवट ऐकलेले, दुर्लक्षित केलेले उपदेश फस्त केले आहेत – तरीही यांना तो नरकात जाईपर्यंत भुकेले ठेवू शकणार नाही.


रविवारचे दुपारचे भोजन. कितीतरी लाभदायक उपदेशाचे शब्द – विश्वासी तसेच अविश्वासी ह्रदयांतून चोरले जातात. शत्रूच्या साध्या सूचना – जेवण, उपदेशकाचे हावभाव, आज चर्चमध्ये किती उकाडा होता, श्री.  —ला टक्कल पडत आहे, . सौ. —ची साडी, असे अनेक  मनात विचार आणून तो आपले दुर्लक्ष करू शकतो का? तो करू शकतो आणि करतो.  

आपल्याकडून वचन चोरण्यासाठी आपले लक्ष विचलित करतो, सूचना देतो आणि खोटे बोलतो.
“नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले” ( १ इतिहास २१:१).
“पवित्र आत्म्याशी लबाडी करावी म्हणून सैतानाने  हनन्याचे मन भरवले”  (प्रेषित ५:३).
“यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात येशूला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता”  (योहान १३:२).
“पौल इशारा देतो की जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होऊ नये म्हणून जपा” (२ करिंथ ११:३).

सैतान आपल्याशी लबाडी करतो, आणि जेव्हा असे करतो तेव्हा तो त्याच्या स्वभावानुसार करतो, “कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे” (योहान ८:४४). खोटे बोलून लोकांनी आपले ऐकावे म्हणून त्यांना तो पकडतो. त्याचे आपल्याविरुद्धचे डावपेच एदेन बागेपासून बदलले नाहीत. आपला शत्रू आपल्या मनात असे विचार आणतो जे पूर्णपणे आपले नसतात.

या शास्त्रभागाचे विश्लेषण करताना जॉन पायपर म्हणतात ; “सैतान तीन पद्धतींनी बीज चोरून नेतो. दुर्लक्ष, दुष्ट इच्छा, आणि अज्ञान. दुर्लक्ष यासंबंधी बोलताना ते म्हणतात:

देवाच्या वचनाकडे लोकांनी गंभीरपणे लक्ष देऊ नये म्हणून सैतान ओव्हरटाईम काम करतो. तो तुम्हाला शनिवारी खूप रात्र होईपर्यंत जागे ठेवील म्हणजे उपदेशाच्या वेळी तुम्हाला डुलक्या लागतील. तुमचे उपदेशापासून लक्ष विचलित होण्यासाठी तो तुमच्यापुढे डझनभर गोष्टी पुढे आणील. उद्या बॉसबरोबर  होण्याऱ्या मिटींगचे विचार तो तुमच्या मनात आणील. जर त्याने तुम्हाला विचलित करून उपदेशकाचे शब्द एका कानावर पडून दुसऱ्या कानातून बाहेर गेले तर त्याने देवाचे वचन तुमच्याकरिता यशस्वीपणे निष्प्रभ केले आहे. दुर्लक्ष हाच त्याचा डाव आहे.”


क्षुल्लक गोष्टी सुचवून, थट्टा करून, अनेक गोष्टी तुमच्या मनात आणून सत्य तुमच्यामध्ये रुजू नये म्हणून सैतान तुमच्यावर घिरट्या घालताना आता पहा. जेव्हा चांगले वचन कठीण जमिनीवर पडते तेव्हा तो चोरायला झडप घालतो. जर आपण दुर्लक्ष करायची इच्छा करतो तर तो ते तुम्हाला देईल. क्रिकेटची मॅच अथवा आठवड्याच्या योजना येशूवर मनन करण्यापासून आपल्याला कित्येक रविवारी रोखतात.

जे उपदेश ऐकतात त्यांच्यासाठी


हे वाचका, चर्चमधील बाकांच्या रांगा ही युद्धभूमी आहे. दर आठवडी, तुम्ही देवाच्या वचनाची चव घ्याल किंवा सैतान ते फस्त करील. आपल्याला जे वचन शिकवले त्याचे महत्त्व त्याला कळते – आणि आपल्याला?

आपले प्रत्येक थांबणे तो पाहत असतो, आपल्या आत्म्याचा नाश व्हावा म्हणून प्रत्येक संधी शोधत असतो. पण जेव्हा सभासद सुवार्ता ऐकत असतात तेव्हा तो अधिक कार्यरत असतो. जे चांगले आहे ते थांबवण्यासाठी, लोकांचे तारण होऊ नये यासाठी ती अधिकच पराकाष्ठा करतो. त्याच्याकडून भरकटणारे विचार येतात, अफाट कल्पना येतात, तसेच उदासीन मने आणि विसरभोळेपणा येतो, झोपाळू डोळे आणि चलबिचल, थकलेले कान आणि विचलित लक्ष,  या सर्वांमध्ये सैतानाचा खूप मोठा हात असतो. लोकांना कळत नाही हे कुठून येते आणि त्यांना उपदेश इतके कंटाळवाणे  का वाटतात. का आठवत नाहीत हेच कळत नाही. ते पेरणाऱ्याचा दाखला विसरतात. ते सैतानाला विसरतात.


कित्येकदा चर्चच्या फाटकापर्यंत पोचेपर्यंत उपदेश मनातून गायब झालेला असतो. रविवारी सकाळी सैतानाची आठवण ठेवा. आपण कमकुवत आहे म्हणून नाही – “कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे” (१योहान ४:४). तर आपण आता सज्ज होण्यासाठी – “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा” ( इफिस ६:११).


आणि ज्याला फिकीर नाही आशा श्रोत्या, मी शेवटी तुला विनंती करू का? एखादा मनुष्य ख्रिस्त जे स्वातंत्र्य बहाल करतो ते ऐकून त्याचा तुरुंग सोडणार नाही पण त्याच्या तुरुंगात वाघ आहे असे समजले तर मात्र नक्कीच सोडेल . तुमच्या अविश्वासामध्ये तुम्ही एकटे नाहीत; सैतान तुमच्याबरोबर आहे. तो तुमच्या लक्ष देण्यावर घाला घालील, मनात शंका निर्माण करील व ख्रिस्तापासून तुम्हाला दूर  ठेवील. चर्चच्या फाटकापर्यंत पोचेपर्यंत सैतान तुमची भेट घेऊन जे तुम्ही खाऊ शकला नाही ते फस्त करून टाकील.

आपण सर्वच जण येशूचा हा  इशारा ऐकून आपण कसे ऐकतो त्याची काळजी घेऊ या (लूक १८:१८).

.

Previous Article

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का?

Next Article

देव आपले विचार वाचू शकतो का?

You might be interested in …

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १३ प्रार्थना पाठ म्हणू […]

वधस्तंभाचा अभिमान

स्टीव्ह फर्नांडीस शिक्षण देऊन वधस्तंभावरच्या ख्रीस्ताविषयीची तळमळ वाढवण्याची गरज आहे. असे जीवन जगावे आणि अशा प्रकारे बोलावे की वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचे मोल अधिकाधिक लोकांच्या दृष्टीस पडेल व त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. येशुप्रमाणेच आपल्यालाही ते महागात […]

तुमच्यासाठी येशू कोण आहे वनिथा रिस्नर

शुभवर्तमान ही चांगली बातमी आहे हे मला ठाऊक आहे पण मी हे सहज विसरते की ही आश्चर्यकारक रीतीने चांगली बातमी आहे. माझ्या ह्रदयाने याचे पुनरावलोकन करावे म्हणून मी देवाला विचारत होते की मला माझे पाप […]