दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुम्हाला चांगला मृत्यू  हवा आहे का?

मार्शल सीगल


१० सप्टेंबर २०२२ हा दिवस मी विसरू शकत नाही. आमचा पहिला मुलगा चालू लागला तो हा दिवस नाही. त्याच्या शाळेचा तो पहिला दिवस नव्हता. तो पहिल्यांदा सायकल शिकण्याचा तो दिवस नव्हता. नाही. १० सप्टेंबर २०२१ या शुक्रवारी माझ्या मुलाने पहिल्यांदा मरण पहिले.

आणि हा फक्त मृत्यूच नव्हता; ही  ‘सॅली’ आजी माझ्या पत्नीची आजी होती. जेव्हा आम्ही लॉस एंजेलिसला जायचो तेव्हा आमचा मुलगा सॅली आजीला भेटायचा. तिला मिठी मारायचा, तिच्याशी बोलायचा, तिच्याबरोबर फोटो काढायचा. त्याला ती खूप आवडायची. आणि तरीही आता ती तिथं होती. अगदी शांत – झोपल्यापेक्षाही  शांत- एका मोठ्या सुंदर लाकडी पेटीत. आमचा छोटा गोंधळ, उत्सुकता आणि भीतीने हादरून गेला होता. भोवताली पहात असताना आपण दु:खी असावे हे त्याला समजत होते पण  ते का हे त्याला समजत नव्हते. यामुळेच तो गोंधळला होता. तुम्ही वडील असा किंवा पाच वर्षीय असा; अशा क्षणांसाठी तुमची कधीच पूर्ण तयारी झालेली नसते.

माझ्या मुलाला पाच वर्षांचा होईपर्यंत मरणाला तोंड द्यावे लागले नव्हते.


मरणाच्या सत्यावर बुरखा

माझ्या लक्षात आले की दररोजच्या जीवनातून मरण हे वजाबाकीत टाकले गेले आहे हे किती अजब आहे. दोनशे वर्षांपूर्वी लोक मृत्यूबद्दल सहजतेने बोलत पण लैंगिकतेबद्दल सहसा बोलतही नसत. आणि आता त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

आपल्या  समाजात आता दु:ख ही वैयक्तिक बाब झाली आहे. कुटुंबाला त्यांचा एकांत द्यावा असे आपण म्हणतो. कोणी वारले तर आपण चर्च किंवा सेमेट्री मध्ये जायचे निवडतो. कधी स्मरणसभा होते मग भोजन. कार्यक्रम शक्य तो लवकर संपवण्याकडे आपला कटाक्ष असतो.

आता मृत्यूकडे किती कमी वेळ आणि लक्ष दिले जाते हे सत्य दाखवते की, समाज जितका मृत्यूचे सत्य झाकतो आणि दडपून टाकतो तितके त्याची मृत्यूसाठी कमी तयारी असते. मला स्वत:ला जेव्हा तो येईल तेव्हा तयार राहायला पाहिजे – आणि तो माझ्यासाठी आणि तुमच्या प्रत्येकासाठीही येईलच – फक्त जर येशू त्याआधी आला नाही तर.


मृत्यू  चांगला असू शकेल का?

जेव्हा माझा मृत्यू जवळ येईल तेव्हा मला प्रेषित पौलासारखे त्याला तोंड द्यायला आवडेल. तो मरणासाठी जितका तयार होता तितके मलाही तयार व्हायला पाहिजे म्हणजे तो जसा मरणापर्यंत पूर्णतेने जगला तसेच पूर्णतेने मीही जगू शकेन. आपण तसे अनेक परिच्छेद पाहू शकतो पण फिलीपैकरांस पत्र गर्तेला अगदी धाडसाने व सुंदरपणे उचलून धरते.

रोमच्या तुरुंगात तो बसला असताना आपण  कधी इतरत्र बसू शकू अशी त्याला कुठलीही आशा नव्हती. त्याचे मित्रही घाबरलेले होते. पूर्वीही अनेकदा त्यांना भीती वाटलेली होती पण आताची ही भीती अगदी खरी होती. “कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे”  (फिली. १:२०). जेव्हा इतर काळजीने भरून गेले होते आणि दु:ख करत होते की आता सर्व संपणार आणि नाहीसे होणार आहे अशा वेळी पौल येणाऱ्या अंताचा संभव कवटाळत होता – जरी तो अकाली येत होता.

काही वचनानंतर तो आत्मविश्वास प्रकट करतो की देव त्याला तुरुंगातून सोडवील (वचन २५), पण हा आत्मविश्वास त्याच्या परिस्थितीतून येत नाही. जे काही तो पाहत होता ते निराळेच भवितव्य दाखवत होते. त्याला ठाऊक होते तो मरू शकत होता. आणि ह्या विचाराने तो विचलित झाला नाही.

“कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे” (फिली. १:२१).

जेव्हा तुम्ही त्याला वाचता तेव्हा मरण हे मरण वाटतच नाही. आशेने मृत्यूच्या सावलीचा, अस्पष्टतेचा निचरा केला आहे. पौलासाठी मरण हे मार्क ५ मधील भूतग्रस्त माणसासारखे आहे. येशूला भेटेपर्यंत कित्येक वर्षे तो साखळ्या तोडून टाकत होता, स्वत:वर क्रूरतेने वार करत होता आणि आकाशाला शिव्या देत होता. “नंतर त्याला  बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृष्टीस पडला”  (मार्क ५:१५). जे येशूमध्ये राहतात त्या सर्वांसाठी तो हेच करतो.

जेव्हा मृत्यू आणि जीवन आपल्याला काय देऊ करतात याचा पौल आढावा घेतो तेव्हा फक्त मरण सहन करायचे म्हणून तो केवळ मृत्यूचा स्वीकार करत नाही तर त्याला ते अधिक चांगले वाटते. “लाभ, चांगले, प्रतिफळ” असे शब्द तो वापरतो. ख्रिस्तामधले त्याचे जीवन तो तुच्छ लेखत नाही. “जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही” (वचन २२). पण पुढे जे येत आहे त्यासाठी आता जे आहे ते आनंदाने सोडण्याइतके त्याला ठाऊक होते.


अधिक चांगले जीवन

इतर मानवजातीप्रमाणेच पौल सुद्धा जन्मापासून मृत्यूच्या भयाने बंधनात होता (इब्री २:१५). जाणूनबुजून व नकळत आपण मरणार या भयानक व जाचक सत्यामध्ये आपण वाढू लागतो व राहतो. आणि ह्या भीतीने लोक सर्व प्रकारच्या पापी आणि अवास्तव गोष्टी करतात. कोट्यावधी लोकांना ज्याची दहशत आहे ती पौलालाही होती. मग त्याचा मरणाविषयीचा दृष्टिकोन कसा बदलला? गर्तेकडे पाहण्यासाठी त्याने  असे कोणते भिंग वापरले?

दोन वचनानंतर हेच तो सांगतो. “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे” (फिली १:२३). मरण  हे जर येशूबरोबर राहणे असेल तर आणि फक्त  तेव्हाच  मरण हे जीवनापेक्षा चांगले आहे. आणि पौलासारखे जे त्याच्यावर भरवसा टाकतात त्यांच्यासाठीच हे घडते. जेव्हा आपण गर्तेतून पुढे पाउल टाकू तेव्हा “ तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल”  (१ योहान ३:२). मरण हे आपल्याला एका गौरवाची फक्त ओळखच करून देणार नाही तर ते गौरव आपल्याला ग्रासून टाकील, आपले रूपांतर करील.

एक दिवस मी अशा उत्तम जगात उठणार आहे की माझ्या सभोवती अत्युत्तम दृश्ये, चवी आणि संधी असतील. आणि ते एक ‘अत्युतम असा मी’ अनुभवणार आहे. एक ‘अत्युत्तम जग’ कारण ख्रिस्ताचे राज्य त्याच्या प्रत्येक इंचावर व श्वासावर दिसणार आहे. ‘उत्तम साहस’ कारण आपण खाणार, काम करणार , फिरणार , हसणार, आणि राज्य करणार – ज्याने हे सर्व निर्माण केले त्याच्याबरोबर. ‘अत्युत्तम मी’ कारण मी त्याच्या इतका  सदृश्य कधीच नव्हतो.
अशा प्रकारे मृत्यूची नांगी मोडली जाते. यामुळेच सर्व गमावण्याची संभाव्यता लाभ असण्यामध्ये वाढू लागते.

मरण्यासाठी जगणे

ही संभाव्यता आपल्याला फक्त चांगले मरण्यासाठी तयार करत नाही तर ती आपल्याला मरेपर्यंत चांगले जगण्यासाठी तयार करते. आणि उपरोध असा की चांगले मरणे म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक चांगले जगणे असे आहे तरी चांगले जगणे म्हणजे पुन्हापुन्हा स्वत:ला मरणे आहे. पौल म्हणू शकतो की “मी रोज रोज मरतो” ( १ करिंथ १५:३१). याचा अर्थ काय?

ते तो आपल्याला फिली. १: २२ मध्ये सांगतो “जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.
   

आणि हे देहाचे फळ कोणते?
“आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे; हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे” (फिली. १:२५-२६).

पौल हा मरणासाठी तयार असल्याने तो जगण्यासाठी मोकळा झाला होता. स्वत:साठी जगायला नाही तर इतरांना प्रभूमध्ये आनंद व्हावा म्हणून. दुसऱ्या शब्दांत त्याला मुक्त केले होते यासाठी की लोकांनी चांगले मरण्यास तयार व्हावे. त्यांनी ख्रिस्तासाठी जगावे आणि स्वर्गासाठी उत्कंठा धरावी म्हणून त्यांना तो  कारणानंतर कारण देत होता. जगामध्ये (आणि तुरुंगामध्ये सुद्धा) असताना जो काही थोडा वेळ त्याला होता त्यामध्ये अनेक मार्गांनी पुढच्या जगासाठी  आत्मे जिंकून त्यांना प्रौढ करण्याची खटपट तो करत होता. त्याला माहीत होते की आयुष्याच्या शेवटच्या दिवशी चांगले मरणे म्हणजे दररोज चांगले मरणे.

आणि म्हणून जर आपल्याला चांगले जगायला आणि चांगले मरायला हवे असेल तर जोपर्यंत आपल्याला श्वास आहे तोपर्यंत आपण स्वत:ला मरत राहतो यासाठी की इतरांनी अखेर पूर्णपणे ख्रिस्तामध्ये जगावे.

Previous Article

फार जोराने धावण्यापासून सावध राहा

Next Article

विचलित, विकृत, फसवेगिरी

You might be interested in …

मी असले कृत्य करणार नाही

मार्शल सीगल लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १४ महान संकटाचा काळ येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते की या जगात तुम्हाला बहुत कष्ट होतील (योहान १६:३३). त्यानुसार आजवर बहुत ख्रिस्ती जनाचा छळ होऊन रक्तसाक्षीही व्हावे लागत आहे. तरीही […]

आत्म्याचे फळ  स्टीफन विल्यम्स

   (लेखांक १) “आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ; प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही” (गलती ५:२२,२३). ख्रिस्ती व्यक्ती ही “कृपेमध्ये वाढत” जाते. जर तुम्ही सजीव मानव असाल […]