दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्या गर्वाबरोबर वाद करा

स्कॉट हबर्ड

वेडेपणा असलेल्या व्यक्ती बरोबर राहताना कसे वाटते याची कल्पना तुम्हाला असेल. “मनुष्य संतानाचे  ह्रदय हे  दुष्टतेने भरलेले असते आणि ते जिवंत असतात तोवर त्यांच्या ह्रदयात वेडेपण असते” (उपदेशक ९:३ पं. र. भा.). जर अशा न्यायासंबंधी तुम्हाला शंका वाटत असेल तर एका ठराविक पापामुळे तरी तुम्हाला पटेल की शलमोन हा बरोबर होता: ते पाप म्हणजे गर्व.

आपण, आपल्यातील प्रत्येक जण  मातीपासून आहोत.  तरी आपण या जगाच्या वाटेवर चालताना असे दाखवतो कीआपली शक्ती ठिसूळ नाही, आपले ज्ञान संकुचित नाही, आपले ह्रदय आपल्यामुळे चालू आहे. याला वेडेपणा हाच योग्य शब्द आहे.

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला एक नवे ह्रदय मिळाले आहे – दुष्ट आणि वेडे नाही तर स्वच्छ आणि शुद्ध  ( यहेज्केल ३६:२५-२७). पण तरीही आपण आपल्यातल्या वेड्या मानवाला पूर्ण टाकून दिले नाही. आपली क्षमा झाली असली तरी गर्व, पराजय आणि नाश अजून आपला पाठलाग करतात.

आपण उठतो, काम करतो, बोलतो, खेळतो आणि झोपतो – आपल्या देहात हा वेडेपणा असताना.

हल्ली प्रेषित पौल मला माझ्या गर्वासोबत वाद करायला मदत करत आहे. १ करिंथ च्या पहिल्या चार अध्यायात तो गर्वाचा वेडेपणा व नम्रपणाचा विवेक याची  पुन्हा पुन्हा आठवण करून  देतो .

१. मनुष्याच्या गर्वाने देवाच्या पुत्राचा वध केला.

आपण देवाचा  शहाणपणा व रहस्य याचे विभागी आहोत. “जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरता नेमले होते ते  ह्या युगातल्या अधिकार्‍यांतील कोणाला कळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते” (१ करिंथ २:७-८).

पौलाने आपल्याला प्रथम आठवण करून दिली असती की, मनुष्याच्या गर्वाने देवाच्या पुत्राचा वध केला. या युगाचे अधिकारी हे फक्त हेरोद आणि पिलात नव्हते तर “ज्ञानी, शास्त्री आणि या युगाचा वाद घालणारे” ( १ करिंथ १:२०) – एका शब्दात म्हणजे गर्विष्ठ. जेव्हा असे लोक येशूसारख्या तारणाऱ्याला आणि सुवार्तेच्या संदेशाला भेटतात तेव्हा ते खांब आणि खिळे घेण्यास सरसावतात.

जर आपण गर्व नीट पाहिला तर त्याने पडलेले खून दिसतात. पूर्ण वाढलेला गर्व हा खून करण्यास मागेपुढे पाहत नाही- हातांनी नाही पण ह्रदयात तरी (मत्तय ५:२१-२२). जे आपला गर्व जोपासतात ते काईनामागे शेतात जातात (उत्पत्ती ४:८). ते ईजबेलचा सल्ला घेतात ( १ राजे २१:५-१४). ते हेरोदाबरोबर भोजन करतात ( मार्क ६:२५-२७).

गर्वाची सुरुवात निरुपद्रवी वाटते – सोशल मिडीयावर पोझ घेतलेला फोटो, मान्यतेची एक दडलेली इच्छा, आपल्यापेक्षा निराळे मत असलेल्यांबद्दल तिरस्काराचे विचार. पण इथे पौल आता पूर्ण वाढलेला पशू दाखवतो, त्याला गौरवाचा प्रभू ओळखता येत नाही – आपल्या पुढ्यात तो उभा असला तरी.

प्युरीटन लोकांची एक प्रार्थना म्हणते:

माझ्यातला प्रत्येक उंच विचार नष्ट कर,
गर्वाच्या ठिकऱ्या कर आणि वाऱ्यावर उधळून टाक,
स्वधार्मिकतेचा चिकटलेला प्रत्येक अंश जाळून टाक,
माझ्यामध्ये पश्चात्तापाच्या अश्रूंचा झरा उघड,
मला मोड आणि मग मला जोड.

२. गर्व हा वधस्तंभासमोर टिकत नाही

“यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो” ( १ करिंथ २२-२३).

गर्विष्ठ लोकानी जरी ख्रिस्ताला मारले तरी त्यांनी जे काही घडावे म्हणून देवाने  स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते तेच केले (प्रेषित ४:२८). देवाच्या सुज्ञ तरतुदीनुसार गर्वाने ख्रिस्ताला वधस्तंभावर दिले – आणि ख्रिस्ताचे वधस्तंभावर  जाणे हे गर्वाचा नाश करते.

१ करिंथच्या  पहिल्या चार अध्यायातून पौल आपल्याला क्रूसाजवळ नेतो आणि आपल्याला लाकडाची कुसळे, आणि खिळ्याच्या टोकांना स्पर्श करायला लावतो. “येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्‍चय केला” ( १ करिंथ २:२). त्याला माहीत आहे की जेथे वधस्तंभ विसरला जातो आणि विपरीत केला जातो तेथेच गर्व राज्य करतो. गर्वाला गुलगुथाच्या हवेत श्वास घेता येत नाही.

पण क्रूस गर्व कसा नष्ट करतो? प्रथम आपल्याला आठवण करून देतो की, “ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला” ( १ करिंथ १५:३). आपल्याच पापाने त्याला वधस्तंभावर खिळले. आपले विषारी तोंड, आपली गुप्त वासना, आपला तोरा, आपले चढेल डोळे.  जॉन स्टॉट म्हणतात, “ वधस्तंभाने  आपल्यासाठी काहीतरी केले हे पाहण्याआधी, आपण त्यामध्ये  काय केले हे पाहणे आवश्यक आहे.”

दुसरी गोष्ट – आपल्या मुखामध्ये एक उत्तम बढाईची बाब देऊन क्रूस गर्व नाहीसा करतो. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्याने आपली बढाई काढून टाकली जात नाही तर तिची दिशा आपल्याकडून त्याच्याकडे वळते. “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” (१ करिंथ १:३१).

पापांची क्षमा झाली, सैतानाचा प्रराभव झाला, मृत्यू नाहीसा केला, देवाचा क्रोध शमवला, नितीमत्ता दिली गेली , स्वर्ग उघडला यासंबंधी बढाई मारा. ख्रिस्ताच्या प्रीतीचा श्वास घ्या आणि स्तुतीच्या विवेकाचा उच्छवास सोडा. ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला म्हणून मी माझी बढाई मारू शकत नाही. त्याची बढाई मारायलाच मला प्रत्येक कारण आहे.

३. देवाने तुम्हाला ख्रिस्ती केले म्हणून तुम्ही ख्रिस्ती आहात.

त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे (१ करिंथ १:३०).

एकदा येशू हे फक्त एक ऐतिहासिक नाव होते, सुवार्ता ही  केवळ एक संडेस्कूलची आठवण होती, तारण ही केवळ एक धार्मिक कल्पना होती.  मग मी ख्रिस्ती झालो. मग येशू हा सर्वात गोड सूर झाला, सुवार्ता ही सर्वात उत्तम बातमी झाली. तारण ही जगाच्या सर्व संपत्तीपेक्षा उत्तम देणगी बनली. हे कसे घडले?

पौल म्हणतो, आपण येशू ख्रिस्तामध्ये आहोत कारण आपला विश्वास ठेवणाऱ्यांच्या कुटुंबात नवा जन्म झाला आहे -आपण ख्रिस्ती घराण्यात जन्मलो म्हणून नाही. येशू खरा कोण आहे समजून घेण्यासाठी आपण हुशार होतो म्हणून नव्हे. आपल्याला तारणारा  हवा होता याच्या जाणीवेमुळे पण नाही तर “त्याच्यामुळेच.” आपल्याला पश्चात्ताप व विश्वास याच्याकडे नेण्यास असलेल्या बाह्य परिस्थितीमागे पिता होता जो आपल्याला बोलावत होता, पुत्र होता ज्याने आपल्याला शोधले आणि पवित्र आत्मा होता ज्याने आपल्यावर हक्क दाखवला. अखेरीस आपण हेच म्हणायला हवे की “ मी ख्रिस्ती आहे कारण देवाने मला ख्रिस्ती केले.”

पौलाने म्हटल्याप्रमाणे ख्रिस्ती जीवनाचा मध्य आणि अखेर हे आरंभाला धरूनच पुढे जाते.  “तर वाढवणारा देव हाच काय तो आहे” ( १ करिंथ ३:७). आपण पवित्र होण्यासाठी श्रम करतो पण प्रत्येक परिश्रम देवाच्या कृपेमुळे आहेत. “जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे” (१ करिंथ  १५:१०). आपण विश्वास ठेवतो कारण देव आपल्याला नवा जन्म देतो; आपण प्रौढ होतो कारण देव आपली वाढ करतो ; आपण शेवट गाठतो कारण तो आपल्याला राखतो ( १ करिंथ १: ७-९)

जेव्हा आपल्या दानाचे किंवा विजयाचे कर्ते आपण आहोत असा विचार करण्यास गर्व जेव्हा आपल्याला फसवतो, तेव्हा एका प्रश्नाने आपल्याला पुन्हा वास्तवात न्यायला हवे : “जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे” 
( १ करिंथ ४:७)? जेव्हा आपण कशासाठीच  अंतिम  श्रेय घेऊ शकत नाही  तेव्हा आपण अखेरीस प्रत्येक गोष्टीसाठी उपकारस्तुती करायला हवी. सर्व जीवनच कृपेचे दान होते, स्तुतीसाठी कारण होते.

४. सर्व गोष्टी तुमच्या आहेतच.

“म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे; पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” ( १ करिंथ ३:२१-२३).

काहीतरी कारणासाठी गर्व आपल्याला गळ घालतो. क्षणभर तरी आपण ज्याची पकड घेतली होती ते गर्व आपल्याला देतो: सोबत्यांकडून प्रशंसा, जाणाऱ्या व्यक्तीचा कौतुकास्पद कटाक्ष, सभेमधला हंशा, आतल्या वर्तुळाचा भाग असण्याचा आनंद. पण ही खरेदी वाटते त्यापेक्षा महागात पडते कारण गर्व हा काहीतरी देतो पण त्याच्या मोबदल्यात सर्वकाही घेतो.

सर्व  याचे स्पष्टीकरण डी ए कार्सन असे करतात: “जर आपण खरे खुरे ख्रिस्ताचे असलो आणि जर ख्रिस्त देवाचा आहे तर आपण देवाचे आहोत… आपल्या स्वर्गीय बापाचे सर्वकाही आहे आणि आपण त्याची मुले आहोत . त्यामुळे सर्व काही आपले आहे.”

जेव्हा गर्व आपल्याला सांगतो की आपण काही गोष्टींना मुकलो आहोत, तेव्हा लक्षात ठेवा की सर्व काही आपल्या पित्याचे आहे आणि तो आपली परिस्थिती अशी मांडेल की दाविदासोबत आपण म्हणू शकू ; “मला काही उणे पडणार नाही”  (स्तोत्र २३:१). जेव्हा ख्रिस्ती लोक गर्व करू लागतात तेव्हा आपण त्या राजपुत्रासारखे होतो जो त्याच्या बापाच्या राज्यातील दोन एकर जागेसाठी भांडण करतो – हे विसरून की सर्व जागा त्याच्या पित्याचीच आहे.

गर्व आपल्याला काहीतरी देतो पण क्षणभरच. देव सर्व गोष्टी आपल्या भल्यासाठी होऊ देतो आणि अखेरीस सर्व पृथ्वीचे वतन देणार तो आहे ( मत्तय ५:५, रोम ८:१६-१७) कारण आपण ख्रिस्ताचे आहोत. ख्रिस्त हा पुत्र या नात्याने देवाचा आहे आणि सर्व जग देवाचे आहे. “ दीन हे ऐकून हर्ष करतील” (स्तोत्र ३४:२).

Previous Article

मार्टिन लूथर (१४८३ -१५४६)

Next Article

मंडळी रोपणासाठी देवाची योजना

You might be interested in …

वराला भेटण्याची तयारी

जॉन पायपर (बायबलनुसार काळाचा संक्षेप करण्यात आला आहे (१ करिंथ ७:२९). येशूने त्याच्या येण्यासाठी जागृत राहण्यास  सांगितले आहे. का बरे? “कारण तो दिवस किंवा घटका कोणालाही ठाऊक नाही.” ख्रिस्ताचे येणे नजीक येऊन ठेपले आहे आणि […]

विचलित, विकृत, फसवेगिरी

जॉन ब्लूम पापाच्या मोहाला प्रतिकार करायचा झाला तर साचेबंद असे कोणतेही एक धोरण नाही. मोह हे अनेक प्रकारे, अनेक वेळा येतात आणि त्यावर विजय मिळवायला बायबल आपल्याला अनेक धोरणे देते. पण ह्या सर्व मोहांमध्ये एक […]

जे केवळ दु:खच बोलू शकते वनिथा रिस्नर

दु:खाइतके दुसरे काहीही आपले लक्ष वेधून घेऊ शकत नाही. वेदनेकडे दुर्लक्ष करणे कठीण असते – फक्त ते सहन करणाऱ्यांसाठी नाही तर ते पाहणाऱ्यांसाठी सुद्धा. आपले डोळे आणि ह्रदय आपोआपच दु:खासाठी स्वत:ला बंद करून घेतात. ख्रिस्ती […]