दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 पंतैनस (इ. स. १५० – २१५)

प्रकरण ३                                   

 इतर देशांच्या तुलनेत भारताच्या इतिहासात एक उणीव आहे. इतर देशात ध्येयाला वाहून घेऊन प्रसंगी त्या ध्येयासाठी रक्तसाक्षी देखील झालेले पुष्कळ लोक आढळतात. त्यामुळे त्यांची लक्षवेधी जीवन चरित्रे वाचून उत्तेजनपर माहिती मिळवणे सुलभ होते. पण भारतात पहिल्या हजार वर्षांत तरी असे काही फारसे लोक आढळत नाहीत. तरी त्याचा एक फायदा असा झाला आहे की आपण भारतावर प्रभाव पाडणाऱ्या ख्रिस्ती धर्मातील आंदोलनांवर लक्ष केंद्रित करू शकतो. त्यातील व्यक्ती या आंदोलनांची दिशा दाखवतात. त्यामुळे तेव्हा जोमाने कार्यरत असणाऱ्या पण आता नष्ट झालेल्या चर्चच्या अनेक प्रभावी केंद्रांची व शाखांची आपल्याला माहिती होते. तसेच सध्याच्या मतप्रणालींचे व आचार विचारांचे मूळ धागेदोरे येथवर असल्याचे आढळते. ख्रिस्ताचा दूत म्हणून दुसऱ्या शतकात आलेली पहिली व्यक्ती म्हणजे पंतैनस होय. थोमा येऊन गेल्याला शंभर वर्षे लोटली होती.

अलेक्झान्द्रिया

पंतैनस हा इजिप्त मधील अलेक्झान्द्रियाचा रहिवासी होता. आज या नावाचे असलेले हे शहर नव्हे. त्या काळाच्या अलेक्झान्द्रिया शहरास आंतरराष्ट्रीय श्रीमंत बाजारपेठ व इजिप्तमधील व्यापाराचे केंद्र  म्हणून महत्त्व होते. इ.स.पूर्व.३०० च्या दरम्यान जगज्जेता अलेक्झांडरने हे शहर वसवले होते. तेथून आलेल्या पंतैनसमुळे भारताचे पाश्चात्य देशांशी असलेले दळणवळण आणि भारतातील ख्रिस्ती धर्माचे व जागतिक व्यापाराचे महत्त्व अधोरेखित होते. व्यापाराने सुरुवात होऊन मग इतर संबंध जुळल्याचा क्रम पुढेही चालू राहिल्याचे लक्षात येते. आपण पाहतो की पाश्चात्य लोक जेथे कोठे व्यापारासाठी गेले तेथे तेथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. खैबर खिंडीतून एक, दुसरा लहान जहाजांनी समुद्रकिनाऱ्याने, तिसरा युफ्रेटीस खोऱ्यातून मोठ्या जहाजांनी तांबड्या समुद्रातून अशा तीन मार्गांनी व्यापार चालत असे. जेव्हा नैऋत्य मोसमी वारे व ईशान्य मोसमी वाऱ्या संबंधीचा शोध लागला तेव्हापासून तर फक्त ४० दिवसात लोक इजिप्त मधून भारतात पोहंचू लागले व भारताशी व्यापार वाढला. विश्वविद्यालय, अफाट ग्रंथसंग्रहालय, तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाचे केंद्र, म्हणून अलेक्झान्द्रियाची प्रसिद्धी होती. येथेच फिलो नावाचा प्रसिद्ध यहूदी पंडित होऊन गेला. त्याने हेल्लेणी धर्म व यहूदी संस्कृतीचा अभ्यास केला होता. प्रभूच्या काळी येथेच जुन्या कराराचे हेल्लेणी भाषेत भाषांतर झाले. येथेच संत मार्काने ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार केला व तेथे पहिली ख्रिस्ती मंडळी स्थापन केली. ती झपाट्याने वाढली. अनेक धर्मांच्या विद्वानांची येथे गाठ पडून सतत तेथे वादविवाद सभा भरत असत. त्यामुळे ही मंडळी आपला विश्वास अचूकपणे सादर करण्यात तरबेज होती. मंडळीतील नवशिक्यांना ख्रिस्ती धर्मसिद्धांत प्रश्नोत्तर रूपाने शिकवले जात असत. यातूनच पुढे ईश्वर विज्ञानाच्या विद्यापीठाची स्थापना झाली. मात्र बहुत धर्मांच्या अस्तित्वामुळे या धर्मपीठाची उदारमतवादी विचारप्रणाली झाली. तरी ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेत शंका नव्हती. केवळ ख्रिस्ताचा गौरव व्हावा अशी वृत्ती असलेला पंतैनस हाच त्या मंडळीचा पाळक होता.

पंतैनस  

ह्याच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्याने लिहिलेले ग्रंथ इजिप्तच्या वाळवंटात गाडले गेले आहेत. त्याच्या शिष्याचे नाव क्लेमेंट होते. पंतैनस मुळेच धर्मांतरित होऊन त्याचा बाप्तिस्मा झाला. ग्रीस, इटली, सिरीया, पॅलेस्ताइन अशा अनेक देशात क्लेमेंटने अध्ययन केले. पण त्याचे समाधान झाले नाही. अखेर पंतैनस कडेच त्याला आत्मिक समाधान लाभले. त्याला विद्यापिठात विद्वान व थोर गुरू म्हणून नावाजलेल्या पंतैनसने जुन्या कराराचे व प्रेषितीय लिखाणाचे म्हणजे नव्या कराराचे शिक्षण दिले. पंतैनसला प्रेषितांप्रमाणेच शुभवर्तमान प्रसाराची तळमळ लागल्यानेच तो भारतात आला. त्याच्याविषयी कैसरीयाचा युसेबियस व इतिहासकार जेरोम यांच्या पुस्तकात माहिती सापडते. पंतैनस इंडीज बेटांपर्यंत गेला होता तेथे त्याला मत्तयाचे शुभवर्तमान अवगत असलेले लोक आढळले. त्यांना बर्थलमयने सुवार्ता सांगितली होती.

देमेत्रीयने त्याला भारतात ब्राम्हण व तत्त्ववेत्यांना सुवार्ता सांगण्यास पाठवले कारण विद्वानाला शोभेसे गुण त्याच्या अंगी होते. पौलाला देवाने जसे पाचारण केले होते, तसेच काहीसे याच्या बाबतीत घडले होते. हे कसे झाले? तर भारतातून इ.स.१९०मध्ये  एक शिष्टमंडळ देमेत्रीयकडे गेले. त्यांनी त्याला विनंती केली की, “आमच्या देशातल्या लोकांना ख्रिस्ती धर्माची माहिती द्यायला एखादा चांगला पाळक पाठवा.” त्यांच्या विनंतीचे महत्त्व पटल्याने  पंतैनस भारतात यायला तयार झाला म्हणून देमेत्रीयने त्याला भारतात पाठवले. तेव्हा त्याचे विद्यापीठातील काम त्या कालावधीत क्लेमेंटला देण्यात आले होते. अल्पशा माहिती वरून समजते की कित्तादाखल जीवन जगून ख्रिस्ताविषयी शिकवण देणारा माणूस भारतीय मंडळीला लाभला होता. वाटेत अरबस्थानातही त्याने भेटी दिल्या. भारतात तो भडोच बंदरावर आला, तेथून कोचीनला गेला. तेवढ्या परिसरात भेटी देऊन तो अलेक्झान्द्रियाला परत गेला. इ.स. २११ पर्यंत त्याने या परिसरात काम केले. पुढे ख्रिस्ती लोकांचा तेथे छळ सुरू झाला. त्यातच त्याचा अंत झाला. ७ जुलै ही तारीख त्याचा हुतात्मा दिन म्हणून पाळतात. तो प्रेषितांच्या तोडीचा होता. त्याला सर्व विद्या अवगत होत्या. त्याचा देवाच्या वचनांवरचा विश्वास व आवेश इतका प्रचंड होता की, अंत:करणातील विश्वासाच्या प्रेरणेने व तळमळीमुळे तो दूरदेशी पौर्वात्य भागात सुवार्ता प्रसाराला गेला व अखेर आलेक्झान्द्रियात रक्तसाक्षी झाला. पंतैनसने भारताचे केलेले वर्णन फारच दिलखेचक आहे.

१- बर्तलमयने आम्हाला शिकवले म्हणून आम्ही ख्रिस्ती झालो असा दावा करणारे लोक त्याला भारतात भेटले.
२- मार्काच्या शुभवर्तमानाची हिब्रू भाषेतील प्रेषितांनी लिहिलेली प्रत आम्हाला आमच्या वाडवडिलांनी दिली असे सांगणारे लोक त्याला भेटले.
पुरावादाखल त्याने ती प्रत अलेक्झान्द्रियास नेली.                                                                                                                                                                            
३-  ‘बर्तलमय आमचा पहिला गुरु’ यापेक्षा त्यांनी अधिक काय सांगितले याचा पुरावा उपलब्ध नाही.                                                                             
४-  पन्तैनसला भेटलेले मलबारचे ख्रिस्ती लोक ‘आमचे वाडवडील सिरीयन ख्रिस्ती धर्माचे अनुयायी होते,’ असे सांगून थोमाशी परंपरागत संबंध
असल्याचे अभिमानाने व ठामपणे सांगतात.
५- यहूदी वंशाच्या ख्रिस्ती व्यापाऱ्यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीत वस्ती केली होती. त्यांच्यामुळे काही भारतीय
     लोक ख्रिस्ती झाले असतील हे देखील मान्यताप्राप्त मत आहे.

यहूदी ख्रिस्ती 
पृथ्वीच्या पाठीवर कोठेही वस्ती करण्याची यहुद्यांची प्रवृत्ती आपल्याला कायम आढळते. भारताच्या व्यापारी मार्गांवर त्या काळात सर्वत्र यहुद्यांची वस्ती आढळते.  इ.स.७० साली जेव्हा यरुशलेम व मंदिर उद्ध्वस्त झाले तेव्हा काही व्यापाऱ्यांनी मलबारचा किनारा गाठला. त्या व्यापाऱ्यांच्या संतानातील लोक पंतैनसला  आढळले असणार. त्यांनी शुभवर्तमानाच्या लिखित प्रती व ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश भारतीयांना दिला असणार. विधर्म्यांशी संबंध येऊनही त्यांचा व्यापारातील भाव कमी झाला नाही की त्यांचा विश्वास पोखरला गेला नाही. त्यांनी ख्रिस्ताचा विश्वास प्रज्वलित ठेवून फाकू दिला. त्यांची नावे काळासोबत गडप झाली. पण भारतात त्यांनी पेटवलेली ज्योत कधी मंद, तर कधी जोरात पेटत राहिली; पण विझून गेली नाही. भारताच्या संकटकाळी, निराशेचा अंधार दाटल्यावर विश्वासी जनांस भावी काळाची आठवण देत ती सुवार्ता सांगत राहिली.                                                                                                                     
या घटनांना बराच कालावधी लोटून गेला आहे. तरी आजच्या सर्वसामान्य मंडळीला ही दुसऱ्या शतकातील मंडळी प्रश्न करीत आहे की तुम्ही एक जबाबदार स्थानिक  ख्रिस्ती मंडळी व विश्वासी व्यक्ती म्हणून प्रेषितांनी जिवावर उदार होऊन गाजवलेली तारणाची निर्भेळ सुवार्ता आपल्या कुटुंबात, कामाच्या जागी, परिसरात, मुखाने व जगून ती गाजवत आहात का?  ख्रिस्ताचा प्रकाश आहात का?

Previous Article

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

Next Article

 प्रेषितांची उमटलेली पावले

You might be interested in …

आत्म्याचे फळ – सहनशीलता

डेरिल गुना सहनशीलता म्हणजे काय? – दीर्घ सहन करण्याची वृत्ती, मंदक्रोध असणे. हा खुद्द देवाचा स्वभाव आहे. “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” (निर्गम ३४:६). ख्रिस्ती लोकांनी सहनशीलता दाखवावी अशी […]

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे (पूर्वार्ध) क्रिस विल्यम्स

“ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? […]

विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १५ कठीण अंत:करणाच्या भूमिवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुवार्ताप्रसार चालू होता. दक्षिण बंगाल हिंदूंचा बालेकिल्ला होता. अफाट लोकसंख्येमुळे मूठभर लोकांच्या धर्मांतराने जागृती होणे सोपे नव्हते. उत्तम निसर्ग लाभल्याची कृपा असलेले भौगोलिक स्थान व […]