दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

भारतीय ख्रिस्ती मंडळीचा इतिहास

 प्रकरण १

प्रस्तावना

 आपल्या जिवंत देवाविषयीचे अगाध सत्य दडपण्याचा प्रयत्न आरंभापासून चालू आहे. आरंभापासून अभक्तिमान लोक, विदेशी राष्ट्रे, खोटे संदेष्टे यांनी ते दडपले आहे. तसेच ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांनी, मंडळीत व कुटुंबात देवाची ओळख करून न देण्याद्वारे देवाविषयीचे सत्य दडपले आहे. म्हणून देव स्वतः हे सत्य लोकांसमोर आणण्याच्या कामी कार्यरत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकापासून आपण पाहतो की, देव वाणीने, दर्शनाने, दूतांद्वारे, स्वप्ने व दृष्टांताद्वारे बोलला. देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे (इब्री. १:१,२). त्यामुळे मानवाने सत्य कितीही दडपले तरी मोठ्या सामर्थ्याने देव निवडलेल्यांचे नेत्र उघडत आहे.

जुन्या कराराची सांगता करून नव्या कराराची स्थापना करताना जगासमोर दडपलेले सत्य परखडपणे मांडण्याची येशूने पुन्हा स्वतः सुरुवात केलीच. पण या कार्यासाठी खास बारा प्रेषितांची आणि पुढे विदेश्यांमध्ये कार्य करणाऱ्या एका खास प्रेषिताची म्हणजे पौलाची देवाने स्वतः निवड केली. या सुवार्तेची कोनशिला येशू स्वतः झाला आणि मंडळीच्या पायावर उभारण्याचे, म्हणजे हे सत्य जाणून येशूला अनुसरणाऱ्या विश्वासी जनांस एकवट करण्याचे  काम त्यांनी येशूच्या वधस्तंभाचे कार्य, त्याचे पुनरुत्थान, स्वर्गारोहण व द्वितीयागमनाच्या घोषणेने केले (इफिस २:१९, २०). त्यांच्या हयातीतच ईश्वरी प्रेरणेने त्यांनी संपूर्ण नवा करार निर्भेळ सुवार्तेचे विश्लेषण देऊन पूर्ण केले. नव्या कराराचे सर्व लेखक प्रेषितांपैकी, येशूच्या शिष्यांपैकी व येशूच्या अर्ध्या भावांपैकीच आहेत. त्यांनी देवाच्या सार्वभौमतेच्या अधीन राहून ईश्वरी प्रेरणेने मंडळ्यांसाठी लिखाण केले (२ पेत्र १:२०,२१; २ तीमथ्य ३:१६,१७). एवढेच नव्हे तर बायबलची ६६ पुस्तके पहिल्या मंडळीतच ईश्वरप्रेरित म्हणून देवाने आपल्याला  दिली. त्यात काहीही भर न घालण्याचा अगर काहीही कमी न करणाचा कडक इशारा देवाने प्रकटीकरण २२:१८, १९ मध्ये दिला. एवढ्यावरच या प्रेषितांचे काम थांबले नाही, तर येशूने पाठवलेले हे प्रेषित यरुशलेमेपासून सुरुवात करून सर्व यहुदीयात शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्ता घेऊन गेले. त्यांनी देवाविषयीचे सत्य लोकांसमोर येशूने दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्याच्या सारखीच चिन्हे व अद्भुते करून पुराव्यांनिशी, मौखिक व लेखी स्वरूपात सादर केले. हे सर्व करताना ते येशूसारखे बोलले. येशूसारखे वागले. प्रेषित योहान वगळता बाकीचे सर्व येशुसारखेच दुःखसहन करीत रक्तसाक्षी झाले.

आज आपण त्यांनी दिलेल्या सत्याच्या ज्ञानामुळेच ख्रिस्ती विश्वासी म्हणून जगत आहोत. आपल्याला समजलेला ख्रिस्त व देवाचे जुन्या करारापासूनचे सामर्थ्य व ज्ञान आपण आपल्या पिढीच्या अंतःकरणावर मानवी संप्रदाय किंवा रूढी परंपरांनी नव्हे तर वचनात व्यक्त झालेल्या देवाच्या स्पष्टीकरणातून बिंबवायला हवे, ही काळजी गरज आहे. यासाठी संडेस्कूल किंवा चर्चवरच केवळ अवलंबून न राहता आपल्या घरातच मुलांना बालपणापासून वचनाचे शिक्षण देण्यात आपण दक्ष राहायला हवे. नाहीतर आपण सत्य दाबून ठेवणाऱ्यांपैकीच एक होऊ. मग फार मोठ्या सार्वकालिक हानीला आपल्याला सामोरे जावे लागेल. देवाचे सत्य प्रेषितांपासून आम्हा भारतीयांपर्यंत कसे आले याचा प्रवास आपण पाहू या.

येशूने पाठविलेल्या प्रेषितांची खास वैशिष्ट्ये होती. भारताच्या सुवार्तेचा इतिहास पाहताना ही माहिती असणे महत्त्वाचे आहे.

१. येशू ख्रिस्ताने स्वतः त्यांची प्रेषितीय कामासाठी निवड केली होती. (मार्क ३:१४, लूक ६:१३, प्रे.कृ.१:२,२८,     
    १०:४१, गलती १:१).             

२. त्यांनी येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानापूर्वी व पुनरुत्थानानंतर प्रत्यक्ष नेत्रांनी पाहिले होते. (प्रे.कृ.१:२२, १०:३९-४१,
    १ करिंथ ९:१, १५:७-८)

३. ख्रिस्ताने त्यांना चिन्हे व अद्भुते करण्याचे अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा वापर करून चमत्कारांद्वारे त्यांनी
    आपण ख्रिस्ताचीच अधिकृत सुवार्ता सांगत असल्याची जगाला खात्री पटवून द्यायची होती. कारण अजून नव्या
    कराराच्या लिखाणाचे देवाचे काम चालू होते. (मत्तय १०:१-२, प्रे.कृ. १:५-८, २:४३, ४:३३, ५:१२, ८:१४,
   २ करिंथ १२:१२, इब्री २:३-४) चमत्कारांची पुष्टी देऊन ख्रिस्ताने पाठवलेले प्रेषित हेच आहेत याचे प्रमाण पटवून
   दिले जात होते.

४. त्यांपैकी एकाही प्रेषिताच्या मृत्युनंतर त्याचे स्थान भरून काढण्यास दुसऱ्या प्रेषिताची नेमणूक करण्यात आली नाही.
    यहुदा इस्कर्योतचे तारणच झालेले नव्हते. म्हणून त्याच्या आत्महत्येनंतर वरील सर्व निकषांमध्ये बसेल अशी व्यक्ती
    प्रेषित म्हणून निवडली गेली होती हे आपण पाहतो. (प्रे.कृ. १:२१-२६ वाचा.) आणि पौल ह्या विदेश्यांसाठी
    पाठवलेल्या प्रेषिताची निवड खुद्द पुनरुत्थित येशूने केली व ३ वर्षे त्याला आपल्यासोबत एकांतवासात ठेवून
    मंडळीची व देवाविषयीची सर्व रहस्ये शिकवली. (प्रे.कृ.९:१५, गलती १:११-२४ वाचा.) वरील निकषांमध्ये
   बसतील असे प्रत्यक्ष येशूने पाठवलेले प्रेषित आता नाहीत. असे प्रेषित पुन्हा झाले नाहीत व होणारही नाहीत. त्यामुळे
   त्यांच्याप्रमाणे अद्भुते करणारे प्रेषितही आता नाहीत. (प्रे.कृ.१३:११, ५:१५-१८, ९:३६-४२, २०:६-१२, २८:१-६.)
   ते तर ख्रिस्ताचे प्रतिनिधी होते.

५. शेवटल्या भोजनाचे वेळी मंडळीच्या नेतृत्वासाठी त्याने त्यांना खास अधिकार दिला होता (योहान १४:२६, १५:२६-
   २७, १६:१२-१४). आरंभीची मंडळी त्यांचा बोध ख्रिस्ताच्या अधिकारातून सादर होत असल्याप्रमाणे स्वीकारत
    होती. त्यांचे लिखाणही पहिल्या मंडळीने ईश्वरप्रेरित देवाचे लिखाण म्हणून मान्य केले होते व त्याचे ते पालनही करीत
    होते (१थेस्सल २:१३).

६. त्यांना जुन्या कराराच्या संदेष्ट्यांइतकाच अधिकार होता (१करिंथ १४:३७, गलती १:९, २ पेत्र ३:१६, यहूदा १७).
    देवाचे वचन लिहिण्याचा अधिकारही त्यांना देवाकडून प्राप्त झाला होता. (२ थेस्सल २:२, २ करिंथ ११:१३, २ पेत्र
   २:१-३.) त्यांनी येशू म्हटलेल्या पायाविषयी दिलेल्या शिकवणीने मंडळीची पायाभरणी पूर्ण केली. आता त्या पायावर
   मंडळीची इमारत रचण्याचे काम चालू आहे. कारण आता फक्त इमारत चढण्यापुरतेच काम करणे अत्यावश्यक आहे. 
   त्यांनी पाया घालण्याचे काम संपवले आहे. आता बिशप, पाळक, वडील डिकन्स यांनी मेषपालाप्रमाणे विश्वासियांच्या
   मंडळीमध्ये बांधणी करायचे काम करायला त्यांची जोपासना करावयाची आहे. (१पेत्र ५:२, तीत १:५.) येशूने
   पाठवलेल्या प्रेषितांचे वेगळेपण व श्रेष्ठत्व आपण प्रकटी २१:१४ मध्ये पाहतो. देवाच्या नगराच्या वेशीच्या पायाच्या
   दगडांवर त्यांची नावे कोरलेली दिसतात. त्यामुळे आज जर कोणी मी ख्रिस्ताने पाठवलेला प्रेषित आहे, असा दावा
   करीत असेल तर त्यांच्या या पदाविषयी प्रश्नच आहे! पवित्र जनांना देवाच्या कामामध्ये सेवा करण्याची संधी देवाने
   त्यांना दिली आहे. त्यामुळे मंडळीतील पवित्र जन ज्ञानात आजही बळकट होताना दिसतात. ते ऐक्यात वाढतात. प्रौढ
   होतात. सखोल सिद्धांतात,  पवित्रीकरणात वृद्धिंगत होतात. त्यासाठी पवित्र आत्मा व ईश्वरप्रेरित वचन म्हणजे बायबल
   ही साधने उपलब्ध आहेत. या प्रकारे आजही त्या मूळ प्रेषितांचा प्रभाव मंडळीवर चालू आहे. त्यांचे काम मंडळीत
   चालू ठेवणारे आजचे प्रेषित म्हणजे मंडळीने पाठविलेले मिशनरी आहेत. ते या मूळ प्रेषितांनी हस्तांतरित केलेली
   सुवार्ता जगासमोर सादर करीत आहेत. त्यामुळे मूळ प्रेषित व मंडळीने पाठवलेले प्रेषित यांच्यात फरक आहे. ते येशूने
   पाठवलेले प्रेषित होते तर त्यानंतरचे सर्व मंडळीने पाठवलेले मिशनरी आहेत.

प्रेषितांच्या कार्यात देवाने आरंभापासून भारतालाही समाविष्ट करून घेतले होते ही गोष्ट आपल्या अभ्यासासाठी फार महत्त्वाची आहे. देवाने त्याच्या एका मूळ प्रेषिताला भारतातही पाठवले होते. तो येथे रक्तसाक्षी झाला. सुवार्तेची पाळेमुळे रोवली. त्यानंतर मंडळ्यांनी विविध देशातून भारतात मिशनरी पाठवले. त्यांच्याद्वारे देवाने भारतात सुवार्ता चालू ठेवली.  लोकांपुढे देवाचे सत्य सादर करण्याबाबतचा त्यांचा इतिहास अनेक चढ उतारांनी भरला आहे आणि अनेक प्रकारे दडपलेले सत्य लोकांसमोर आणण्याचे काम अजूनही चालूच आहे. तो इतिहास अभ्यासून आपण उत्तेजित होऊ या आणि देवाविषयीच्या शंकाकुशंका, कूट प्रश्नांनी देवावर आरोप करीत त्याच्यापासून दूर न जाता देवाची घनिष्ठ ओळख करून घेऊ या. त्याचे कार्य पाहून उत्तेजित होऊ या.           

Previous Article

अपयशाला तोंड देतानालेखिका

Next Article

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

You might be interested in …

देव तुम्हाला क्षमता देईल

जॉन ब्लूम बायबलमध्ये देवाने समाधान, उत्तेजन, मार्गदर्शन आणि खात्री देणारे मोलवान खडे काही ठिकाणांमध्ये विखरले आहेत.  मला अपेक्षा नसताना मी माझी वैयक्तिक भक्ती करत असताना अगदी किचकट अशा निर्गमच्या काही जागी मला ते दिसले. पूर्ण […]

ख्रिस्तासाठी थोडे दिवस कष्ट करताना

ग्रेग मोर्स येशूच्या मागे जाणे सोपे आहे की कठीण? एका बेघर (आणि प्यालेल्या) माणसाने माझ्या पत्नीला काही वर्षांपूर्वी प्रश्न केला. खरं तर त्याला स्वत:शिवाय इतर कुणाचेही उत्तर ऐकण्यात स्वारस्य नव्हते. त्याने स्वत:च आपला प्रश्न लगेच […]

लक्ष विचलित झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल

जॉन ब्लूम येशूने शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सांगितलेले वाक्य असे आहे, “कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको” (मार्क ४:२३). जर आपण शहाणे असू तर येशू जे काही सांगतो ते आपण ऐकू, विशेष करून त्याने वारंवार […]