अक्टूबर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

डॉ. ॲलिक्सो डी मेंझिज

 १५५९ – १६०५

प्रकरण ८

 तिसरा टप्पा 

उमेदीच्या ३८व्या वर्षी आपल्या चर्चचे हित जपणारा हा माणूस पुढे आला. अत्यंत हुशार म्हणून तो विद्यार्थी दशेत असताना चमकला होता. तर आता उत्कृष्ट उपदेशक म्हणून त्याची ख्याती होती. त्याची माद्रिदच्या दरबाराचा उपदेशक म्हणून नेमणूक झाली होती. १५९५ मध्ये गोव्याचा आर्च बिशप म्हणून त्याची नेमणूक झाली. सिरियन चर्चच्या मार अब्राहाम बिशपने कॅथोलिक धर्ममतांचा त्याग केल्याने मलबार चर्चला आपल्या काबूत आणण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली होती. त्यासाठी बाबिलोनने नेमलेल्या बिशपला मलबारमध्ये पाउल टाकू न देण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. तो गोव्यात आला तेव्हा मार अब्राहाम अंगामालीत बिशप होता. पण त्याच्या केसालाही तो धक्का लावू शकत नाही हे त्याला कळले होते. तेथे पोपच्या अधिकाराला किंवा पोर्तुगीज हुकुमाला कोणी जुमानत नव्हते. म्हणून मार अब्राहाम बिशप मरण पावण्याची त्याला दोन वर्षे वाट पाहावी लागली.

त्याच्या मृत्युनंतर त्याने आपल्या मोहिमेला आरंभ केला. बाबिलोनलच्या अधिकाऱ्याला त्याच्या जागी नवा बिशप पाठवण्याचे पत्र केव्हाच गेले असल्याची बातमी गोव्यात समजली होती. म्हणून ती विनंती निष्फळ ठरवण्याचे बेत ताबडतोब आखण्यात आले. तो बिशप कोणत्या जहाजावर चढतो हे समजण्यासाठी त्याच्या मार्गावरील सर्व बंदरांवर पाळत ठेवण्यास नौदलाला हुकूम सोडण्यात आले. ही नाकेबंदी सफल झाली. त्यांनी बिशप नेमताच एकामागून एकाला जहाजावर चढताच मायदेशी रवाना करण्यात आले, आणि अंगामालीचे पद रिक्तच राहिले. त्यामुळे सिरियनांचा तात्पुरता धर्माधिकारी आर्चडिकन जॉर्ज याच्याशी दोन हात करायला गोव्याच्या अधिकाऱ्याला सवड मिळाली. ती त्याने धूर्तपणे पार पाडली.

पहिला पवित्रा –  आर्चडिकन जॉर्जला मेंझीजने प्रथम पत्र लिहून कळवले की त्याची नेमणूक तात्पुरती झाली आहे, हे त्याचे अधिकारपत्र त्याची ही नेमणूक कायदेशीर असल्याचे दर्शवणारे असेल. त्यावर मान्यतेची सही करण्यापूर्वी त्याने सोबत दिलेल्या अटीची पूर्तता करणे बंधनकारक होते. त्यासाठी रोमन कॅथोलीक विश्वास आपला असल्याच्या  प्रतिज्ञापत्रावर त्याने सही करायची होती. मेंझीजचा हा आश्चर्यकारक उपक्रम सिरियनांना फार धाडसाचा वाटला. संतापाने त्यांच्यात भडका उडाला. त्यांनी मेंझीजच्या या पत्राला मुळीच मान्यता दिली नाही. “संत थोमाचा जितका रोमच्या मंडळीशी संबंध आहे, तितकाच रोमच्या चर्चचा थोमाच्या प्रेषितीय मंडळीशी संबंध आहे.” असे जॉर्ज म्हणाला. अंगामालीत त्याने अदीक्षित लोकांची सिनेड भरवली. त्यांनी एकमुखाने जॉर्जला पाठींबा दिला व शपथपूर्वक म्हटले की, “आम्ही प्रेषितीय प्राचीन धर्मविश्वास व आचारसंहिता मुळीच सोडणार नाही. बाबेलच्या अधिकाऱ्याने नेमलेल्या बिशप शिवाय दुसऱ्या कोणाला मानणार नाही.” हे फारच आशादायी, अनुकूल व करारपत्रावर शिक्कामोर्तब केल्याप्रमाणे होते. पुढे ४० वर्षांनी पाश्चात्य लोकांनी एडीन्बरो येथे असाच सुप्रसिद्ध करार घडवला. पण त्यांनी ही चिकाटी कायम राखली. तशी चिकाटी भारतीय पौर्वात्य लोकांनी कायम राखली नाही ही खेदाची गोष्ट आहे.                              

मेंझीजच्या कानी सिरियनांचा हाहाकार पोहंचला आणि तो अस्वस्थ झाला. पण तो गांगरला नाही. आपले डोके शांत ठेवले. आणि स्वत:च बंडाच्या जागी हजर होण्याचा बेत केला. आत्मसंरक्षणाची तजवीज न करता निश्चयाने, निधड्या छातीने, चिकाटीने, कारारीपणाने धोका पत्करून तो गेला आणि त्याला यशही आले. १५९९ च्या जानेवारीत तो गोव्याहून कोचीनला गेला. आर्चडिकन जॉर्ज डोंगराळ भागातून ३००० सशस्त्र सैनिकांनिशी त्याच्याकडे बैठकीसाठी गेला. त्यानंतर त्याच्यावर संकटे कोसळली व त्याची दयनीय अवस्था झाली. कारण हे लोक सल्लामसलतीसाठी देवाकडे न जाता मानवी बलाकडे गेले. कारण तो आपल्या समाजाचा जबाबदार, अधिकृत, समंजस, वचनाचा अभ्यासक, देवाला ओळखणारा व त्याच्यावर दृढ विश्वासाने अवलंबून राहणारा नेता नव्हता. ज्या चर्चने अनेकदा दटावणीला भिऊन आपली मूळ धर्मतत्त्वे अप्रमाण मानली होती, अशा मंडळीचा तो प्रतिनिधी होता.जसजसे त्यांचे पुढारी आपली धर्मतत्वे नाकारत गेले तसतसा त्यांच्या स्वातंत्र्याला व स्वाभिमानाला धक्का बसून तडा जाऊ लागला. अशा परिस्थितीत सावरायला वेळ मिळाला नाही आणि रोमच्या सत्तेला टक्कर द्यायची वेळ आली होती. रोम सतत आपला अधिकार रेटत चालले होते. त्यात या कर्तबगार मेंझीजशी त्यांची गाठ पडली होती. जॉर्जच्या वागण्यात भित्रेपणा, चंचलता, हतबलता दिसत होती. ३०००चे सैन्य घेऊन भेटीला जाण्यातूनच हे व्यक्त होत होते. मेंझीजने त्याची नाडी पूर्ण ओळखली होती. तो त्या ३००० च्या सैन्याला मुळीच घाबरणार नव्हता. कारण पहिल्याच भेटीत पहिला करार करणे त्याने साध्य केले होते. 

पहिला करार 

अ- बाबिलोनलच्या अधिकाऱ्यावर बहिष्कार टाकून त्यांच्या चर्चच्या प्रार्थनेत त्याचा नाम उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली.                                                                                                   

ब- अखिल जगातील पाळक या पदवीवर एकट्या रोमच्या पोपचा हक्क आहे, अशी घोषणा करण्याच्या करारावर सही करण्याच्या कामी जॉर्जचे मन वळवण्यात तो यशस्वी झाला. ऐन सही करताना जोर्जने कां कूं करताच त्याला दरडावून त्याने त्याची सही मिळवली. “फादर सही कराच नाहीतर झाडाच्या मुळावर घाव घालायची वेळ आली आहे.” या त्याच्या वाक्याने जॉर्जला थंडच केले. आपल्या पुढाऱ्याच्या या कृतीने सिरियन लोक संतापले. पण बाबिलोनहून बिशप येईपर्यंत शांतता टिकवायला आपण हे केल्याची लंगडी सबब त्याने पुढे केली. आणि लोकही शांत झाले. पण ही सर्व कृती जॉर्जलाही कमीपणा आणणारी होती. पण आपल्याला त्याची कींव वाटत नाही. लवकरच मेंझीज व जॉर्ज मध्ये दुसरा आणखी एक करार झाला.

दुसरा करार 

१- लवकरात लवकर सिनेड भरवावी. त्यात तुमच्या चर्च मधील सर्व प्रकारचे प्रतिनिधी असावेत. 

२- सिनेडने विश्वास व दैनंदिन कारभाराबाबत निर्णय घेऊन नियम लावून द्यावेत. 

३- मेंझीजला त्यांच्या कोणत्याही धर्मप्रांतात दीक्षा, दृढीकरण सोडून केवळ उपदेश करण्याची परवानगी असावी.                                                                                                                                                                         

मेंझीजची पूर्वतयारी – सिनेडमध्ये सिरियनांच्या बालेकिल्ल्यात उपदेश करत फिरण्याच्या परवानगीच्या सोन्यासारख्या संधीचा पुरेपूर फायदा मेंझीजने उठवला. त्याच करारात त्याच्यावर टाकण्यात आलेला प्रतिबंध मात्र त्याने धाब्यावर बसवला. लोकांचे मन वळवायला कानाकोपऱ्यातील झाडून सर्व सिरियन मंडळ्याना भेटी देऊन उपदेश केले. प्रसंगी लाचही दिली. मुठभर तरुण जमवून त्यांचे दृढीकरणही केले. सिरियन मंडळीत हा विधी नसूनही त्याने हा विधी चालू केला. तीन ठिकाणी मिळून ९० तरुणांना दीक्षा दिली. धोरणीपणे वागून करारपूर्वक दिलेल्या वचनांचा भंग केला. त्याचा परिणाम सिनेड मध्ये त्याला बहुमत मिळण्यात दिसून येणार होता. त्या तरुणांनी तर मेंझीजला पाठींबा देण्याचे वचनही दिले होते. ह्या बातम्या कानी येताच जॉर्ज घाबरला. लोक मूळ सिरियन चर्च सोडून जाऊ लागले. तव्हा मात्र आपल्या भवितव्याच्या चिंतेने त्याला घेरले. मेंझीजला शरण जायचे नाहीतर रोममध्ये स्वत:ला हद्दपार करून घ्यायचे हे दोनच पर्याय त्याच्यापुढे उरले. आता त्याची मोठी कसोटी होती. मेंझीज याच क्षणाची वाट पाहात होता. जॉर्जने शरणागतीचा मार्ग पत्करला. जराही दयामाया न दाखवता त्याने या विजयाचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने जॉर्जला १० कलमी  करारपत्र पाठवले. तो मान्य असल्याची २० दिवसात सही करून तो परत पाठवायची अट घातली.  जुलमाने मान्यता मिळवणे मेंझीजला योग्य वाटले. त्यातील १० कलमे अशी होती –                                                 

१- नेस्टोरियन, दिओडोरस, थीओडोरास यांच्या चुकांवर व दोषांवर पूर्ण बहिष्कार टाकायचा. 

२- संत थोमा व संत पेत्र यांचे सिद्धांत भिन्न नाहीत. ख्रिस्ताचे एकमेव शुभवर्तमान खरे आहे अशी घोषणा करायची.

३- रोमन कॅथोलिक विश्वास मान्य असल्याची कबुली द्यायची.

४- धर्मप्रान्तातील सिरियन भाषेतील ग्रंथ व  त्यांची मालमत्ता आर्च बिशप मेंझीजला सोपवायची. त्याने ग्रंथातील चुका
     सुधारायच्या व त्याला वाटतील ते ग्रंथ जाळून टाकायचे.

५- पोपला सबंध चर्चचा प्रमुख अधिकारी मानायचे.

६- बाबिलोनलच्या अधिकाऱ्यावर बहिष्कार घालून त्याच्याशी पत्राद्वारे अगर कसलाच संबंध ठेवायचा नाही.

७- पोपने पाठवलेल्या व गोव्याच्या आर्चबिशपशिवाय इतर कोणालाही धर्मप्रांतात येऊ द्यायचे नाही.

८- गोव्याच्या आर्चबिशपला आपला पुढारी म्हणून मान्यता द्यायची.

९- विश्वास विषयक प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी एक सिनेड भरवावी. त्यात प्रत्येक मंडळीच्या समितीने व निवडक
    अदीक्षित सभासदांनी हजर राहावे. सिनेडचे सर्व नियम आर्चबिशपने बंधनकारक मानावेत. सिनेडला हजर राहाण्याची
    पत्रे संपूर्ण धर्मप्रान्तांत पाठवावीत.    

१०- आर्च डीकन जॉर्जने सशस्त्र सैनिक सोबत न घेता आर्चबिशप मेंझीज सोबत प्रांतभर फिरावे.  

केवढा हा मानखंडनेचा प्याला! जॉर्जने याचा पूर्ण थेंबन् थेंब पिऊन टाकला! त्याचे जे काही प्रिय असे होते ते सर्व त्याने मेंझीजच्या हवाली केले. आणि गुडघ्यावर येऊन शपथपूर्वक ह्या करारातील नवा विश्वास जाहीर केला.

कोचीन मधील गावात २० जून १५९९ ला सिनेड भरली. या प्राचीन सिरियन मंडळीचा तेथे शेवट होणार होता. सर्वाना निमंत्रणे गेली. आज जॉर्जची निमंत्रण पत्रिका उपलब्ध नाही. मेंझीजची मात्र उपलब्ध आहे. त्यात मेंझीजने अवलंबलेल्या मार्गाचे समर्थन केले आहे.

सिनेड – सर्व मिळून ८१३ प्रतिनिधी हजर होते. एक हजार वर्षे प्रेषितीय विश्वासाने चाललेल्या स्वतंत्र सिरियन मंडळीचे हे खरेखुरे प्रतिनिधी होते. मेंझीजने अशी पूर्वतयारी केली होती की दीर्घकाळ या मंडळीने मान्य केलेली मुलभूत सत्ये त्याच मंडळीने आता सदोष असल्याचे एकमताने घोषित करावे. हे घडवून आणायला तो ११ दिवस आधीच तेथे ठाण मांडून राहिला. सिरियन समितीचे ८ सदस्य, ४ अदीक्षित व स्वत:चे ६ जेजुईट लोक यांची आधी एक सभा भरवली. त्याने सिनेडमध्ये मांडायचे असलेले मुद्दे सविस्तर त्यांच्यासमोर लिखित स्वरूपात ठेवले. यात त्याची कर्तबगारी, आयोजनपद्धती उघड दिसते. यातील प्रत्येक मुद्द्यावर खल झाला. धर्मसिद्धांत व मंडळीचा कारभार याबाबतच्या मुद्द्यांवर निश्चयपूर्वक तो जराही ढळला नाही. ते सर्व मान्यच असल्याचे त्यांच्या गळी उतरवले. समितीला हे सर्व मान्य असल्याचा  सिनेडमध्ये देखावा करण्यासाठी ही त्याची पूर्वतयारी होती. सिनेडच्या सभा ८ दिवस चालल्या. अखेरपर्यंत सभेला हजर राहणे बंधनकारक केले होते. गुप्त कारस्थान व घोटाळे टाळण्यासाठी गटागटांनी लहान लहान बैठका घेणे सक्तीने मना केले होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बहिष्कृत करण्याचे घोषित केले होते. पहिल्या दिवशी मेंझीजने प्रथम आपला मुकुट वेदीवर ठेवला आणि शुभवर्तमानाच्या प्रतीवर हात ठेवून आपला धर्मविश्वास वाचून दाखवला. त्यात सिरीयन मंडळीने त्याज्य व पाखंडी ठरवलेले काही सिद्धांतही वाचले. सिनेडने ते मुकाट्याने ऐकले. पण वाचन संपताच ते निषेध दर्शवत कुरकुर करू लागले. आम्हाला ही नवी विश्वासाची तत्त्वे मान्य नाहीत असे जाहीर घोषित करू लागले. पूर्वीची ख्रिस्ती तत्त्वे, सिद्धांत, विश्वास, आचार, विचार यांना काळीमा लावायचे लाजिरवाणे काम आम्ही कसे करायचे? असे म्हणू लागले. पण या सर्वाला तोंड देण्यास मेंझीज सज्ज होता. “उलट तुम्ही ती नाकारत नसून त्यांना पुष्टी देत आहात” असे त्याने ठासून सांगितले.

कॅथोलिक धर्म विश्वासाचे प्रोटेस्टंट सिनेडमधील आक्षेप घेणाऱ्या लोकांपुढे धूर्तपणे समर्थन केल्यावर तुमचा आर्च डीकन जॉर्जसुद्धा हा विश्वास कबूल करील असे त्याने जाहीरच करून टाकले. हताश व गर्भगळीत जॉर्जने तसेच केले. केवढी अपमानास्पद नामुष्की! मग सिनेडमधील ७० प्रतिष्ठित व्यक्ती ही सभाच उधळून लावायला तावातावाने पुढे सरसावल्या. तेव्हा मेंझिजने शांतपणे विचारले, “तुमचे म्हणणे काय आहे?” ते म्हणाले, “आम्हाला तुमच्या छत्राखाली घेतले तर आमचे राजे घेत असलेले कर आम्हाला माफ करावेत.” तेथे गव्हर्नर हजरच होता. लगेच त्याच्यावर हे काम त्याने सोपवले. मेंझिजपुढे गुडघे टेकून त्याने ते स्वीकारले आणि बंड थांबले.

मेंझिज सर्व बाजूंनी विचार करून परिस्थिती हाताळणारा होता. या कठीण प्रसंगावर त्याने शांत माथा ठेवून मात केली. आठव्या दिवशी सर्व निर्णय पास झाले. आता मलबारचे सिरियन चर्च नावापुरतेच सिरियन चर्च राहिले. त्यांनी रोमन कॅथोलिक मत प्रणालीचा पेहराव परिधान केला. फक्त सिरियन भाषेत त्यांची उपासना होत होती एवढेच! अशा प्रकारे या मूळ विश्वासाची मंडळी भ्रष्ट झाली. फार वेगाने तिचा कायापालट झाला. त्याक्षणी सिरियन लोकांच्या लक्षात या घटनेचे गांभीर्य लक्षात आले नसले तरी हळूहळू त्यांना सर्व अर्थबोध होणार होता.

आता तीन ऐवजी सात विधी होणार होते ते सक्तीने लादले गेल्याचे त्यांना जाणवणार होते. मूर्त्यांचा उपयोग उपासनेत हळूहळू होणार होता. तेव्हा कसलीही दयामाया चालणार नव्हती. प्राचीन धर्मग्रंथ नष्ट करणे तर त्यांना भयंकर वाटले असेल. सर्व पारंपारिक सिद्धांतांच्या ग्रंथांचा होम करण्यात आला. पूर्वेतिहास त्यांच्या स्मरणातूनच पुसला जावा म्हणून मेंझिजनेही कुटिलनिती वापरली होती. त्याने प्रोटेस्टंटांचा पूर्वेतिहास व मूळ सिद्धांत संग्रहाचे लिखाणच नष्ट केले. एका जर्मन लेखकाने त्या दिवसाला ‘विध्वंसदिन’ म्हटले आहे. भोवतालच्या लोकांच्या ज्या वेडगळ चालीरीती व आचारविचारांचा सिरियन मंडळीच्या लोकांत शिरकाव झाला होता, त्यांना मात्र बंधन आले हे चांगलेच झाले. मिशन काढणे आपले कर्तव्य असल्याचे घोषित करून ते चित्रही त्याने बदलले. धर्म प्रांताचे छोटे विभाग करून त्यावर स्वतंत्र पाळक नेमले. त्यामुळे चर्चमध्ये सुव्यवस्था, संघटना, एकजिनसीपणा वाढला. या किरकोळ फायद्याच्या तुलनेत नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात झाले. सिनेडचा समारोप एका गीताने झाला. गळा दाटून, दुःखाने ते गीत गाण्यात आले.

मेंझिजचा हा विजय होता. पण ह्याविरुद्ध कधीही बंड होऊ शकते हे लक्षात घेऊन आपल्या अधिपत्याखाली आलेल्या धर्म प्रांतात आपली खास वस्त्रे घालून फिरतीवर सिरियन मंडळ्यांना जाऊन भेटी देण्याचा त्याने धडाकाच लावला. यात त्याची बुद्धिमत्ता व संघटन कौशल्य दिसते. लोक आदराने त्याचा सत्कार करून त्याच्या हाताचे चुंबन घेत. त्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतो, अशी त्यांची समजूत होती. शेकडो मुलांना सोन्याचे नाणे असलेले केक वाटून त्याने लोकांची मर्जी संपादन केली. मरीयेची भक्ती करण्याची प्रथा सुरू केली. मेजांच्या जागी दगडी वेद्या आल्या. मूर्त्यांना भक्तिस्थानी जागा मिळाली. त्यासाठी मेंझिजने पदरचे पैसे खर्च केले. तरीही काही लोकांच्या मनात राग धुमसतच होता. तसे निदर्शनास येतच मेंझिज तो दडपून टाकत असे. लोकांची त्याला साथही मिळत असे. एकदा कालिकत येथे एका कार्यक्रमात एक नाटक सादर होत असता लोक आनंदाने त्याला भरभरून प्रतिसाद देत होते. मेंझिजच्या लक्षात आले की, हे कलाकार रोमी विश्वास नवीनच पाखंड असून थोमा व पेत्राद्वारे आलेला विश्वासच प्रभावी असल्याचे सादर करत आहेत. तेव्हा लोकांचा तो उमाळा दडपण्यासाठी ताबडतोब त्याने जाहीर केले की, “या नटांना भूतबाधा झाली आहे.”
 

कधी मनधरणी करून तर कधी धमकी देऊन तर कधी बाबापुता करून रोमन कॅथोलिक चर्चच्या शृंखला सिरियन चर्चच्या गळ्यात त्याने अडकवल्या. जेव्हा १५९९ मध्ये तो गोव्याला जायला बंदरावर आला तेव्हा  शेकडो लोक त्याला निरोप द्यायला तेथे जमले होते. “आमच्या धर्मप्रांताचे तुम्हीच बिशप व्हा” असे विनवू लागले. पण हा रोमच्या पोपचा अधिकार असल्याचे सांगून व ही विनंती पोपच्या कानी घालण्याचे अभिवचन देऊन तो तेथून निघाला. मलबार धर्मप्रांतात तो साडेदहा महिने राहिला. पण एवढ्या थोड्या अवधीत १००० वर्षांच्या स्वतंत्र मंडळीला त्याने रोमचे अंकित करून त्यांच्या पायाशी लोळण घेण्यास भाग पाडले. हा त्याचा मोठा विजय होता.

या इतिहासावरून तुमच्या लक्षात आले असेल की, त्याने सुरू केलेल्या कित्येक चुकीच्या गोष्टी या पूर्वीच्या मूळ विश्वासी मंडळीत नव्हत्या. त्या आज आपल्याही काही मंडळ्यांमध्ये आढळतात. स्वतंत्र विश्वासी मंडळ्यांनी त्यांचा आपल्या मंडळीत वापर केलेला नाही ही उत्तम गोष्ट आहे. पण ह्या बाह्य गोष्टींपेक्षाही खोटे शिक्षण वाव मिळाल्यास किती आक्रमकपणे मंडळीचा कब्जा घेऊ शकते हा मंडळीसाठी फार मोठा धडा आहे. म्हणूनच वचनातच प्रत्येक गोष्टीचा नित्य शोध घेऊन बिरुयाच्या मंडळीप्रमाणे या गोष्टी अशाच आहेत का याचा पडताळा घेण्याची मंडळीने सवय करून घ्यायला हवी (प्रे.कृ.१७:११). तसेच मंडळीच्या पुढाऱ्यांनी आपल्या मंडळीचे किती आस्थेने पालन पोषण, जतन केले पाहिजे हा तर फार मोठा धडा पुढाऱ्यांसाठी आहे.

मेंझीजची कामगिरी डोळ्यात भरण्याजोगी होती. ब्रिटीश म्युझियम मधील ग्रंथांत त्याच्याविषयी अधिक माहती मिळते. सिरियन लोकांना अंकित करण्यामागे रोमी लोकांचा राजकीय हेतू होता. थोमाच्या काळापासून जे लोक ख्रिस्ती धर्माला चिटकून होते, ते एवढेच. हे लोक पोर्तुगीजांसाठी तीस हजार सैन्य उभारू शकत होते. म्हणून या लोकांना रोमन चर्चच्या धर्मप्रांतात अंकित करून घेण्याने पोर्तुगीजांना राजकीय फायदाच होणार होता. १६ व्या शतकापर्यंतच्या या सर्व ख्रिस्ती लोकांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी कोणी केले नसेल इतके त्यांना रोमचे अंकित करून घेण्याचे काम मेंझीजने अवघ्या नऊ महिन्यांत करून दाखवले होते. तो म्हणतो, “सेरा प्रांतातल्या भेटीने मी अगदी गळून गेलो होतो. शरीरातले त्राणच नाहीसे झाले होते. पण स्तोत्र ९१:१५-१६ मधील पवित्र आत्म्याचे शब्द मी डोळ्यापुढे ठेवले होते.”
गोव्यात हिवाळा न घालवता वरील कामासाठी वेळ दिल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. कॅथोलिक शिक्षण व पाळकीय संगोपनाची आवश्यक ती सेवा त्याने केली. लोकांना धर्मसिद्धांत शिकवले. द्राक्षमळा वाढवला व त्याची जोपासना केली. शक्तीबाहेरचा हा भार वाहाणे त्याने प्रिय मानले. त्यावेळी हे आपल्या एकट्याचे काम नसून गटकार्य असल्याचे त्याने मान्य केले. फादर लोकांनी त्यागाने, भूतदयेने, प्रीतीने केलेल्या श्रमाचे त्याने कौतुक केले. आपण चुका केल्याचीही नम्रपणे त्याने कबुली दिली. आपल्याला सहाय्य करणाऱ्या फादर लोकांसाठी सेरा येथे त्याने निवासस्थान बांधले. तेथून लोकांच्या तारणाचे काम चालू राहील असा विश्वास दाखवून त्यांना आशीर्वाद दिले. हा रोमचा अत्यंत कर्तबगार मिशनरी होऊन गेला. मेंझीजची भारतातील कामगिरी आता पूर्ण झाली होती. काही दिवस तो गोव्यात आर्च बिशप व पौर्वात्य वसाहतींचा  व्हाईसरॉय म्हणून राहिला. १६०१ मध्ये अंगामालीच्या बिशपपदी फ्रांसिस्को रोज या जेसुईटची नेमणूक झाली. १६०५ मध्ये प्रेलेंटची आर्चबिशप म्हणून नेमणूक झाली. सिरियनांचे अंगामालीचे पीठ इतिहासजमा झाले. आणि मेंझीज युरोपला गेला. तेथे त्याचा बहुमान झाला. पोर्तुगालचा व्हाइसरॉय, कौन्सिलचा अध्यक्ष, अशी मानाची पदे त्याने भूषवली. पण नंतर लवकरच त्याची छीथू होऊन तो पदभ्रष्ट झाला व मरण पावला. केवळ मलबारच्या सिरियन मंडळीला मूळ प्रेषितीय सत्य विश्वासापासून धूर्तपणे व कपटनितीने तोडून रोमच्या गाड्याला जोडल्याबद्दल त्याला रोमच्या मंडळीचा कर्तबगार पुरुष म्हणून स्थान मिळाले.

भारतीय ख्रिस्ती लोकांना वाजवीपेक्षा अधिक दोष देणे टाळण्याची दोन कारणे लक्षात येतात –   

१- या देशातील राजांशी पोर्तुगीजांचा संबंध आला. या धार्मिक भांडणात आरंभी कोचीनच्या राजाने  पोर्तुगीजांच्या न कळत ख्रिस्ती प्रजेला त्यांना प्रतिकार करण्यास उत्तेजन दिले होते. त्यांच्यामधील वादाचा तपशील त्याला ठाऊक नव्हता. पण ख्रिस्ती लोकांचा पोर्तुगीजांशी जवळचा संबंध येऊ नये म्हणून तो ही खबरदारी घेत होता. हे लोक रोमचे अंकित झाले तर आपल्या देशाचे संरक्षण करणे कठीण जाईल असा धोका त्याला जाणवत होता. म्हणून तो गुप्तपणे मेंझीजच्या कामात अडथळे निर्माण करत होता. मेंझीज या राजाला पुरता जाणून होता. राजाला याबाबत तटस्थ ठेवायला त्याने मोठी लाच दिली होती व पोर्तुगीज पारिपत्य करू शकतात असा इशाराही दिला होता. म्हणून शेवटी काही लुडबुड न करता राजाने मेंझीजला रान मोकळे करून दिले.                    

२- राजाचा पाठिंबा जाताच सिरियन चर्चचे लोक दुबळे झाले. त्यात त्यांच्या संधिसाधू, सत्याची  चाड नसणाऱ्या, धरसोड करणाऱ्या, चंचल धर्मपुढाऱ्यांची भर पडली. 

भारतीय मंडळीचे दोष 

या मंडळीच्या दोषांकडे दुर्लक्ष करता येत नाही. युरोपात रोम व सुधारक मंडळ्यामध्ये बऱ्याच भागात असाच संघर्ष चालू होता. धर्मसुधारणेला रोमन कॅथोलिक धर्मपुढाऱ्यांचा पाठिंबा नव्हता. बरेच लोक रोमन कॅथोलिक पंथाला चिकटून राहिले होते. राजाही धर्मसुधारणांच्या विरुद्ध होता. पण जेथे लोक मूळ विश्वासात खंबीर राहिले तेथे कॅथोलिक पंथाचे उच्चाटन झाले. जर्मनीत तेच झाले. पण भारतात उलट झाले. निधड्या छातीने आपत्तींना तोंड देणारा एखादा लूथर भारतात निपजला नाही. पुढाऱ्यांनी दगा दिला, लोक डगमगले. युरोपीय मंडळीचे गुण भारतीय मंडळीत नव्हते. युरोपियनांची खंबीर वृत्ती, तारणाचा व नित्याच्या जीवनात दृढ विश्वास, वैयक्तिक आध्यात्मिक अनुभव भारतीयांमध्ये दिसले नाहीत.

युरोपियनांचा  मर्दानी बाणा भारतात मिशनऱ्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षात देखील दिसतो. त्यांच्या ठायी पवित्र आत्म्याचे वैयक्तिक जीवनातील कार्य व वचनातील सत्याच्या ज्ञानावरील विश्वासामुळे प्राप्त होणारे सामर्थ्य होते. रोम विरुद्ध लढण्यास हीच गोष्ट प्रभावी ठरली. वचनातील सिद्धांत व सत्यांवरील प्रचंड विश्वास व एकनिष्ठा त्या सत्यासाठी प्राण देण्याचेही सामर्थ्य पुरवतात. हेच ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासाचे मर्म आहे.

मेंझीजची अनेक चुकीच्या सिद्धान्तांवर व चुकीच्या कार्यपद्धतीवर निष्ठा मात्र भक्कम अशी होती. आणि त्यासाठी तो प्राण देण्यासही तयार होता. अशा प्रेषितीय वृत्तीचा मुलभूत सत्ये जाणणाऱ्या ख्रिस्ती  भारतीयांमध्ये अभाव होता. त्यांनी दिलेल्या लढ्यात ख्रिस्ती सिद्धान्तांचा, ख्रिस्ताच्या कृपेचा, दैवी विश्वासाचा लवलेशही दिसत नाही. विश्वास, आशा, प्रीतीचा अभाव दिसतो. खऱ्या मंडळीचा इतिहास त्यांनी घडवलाच नाही. उलट आपण आपला लेखी पूर्वेतिहास, पुरावादाखल दस्तऐवज व मोलवान ग्रंथही गमावून बसलो. मेंझीजच्या विजयामुळे रोमपेक्षा अधिक शुद्ध ख्रिस्ती धर्मसिद्धांत व आचारविचारांचे भारतीय सिरियन ख्रिस्ती मंडळीकडून उच्चाटन झाले. त्यांना धर्म म्हणजे एक रूढी परंपरा वाटत होती. आज हीच चूक काही भारतीय मंडळ्यांमध्ये चालू आहे. ख्रिस्ती लोकांमध्ये खरा ख्रिस्ती अनुभव फारच कमी प्रमाणात आढळतो. त्या सिरीयन मंडळीला येशू कोण आहे आणि काय आहे हे समजले असते तर मेंझीजला विजय मिळवणे शक्य झालेच नसते. उलट त्याच्या विजयाचे दुष्परिणाम आजवर टिकलेले दिसतात.                                          

यानंतर ५० वर्षांनी डच लोकांनी पोर्तुगीजांना भारतातून हाकून दिले. तेव्हा सिरियन लोकांनी बंड  करून रोमची बंधने तोडून झुगारून दिली. तरी निम्मे लोक रोमलाच धरून राहिले. मेंझीज मरण पावला तरी त्याचा आवाज घुमतोय. अनेक वर्षे बाल्यावस्थेत राहिलेली, प्रौढ न झालेली देवाची मंडळी त्याने उद्ध्वस्त केली. त्याचे ते कार्य असे असूनही अजून टिकून आहे. सार्वभौम देवाने ही मंडळी पुढच्या मंडळीस शिकवण मिळण्यासाठी व बोधासाठी वापरली. या इतिहासातून आजच्या मंडळीने इफिस ६:११ प्रमाणे सैतानाच्या डावपेचानुसार मंडळीत घुसून खोट्या शिक्षणाने बहकवणारे लोक ओळखावे, व त्यासाठी वचनात दृढ होत राहावे. बाल्यावस्थेत न राहाता विश्वासात प्रौढ व्हावे. बिरुयाच्या मंडळीप्रमाणे त्यांची शिकवण वचनातून पडताळून पाहाणारे व्हावे. ख्रिस्ताने व प्रेषितांनी खोट्या संदेष्ट्यांविषयी दिलेले इशारे पाळावे. भारतीय मंडळीने केवळ मूळ प्रेषितीय विश्वासच अग्रस्थानी ठेऊन पाळावा, अर्थात त्यासाठी प्रत्येक पिढीने वचनाने व पावित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शुद्ध होत सत्याच्या ज्ञानात वाढत जाण्याचा अनुभव घेतला तरच देवाची ही इच्छा सफल होईल. देव करो आणि असेच घडो. हे मंडळी जागृत राहा.

मेंझिजच्या यशाकडे थोडे अवलोकन करू या. पोर्तुगिजांना प्रतिकार करण्यास कोचीनच्या राजाने सिरियन चर्चला गुप्तपणे उत्तेजन दिले होते. कारण पोर्तुगिजांना एकटे पाडले तर परकीयांपासून आपल्या प्रांताचे रक्षण करणे आपल्याला सोपे जाईल असे त्याला वाटले. त्या राजाला मेंझिज पुरता ओळखून होता. याच राजाला त्याने ९५००  पौंड लाच दिली होती आणि पोर्तुगिज तुझे पारिपत्य करतील असा त्याला इशाराही दिला होता. तेव्हा चर्चच्या राजकारणात लुडबुड करणे त्याने सोडून दिले होते. राजाने आपल्याला सोडल्याचे पाहून चर्चची प्रतिकारशक्ती कमी झाली. त्यात सिरियन चर्चच्या धर्मपुढाऱ्यांनी संधीसाधूपणाचे, स्वार्थी, धरसोडीचे व सत्याची कास न धरता तडजोड करण्याचे वर्तन केले. त्यांच्या दगलबाजीमुळे सिरियन चर्च अधिकच शिथिल बनले व त्यांचे धैर्य खचून त्यांनी पडते घेतले.

त्यावेळी जागतिक धार्मिक अवस्था अशी होती की स्कॉटलंडमधील धर्मजागृतीला रोमन चर्चच्या धर्मगुरुंचा पाठिंबा नव्हता. राजाही धर्मजागृतीच्या विरुद्ध होता. बहुतेक लोक रोमन कॅथॉलिक पंथाला धरून होते. पण तेथील मंडळीने खंबीरपणे तेथे कॅथॉलिक पंथाचे उच्चाटन केले. जर्मनीत तसेच घडले. जर्मन लोकांच्या निर्धाराने कॅथॉलिक मंडळीला तेथेही माघार घ्यावी लागली. पण भारतात उलटा प्रकार झाला. देव, न्यायत्व, नीतिमत्त्वाचे पवित्रीकरणाचे जीवन, खरे सैद्धांतिक शिक्षण यावर येणाऱ्या घाल्यांना निधड्या छातीने तोंड देणारा एखादा लूथर किंवा नॉक्स भारतात झाला नाही. युरोपियनांची खंबीर व धार्मिक वृत्ती भारतातील सिरियन चर्चच्या लोकांमध्ये नव्हती. भारतातील युरोपियनांमध्येही ती खंबीर व धार्मिक वृत्ती आढळते. त्या बाबतीत मेंझिजचे यश उठून दिसते. एका युरोपियन नागरिकाने भल्या मोठ्या पौर्वात्य ख्रिस्ती समुदायावर प्रभुत्व मिळवण्याचे हे ठळक उदाहरण आहे. याच युरोपियनांची इतर देशात प्रगती खुंटली तर एकट्या मेंझिजने भारतात एकट्याने ते घडवून दाखवले. ही भारतीय प्रॉटेस्टंट समाजाची लाजिरवाणी कहाणी आहे. सिरियन मंडळीने ख्रिस्ताच्या चरणाशी बसून  सत्य टिकवण्याकरता तशी त्यांच्यासारखी धमक प्राप्त करून घेतली नाही.

मेंझिजच्या मते रोमच एकमेव सत्य चर्च होते. देवाकडे जाण्याची किल्ली त्यांच्याकडेच आहे अशी त्याची भावना होती. त्यासाठी मरणही पत्करण्याची त्याची तयारी होती. त्यांचे धर्मसिद्धांत व कामाची पद्धत कितीही चुकीची असली तरी मेंझिज प्रभावी निष्ठावंत होता. सिरियन चर्चमध्ये हा अभाव होता. एक ग्रंथकार या मंडळीविषयी म्हणतो, “दैवी विश्वास व कृपेचा काडीइतका पुरावा या मंडळीमध्ये दिसला नाही. शुभवर्तमान, आशा, विश्वास, प्रीती ही त्यांनी जतन केली नाहीत. त्यामुळे शुद्ध धर्मसिद्धांतांचे व आचार विचारांचे उच्चाटन झाले. ते आपला विश्वास जगत नव्हते तर रूढी परंपरा पाळत होते. म्हणूनच मेंझिजचा विजय झाला.”

त्याच्या विजयाचे परिणाम आजही टिकून असल्याचे आढळते. ते आपल्याला इशारा देतात. ऐक्याच्या नावाखाली कॅथोलिकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे ही तारण पावलेल्या विश्वासी जनांसाठी धोक्याची घंटा आहे. मेंझिसनंतर ५० वर्षांनी डच लोकांनी पोर्तुगिजांना भारतातून हाकून लावले. तेव्हा सिरियन लोकांनी बंड करून रोमच्या शृंखला तोडल्या व पुन्हा युरोपच्या ख्रिस्ती जगताशी पूर्ववत संबंध जोडला. पण निम्म्या लोकांना पश्चात्ताप झाला व रोमने पुन्हा त्यांना आपल्याकडे वळवून घेतले. सिरियन चर्चने त्या ५० वर्षात स्वीकारलेले कॅथॉलिक आचारविचार जतन करून ठेवले हे मात्र खरे आहे. आज कॅथॉलिकांची सात आकडी संख्या पाहून मेंझिजचा आवाज घुमत असल्याचा प्रत्यय येतो. एक माणूस किती प्रचंड काम करू शकतो एवढाच धडा सत्य सिद्धांतांचा पुरस्कार करणाऱ्या निष्ठावंत प्रॉटेस्टंट पुढाऱ्यांनी यातून घ्यायला हवा. प्रत्येक स्थानिक मंडळी शास्त्राभ्यास करून वचनात दृढ व्हायला हवी. म्हणून अनेक शास्त्राभ्यास गट सुरू व्हायला हवेत. अर्थात त्या वर्गांचे नेतृत्व करण्यास पुढारी तयार केले पाहिजेत. म्हणजे मंडळी जिवंत व खंबीर राहून खोट्या शिक्षणाला मुळीच थारा देणार नाही. सत्याचीच घोषणा करीत राहील. प्रभू आजही म्हणत आहे, “तू माझ्यावर सर्वोच्च प्रीती करतोस का? माझ्या कोकरांस चार… माझ्या मेंढरांस पाळ”

Previous Article

सिरियन चर्च आणि रोम

Next Article

रॉबर्ट डि नोबिली व त्याचे अनुयायी 

You might be interested in …

ख्रिस्तजयंती तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो…”

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” योहान ७:३८. येशूने असे म्हटले नाही की,जोमाझ्यावर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाचा अनुभव येईल. तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून त्याला जे काही […]

स्वर्गाचीउत्कट इच्छा

(५) (अ) पवित्र शास्त्रानुसार ‘सध्याच्या ‘स्वर्गाच्या ३ पातळ्या आहेत– पहिली वातावरणाची, दुसरी ग्रहमंडळाची व तिसरी ही अनंतकाळाची. मृत्यूनंतर- देवाने जिवंत असतांना त्याच्याकडे घेऊन जाण्यामुळे-‘विश्वासणारी व्यक्ती सरळ ‘तिसऱ्या पातळीच्या’ स्वर्गांत जाते व म्हणून आम्हीही सर्व विश्र्वासणारे […]