सोळावे शतक
प्रकरण ७
भारतातील ख्रिस्ती धर्म व युरोपातील ख्रिस्ती धर्म यात मूलभूत फरक आढळतो. परस्पर विरोधी मतांवरून युरोपातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये झगडे झाले तसे भारतात आढळत नाही. कारण भारतात पाश्चात्य मंडळ्यांचा एकच शत्रू होता व त्यांचे एकच उद्दिष्ट होते. ते साध्य करण्यासाठी त्यांनी सेवा केली. भारतात भिन्न वेळी व भिन्न स्थळी स्वतंत्रपणे संघर्ष झाले. हल्ले करणाऱ्यांशी त्यांची मते एक नसली तरी ते सर्व येशू ख्रिस्ताशी एकनिष्ठ होते. भारतातील रोमन चर्च व मलबारचे प्राचीन सिरियन चर्च यांच्यातील झगडा अपवादात्मक आहे.
मलबारचे ख्रिस्ती लोक बाबिलोनच्या धर्मगुरूला आपला प्रमुख अधिकारी मानत होते. लॅटीन चर्चचे रोमच्या पोपशी एकनिष्ठ असलेले अनुयायी भारतीय ख्रिस्ती लोकांवर आपला पगडा बसवायला आलेले आपण पाहिले. पण या दोन्ही गटांतील ख्रिस्ती लोकांना परस्परांच्या ऐतिहासिक बैठकीची कल्पना नव्हती. पोर्तुगीजांनी भारतात पाऊल टाकले तेव्हा मलबारमध्ये पुष्कळ सभासदांचे सुसंघटित प्राचीन चर्च असल्याची अंधुक कल्पना त्यांना आली. तर मलबारच्या ख्रिस्ती लोकांना हे गोरे लोक आपल्यासारखेच ख्रिस्ती असल्याचे पाहून मोठे नवल वाटले. वरवर काहीसे साम्य वाटले तरी परिचय वाढू लागताच रोमच्या विधींपेक्षा या सिरियन चर्चचे मार्ग वेगळे असल्याचे पाश्चात्यांना समजले. पण आपले मार्ग चुकीचे आहेत याची या रोमन कॅथोलिक पाश्चात्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे सिरियन चर्चमध्ये जे योग्य होते तेच चुकीचे समजून त्यांना आपल्या मार्गावर आणणे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी मानले. म्हणून त्यांच्यामधील तरुण मुलांना विद्यार्थी करून घेऊन त्यांना बाप्तिस्मा देऊन या सिरियन लोकांच्या त्यांच्या मते असलेल्या चुका दुरुस्त करून आपल्या मंडळीत सामील करून घेण्याच्या कमी त्यांचा वापर करण्याची त्यांनी योजना आखली. झेवियरने हे काम केले नाही. पण हे काम करण्याची अधिकारी वर्गाला त्याने कळकळीची आज्ञा देऊन ठेवली होती. हे काम जबरदस्तीने करण्यासारखे नव्हते. कारण हे लोक भारतीय होते. एका संस्थानिकाची प्रजा होते. त्या राजे लोकांची सहानुभुती गमावणे व्यापार व राजकारणाच्या दृष्टीने त्यांना परवडणारे नव्हते. आणि सिरियन ख्रिस्ती समाज काही मुठभर नव्हता. तेव्हा त्यांची संख्या दोन लाखांच्या घरात होती. ते समाजात प्रतिष्ठित लोक होते. संस्थानिकांनी त्यांना भरपूर स्वातंत्र्य दिले होते. आपल्या धर्म बांधवांना हे लोक राजनिष्ठा, नागरी व धर्मपालनासाठी जबाबदार धरीत. संस्थानिकही त्यांच्या धार्मिक व्यवस्थेत ढवळाढवळ करीत नव्हते. त्यामुळे रोमी लोकांना निराळी पध्दत वापरावी लागली. त्यापूर्वी सिरियन चर्चमध्ये त्यांना कोणत्या सुधारणा करायच्या होत्या ते पाहू.
या धोरणामुळे युरोपियन सुधारित मंडळ्यांची सहानुभुती सिरियन चर्चलाच मिळाली. नैतिकदृष्ट्या या लोकांच्या आचरणात नावे ठेवण्याजोगे चुकीचे काहीच नव्हते. कधीतरी एखाद्या वेडगळ रुढीकडे त्यांचा ओढा असल्याचे आढळून येई. त्यांच्या तुलनेत भारतातील पोर्तुगीजांचे आचरण रोमी लोकांना लाजविणारे होते. मग सिरियन ख्रिस्ती लोकांचा दोष काय होता? तर रोमी लोकांच्या मते सिरियनांची धर्मतत्त्वे दोषपूर्ण होती आणि त्यांचा व्यवहार शास्त्रोक्त नव्हता. खरे तर सिरियन चर्चचे सिद्धांत तर प्रासंगिक मूळ मंडळीने जपलेले असल्याचे पुरावे देणारे होते.
१. प्रभूभोजनाच्या वेळी भाकर व द्राक्षारसाचे प्रत्यक्ष ख्रिस्ताचे शरीर व रक्त यात रूपांतर होत असल्याचे रोमी लोक मानीत होते. त्याला सिरियन मंडळीचा विरोध होता. या विधीत ख्रिस्ताचे आध्यात्मिक सान्निध्य असते असे ते कृतज्ञपणे मानत होते. रोमी लोक भाकर द्राक्षारसात बुडवून देत. तसे सिरियन लोक करीत नव्हते.
२. सिरियन भक्तीत मरियेच्या भक्तीला स्थान नव्हते.
३. उपासनेत मूर्तीचा वापर करणे ते मुर्तिपूजाच मानीत.
४. पर्गेटरीचे तर त्यांनी नावही ऐकले नव्हते.
५. ते साधुसंतांच्या नावे प्रार्थना करत नव्हते.
६. प्रभुभोजनापूर्वी रोमी लोक पाळकाकडे येऊन पापकबुली देत ही गोष्ट तर सिरियनांना धक्कादायक होती.
७. बाप्तिस्मा, प्रभुभोजन व दीक्षा हे तीनच विधी सिरियन चर्च मानत होते. तर रोमी लोकांकडे सात विधी होते.
८. पोपला जगद्गुरू न मानता बाबिलोनच्या धर्मगुरूला आपला मुख्य अधिकारी मानणे हा रोमन कॅथोलिकांच्या दृष्टीने
मोठा अपराध होता.
हे सर्व अडथळे दूर केल्यास सर्वच सोपे होईल असे रोमी लोकांना वाटत होते. पण इराणच्या बाबिलोन येथील नेतृत्वाखाली वडिलोपार्जित चालत आलेल्या सिद्धांत व विधींना सिरियन चर्च अभिमानाने दृढ धरून होते. त्यामुळे रोमची कामगिरी बिकट बनली होती. ती त्यांनी तीन टप्प्यात पार पडली.
पहिला टप्पा
सिरियन चर्च अज्ञानाने या चुका करत असून आपलाच मार्ग श्रेष्ठ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, हा प्रभावी मार्ग होईल असे त्यांना वाटले म्हणून सिरियन तरुणांना रोमी पध्दतीचे पाळकीय शिक्षण देण्यासाठी १५४५ मध्ये त्यांच्या फ्रॅन्सिस्कन लोकांनी क्रांगानोर येथील ‘देवाचा थोर सेवक’ म्हणून कर्तबगार फादर व्हीन्सेंझची नेमणूक करून धर्मपीठ सुरू केले. तेथे त्या तरुणांना शिक्षण दिले. पण शिकून बाहेर पडलेल्या तरुणांचा १) सिरियन चर्चने एक शब्दही ऐकून घेतला नाही. २) त्यांना मंदिराची पायरी चढू दिली नाही. ३) त्यांच्या वाऱ्यालाही ते उभे राहात नव्हते. ४) त्यांची लॅटीन भाषा त्यांना मान्य नव्हती. सिरियन भाषेतील भक्ती त्यांना समजत नसली तरी तीच त्यांना देवभाषा म्हणून मान्य होती. ५) हे पाळक रोमी लोकांच्या पाळकांसारखा पोशाख करीत हे त्यांना रुचले नाही. फ्रान्सिसकरांचे हे मोठे अपयश होते.
याचा जेसुइट पंथीयांनी फायदा घेतला. आणि क्रांगानोरपासून दीड मैलांवर वैपिकोटा येथे १५८७ मध्ये त्यांनी आपले कॉलेज सुरू केले. त्यांनी पूर्वीच्या चुका टाळल्या. विद्यार्थ्यांना सिरियन भाषेत शिक्षण दिले. सिरियन चर्चने त्यांनाही थारा दिला नाही. त्यामुळे त्यांच्याही पदरी निराशाच पडली. उलट हे नवशिके पाळक आपल्या गुरुंशीच हुज्जत घालू लागले व आपले श्रेष्ठत्व त्यांना ऐकवू लागले. इराणच्या धर्म पुढाऱ्यांसाठी राजरोस प्रार्थना करू लागले. अखेर ही पद्धत रोमी लोकांना त्याज्य लेखावी लागली.
प्राचीन सिरियन चर्च मिळवण्याचा प्रयत्न – दुसरा टप्पा
हा टप्पा अत्यंत अप्रतिष्ठतेचा किंवा दुष्टतेचा होता कारण यात त्यांना सिरियन बिशपलाच पळवून न्यायचे होते. बाबिलोन व ह्या भारतीय मंडळीचे लोक यांना जोडणारा सजीव दुवा म्हणजे हा बिशप होय. फुटीर वृत्तीच्या पंथाच्या मूळ पीठाशी आपण एकनिष्ठ आहोत असे टाहो फोडून सांगणारा हा बिशप, मनापासून पाखंडी सिद्धांतांच्या विषाचा प्रसार करणारा हा बिशप असणार होता. रोमचा इंगा दाखवून या बिशपला पळवले की सिरियन लोक, त्यांची मंडळी हे सारे ताळ्यावर येतील. त्यासाठी त्याला पळवून नेल्यावर त्याला रोमी सिद्धांतांकडे वळवायचे, आपल्या पद्धतीप्रमाणे वागायला लावून त्यालाच परत भारतात पाठवून त्याच्याच हातून सिरियन लोकांना आपल्या कळपात घ्यायचे अशी ही कपटनीतीची विवेकभाव बाजूला ठेऊन आखलेली धाडसी योजना. एकामागून एक अनेक बिशपांवर हा प्रयोग केला गेला. त्यांची सत्त्वपरीक्षाच झाली. आणि या बिशपांनी जी नामुष्की व नालायकी दाखवली त्यामुळे त्यांना जे लाजिरवाणे वागवले गेले, त्याबद्दल त्यांची मुळीच कींव येत नाही. सर्व बिशपांच्या नावाला ‘मार’ हा आदरार्थी शब्द लावला जात असे हे पुढील वाचन करताना लक्षात ठेवा. कोणकोणत्या बिशपांवर हा प्रयोग झाला ते आता अभ्यासू.
१- मार योसेफ बिशप वर पहिला प्रयोग झाला. कोचीनच्या रोमी पाळकाशी तो स्नेहभावाने वागत असे. त्याचा फायदा उठवून अनुकूल परिणाम होण्याच्या आशेने प्रथम त्याच्यावर आरोप ठेवला गेला की ‘कुमारी मरियेला देवमाता संबोधू नये’ असे आपल्या हाताखालच्या तरुणांना याने शिकवले. कोचीन येथे पोर्तुगीज सैन्य असल्याचा फायदा घेऊन तेथे त्याला १५५६ मध्ये बेकायदा अटक केली. आणि चौकशीसाठी प्रथम त्याला गोव्याला व तेथून लागलीच पोर्तुगालला चौकशीसाठी पाठवले. तेथून ताबडतोब त्याला रोमला पोपकडे चौकशीसाठी पाठवावे अशी पोर्तुगीज वरिष्ठ अधिकाऱ्याला विनंती केली. पण मार योसेफला पोपपुढे पाठवण्याची गरजच पडली नाही. त्याने तेथे राणी व इतर अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केली. आणि आपल्या चर्चला सुधारून रोमच्या सत्तेखाली आणण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे त्याला लागलीच भारतात परत पाठवले. गोव्याच्या अधिकाऱ्याच्या इच्छेविरुद्ध त्याला मलबारच्या अधिकार पदाची सूत्रे मिळाली. त्याला इतका सहजासहजी झालेला पश्चात्ताप खरा वाटेना. कारण आपल्या देशाच्या किनाऱ्यावर पाउल पडताच आपण आता पोर्तुगालच्या क्षेत्रात नाही हे दिसताच रोमशी उद्धटपणे वागून त्याने आपल्या पूर्वीच्या कामाला सुरुवात केली. पण पुन्हा त्याच्याविरुद्ध कुटील कारस्थान रचून त्याला १५६७ मध्ये युक्तीने रोमला पाठवले. तेथे त्याच्यावर पाखंडीपणाचा आरोप केला गेला. तेथेच त्याचा अंत झाला. तो कसा झाला ते ठाऊक नाही.
२- मार योसेफ बिशपला हद्दपार केले तेव्हा बाबिलोनहून मार बिशप अब्राहामची त्याच्या जागी नेमणूक झाली होती. त्याच्याबाबत अशाच धोरणाची कपटनीती आखली गेली. जेव्हा मार योसेफ बिशप आपल्या धर्मप्रांतात परतला होता तेव्हा ह्या दोघांचे खटके उडून स्पर्धा लागली होती. रोमहून परतलेल्या बिशपने आपल्या स्वार्थापोटी आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध गोव्याच्या आर्चबिशपकडे तक्रार केली की याने आपल्या धर्मप्रांतात अनाधिकाराने प्रवेश केला आहे, शिवाय तो पाखंडी असल्याचाही त्याच्यावर आरोप केला. त्यामुळे १५५७ मध्ये मार अब्राहाम बिशपला अटक करून रोमला पाठवण्यात आले. युरोपच्या वाटेवर असताना हा बिशप कैदी असताही मोसाल येथे पळून गेला. तेथे बाबिलोनचे मूळ विद्यापीठ होते. तेथे त्याला अंगामालीचा मूळ बिशप असल्याचे शिफारस पत्र देण्यात आले. ते पत्र मिळताच आपणहून तो रोमची मंजुरी मिळवण्याच्या इराद्याने रोमला गेला. त्याला ती मंजुरी मिळाली. पण त्यासाठी रोमी शास्त्र प्रमाण असल्याची कबुली दिली व आपले पूर्वीचे मूळ सिद्धांत त्याज्य ठरवले. शिवाय बाबेलच्या अधिकाऱ्याशी येथून पुढे एकनिष्ठ राहाणार नसल्याचे वचन दिले. नव्याने दीक्षाही करून घेतली; आणि अंगामालीचा बिशप म्हणून मलबारला निघाला. तेथे गेल्यावर भारतीय मंडळीला पोपचे प्रभुत्व मानायला शिकवून त्यांच्या कळपात आणण्याचे वचनही दिले. पण भारतात पोहोंचताच आपण कट्टर सिरियन असल्याचे घोषित करून रोममध्ये त्याज्य ठरवलेले आपले मूळ सिद्धांतच पुन्हा शिकवायला सुरुवात केली. अशा प्रकारे या दोन्ही बिशपांनी रोममध्ये रोमी लोकांप्रमाणे तर मलबारमध्ये आपल्या लोकांप्रमाणे वागायचे लवचिक व चंचल वर्तन केले. मलबारमध्ये येताच मार अब्राहाम बिशपने आपण रोम मध्ये दिलेली सर्व वचने मोडली. अशी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पुढाऱ्याकडून लोकांची आत्मिक प्रगती कशी होणार? १५७९ मध्ये गोव्यात एका परिषदेस हजर राहून पुन्हा मार अब्राहाम बिशपने शपथपूर्वक बाबिलोनशी आपले संबंध तोडले आणि रोमचे आधिपत्य पत्करले. आपल्या धर्मप्रांतात तेथून परतल्यावर पोर्तुगीजांच्या भीतीने मोसलच्या धर्मपीठाच्या अधिकाऱ्याला खुलासादाखल पत्र पाठवले की मी गोव्याला गेलो होतो. तेथील परिषदेत आपल्या धर्मसिद्धांतांची प्रशंसा केली. आणि आपल्या प्रांतासाठी एक सहाय्यक बिशप पाठवण्याची विनंती केली.
३- त्याच्या विनंतीवरून मार सिमियन बिशप बाहेरून पाठवण्यात आला. त्यामुळे रोमला आपली कुटील नीती पार पाडण्याची आयती संधी मिळाली. आता या जुन्या व नव्या बिशपमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यावरील कारवाईप्रमाणे १५८६ मध्ये नवीन बिशप सिमियनला युक्तीने पोर्तुगालला पाठवले. ५व्या पोपने त्याची चौकशी केली. त्याची बिशपची वस्त्रे हिरावून घेऊन त्याचा अपमान केला. त्याच्याकडून त्याच्या चुका मान्य करून घेतल्या. १५९४ मध्ये त्याला तुरुंगात टाकले. तेथे त्याला अलिक्सो मेंझीज नावाच्या गोव्याच्या भावी बिशपच्या ताब्यात दिले. धर्मविचारणी सभेकडून त्याचा अंत झाला. सिमियनचा काटा काढल्याने मार अब्राहाम बिशपला आता गोव्याच्या रोमन कॅथोलिक अधिकाऱ्याची मनधरणी करण्याची गरज राहिली नाही. तो परत आपल्या मूळ चर्चला गेला. १५९७ मध्ये हा बहुरूपी बिशप मरण पावला. मरतेसमयी रोमचे नव्हे तर बाबिलोनचे, पर्यायाने आलेक्झान्द्रियाच्या मूळ मंडळीचे अधिपत्य मानण्याचा त्याचा निर्धार कायम होता. जेसुइट लोक तो अत्यवस्थ असता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मागू लागले. ती त्याने नाकारली. सिरियन बिशप म्हणून अंगामालीच्या मंदिराच्या आवारात त्याला दफन करण्यात आले. त्याच्या मरणानंतर प्राचीन सिरियन चर्च जिंकण्याचा रोमचा तिसरा टप्पा सुरू झाला. अशा मोक्याच्या वेळी डॉ. अॅलीक्सो डी मेंझीज हा बिशप गोव्यात आला.
Social