सितम्बर 9, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

रॉबर्ट डि नोबिली व त्याचे अनुयायी 

  १६०६ ते १७४१

प्रकरण ९

प्रास्ताविक

भारतीय मिशनांमध्ये या काळात अनेक दोष आढळतात. त्यात हमखास आढळणारा दोष म्हणजे भारतीय मंडळीपुढे  भारतीयांपुढे सादर केलेल्या ख्रिस्ती धर्माचे स्वरूप इतके पाश्चात्य होते की भारतीयांना ते स्वीकारणे शक्य नव्हते. यापूर्वी आरंभीच्या मंडळीचे ख्रिस्ती धर्मप्रणालीचे स्वरूप असे नव्हते.

खरे तर या मुद्द्याला तितकेसे महत्त्व देण्याचे कारण नाही. ही गोष्ट सोडून द्या आणि मूलभूत तत्त्वे जशीच्या तशी स्वीकारा व ख्रिस्ताला पौर्वात्य भाषाशैलीतून, विचारसरणीतून सादर करा, हे किती सोपे आहे बरे. मग भारतातील विरोध विरून जाईल. पौर्वात्य पूर्वग्रहांना धक्का न लावल्यास ख्रिस्ती धर्म प्रणाली झपाट्याने वाढेल. हे प्रत्यक्षात कसे उतरवायचे हा प्रश्न मिशन संस्थांमध्ये सतत असे. पण एकाही मिशन कार्यकर्त्याने तळमळीने हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केल्याचे सहसा आढळत नाही. पण जेसुइट मिशनने ५०० वर्षांपूर्वी यासाठी जोराचा प्रयत्न केला. त्याचे पुढारपण रॉबर्ट डि नोबिली कडे होते. त्याची चिकाटी व स्वार्थत्याग पाहून नवल वाटते. त्यावर आपण उहापोह करू.                              

रॉबर्ट डि नोबिली चा जन्म इटलीतील उच्च कुळात इ.स.१५७७ मध्ये झाला. तो दुसरा पोप मार्सेलस याच्या नात्यात होता. त्याचे शिक्षण जीजस सोसायटीत झाले. तेव्हाच त्याची विद्वत्ता, प्रचंड उत्साह आणि आवेश लक्षणीय होती. १६०६ मध्ये तो भारतात आला. तेव्हा मेंझीजची सिरियन ख्रिस्ती मंडळी कॅथोलिक विश्वासात वळवण्याची कामगिरी घडली होती. कॅथोलिक मंडळीमध्ये तेव्हा २ लाख लोक होते. तेव्हा पौर्वात्य पाळकांना मोठा हुरूप आला. हा केवळ भारतीय सिरियन ख्रिस्ती चर्चवर मिळवलेला विजय होता. प्रत्यक्षात डि नोबिलीला फार उत्तेजनकारक चित्र मुळीच  आढळले नाही. झेवियरने खूप काम करूनही नंतर आलेल्या अनेक मिशनऱ्यांच्या परिश्रमांना फारसे यश आलेले दिसत नाही. ब्राम्हणांनी अजून ख्रिस्ती विश्वास स्वीकारला नव्हता. चार वर्णातील लोकांमध्ये अलिप्तता होती. शेवटी त्यांचा नाद सोडून देऊन मिशनरींनी दलित व कनिष्ठ वर्गातील लोकांमध्येच अधिक काम केले.

डि नोबिलीची मदुरेस नेमणूक झाली. त्याला येथील परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागला. भारतीय संस्थानामध्ये काम करायला त्याला फार अडचणी आल्या. झेवियरला अशा अडचणी आल्या नव्हत्या. त्याला हिंदू धर्माचे विचार सिद्धांत व तत्त्वे यांचा गंधही नव्हता.     

डि नोबिली ला त्या स्पष्ट दिसल्या. त्यांच्या सामाजिक व धार्मिक आचार विचारांस कडवा विरोध करण्यासारख्या खूप गोष्टी त्याला आढळल्या. मदुरेत त्याला पोर्तुगीज सत्तेचा किंवा त्यांच्या  अधिकाऱ्यांचा पाठिंबा नव्हता. मदुरा हे हिंदू राज्याचे राजधानीचे शहर होते. तेथे पोर्तुगीजांना कोणी मानत नव्हते. उलट युरोपियनांप्रमाणेच पोर्तुगीजांचा ते फिरंगी म्हणून उपहास करीत असत. त्यामुळे मिशनरी डावपेचात बदल करण्याची त्याला गरज वाटली. मदुरा हे दक्षिण भारतातील हिंदूंचे आगर होते. हिंदू धर्मतत्त्वाचे ज्ञान संपादन करायला दहा हजार विद्यार्थी व शेकडो गुरू तेथे राहत होते. कोणाकडे एक दोन तर कोणाकडे तीनशे विद्यार्थी चार पाच वर्षे शिक्षण घेत असत. या गुरू शिष्यांच्या चरितार्थासाठी सढळ हाताने सरकारी खजिन्यातून देणग्या मिळत. अशा ठिकाणी घंटा वाजवून लोक जमा करण्यापेक्षा नाविन्यपूर्ण काहीतरी करावे असे झेवियरला वाटले. दोन प्रमुख गोष्टी होत्या. एक म्हणजे लोक जातपातीच्या बंधनात अडकले होते. दुसरे म्हणजे हिंदू धर्माचा हा अभेद्य किल्ला होता. तो सर करायला उघड विरोध पत्करून नव्हे तर युक्तीने व धीमेपणाने लढाई करायची होती असे त्याला स्पष्ट दिसत होते.

एका मिशनरीने सिंहगर्जना करून आपले काम सुरू करावे असे त्याला सुचवले. पण डि नोबिलीने आपले मत मांडत म्हटले, “उघड हल्ला करून आपण स्वत:साठी सर्व वेशीच बंद करून घेऊ. या मार्गाने लोकांचे तारण होणार नाही. फ्रांसिस्कन लोकांनी जुन्या पद्धतीने काम करून पाहिले पण व्यर्थ.” दलितांमध्ये जेसुईट लोकांनी थोडेफार काम सुरू केले होते, ते मदुरेतील ब्राम्हणांना माहीतही नव्हते. उच्चवर्णीय त्यांच्यात केव्हा लक्ष घालतील ते डि नोबिली ने हेरले. पोर्तुगीजांचे अमंगळ वर्तन, भ्रष्ट आचरण, दारूबाजी, गोमांस भक्षण यामुळे ब्राम्हण त्यांचा रागराग करीत. मग त्यांनी शिकवलेल्या धर्माकडे लक्ष देणे व तो स्वीकारणे तर दूरच राहिले. पौल सर्वांसाठी सर्व काही झाला होता. प्रभुदेव तर आपले अधिकार बाजूला ठेऊन मानवी देह धारण करून मनुष्याच्या तारणासाठी या जगात आला होता. याचा आधार घेऊन डि नोबिली ने महत्त्वाचा मिश्चय केला. तो असा – “मीही भारतीयांच्या तारणासाठी स्वत: भारतीयांसारखा होईन.”                         

म्हणून त्याने युरोपियनांची सर्व वैशिष्ट्ये सोडून देऊन ब्राम्हणांमध्ये ब्राम्हणासारखे वागायचे,  त्यांच्या पोटात शिरून त्यांचा विश्वास संपादन करायचा, मग खऱ्या विश्वासात आणून त्यांना बाप्तिस्मा द्यायचा व त्याना ख्रिस्ताचे अंकित करायचे, अशी योजना आखली. त्याचे हे धोरण धोक्याचे तर होतेच, पण देवाच्या तसेच  नैतिक दृष्टीने योग्य नव्हते. पण कठीण, नाविन्यपूर्ण व नवलाईचे नक्कीच होते. दलितांमध्ये त्यांच्यासारखे वागणे वेगळे; पण वेषांतर करून ब्राम्हण होणे वेगळे. शिवाय त्यांची भाषा अगदी चांगली यायला हवी, त्यांच्या धर्म ग्रंथांची माहिती हवी. त्यांचे आचार विचार सहज जगता यायला हवेत. तरी हे सर्व जाणूनही गोव्याच्या आर्च बिशपच्या परवानगीने त्याने या धाडसी प्रयोगाला सुरुवात केली.                                                     

एक दिवस मदुरेभर बातमी पसरली की, मदुरेची कीर्ती ऐकून एक तपस्वी आला आहे. त्याने ब्राम्हण वस्तीत मुक्काम ठोकला आहे. कुतूहलापोटी त्याच्याविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला लोकांची रीघ लागली. पण या ब्राम्हणाचे नोकर त्यांना आत सोडीनात. ते सांगत होते, “महाराज ध्यानस्थ बसले आहेत. त्यांना कोणी व्यत्यय आणू नये.” त्यामुळे लोकांची उत्कंठा अधिकच वाढली व संन्यासाची कीर्ती अधिकच पसरली. त्यानंतर बंधने थोडी शिथिल करून विशिष्ट अधिकारी वर्गाला त्याच्या दर्शनाची व त्याच्याशी बोलण्याची परवानगी मिळू लागली. ब्राम्हणांच्या आचारपद्धतीनुसार व्यासपीठावर मांडी घालून बसल्याप्रमाणे त्याचे दर्शन घडे. त्याच्या गळ्यात त्याच्या जातीचे निदर्शक यज्ञोपवीत होते, पण ते पाच पदरी होते. जान्हव्यापेक्षा ते वेगळे होते. त्र्येकत्वाचे दर्शक म्हणून सोन्याचे तीन पदर व प्रभूचा देह व आत्म्याचे दर्शक म्हणून दोन पदर असे पाच पदर होते. त्यालाच एक लहानसा क्रूस बांधला होता. त्यांच्या बोलण्यात विद्वत्ता व आचार विचारात शुद्धता दिसून येत होती. तो दिवसातून एकदाच दूध भात व कडू भाजीपाल्याचा आहार घेत असे. राजदारबारीही त्याला बोलावण्यात आले. पण एखादी स्त्री दृष्टीस पडून विटाळ होऊ नये ही सबब पुढे करून त्याने नकार दिला. त्यामुळे त्याच्या निर्मळ वर्तनाविषयी लोक प्रकर्षाने बोलू लागले. त्यामुळे अशा मनुष्याची शिकवण खरीच मानली पाहिजे अशी लोकांची खात्री पटावी म्हणून पुरावादाखल त्याने प्राचीनकाळचा एका जीर्ण ताडपत्रीवरचा लेख लोकांना दाखवला. त्या आधारे हे ‘रोमन ब्राम्हण’ प्रत्यक्ष ब्रम्हदेवापासून उतरले असून उत्पत्तीत सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ असल्याचे सांगितले. आणि लोक नि:शंकपणे त्याचे म्हणणे ऐकून घेऊ लागले.             

मग भराभर ग्रंथ लिहिण्याचा त्याने सपाटा लावला. वेद ईश्वरप्रणीत व प्रमाण आहेत असे सांगितले, पण त्यावर कळस म्हणून त्याने स्वत:च पाचवा वेद लिहिला. विशेष म्हणजे पुढे १५० वर्षांपर्यंत तो टिकून राहिला. लवकरच त्याला खूप शिष्य मिळाले. मोठ्या प्रमाणात बाप्तिस्मेही झाले. हिंदू धर्मातून आलेल्या या नव्या शिष्यांना त्याने हिंदू धर्मातील काही अत्यंत महत्त्वाच्या  सवलती दिल्या. जातीनिर्बंध पाळण्याची त्याना मुभा दिली. ते शेंडी ठेवत, भस्म लावत, चंदनाचे पट्टे ओढत. डि नोबिलीचे मत होते की ख्रिस्ती धर्म पत्करल्यावर जात, उच्च कूळ, आचार सोडलेच पाहिजेत असे नाही. त्यामुळे त्याला खूप शिष्य मिळाले.

देवाच्या वचनानुसार त्याची संपूर्ण पद्धत व मते चुकीची, मानवी ज्ञानाची होती. प्रे कृ १७:१६-३४ मध्ये पौलाने विद्वान मुर्तिपूजकांना व तत्ववेत्त्यांना अथेंसमध्ये ख्रिस्त कसा सादर केला हे पहाता डि नोबिली संपूर्ण कृती स्पष्टपणे वचनबाह्य असल्याचे सिद्ध होते. त्याने थेट निर्माणकर्त्या देवाकडे त्यांची दृष्टी वळवली व तो त्यांचा एकच देव असल्याचे दाखवून दिल्यावर तोच देव येशू त्यांचा तारणारा असल्याचे सिद्ध केले. सरळ, सोपी, खरी सुवार्ता. मग प्रतिसाद त्यांच्यावर सोडायचा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकदा ख्रिस्ताला स्वीकारले की मागच्या धर्म विश्वासाची कोणतीच गाठोडी सोबत घ्यायची नाहीत, याविषयी प्रे.कृ. १५ मध्ये आरंभीच्या मंडळीने संपूर्ण सार्वत्रिक मंडळीसाठी ठरावाच केला आणि तो सर्व मंडळ्याना पाठवायची तजवीज केली. त्यात विदेश्यांनी त्यांच्या रूढी यहुद्यांवर व यहुद्यांनी नियमशास्त्राचे नियम विदेश्यांवर लादायचे नाही हा पुढील सर्व मंडळ्यासाठी करार झाला.      

डि नोबिली देवाची ही चौकट कशी काय मोडू शकतो? म्हणूनच अशा प्रकारच्या सुवार्ताप्रचाराचे काय झाले हे पाहाणे महत्त्वाचे आहे.             

त्याने कितीही कल्पकता व चलाखी दाखवली, त्याची लोकप्रियताही वाढली तरी त्याला विरोध झालाच. काही ब्राम्हण उघडपणे तर काही अप्रत्यक्षपणे विरोध करीत. वादविवादात तो नेहमी विजयी होई. मग तो विरोधकांना भेट देत असे. मुलकी अधिकाऱ्याना नजराणे पाठवून तो खुष ठेवी. बाप्तिस्मा घेतलेल्यांना तर मोठीच अडचण आली. त्यांचा सामाजिक दर्जा काय? ना इकडचा ना तिकडचा अशी त्यांची अवस्था झाली. त्यांचा हा मोठा प्रश्न भेडसावू लागला. दलितांमध्ये फादर फर्नांडीस काम करत होता. त्यांची काळजी घेत होता. १६१० मध्ये तेथून आलेल्या दलित ख्रिस्ती व्यक्तींच्या वक्तव्याने तो हादरलाच. “बाप्तिस्मा घेतलेले मूळ जातीला मुकले आहेत व ते दलित व फिरंगी झाले आहेत. आणि हा डि नोबिली फिरंगीच आहे.” असे त्याने जाहीर करताच फारच गोंधळ उडाला. तेव्हा डि नोबिलीने शपथवार खोटे सांगितले की, “मी फिरंगी नाही. त्यांच्या देशात माझा जन्मही झाला नाही. मी रोममध्ये जन्मलो. उच्च कुलीन आहे. मी खोटे बोलत असेन तर देव मला नरकात टाकील. मी सांगतो तो सिद्धांत या देशातील साधुसंत पूर्वीपासून सांगत आले आहेत. देव सर्व जमातींचा स्वामी आहे. त्याचा हा सिद्धांत सर्वांनीच पाळला पाहिजे.” असे बोलून त्याने  हे वादळ शमवले. पण त्यामुळे त्याचे व त्याच्या धर्मगुरूंचे जुंपले. त्यांच्या लक्षात आले की डि नोबिलीची पद्धत विलक्षण व अपूर्व आहे. पवित्र ख्रिस्ती नावाखाली विधर्मी लोकांमध्ये ख्रिस्ती धर्म व मूर्तिपूजा यांची खिचडी वाढत आहे. या प्रकाराबद्दल फर्नांडिसने जेसुइटच्या मलबार मधील अधिकाऱ्याला तक्रार केली. डि नोबिली ला ताबडतोब त्याचे विधी सशास्त्र असल्याचे सिद्ध करण्यास पाचारण करण्यात आले. हा वाद १० वर्षे चालला.                                              

त्यामुळे त्याच्या नित्याच्या कामात खंड पडू लागला. मदुरा – कोचीन – गोवा – रोम अशा चौकशीमुळे त्याच्या फेऱ्या वाढल्या. अखेर १५ वा पोप ग्रेगरीने हा मिशनरी व त्याची पद्धत निर्दोष ठरवली. पोपने एक आज्ञापत्र काढून त्याच्या शिष्यांना गंध लावण्याच्या व शुचिर्भूत करायच्या वस्तूंवर पाळकांनी आशीर्वाद दिल्यावर त्यांचा उपयोग करण्याचा अधिकार व परवानगी दिली. भलतीच मोठी किंमत भरून हा विजय डि नोबिलीने मिळवला. पण ब्राम्हणांना ख्रिस्ती धर्मात आणण्याचा त्याचा मार्ग खुंटला. शिवाय गोव्याच्या आर्च बिशपशी त्याचा संबंध असल्याचे उघड झाले. त्यामुळे लोक त्याचे भाषण ऐकून घेईनात. पण मदुरा पद्धतीला पोपचा पाठींबा असल्याने त्याला हिम्मत आली. रोमन चर्चचे स्थानिक अधिकारी आपल्याला विरोध करतील ही भीती त्याला उरली नाही. अत्यंत उच्च वर्णीय लोक आपल्या आटोक्याबाहेरचे आहेत, पण इतर जातींचे भरपूर लोक या अवाढव्य देशात आहेत. त्यांना आपल्या धर्मात आणण्याची तो आशा बाळगू लागला.

१६२४ पासून डि नोबिलीच्या कामाचे दुसरे पर्व सुरू झाले. आता संन्याशाचा पेशा सोडून त्याने भगवी वस्त्रे, फेटा, पायात खडावा, असा यात्रेकरूचा पेहराव केला. हातात दंड घेऊन देशभर यात्रेकरूचा प्रवास सुरू केला. तो तडजोडीची भेसळ सुवार्ता सांगत असे. वर्षांमागून वर्षे त्याची ही यात्रा चालली. त्याचे खूप हाल झाले. पण अनेक ठिकाणी रोमन ब्राम्हण नजरेस पडू लागले. खूप लोक बाप्तिस्मा घेऊ लागले. त्याला कनिष्ठ व इतर जातीचे हजारो अनुयायी मिळाले. कारण ख्रिस्ती झाल्यावर ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे त्यांना फारसा त्याग करावा लागत नसे. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणे म्हणजे हिंदू धर्मात उच्च स्थान मिळवणे किंवा नव्या जातीत जाणे एवढाच अर्थ होता. पूर्वीच्या आचारविचारात कोणी फारशी ढवळाढवळ करीत नसे. केवळ देव दैवतांची नावे बदलली होती.                                                             

अशा प्रकारे त्याने ४२ वर्षे काम केले. मानहानी स्वीकारली. त्याग व कष्ट केले. त्याचे शरीर खंगले. दृष्टी मंद झाली. तो सिलोनला गेला. पण भारताच्या आठवणीने तेथे त्याचे मन रमेना. तो परत भारतात मैलापूरला आला. तेथे त्याचे डोळे गेले. एका झोपडीत त्याने काही वर्षे काढली. पण ग्रंथ लिहिणे, जपजाप्य, उपासतापास असे खडतर जीवन चालूच होते. चार ब्राम्हण त्याची सेवा करीत. वयाच्या ८० व्या वर्षी १६ फेब्रुवारी १६५६ मध्ये त्याचा अंत झाला. त्याच्यामुळे सुमारे एक लाख लोक ख्रिस्ती झाले होते. जरी त्याच्या अंगी धर्मवीराचे गुण दिसत असले तरी त्याची कींव करावीशी वाटते. कारण त्याने प्रेषितांनी गाजवलेली मुलभूत निर्भेळ सुवार्ता सांगितली नाही. आणि देवाचे काम देवाच्या मार्गाने त्याच्याकडून झाले नाही.

त्याच्यामागून त्याचे काम त्याच पद्धतीने जेसुइटांनी सुरू ठेवले. डि नोबिली च्या व झेवियरच्या अनेक कथा ऐकून अनेक रोमी तरुणांना भारताचे आकर्षण वाटून त्यांना मिशनरी होण्याची तळमळ लागली. असाच त्याच्यानंतर आलेला पुढचा मिशनरी जॉन दिब्रिटो होय. पण आजच्या मंडळीला डि नोबिलीकडून आपला न्यायी देव इशारा देत आहे की, आपण मंडळीसाठी जे काही काम परिश्रमपूर्वक करत आहोत, शिक्षण देत आहोत ते बायबल आधारित व देवाने आखून दिलेल्या प्रेषितीय शिकवणीप्रमाणे आहे का? आणि तुमच्या लक्षात आले की आपण चुकत आहोत, तर वेळीच देवाच्या चाकोरीच्या अधीन व्हा व पश्चातापपूर्वक नव्याने सुरुवात करा. कारण शेवटी आपल्याला देवासमोर उभे राहून आपल्या सर्व कामाचा हिशोब द्यायचा आहे. तेव्हा त्याच्या न्यायाच्या अग्निपुढे तुमचे काम सोन्याने, चांदीने, मौल्यवान पाषाणांनी, दगडांनी केले असेल तर टिकेल पण भुसा, लाकूड इ.नी केले असेल तर जळून जाईल.

१ करिंथ ३:१०-१५ वाचा.

Previous Article

डॉ. ॲलिक्सो डी मेंझिज

Next Article

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग 

You might be interested in …

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

स्कॉट हबर्ड ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फक्त बायबल वाचण्यातच रस नसतो. जे वाचतो ते आपल्याला भावले जावे, त्याने आपल्याला प्रेरणा द्यावी व आपल्याला बदलून टाकावे अशी आपली इच्छा असते. आपण लवकर उठून शास्त्रलेखांच्या पानावरून केवळ […]

कठीण काळामध्ये वधस्तंभाचा दिलासा

स्टीफन विल्यम्स “ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या […]

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

मार्शल सीगल आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूची किंमत आपण कमी करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे […]