दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ

(१७२६ ते १७९७)

लेखांक १३

राजदरबारी ख्रिस्ताचा सेवक श्वार्टझ्

नित्याचे सुवार्ताकार्य करत असतानाच ब्रिटिशांचा वकील म्हणून दूतावासाची कामगिरी हाती घेण्याची गव्हर्नरची विनंती श्वार्ट्झने स्वीकारल्याचे आपण पाहिले. त्यासाठी आपल्याला सरकारने वारंवार केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने प्रवासखर्चाखेरीज कसलाही नजराणा अगर मदत स्वीकारली नाही. हैदरने तर त्याला फार सन्मानाची वागणूक दिली. त्याला कोठेही उपदेश करण्याची परवानगी दिली. हैदरची बुद्धिमत्ता, कडक शिस्त व व्यवहारचातुर्याचे श्वार्टझने कौतुक केले. सलोखा व शांततेसाठी त्याने हैदरशी बोलणे केले. पण हैदरचे मन युद्धाच्या मुद्यावर ठाम असल्याचे त्याला दिसून आले. तेव्हा झाला प्रकार त्याने मद्रास सरकारला कळवला व तंजावर गाठले. लढाईच्या काळात ख्रिस्ती समाजाला व इतरांनाही अन्नपाण्याची टंचाई होऊ शकते या हिशेबाने त्याने १२ हजार गोण्या तांदूळ भरून ठेवला. पुढच्याच वर्षी हैदरने हल्ला केला. मद्रास व तंजावर त्याने हस्तगत केले. अन्न दुर्मिळ केले. श्वार्टझला मात्र त्या काळात कुठेही वावरण्याची मुभा देण्यात आली होती. हैदरने हुकूम सोडला होता की, “आदरणीय श्वार्ट्झ पाळकाला वाटेत कोणीही उपद्रव करू नये. त्याला बोटही लावू नये. त्याला मान द्यावा. त्याच्याशी दयाळूपणे वागावे, कारण तो साधुपुरूष आहे. माझ्या राज्याचे नुकसान करावे असे त्याच्या मनातही येणार नाही.” त्यामुळे एकही शिपाई त्याला हात लावायलाही धजला नाही. लढाईदरम्यान हैदर मरण पावला. टिपू सुलतानने लढाई पुढे चालू ठेवली. पण आपल्याला हा वृत्तांत किती आव्हान देतो. आपली साक्ष उच्च अधिकाऱ्यांमध्ये, राजदरबारीही कशी खणखणीत असावी. 

त्याचे परिणाम किती प्रभावी असतात. तसेच या लढाईत झाले. तंजावरच्या किल्ल्यात शत्रू जवळ येऊन ठेपल्याने मोठी आणीबाणी ओढवली. किल्ल्यात पुष्कळ लोक राहत होते. पलटणीपुरतेही तेथे धान्य नव्हते. देशात खूप धान्य होते. पण किल्ल्यात ते धान्य पोहंचवण्यासाठी बैल नव्हते. कारण धान्य वाहतुक करणाऱ्यांना वाटेतच बैलांसह लुबाडले जायचे. त्यामुळे लोकांनी आपले बैल रानात सोडले होते आणि ते धान्य पोहंचवायला मदत करत नव्हते. तुळाजी राजाचे आदेशही लोक पाळत नव्हते. शेवटी लोकांची मने वळवण्याची जबाबदारी राजाने श्वार्टझवर सोपवली. तसा करार करायला राजाने कोरा कागदच पाठवला. कारण उपासमारीने लोकांची गल्लीबोळांत प्रेते पडलेली दिसत होती. श्वार्टझने लोकांना खेडोपाडी कळवले की शत्रुंनी कोणाचाही बैल नेला तर त्याची भरपाई मी करीन. दोनच दिवसात हजार बैल गोळा करण्यात आले. मग खेडोपाडी श्वार्टझने ख्रिस्ती पाळक व सुवार्तिकांना बैल घेऊन धान्य गोळा करायला पाठवले. अशा प्रकारे ८० मण धान्य किल्ल्यात धाडून त्याने किल्ला वाचवला.

पण या सर्व काळातील कटू अनुभवांमुळे तुळाजीराजा खिन्न झाला. आणि बाबा नावाच्या ब्राम्हण दिवाणाच्या नादी लागून तो खूप जुलूम करू लागला. त्यामुळे हवालदिल झालेले लोक प्रांत सोडून स्थलांतरित होऊ लागले. श्वार्टझने मनोमन राजाला विनवूनही काही फायदा झाला नाही. शेवटी मद्रास सरकारने त्या दिवाणाला बडतर्फ केले व त्याच्या जागी राज्यकारभारावर देखरेख करण्यासाठी तीन ब्रिटिशांचे सल्लागार मंडळ नेमले. त्या मंडळावर गव्हर्नरने श्वार्टझची नेमणूक केली. शांती समाधान नांदण्यासाठी श्वार्टझच्या हाती सूत्रे दिल्यास देशाचे व राज्याचे हित होईल अशी गव्हर्नरची खात्री होती. देवाच्या सार्वभौमत्वाने मिसरात योसेफाचा व पुढे बाबेलमध्ये दानीएलाचा विदेशी राजांनी कसा उपयोग करून त्यांना उच्चपदी नेमले होते याची आपल्याला येथे आठवण होते. एका नम्र मिशनरीचा हा फार मोठा सन्मान होता. त्या पदावर तो आपले मिशन कार्य सांभाळून सेवा करत होता. त्याचे कार्य यामुळे दूरवर पसरले. दक्षिणेकडील तिनुवेल्ली जिल्ह्यात ते खूप वाढले. 

१७७८ मध्ये श्वार्टझ् तिनुवेल्ली जिल्ह्यातील पलमकोट्टा येथे गेला. पूर्वीपासून तेथे कार्यरत असलेले स्थानिक ख्रिस्ती शिपाई व क्लारिंदा नावाची बाप्तिस्मा घेतलेली ब्राम्हण विधवा यांच्या मदतीने तेथे मंदिर बांधले. प्रश्नोत्तर रूपाने शिकवणारे दोन शिक्षक व एक शाळामास्तर तेथे नेमला. त्यामुळे तेथील ख्रिस्ती सभासद संख्या २० वरून १६० वर गेली. १७८५ मध्ये तेथे त्याने दुसरी भेट दिली तेव्हा तेथे उत्तम कार्य करणारा सुवार्तिक नेमला. त्यामुळे तेथील काम वाढले. मद्रासचे दुभाष्ये व मॅनेजर्सनी लोकांवर जुलूम  केल्याने लोकांनी देशांतर केले होते. त्यामुळे शेतीची कामे बंद पडली होती. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची भयानता जाणून लोकांना परत आणण्याचे कोणाचेच प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पण श्वार्टझने राजाच्या वतीने चांगली वागणूक मिळण्याविषयी हमी दिली आणि सर्व लोकांना राज्यात परत आणले. झटपटीने त्यांच्याकडून लागवडीची कामे करून घेतली. लोकांनी उत्तम प्रकारे काम करण्याची त्याला हमी दिली. रात्रन् दिवस खपून शेतीची कामे त्यांनी पूर्ण केली आणि त्या वर्षी सर्वाधिक उत्तम पीक उत्पादन झाले. ख्रिस्ती लोक व मिशनरी ख्रिस्ती धर्मविश्वासाचे खरे स्वरूप सुवार्तेद्वारे सांगत व तसेच जीवन जगून दाखवत.

त्यामुळे देशाचा कसा फायदा होतो हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले, लोकांना वचनाचे शिक्षण दिल्यानेच लोकांचे मन देवाकडे वळते व ते सन्मार्गाने चालू लागतात; हे श्वार्टझने सिद्ध करून दाखवले व आपल्या आधुनिक काळासाठी आपल्याला महान कित्ता घालून दिला. विधर्मीयांना व मूर्तिपूजकांना देवाची पुरती खरी ओळख नसल्याने त्यांच्याकडून उत्तम वर्तनाची अपेक्षा ठेवणे चूक असल्याचेही त्याने दाखवून दिले.

श्वार्टझ् कालवश 

वृद्ध होईपर्यंत श्वार्टझने पिता, पाळक व मिशनरी अशा तीन स्वरूपात सेवा केली. सर्व लोक सन्मानाने त्याच्यावर प्रेम करून त्याचा आदर करीत. आयुष्याचे शेवटचे दोन चार महिने सोडल्यास वयाची ७१ वर्षे पूर्ण होईपर्यंत देवाच्या कृपेने त्याने नेटाने काम केले. १७९७ च्या ॲाक्टोबरात त्याने अंथरूण धरले. १३ फेब्रुवारी १७९८ रोजी आपल्या सहकाऱ्यांस व मित्रपरिवारास कडक बोध केला. सर्वांनी मिळून उपासना संगीतातून त्याचे आवडते गीत गाईले. “मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे सत्य देवा, तू माझे तारण केलेस.” असे म्हणून तो प्रभूच्या बाहूत विसावला. त्याच्या मृत्यूने राजेरजवाडे, शेतकरी, सैनिक, नागरिक, ख्रिस्ती, ख्रिस्तीतर असे सर्व जातीचे, वंशांचे, वर्गांचे, दर्जांचे लोक हळहळले व त्यांनी मोठा शोक केला. उच्चवर्णीय राजा सर्फोजीही त्याच्या प्रेतयात्रेबरोबर कबरस्तानात गेला. कबरेवरील शिलालेखावर राजाचे प्रशंसोद्गार कोरले आहेत –

“तुम्ही सुज्ञ, विनयशील, प्रांजळ, प्रामाणिक होता. आत एक, बाहेर आत एक, बाहेर एक असे नव्हे तर तुमचे मन निर्मळ होते. तुमचा निर्धार दांडगा, तुम्ही अनाथांचा पिता, विधवांचा आधार, पालनकर्ता, कोणाचेही समाधान प्राप्तीचे स्थान. पतितांचा प्रकाशदाता, स्वत:च्या उत्तम आचरणाने सन्मार्ग दाखवणारे, माझे व मित्रांचे, तुम्ही वरदानच आहात. बाबा, तुमचे नाम राखण्याची क्षमता माझ्या अंगी येवो, हीच या सर्फोजीची प्रार्थना.”

मद्रासमधील एका स्मारकावरील शिलालेखात म्हटले आहे:  “श्वार्टझचे आयुष्य म्हणजे आपल्या धन्यवादित प्रभूचे उदाहरण डोळ्यापुढे ठेऊन कित्ता गिरवण्याचा एक प्रदीर्घ प्रयत्न… पन्नास वर्षे तो लोकांचे भलेच करीत हिंडला.”

खरेच, लोकांचे अंत:करण प्रभूकडे लावायला, वश करायला, साधा चांगुलपणा किती कारणीभूत होऊ शकतो हेच श्वार्टझचे चारित्र्य दाखवून देते. कशासाठी हवेत सत्ता, पैसा, पद, मानमरातबासाठी हेवेदावे आणि कुरघोडीचे राजकारण? श्वार्टझ् जसा राजाच्या महालात जाई, तसाच गरीबाच्या झोपडीतही जाई. सर्वांसाठी हा भला माणूस सर्वांना वाचून समजेल असे देवाचे चालते बोलते पत्रच होता. येथे त्याने ६००० लोकांना बाप्तिस्मा दिला. पुढे त्याच्या मिशनकार्याला ‘कोस्टल मिशन’ असे नाव पडले. 

१८ व्या शतकात सुमारे ५० मिशनरी युरोपने पाठवले. त्यांचे कार्य वाढतच गेले. या शतकात सुमारे ४० हजार बाप्तिस्मे झाले. पण १९व्या शतकात मात्र मिशनकार्याच्या ऱ्हासाला झपाट्याने सुरुवात झाली. 

याचे पहिले कारण, युरोपखंडातील मंडळ्यांचा आत्मिक ऱ्हास झाला होता.

दुसरे कारण, आपल्या स्वदेशी मंडळीने केलेल्या चुकांमुळे डॅनिश मिशनची गळचेपी झाली. १७ व्या शतकाच्या अखेरीस बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीच प्रमाण मानण्याची विचारसरणी जर्मनी व डेन्मार्कमध्ये सुरू झाली. त्यामुळे पूर्वीची मिशनरी वृत्ती लोप पावू लागली. आता हॅलेचे विद्यापीठ मिशनरींचे माहेरघर राहिले नाही. मिशन सेवसाठी स्वयंसेवक मिळेनासे झाले होते. भारतात मिशनरींच्या जागा रिक्त राहू लागल्या. मिशनरी म्हणून येणारे लोक नामधारी ख्रिस्ती असायचे. १८२४ मध्ये तर सुवार्ताप्रसार व ख्रिस्ती शिक्षण हे ध्येय न राहाता फक्त शाळा काढून शिक्षण देणे फायद्याचे आहे, असे मानले जाऊ लागले. हेच धोरण ख्रिस्ती धर्मप्रसाराचा मार्ग म्हणून स्वीकारले गेले. ख्रिस्ताच्या मत्तय २८: १९-२० मधील महाआज्ञेत त्यांनी भयानक बदल केला. देवाने प्रगट केलेल्या ज्ञानाच्या आधारावर झिगेन्बाल्गने तयार केलेल्या प्रश्नोत्तरावलीची जागा आता निसर्गनियमांवर केलेल्या प्रश्नोत्तरावलीने घेतली. मिशनरींचे संदेशही प्रभावी नसायचे. पूर्वीच्या मिशनरींनी समाज संघटित केला होता. पण त्यांची काळजी वाहण्याचे काम स्थानिक सुवार्तिकांवर व मूठभर दीक्षित पाळकांवर सोपवले होते. त्यामुळे मिशन कार्याला उतरती कळा लागली. फक्त श्वार्टझच्या क्षेत्रात त्याच्या मृत्युसमयी वीस हजार ख्रिस्ती होते. पुढे ५० वर्षांनी ती संख्या पाच हजारावर आली. स्थानिक मंडळीतील सदोष कारभार व अनिष्ट परंपरा ही त्यामागची कारणे होती.

श्वार्टझच्या काळातही जातिभेदाला मान्यता होती. केवळ उपासनेसंबंधात नव्हे तर इतर व्यवहारातही हे भेद दर्शवले जात होते. ही गोष्टही मिशन कार्याच्या ऱ्हासाला कारण झाली. जर त्याच्या मागून येणाऱ्या मिशनऱ्यांची वृत्ती श्वार्टझ सारखीच असती, त्यांनी सावधगिरीने सेवा केली असती, लोकांशी ते दयेने, सचोटीने वागले असते, तर असा ऱ्हास झाला नसता. हे मिशन सतत युरोपियन मंडळीच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करायचे. म्हणून मंडळीत विषारी बीजे रुजली गेली. श्वार्टझच्या लक्षात ही गोष्ट आली होती. ही कटू फळे येऊ नयेत म्हणून तो जपत असे. श्वार्टझनंतर त्याचा मानसपुत्र कोहलॅाफने त्याच्या मिशनवृत्तीने काम केले. पण त्याच्या नंतरचे लोक ढिलाईेने वागले. मंडळीत हळूहळू फुटी पडल्या. बंधुभाव लोप पावला. प्रभूची चित्तवृत्ती नष्ट झाली.

पुढे दुसऱ्या ब्रिटिश व अमेरिकन संस्थांनी मिशनकार्य हाती घेईपर्यंत या अनिष्ट परिस्थितीतून यांचे डोके वर निघाले नाही. जेव्हा त्यांनी आपल्या आधीच्या मिशनकार्याकडून बोध घेऊन, कोणत्याही परिस्थितीत जातिभेदाला मान्यता देणे नाकारले, तेव्हाच मिशन कार्याने डोके वर काढले. श्वार्टझमुळे युरोपियनांमध्ये भारतीय मिशन कार्याविषयी कायमची आस्था स्थापित झाली. पुष्कळ भारतीय भूमिपुत्रांना ख्रिस्ती सामर्थ्याने आशेचा व प्रकाशाचा किरण दाखवला. भावी काळातील मंडळीचा मार्ग सुकर करून प्रगतीपथावर आणण्यासाठी त्याने मोलाची कामगिरी केली. त्यामुळे ख्रिस्ती धर्मविश्वासाला भारतात भक्कम स्थान प्राप्त करता आले.

    
 

ReplyForward Add reaction
Previous Article

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

Next Article

 विल्यम केरी

You might be interested in …

देवाची सुज्ञता लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“अहाहा ! देवाचे ज्ञान व विद्या यांची संपत्ती किती अगाध! त्याचे न्याय किती अतर्क्य आणि त्याचे मार्ग किती अगम्य! (रोम ११:३३). अचानक कोळशाची खाण खचली आणि गावातील मुले मरण पावली तर देवाने किती मोठी चूक […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

  एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १२ कोणाला भ्यावे […]

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स लेखांक ४ ठासून केलेल्या विरोधातून प्रॉटेस्टंट व सुवार्तावादी चळवळींचा जन्म रोमन कॅथॉलिकवादाच्या कित्येक शतकांपासूनच्या जुनाट शृंखला तोडून त्यांचा विध्वंस करून अगदी पूर्ण नवीन मतप्रणालीची सुरुवात झाल्याचे पाहून तुमच्या मनात खोल प्रतिक्रिया उमटलीच पाहिजे. […]