दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 विल्यम केरी

(१७६१- १८३४)

लेखांक १४                                      
 

आतापर्यंत आपण जर्मन व डॅनिश मिशनरी पाहिले. डॅनिश मिशनचा अस्त झाल्यावर इंग्लंडने भारतात जे मिशनरी पाठवले, त्यातील हा पहिला मिशनरी. १६०० मध्ये भारतात ब्रिटिश कंपनी आली. व्यापारात उत्तम जम बसूनही भारतात मिशनरी पाठवण्यास त्यांनी खूप विलंब लावला. मधल्या २०० वर्षांत त्यांचे सैनिक, खलाशी, नागरिक, व्यापारी, धंदेवाईक व सहकारी लोकांचीच भारतात रीघ लागलेली आढळते, पण मिशनरी आल्याचे आढळत नाही. डॅनिश मिशनरींना त्यांनी अल्पशी मदत केली होती, इतकेच. पण मिशनरी मनुष्यबळ पाठवले नाही. 

यावरून (१) ब्रिटिश मंडळी मिशन कार्याबाबत मृतवत् होती. (२) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीने मिशन संस्था स्थापण्यास विरोध केला. (३) भारतीय मंडळ्याही ख्रिस्तीतरांच्या तारणाबाबत उदासीन होत्या. त्यामुळे त्यांनी भारतीय मंडळ्यांना जागे करणारा व ख्रिस्तीतरांच्या तारणाचे ओझे असणारा मिशनरी पाठवणे आवश्यक होते. मनुष्यापेक्षा देवाची निवड कशी असते याचे १ करिंथ १: २७ नुसार देवाने प्रमाण पटवून दिल्याचे आपण पाहणार आहोत. “ज्ञान्यांस लाजवावे म्हणून जगातील जे मूर्खपणाचे व बलवानांस लाजवावे म्हणून जगातील दुर्बल ते त्याने निवडले.”

एका खेड्यात उदरनिर्वाहासाठी चांभाराचा धंदा करून छोट्याशा मंडळीचे पाळकपण करणाऱ्या नम्र विल्यम केरीला देवाने निवडले. त्याला कुशाग्र बुद्धिमत्ता व आध्यात्मिक दाने देवाने दिली. त्याचा जन्म १७६१ मध्ये नॅार्दनटनशायर मधील पाल्सपरी नावाच्या गावात झाला. अत्यंत गरीबीमुळे १४ व्या वर्षी एका चांभाराकडे तो काम शिकू लागला. त्याला चर्च ॲाफ इंग्लंडचा फार अभिमान होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्याच्या जीवनात मोठी क्रांती घडून आली. आपल्या विचारसरणीशी जुळणाऱ्या बॅप्टिस्ट पंथाचा तो अनुयायी झाला व त्याच चर्चशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिला. या चर्मकाराद्वारे मिशनकार्यासाठी अनेक कुशाग्र बुद्धीचे, विचारवंत, कल्पक, वादविवादपटू मिशनरी मंडळीला मिळाले आहेत. वहाणा तयार करताना केरीने लॅटिन, ग्रीक व हिब्रू या तीन भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादन केले.

याचा पुढे आपल्या जीवनात देव का व कसा उपयोग करून घेईल याची त्याला तेव्हा कल्पनाही नसेल. आपण केलेले कोणतेही कष्ट निरुपयोगी व निष्फळ ठरत नाहीत देव त्याचा उपयोग कधीकाळी त्याच्या योजनेसाठी करून घेत असतो, हा देवाच्या लोकांचा अनुभव आहे.

रविवारी जोडे बांधायचे काम बंद ठेवून तो मंदिरात उपदेश करीत असे. १७८३ मध्ये दीक्षा घेतल्यावर तो बॅप्टिस्ट मंडळीचा पाळक झाला. वर्षाला त्याला १६ पौंड मिळत असत. ते संसाराला अपुरे असल्याने चांभाराचा व्यवसाय त्याने चालू ठेवला. वयाच्या २० व्या वर्षी त्याच्या दुकानाचा मालक मृत पावल्याने त्याने मालकाचे दुकान चालवायला घेतले व डॅाली पॅकेट या त्याच्या मेहुणीशी विवाह केला. ती दिसायलाही अशीतशीच व मंदबुद्धीची होती. या निर्णयात उतावळेपणे त्याच्या हातून चूकच झाली. त्यामुळे पुढील आयुष्यात त्याला फारच त्रास झाला. पण त्याविषयी तो चकार शब्द काढत नाही. खेडवळ चांभारापेक्षा जे त्याच्याकडून पुढे अत्युच्च कार्य होणार होते, त्यासाठी ती त्याला मुळीच साजेशी पत्नी नव्हती. अल्पकाळ त्याने शिक्षकी पेशा पत्करला. पण पुन्हा जुन्या व्यवसायाकडे वळला. शिक्षकी पेशामुळे त्याची भुगोलाची गोडी वाढली. ‘कॅप्टन कुकची जलपर्यटने’ हा ग्रंथ वाचून पृथ्वीवरील अनेक स्थळांची त्याने माहिती मिळवली. दुकानातील भिंतीवर जगाचा एक मोठा नकाशा चिकटवून त्यावर देशांची नावे, भाषा, लोकसंख्या, चालीरीती, प्रचलित धर्म याविषयीच्या नोंदी त्याने लिहिल्या. तेव्हा

मूर्तिपूजकांची संख्या प्रचंड असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांना ख्रिस्ताची ओळख करून घेण्याचे मंडळीचे आद्यकर्तव्य असल्याचे त्याला प्रकर्षाने जाणवले. याविषयी आपल्या इंग्रज बांधवांमध्ये जागृती करण्याची त्याला आस लागली. एका सभेत त्याने याविषयी १७८६ मध्ये पहिला प्रयत्न केला असता सभेचा अध्यक्ष मि. रायलंड म्हणाला, “अरे तरुणा, मूर्तिपूजकांना खऱ्या धर्मात आणावे असे देवाला वाटले तर तुझ्यामाझ्या मदतीशिवाय तो धर्मांतर घडवून आणील.” मि. फुलर म्हणाले, “देवाने स्वर्गाला खिडक्या पाडल्या तरच हे होईल.” या कटू अनुभवामुळे निराश होऊन केरी घरी परतला. पण आपल्या मताशी मात्र ठाम राहिला. हळूहळू आपल्या मताची लोकांवर छाप पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले व त्याला समाधान वाटले.

१७९२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात त्याने म्हटले, “मूर्तिपूजकांना सत्य मार्गात आणण्यासाठी उपाययोजना करणे ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य आहे असे मला खात्रीने वाटते.”  या पत्रकातून लोकांची अनुकूल मते प्रसिद्ध होऊ लागली. मि. रायलंड व फुलरही या मतास पूर्ण अनुकूल झाले. १७९२ मध्ये पाळकांच्या बैठकीत विल्यम केरीने यशया ५४:२-३ या वचनांवर दोन भागांत संदेश दिला. तो इतिहासप्रसिद्ध ठरला. ते वचन असे आहे, “आपल्या डेऱ्यांची जागा वाढव. आपल्या राहुट्यांच्या कनाथा पसरू दे. अटकाव करू नको. आपल्या दोऱ्या लांब कर. मेखा पक्क्या ठोक. कारण उजवी व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवील.” त्यावर केरी म्हणाला, “देवाप्रीत्यर्थ मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करा व मोठमोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.” पाळकांच्या सभेत मूर्तिपूजकांमध्ये सुवार्ताप्रसार करण्याचा ठराव झाला. आणि २ ॲाक्टोबरला इंग्रजांची मिशनरी सोसायटी स्थापण्यात आली. मि. फुलर त्या समितीचे चिटणीस झाले. सुवार्ताप्रसारासाठी पहिली वर्गणी १३ पौंड २ शिलिंग ६ पेन्स जमली. या वृक्षाला पुढे भरपूर फळे आली. आणि केरी म्हणाला, “मला पाठवाल तेथे मी या कामगिरीवर जातो.”

तेव्हा बंगालहून जॅान थॅामस या सर्जनला त्याच्या स्वच्छंदी व भ्रमिष्ट स्वभावामुळे परत पाठवले होते. पण तो भक्तिमान व कार्यनिष्ठ होता. या मिशनरी सोसायटीने भारतात काम करावे असा त्याने आग्रह धरला व केरीसोबत पुन्हा भारतात जाण्याची इच्छा दर्शवली. त्याने आग्रह केला नसता तर कदाचित केरीची बहुमोल सेवा भारताला मिळाली नसती. पण थॅामस कर्जबाजारी असल्याने मोठे संकट उद्भवले. ही मिशनरी मंडळी प्रवासास निघाली असता सावकाराने त्याचे अटक वॅारंट काढले. कंपनीच्या परवानगीशिवाय हा कप्तान मिशनरींना घेऊन जात असल्याची तक्रार नोंदवणार असल्याचा त्याने या अमेरिकन जहाजाच्या कप्तानाला धाक घातला. तेव्हा डॅनिश जहाजाने त्यांना आपल्या जहाजात घेतले. आणि ते सुखरूप पुढच्या प्रवासाला निघाले. त्यात विल्यम केरी, त्याची पत्नी, पाच मुले, मेहुणी, थॅामस दांपत्य ही सर्व होती. हा काही फार कर्तबगार चमू नव्हता. पण त्यांच्यासारखी सेवा पुढे कोणाकडूनही झाली नसेल. आपले स्वप्न साकार होणार व मंडळीची सेवा होणार या जाणीवेने केरीला अत्यानंद झाला. मि. फुलरने त्यांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. १० नोव्हेंबर १७९३ ला ते सर्व कलकत्यास पोहंचले. हा भारतासाठी सुवर्णदिन होता.

सुरुवातीला त्यांच्यावर एकामागून एक संकटे आली. कंपनीच्या नोकरांनी तर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. थॅामसमुळे आर्थिक संकटे उद्भवली. त्याच्यावर सर्व आर्थिक जबाबदारी होती. इंग्लंडहून आणलेली बेताची रक्कम व माल ही त्यांची पुंजी होती. माल विकून त्यांनी खर्च भागवायचा होता. जवळची रक्कम थॅामसने लवकरच उधळली. मालातून फारसे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे परिवारातील सगळे आग

पाखडू लागले. एका धनाढ्याने आपले लहानसे घर त्यांना राहायला दिले. या सर्व दुखण्यांना मुळीच न जुमानता केरीने जहाजावर असताना सुरू केलेला बंगालीचा अभ्यास पुढे चालू ठेवला. पण अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे काय? सुंदरबनात जमीन मिळते हे समजताच, तो परिसर रोगट व हिवतापाच्या संसर्गाचा असूनही तेथे झोपड्या बांधून त्याने शेती सुरू केली. शिकार व शेतीकामात त्याचा बराच वेळ जाऊ लागला. न डगमगता सर्व परिस्थितीत आनंदात राहणे हा त्याचा स्वभावच होता. फुलरला त्याने आपल्या अडचणी व दिनचर्या कळवताना म्हटले, “अनेक अडचणी येत असता मला कोणी पृथ्वीचे साम्राज्य जरी दिले, तरी हाती घेतलेले काम मी सोडणार नाही.”

थॅामसचा उडनी नावाचा एक मित्र होता. सरकारी नोकरी सांभाळून तो इतरही उद्योग करायचा. मदनावती येथे त्याचा निळीचा कारखाना होता. थॅामसकडून त्याला केरीचा सर्व हालहवाल समजला. मिशनकार्य सांभाळून आपल्या कारखान्यात दरमहा २०० रुपये वेतनावर त्याने केरीला काम दिले. त्यासाठी १७९५ ते १८०० केरी मदनावतीस वास्तव्याला होता. हा परिसरही आरोग्याच्या दृष्टीने चांगला नसल्याने तेथे त्यांचे एक मूल वारले. त्याच्या पत्नीच्या डोक्यावर परिणाम झाला. तिचा हा आजार वाढतच गेला. सर्वांनाच तापाचा संसर्गही झाला. पण त्याच्या भावी कार्याचा पाया येथेच घातला गेला. शहरापेक्षा खेड्यात राहिल्याने स्थानिक जनतेशी त्याचा दाट परिचय झाला. त्यामुळे त्याला लोकांची मतप्रणाली, समजुती, अडचणी व चालीरीतींची चांगली माहिती झाली. त्यांच्या भाषेचे उत्तम ज्ञान झाले व स्थानिक भाषा तो अस्खलित बोलू लागला. हिंदू धर्माचे त्याला खोल ज्ञान झाले.

कारखान्याचे काम करून तो इमानदारीने नाना प्रकारे मिशनकार्य करू लागला. त्याने एक शाळा काढली. २० मैलांच्या परिसरातील सुमारे २०० पाड्यांवर फिरून त्याने सुवार्ताप्रसार केला. बायबलचे बंगालीत भाषांतर केले. संस्कृतचे महत्त्व ओळखून ती भाषाही तो शिकू लागला. त्याने संपूर्ण महाभारत वाचून काढला. 

१७९९ मध्ये उडनीने कारखाना विकला व तो परदेशात स्थलांतरित झाला. साचवलेल्या पैशातून केरीने एक लहानसा कारखाना विकत घेतला. त्यातील नफ्यावर त्याला खर्च भागवता येणार होता. पवित्र शास्त्र छापायला त्याने एक जुना छापखाना विकत घेतला. मिशनरी सोसायटीला आणखी मिशनरी पाठवण्याची विनंती केली. मदनावतीहून सत्याचा प्रकाश पसरवण्याची स्वप्ने तो पाहू लागला. एका मिशनरीच्या कौटुंबिक खर्चातून ‘समाईक मालकी, समाईक उपभोग’ या तत्त्वावर आठ कुटुंबे चालवण्याची पद्धत त्याने अवलंबली. अशी आठ कुटुंबे पाठवण्याची त्याने फुलरना विनंती केली. बायकांनीही पतीसह काम करावे अशी त्याची मागणी होती. एकाने शिक्षकाचे काम करून त्यांच्या मुलांना शिकवावे. सर्वांनी चौकोनी परिसरात झोपड्या बांधून राहावे असे त्याने योजले. सर्व व्यवस्था पाहाण्यास कारभारी नेमावेत, त्यांनी खाणेपिणे, उपासना घेणे, उपदेश करणे, शिक्षण देणे, या जबाबदाऱ्या सांभाळण्याविषयी नियम केले. या योजनेत फिरतीवर राहून सुवार्ताप्रसार करण्यास प्राधान्य देण्यात आले.

येथवरचा संपूर्ण प्रवास किती खडतर होता हे तुमच्या लक्षात आले असेल. भारतीय लोकांवरील प्रेमाखातर त्याने ते सर्व सोसले. पाच वर्षांतील केरीच्या पत्रव्यवहारातून तो सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास तो सज्ज असल्याचे इंग्लंडमधील मंडळीच्या लोकांच्या लक्षात आले. त्यांच्या ठायी मिशनरी वृत्ती अग्निसारखी पेटून भडकू लागली. ती संपूर्ण जगभर सुवार्ता पसरेपर्यंत थांबणार नाही अशी फुलरना आशा वाटू लागली. चार नवीन मिशनरी भारतास निघाले. ईस्ट इंडिया कंपनीला हे समजताच कंपनीचे धाबे दणाणले. त्यांना विरोध वाढणार हे केरीच्या लक्षात आले. ज्या अमेरिकन जहाजाने ते आले, त्याने हुगळी बंदरात नांगर टाकला. पण त्या मिशनरींना धमकी देण्यात आली की, “तुम्ही कलकत्यात उतरण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तुम्हाला हद्दपार करू.” पण कंपनीचा एक प्रमुख डायरेक्टर चार्लस ग्रांट मिशनकार्याचा पुरस्कर्ता होता. त्याला मिशनरींविषयी अत्यंत आपुलकी होती. त्याने आरंभीच सल्ला दिला होता की त्यांनी कलकत्याऐवजी सेरामपूरला उतरावे. तेथे डॅनिश मिशनच्या आश्रयास जाऊन तेथून केरीकडे जाण्याची तजवीज करावी. अधिकाऱ्याचा डोळा चुकवून ते जहाजातून उतरून दोन होड्यांमधून सेरामपूरला गेले. कर्नल बाय हा दक्षिणेकडील श्वार्टझचा स्नेही होता. अशा रीतीने उत्तरेकडील केरी व दक्षिणेकडील श्वार्टझ हे भारतात येणाऱ्या मिशनरींना जोडणारे दुवा बनले. लॅार्ड वेल्सलीने या मिशनरींना हद्दपार करण्याची मागणी करूनही कर्नल बायने ती नाकारली. अमेरिका व डेन्मार्कशी आंतरराष्ट्रीय स्तरावर कटकट होणे टाळण्यासाठी व्हॅाइसरॅायही नरमला व हा विषय तिथेच सोडून दिला. सार्वभौम देव कार्यरत होता. पण मिशनचे ठाणे कोठे असावे हे निश्चित करताना मदनावती बंगालमध्ये असल्याने केरीला नाखुशीने तो विचार सोडून द्यावा लागला. त्याला आपले बिऱ्हाड तेथून हलवावे लागले. कारखाना व सुरू केलेले काम तसेच अर्धवट सोडून द्यावे लागले. १० जानेवारी १८०० मध्ये तो

सेरामपूरला गेला. तेथे दूरगामी स्वरूपाच्या मिशन कार्याला सुरुवात झाली.

केरी , मार्शमन आणि वॅार्ड हे मिशन कार्याचे त्रिकूट बनले. ग्रांट व बसडन या दोन मिशनरींवर मृत्युने घाला घातला. विल्यम वॅार्ड कुशाग्र बुद्धीचा, व्यवहार कुशल व छापखान्याच्या कामी तरबेज होता. जोशुआ मार्शमन उत्तम शिक्षक, सुसंस्कृत व सुवार्तेची तळमळ असणारा होता. या तिघांमध्ये विशेष कलागुण होते. त्यांची विचारधारा, शील व मनोवृत्ती सारखीच होती. ते परस्परांशी अशा बंधुप्रीतीने बांधलेले होते की केवळ मृत्युनेच त्यांचा वियोग होऊ शकला. त्यांनी उदरर्निर्वाहासाठी कमीत कमी पैसे वापरायचे ठरवले. पहिली तीन वर्षे तर अत्यंत कमी रक्कम बोर्डाकडून आली. मिशनरींनी आपला उदर्निर्वाह परस्पर भागवून सुवार्ताप्रसार करावा अशी मंडळीची मागणी असे. म्हणून पौलाच्या धोरणाने वागून या मिशनरींनी सोसायटीवर आपला बोजा पडू न देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. म्हणूनच केरीने सुंदरबनात शेती केली. मदनावतीत कारखान्यात काम केले. सेरामपूरला आल्यावर एक मोठे घर विकत घेऊन सहा कुटुंबांनी त्यात आपले बिऱ्हाड थाटले. सर्व एका पंक्तीस बसून जेवीत असत. सर्व काही सामाईक असे. मिसेस केरींना एका खोलीत बंद करून ठेवावे लागे. एवढे सोडल्यास सर्व जण गुण्यागोविंद्याने राहात होते. भांडणे, किरकिरी, किटकिटी औषधालाही नसत. ते आळीपाळीने प्रार्थना घेत व उपदेश करीत असत. एकेकावर एकेक महिना घरगुती कामांवर देखरेख करण्याचे काम सोपवलेले असे. केरी खजिनदार होता. औषधपाणी तोच पाही. ब्रदर फाऊन्टन ग्रंथपाल होते. शनिवारचा दिवस लोकांना सल्लामसलत देऊन त्यांच्यातील तंटे मिटवून प्रेमाने वागण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी होता. खाजगीरित्या कोणी काही करूच नये असा नियम होता. केवळ मिशनचे हित हे एकच ध्येय होते.

मिशनकार्याच्या व्यवस्थापनेतून केरीचा व्यवस्थितपणा, तारतम्य व बुद्धी विशेष प्रत्ययास येते. पवित्र शास्त्राचे भाषांतर हे त्यांचे प्रमुख काम होते. वॅार्डने छापखान्याची जबाबदारी घेतली होती. मार्शमन बंगाली शिकला व स्थानिक शाळांवर देखरेख करू लागला. त्याच्या अनुभवाचा व कर्तृत्वाचा खूप फायदा झाला. १८०० साली त्यांनी युरोपियन मुलांसाठी शाळा व वसतीगृह सुरू केले. त्याचा युरोपियनांस खूप फायदा झाला. शिवाय या उपक्रमातून वर्षाला १०,००० पौंड प्राप्त होऊ लागले.

भारतातील युरोपियन तरुणांसाठी कॅालेज काढायचे गव्हर्नर वेल्स्लीच्या मनात होते. पौर्वात्य भाषा, कायदेकानू, रीतीरिवाज शिकवण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण केरीशिवाय कोणी योग्य व्यक्ती शिकवायला मिळेना. या नम्र, गरीब मनुष्यास त्यांनी विनंती केली. आपल्याला हे झेपेल की नाही या संभ्रमातच कां कूं करीत त्याने ही विनंती मान्य केली. १८०१ साली त्याने डॅा. रायलंडला पत्र लिहिले, “मिशन कार्याला व्यत्यय येणार नसेल तरच मी हे काम स्वीकारीन.” त्याने आपल्या सर्व शंका कुशंका, आपल्या उणीवाही त्यांच्यापुढे प्रांजळपणे मांडल्या. ते म्हणाले, “केरीची पात्र- अपात्रता ठरवणे हे आमचे काम आहे.”  तेव्हा केरीने आपली संमती कळवली. आणि त्याची प्राध्यापक म्हणून कॅालेजात नेमणूक झाली. पुढे ३० वर्षे त्याचा या कॅालेजशी संपर्क राहिला. त्याची बुद्धिमत्ता व मनमिळाऊ स्वभावामुळे मिशनकार्याची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. युरोपियन समाजाशी मिशनरींचा संपर्क वाढला. यापूर्वी त्यांचा फक्त कनिष्ठ वर्गाशी संबंध आला होता. आता वरिष्ठ वर्गाशीही त्यांचा संपर्क वाढला. त्यांच्या रिवाजांशी जुळवून घेताना हलक्या वर्गातून वर आलेला असूनही केरीला अडचण आली नाही. त्याला गरीबीची लाज वाटली नाही की त्याच्याकडून चुकीचे वर्तन घडलले नाही. 

कोणीतरी एकदा केरींना विचारले, “डॅा. तुम्ही पूर्वी बूट बांधण्याचा मोच्याचा व्यवसाय करायचा ना?” 

केरी म्हणाले, “महाराज, नाही. मी तर फाटके तुटके बूट शिवून सावून देण्याचे काम करत होतो.” 

प्राध्यापकाचे काम स्वीकारल्याने त्यांचा बंगाली भाषेचा व्यासंग वाढला. तेव्हा बंगालीत एकही ग्रंथ नव्हता. बंगाली साहित्याचे प्रमुख जनक डॅा. केरी होत. प्रथम त्यांनी बंगाली व्याकरणाचे पुस्तक लिहिले. मग कॅालेजची पाठ्यपुस्तके लिहिली. संस्कृतची लोकप्रियताही त्यांनी वाढवली. केरी संस्कृतचेही प्राध्यापक झाले. पट्टीचा विद्वान मनुष्य अशी त्यांची ओळख होती. त्यांना मिळणाऱ्या प्राध्यापकाच्या वेतनाची मंडळीच्या भांडारात भर पडू लागली. आठवड्याचे तीन दिवस कलकत्यात घालवून होडीने नदी ओलांडून ते सेरामपूरला येत असत व पवित्र शास्त्राचे भाषांतर व मिशनरी कार्य करीत असत. वर्षाला ६०० पौंडांवरून त्यांचा पगार वर्षाला १५०० पौंडावर गेला. हा पैसा सामाईक असल्याने

मिशनकार्य झपाट्याने वाढू लागले. त्याने स्वार्थत्यागाचे उत्तम उदाहरण घालून दिले. खाजगी खर्चाला मार्शमन ३०रु, वार्ड २० रु तर केरी ५० रु ठेवून घेत असत. केरींना कॅालेजला व सरकार दरबारी जावे लागत असल्याने प्रवासखर्च, कपडेलत्ता व इतर खर्चासाठी जास्त खर्च येत असल्याने ते तुलनेने जास्त पैसे घेत असत. पण मिशनला केरींकडून वर्षाला ४६,००० पौंड एवढी प्रचंड रक्कम मिळत असे. सोसायटी वर्षाला २००० पौंडच देत असे. कष्टाने पैसे कमवून,  स्वार्थत्यागाने दान देऊन, सेरामपूरने बहुमोल मिशनकार्य पुढे नेले.

हा मोठा आदर्श त्यांनी भावी पिढीसाठी घालून दिला. अनेक उत्तम योजना पैशाअभावी पूर्ण होऊ शकत नसतात. पण त्यांच्याकडे पाहून इंग्लंडमध्ये जागृती झाली. भारतही खडबडून जागा झाला. ख्रिस्ताच्या राज्याचा भारतात प्रसार झाला. सेरामपूर मिशनने देवाकडून मोठमोठ्या अपेक्षा केल्या. त्यांची ध्येये कष्टाने उभारलेल्या ध्येयातून साकार

झाली. केरींच्या व्यक्तिमत्वामुळे व कार्यामुळे भारताची विविध अंगांनी प्रगती झाली. 

Previous Article

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ

Next Article

विल्यम केरी

You might be interested in …

ख्रिस्ताचं मन: फिलिपै २:५ (॥)

 ख्रिस्ताचं मन म्हणजे त्याचा कळवळा हे आपण पाहिलं व त्या मायेनं व सहानुभूतीनं त्यानं काय कृती केली तेही पाहिलं. आपण त्यातून हे शिकलो की, (१) आपल्याजवळ जे आहे ते आपल्यासाठीच ठेवण्याची वस्तू नव्हे.(२)  इतरांसाठी ती […]

देवावर विश्वास लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

विश्वसनीय देव देव हा विश्वसनीय आहे या सत्यावर देवावर विश्वास ठेवण्याचा विचार आधारलेला आहे. आतापर्यंत जी सत्ये आपण शिकलो त्यामध्ये आपण दृढ व्हायला हवे. आपली तो सातत्याने काळजी घेतो. याविषयीच्या अभिवचनांचा आपण आधार घ्यायला हवा. […]

आपण ख्रिस्तजयंतीच्या भावनांसाठी धडपडतो

मॅट चँडलर पुन्हा एकदा या ख्रिस्तजन्मदिनी युद्ध सुरू होणार. नाताळ सुखाचा जावो म्हणायचे की मेरी ख्रिसमस? पण खर्‍या विश्वासीयांसाठी खरे आव्हान यापेक्षा अगदी पूर्ण निराळे असते. ती लढाई आपल्या हृदयासाठी, आपल्या आनंदासाठी आणि आपल्या भक्तीसाठी […]