दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

“ माझं गौरव” (।)

“ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे” (योहान १७:१०).

प्रस्तावना – जग दु:खानं भरलं आहे. त्या दु:खादु:खात फरक आहे. शारीरिक दु:खापेक्षा आध्यात्मिक दु:ख सहन करायला अतिशय अवघड असतं. त्यातल्या त्यात आध्यात्मिक निराशा माणसाला सततच्या अस्वस्थतेनं जिणं अतिशय बेचैन, नको नकोसे करून सोडते. आपल्या स्वत:च्या तारणाबद्दल, आपल्या पातकी प्रवृत्तीनं भरलेल्या जिण्यामुळं, कधीमधी देह, जीव, जग, यांच्या ओढीनं होणाऱ्या पातकांमुळं, सहज एक संशय वाटत राहतो. दुसऱ्यांचं यशस्वी आध्यात्मिक जीवन पाहिलं की तुलनेनं वाटत राहातं की “आपलं खरोखरच तारण झालंय का? असलं, तर आपण आजवर काय केलं? काय करीत आहोत? यापुढं तरी आपल्या हातून काय दिवे लागणार ?” आणि मन मोडून रंजीस येतं, निराशेत, अंधारात बुडून गडप होतं. देहाचे नित्याचे व्यवहार चालू असतात, पण मनात सतत टोचणी असते. ती शांतपणे जाळत राहते.

आरशाचे दोन प्रकार असतात. एक खोलगट गोल, दुसरा फुगीर गोल. खोलगटात चेहरा अव्वाच्या सव्वा मोठा दिसतो. फुगीरात चेहरा आहे त्याहून लहान दिसतो. असे आरसे आध्यात्मिक जगातही आहेत. ते खास विश्वासीयांजवळ असतात. कित्येक जण खोल आरशात आपले चेहरे पाहून खूश असतात. आपलं तारण झाल्याची खात्री असते व आपलं बाह्यवर्तन, बोलणं, कृती आहेत त्याहून मोठ्या दिसतात. त्या आनंदात ते मग्न असतात. हे स्वत:चं खरं नसून लटकं चित्र आहे याचा त्यांना थांगपत्ता नसतो.
तर दुसरे फुगीर आरशात आपला चेहरा पाहतात. जणू शून्यात नाहीसं होणारं चित्र पाहून ते खट्टू होऊन धास्तावतात. आपल्या जवळच्या आरशांचा हा खेळ आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून ते वरीलप्रमाणे पूर्ण हताश, निरुत्साही, निष्क्रिय बनून दु:खानं दडपून जातात. अशा निष्क्रियतेवर, निराशेवर व उदासीनतेवर काही उपाय आहे का?

ख्रिस्ती धर्मच एकटा एक खरा धर्म आहे, तर मग निराशा नष्ट करण्याचा मार्ग त्यात आहेच. तो कोणता? आपल्या जवळचे जगाने तयार केलेले हे वाकडे आरसे फेकून देऊन देवाचा खरा आरसा घेतला की झालं! त्या आरशात आपलं तोंड नाहीच दिसत. तिथं सर्वांग परिपूर्ण, यहुदाचा सिंह, शारोनाचा गुलाब, पहाटचा तारा, दहा हजारात देखणा जो आपला प्रभू, त्याचं तोंड दिसतं. ते आपण पाहात बसलो की पवित्र आत्मा पाहणाऱ्याला त्याचं सौंदर्य, वैभव त्या गौरवातून बहाल करतो. आस्ते आस्ते न्याहाळून पाहता पाहता आपण वैभवातून वैभवात जात जात त्याच्या गौरवानं भरून जातो (२ करिंथ ३:१७-१८). चला तर घेऊ या देवाचा आरसा, सुवार्तेचा महान ग्रंथ आपलं पवित्र शास्त्र. योहान १७ मधील प्रभूच्या प्रार्थनेतलं १० वं वचन वाचू आणि न्याहाळून, मनन करून पाहू तिथं आपल्या प्रभूचं वैभवी चित्र. ते आपलंसं करू. त्याचं तेज आपल्यामध्ये घेऊ. त्या तेजानं पेटून उठून ते ओतप्रोत भरू देऊन त्याच्यासारखं सांडू देऊ. शांत समाधानानं भरून जाऊ.

ती वरची माडी. रात्रीचं ते गंभीर वातावरण. प्रीतीनं परिपूर्ण, तरी धास्तीचं, रहस्यमय, प्रार्थनेच्या परिमलानं दरवळणारं! शिष्यांसमक्ष, शिष्यांसाठी महायाजकीय विनवणीची येशू प्रार्थना करत आहे. म्हणत आहे:
“ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” काय बरं याचा अर्थ ? “त्यांच्यामध्ये” म्हणजे त्याच्याबरोबर असलेल्या ११ शिष्यामध्ये. ‘माझं’ म्हणजे कुणाचं गौरव झालं आहे? वैभवशाली देवपुत्र येशूख्रिस्ताचं गौरव झालं आहे, म्हणजे होऊन चुकलं आहे.
कुणामध्ये गौरव झालंय? शहारून सोडणाऱ्या संकटांनी सुन्न होऊन भीतीनं भेदरलेल्या त्या शिष्यसमुदायात त्याचं गोरव होऊन चुकलं आहे. काय म्हणत आहे प्रभू? एकांती, गांभीऱ्यानं तो आपल्या बापाशी जिव्हाळ्यानं हितगुज करत हे शांतपणे समतोल विधान करीत आहे. तो सत्यच सांगत आहे की तो वैभवानं वेढलाय. त्याचं वैभव ते आपलंही गौरव, समाधान! करू या यावर मनन!

(१) गौरव – या वचनाचा अर्थ समजायला प्रथम गौरव म्हणजे काय ते पाहू. प्रथम जुन्या करारात मग नव्या करारात त्याचा अर्थ शोधू. आपलं प्रतीक म्हणून व प्रभूच्या मनातला अर्थ समजून घेऊ म्हणजे संपूर्ण जुन्या व नव्या कराराच्या पार्श्वभूमीवर या वचनाचा अर्थ लख्ख समजून प्रभूचा मानस कळल्याचे समाधान लाभेल.
शास्त्रातील शब्दार्थांचं आगर म्हणजे जुना करार. आणि नव्या करारातील शब्दार्थांमध्ये असतो देवाच्या मनातील जिव्हाळा ! त्या जिव्हाळ्याद्वारे त्या शब्दार्थांचं नवीकरण असतं. म्हणून जुन्या करारातील अर्थसंपत्ती धुंडाळू या. तपशीलात न जाता आपल्या प्रतिकाच्या प्रकाशापुरतं पाहू. “ गौरव” या शब्दाचे जुन्या करारात ७ अर्थ आहेत.

(१) शौभा – सौंदर्य (२) वजन -महत्त्व (३) संपत्ती (४) दुर्मिळता (५) शुद्धता (६) विजय (७) सन्मान.

यांचे जवळ जवळ एकाच अर्थाचे किंवा परस्परांवर अवलंबून असणाऱ्या अर्थांचे तीन गट पाडता येतात.
(अ) पहिला गट – (१) वजन – महत्त्व (२) संपत्ती.
(आ) दुसरा गट – (१) शुद्धता (२) दुर्मिळता (३) शोभा- सौंदर्य.
(इ) तिसरा गट – (१) विजय (२) सन्मान
गौरव या शब्दाच्या अर्थाची ही संपन्नता किती समृद्ध आहे, पाहा.

(अ) वस्तुच्या आंतरिक बनावटीनं तिला वजन प्राप्त होत असतं. त्याचं आध्यात्मिक अर्थात रूपांतर होतं तेव्हा त्याला मानसिक, नैतिक, आध्यात्मिक वजन प्राप्त होतं. त्यासाठी आंतरिक बनावटीचं वजन, महत्त्व वजाबाकीत जितकं जाईल, तितक्या प्रमाणात संपन्नता वाढते. म्हणजे गौरव याचा अर्थ वजन व महत्त्व यामुळं आलेली संपन्नता.

(आ) अर्थाचा दुसरा घटक – वस्तु शुद्ध, निर्भेळ, पवित्र हवी. जितक्या प्रमाणात ती अधिक पवित्र तितकी ती दुर्मिळ. त्या दुर्मिळ पवित्रतेनं तिला सौंदर्य व अलंकारिक शोभा प्राप्त होतं. ह्या दोन्ही अर्थांनुसार ते गौरव अंगभूत, आतल्या आत खेळणारं, स्थिर आहे. यावरून अमकी वस्तू गौरवी आहे याचा अर्थ ती संपन्न व सुंदर आहे.

(इ) विजय व सन्मान – हा आंतरिक अर्थ नव्हे. तर कृपा, पराक्रमानं , शौर्यानं कमावलेला आहे. विजय ( गौरव) याचा मूळ अर्थ उठणं असा आहे ( निर्गम १५:१ व २१). मिर्यामच्या विजयगीताच्या ध्रुपदात तो शब्द आहे. “ यहोवाला गीत गा कारण तो विजयानं उन्नत ( गौरवशाली ) झाला आहे.” अर्थात त्या पराक्रमाच्या कृती डोळ्यात भरून, बोलबाला होऊन सन्मान, प्रसिद्धी, वाखाणणी ही होणारच.


(२) कुणाचं गौरव? – अर्थात अंगभूत महत्त्वानं, सहज सौंदर्यानं मंडित, सुशोभित, आपल्या आक्रमक शौर्यानं संपन्न, सुंदर, सन्मान्य, हे यहोवाच्या गौरवार्थच वापरलेले शब्द आहेत हे सांगायला नकोच. त्याच्या आक्रमक शौर्यामुळं त्याच्या दर्शनसमयी त्याची संपन्नता व सौंदर्याची प्रतीती येते. तर त्याच्या तारणाच्या भयानक पराक्रमाच्या वेळी त्याच्या शौर्याच्या कृतीनं त्याचा सर्वत्र सन्मान होतो.  हेच यहोवाचं तेज, त्याचं गौरव! त्याच्या गौरवाच्या तेजानं अखिल पृथ्वी भरली आहे.

प्रियांनो, पाहिलंत का, हे आश्चर्य? देवपुत्र येशूख्रिस्त त्याच्या बापानं त्याला दिलेलं हे गौरव आपल्या स्वत:साठी राखून न ठेवता आपल्याला, या निखालस नालायक पातक्यांना तो देऊन टाकतो? का बरं? कुणास ठाऊक ? ज्या अल्हाददायी रहस्यांनी आमच्यासाठी तारण सिद्ध होऊन आम्हाला प्राप्त झालं, त्याच्या यादीत या रहस्याचा प्रथम क्रमांक लागेल असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण काय बरं? त्याचं मूलभूत कारण देवाच्या स्वभावाच्या मध्यभागी, त्याच्या ह्रदयाच्या केंद्रबिंदूशी जडलेलं दिसतं हे नक्की. देवपण याचा अर्थ स्वार्थाचा अभाव. आपलं देवपण सतत दुसऱ्याला बहाल करणं म्हणजेच देवपण. देव कोण? तर पातक्यांनी स्वेच्छेने स्वीकारण्याच्या अटीवर आपली प्रीती, पावित्र्य, आपले सर्वस्व इतरांना देणारा म्हणजे देव! किती गोडच गोड वास्तव कल्पना! या दृष्टिकोनातून देवबाप त्याचं गौरव आपल्या पुत्राला देतो, अन् देवपुत्र ते आपल्या शिष्यांना देतो. अशा सोप्या प्रकारे ते पातक्यापर्यंत येऊन पोहंचतं. प्रियांनो इथं थोडं थांबू या आणि या उदात्त गोष्टीवर मनन करून समाधान प्राप्त करू या. हा आपला नित्याचा आंतरिक आहारच होऊन जाऊ द्या.

हे कसं होतं माहीत आहे? पातकाची सतत आपल्या अंतर्यामाला टोचणी लागत असल्याने काही वाकड्या गोष्टी आपल्यात निर्माण झाल्या आहेत. त्यातील सर्वात विध्वंसक गोष्ट म्हणजे देवानं दिलेली देणगी मनमोकळेपणानं स्वीकारण्याऐवजी आपल्या मनच्याच लाख अडचणी आपण उभ्या करतो. आणि महान तारणापासून अलिप्त राहून दूर पळतो व अखेर ते गमावूनही बसतो. देवबाप जर आपलं गौरव आपल्या पुत्राकरवी आपल्याला द्यायला तयार आहे, तर साऱ्याच गोष्टी तो आपल्याला कसा देणार नाही? अवश्य देईल, याची आपल्या मनात पक्की गाठ बांधून ठेऊ या.

आता असं आहे की अखेर देवाघरी सर्व संतांना प्रभू आपलं गौरव देणार आहे हे खरं आहे (२ थेस्सल. १:१०). पण दुसरीही गोष्ट तितकीच खरी आहे की अगदी सामान्य शिष्यही सध्या ख्रिस्ताचं गौरव होऊ शकतात (२ करिंथ ८:२३). आमचं आत्ताचं समाधान या गोष्टीत साठवलं आहे. प्रभूनं आपल्याला गौरव दिल्यावर आणखी काय राहिलं? आपण ते आपलंसं करून घेणं राहातंच ना? ख्रिस्ती अध्यात्मातला तो एक मूलभूत, मध्यवर्ती, महत्त्वाचा नियम आहे. तो असा की, देवाचं देवपणही आम्हाला स्वेच्छेनं, आपलंसं करण्याच्या अटीवर विश्वासाच्या होकारानं, ममत्वानं स्वीकारल्यावर प्राप्त होऊन घरचंच होऊन बसतं. ते सारं प्रभूनं तयार करून ठेवलं आहे. देण्याची त्याची इच्छा आहे, नव्हे दिलंच आहे; मात्र ते घेतलं पाहिजे. ते घेण्यानंच ख्रिस्ताचं व देवाचंही गौरव आपल्याला प्राप्त होतं. म्हणून प्रभूनं आपल्या या महान याजकीय प्रार्थनेत आपल्या बापाशी केलेल्या हितगुजात आमच्या समाधानासाठी वरील आश्चर्यकारक विधान केलं आहे.

( पुढे चालू)

Previous Article

देवाच्या दीनांना दिलासा (III)

Next Article

“ माझं गौरव”  (II)

You might be interested in …

असहाय गरजू असे चर्चला या

जॉन पायपर ख्रिस्ती लोक एकत्रितपणे दर आठवडी भक्तीला जमतात ही साजेशी व सुंदर गोष्ट आहे.जेव्हा आपण असे करतो तेव्हा त्र्येक देवाच्या ज्ञानाचे जे सत्य आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये देव आपल्यासाठी जो आहे त्या ठेव्यामुळे जी […]