दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 संतापाचं भांडण : पौल व बर्णबा


प्रस्तावना –  पवित्र शास्त्र हे एक विलक्षण पुस्तक आहे. त्याला ‘पवित्र शास्त्र’ असे नाव आहे. पण त्यात अशाही वाईट पातकांच्या नोंदी आहेत की त्या केवळ ऐकूनही कान भणभणतील. तरीही ते ‘पवित्र शास्त्रच’ आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण ते पश्चात्तप्त पातक्यांना देवाची पवित्रता बहाल करणारं, पवित्र देवाचं प्रगटीकरण करणारं, अजोड पुस्तक आहे. म्हणून त्यातील पातकं सुद्धा गरजवंत गरिबांना उपकारकच ठरली आहेत.

दाविदाचं ५१ वं स्तोत्र त्यातलंच आहे. त्याच्याबद्दल संत ॲागस्टीन कृतज्ञतेनं म्हणतो : “हज्जारो पातक्यांमध्ये पश्चात्ताप निर्माण करणाऱ्या स्तोत्रा, हज्जारो पातक्यांना आपला पश्चात्ताप व्यक्त करण्याकरता अचूक भाषा पुरवणाऱ्या स्तोत्रा, धन्य तुझी! नि दाविदा, ज्या पातकामुळं तू हे स्तोत्र पश्चात्तप्त होऊन गायलंस, ते तुझं पातकही धन्य!”

असंच एक भांडण पवित्र शास्त्रात प्रे.कृ १५:३९ मध्ये चिमुकल्या वचनात सांगितलं आहे – “नि एक संतापाचं भांडण झालं.. इतकं की ते दोघे एकमेकांपसून वेगळे झाले.”
प्रियांनो, भांडणातून कधी काही चांगलं निष्पन्न झालं आहे का? नाही, हे खरं. पण पवित्र शास्त्रात हे भांडण आहे. आणि शिकण्याची वृत्ती व तयारी असणाऱ्या नम्र माणसाला त्यातून शिकायला मिळणारच. म्हणूनच या भांडणाचा अभ्यास करू या.

१- हे देवाच्या दोन संतश्रेष्ठ माणसांमधलं कडाक्याचं, संतापाचं भांडण आहे. त्यासाठी मूळभाषेत वापरलेल्या शब्दाचा अर्थ तीव्र, पेटलेलं, कापून टाकणारं, संतापाचं भांडण असा आहे. इतका रागाचा झटका येण्याचं कारण काय?

(अ) हे भांडण झालं कोणामध्ये? तेच तर आश्चर्य आहे! ख्रिस्तानंतर कोणीही झाला नाही असा संत पौल एका पक्षाचा तर पौलाच्याच तोडीचा, किंबहुना कित्येक बाबतीत पौलापेक्षा श्रेष्ठ संत बर्णबा दुसऱ्या पक्षाचा, यांच्यात हे भांडण झाले.

(ब) कोणाबद्दल ? कशासाठी? मार्क योहानाबद्दल. नि का? तर पौलाच्या सुवार्ताप्रसाराच्या आवेशाला उसंत प्रकार माहीतच नाही. पहिली मिशनरी फेरी झाली. शिष्य मिळाले. त्यांची परत भेट घ्यावी, त्यांना विश्वासात स्थिर करावे, अशी या पेटलेल्या सुवार्तिकाची इच्छा. त्याच्या पहिल्या फेरीतला त्याच्या इतकाच पेटलेला सोबती म्हणजे बर्णबा. त्याच्याजवळ वरील इच्छा प्रगट करताच तोही एका पायावर तयार झाला. मग फिसकटलं कुठं? तर पहिल्या फेरीत बर्णबाचा चुलत भाऊ मार्क योहान काही वेळ त्यांच्याबरोबर होता, त्यालाही बरोबर घ्यावं ही बर्णबाची इच्छा होती. पण पहिल्या फेरीत पफेहूनच तो फेरी अर्धवट सोडून मधूनच निघून गेला होता. ‘काम सोडून निघून गेलेल्याला बरोबर घेऊ नये’ असं पौलाला वाटलं. तर उलट आपल्या उदार, उमद्या स्वभावाला अनुसरून त्याला सोबत घ्यावं असं बर्णबाला वाटलं. दोघांचेही हेतू चांगले. आपलंच बरोबर अशी दोघांची दृढ समजूत. आवेशाच्या भरात शब्दानं शब्द वाढला. दोघांचं संतापून कडाक्याचं भांडण झालं.

(क) भांडणाचा परिणाम काय झाला? तर ते दोघे वेगळे झाले. नि असं दिसलं की विशेष काही वाईट झालं नाही. दोघेही चांगल्या हेतूने सुवार्ताकार्य पुढे चालू ठेऊ पण कोणी परस्परांशी संबंध ठेऊ नयेत असे म्हणत ‘वेगळे झाले.’ दोघेही पहिल्या फेरीत मिळालेल्या शिष्यांना स्थिर करायच्या कामी, पौल खुष्कीच्या मार्गानं तर बर्णबा जलमार्गानं कुप्र बेटाकडे गेला. भांडणाचा काही विपरीत परिणाम झाल्याचं आढळून आलं नाही. पण भांडणाचा झालेला दूरगामी परिणाम दिसून यायला बरेच दिवस लागले. बर्णबासारखा पहिल्या प्रतीचा संतश्रेष्ठ कायमचाच सुवार्तेच्या कामातून वजाबाकीत निघाला. किती खेदाची गोष्ट झाली बरं ही! शेवटी भांडण ते भांडणच !

(ड) भांडणाची पार्श्वभूमी – एवढा दु:खद परिणाम झालेलं भांडण कोणत्या परिस्थितीत आणि का झालं बरं? हे पाहाणं फार बोधप्रद आहे. म्हणून ही पार्श्वभूमी अभ्यासू व त्यातील पाठ मनात जपून ठेवू. अंत्युखियातील मंडळी मुख्यत: यहुदीतरांतून ख्रिस्ती झालेल्यांची होती. त्या सभासदांमुळे ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासात एक मोठा, जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. तिथंच त्या प्रश्नाचा ख्रिस्ती धर्मविश्वासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निकालही लागला होता. असा कोणता महत्त्वाचा प्रश्न होता व त्याचा निकाल काय लागला होता? त्याचा या भांडणाशी अप्रत्यक्ष काय संबंध होता? ते सर्व समजून घेण्यासाठी काही महिती करून घेणं आवश्यक आहे.

अंत्युखियात चार प्रकारचे लोक होते. त्यांचे मुख्य दोन गट होते.
(अ) पहिला गट: यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेले. त्यातील १- हिब्रू किंवा अरामी बोलणारे यहूदी २- ग्रीक भाषा बोलणारे यहूदी
(ब) दुसरा गट: विदेशी ग्रीक लोकांचा. त्यात होते (३) यहूदी मतानुसारी देवभीरू विदेशी ग्रीक (४) यहूदी न झालेले विदेशी मूर्तिपूजक ग्रीक होते.

पहिले ख्रिस्ती लोक यहुद्यांमधलेच झाले होते. ते हिब्रू व ग्रीक बोलणारे दोन्हीही होते. आता असं झालं की कुप्रातील काही सुवार्तिक अंत्युखियात आले. त्यांनी यहूदी न झालेले पण यहुदीय मतानुसारी व देवभीरू ग्रीकांना सुवार्ता सांगितली व ते ख्रिस्ती झाले. आता प्रश्न उभा राहिला की यांना ख्रिस्ती म्हणायचं का? त्यांना मंडळीत घ्यायचं का? दोघे मिळून एकच मंडळी झाली असं समजायचं का? त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करायचे का? का यहूदी तेवढेच ख्रिस्ती समजायचे? म्हणून यहुदीय मतानुसारी गटाला सभास्थानाबाहेरच ठेवले गेले होते. त्यावरून दोन मतं होती. एक मत होते की त्यांनी सुंता करून घेऊन आधी यहूदी झाले पाहिजे मग त्यांना मंडळीत स्थान द्यावं. तर दुसरं मत होतं की त्यांनी यहूदी होण्याची गरज नाही. त्यांना ख्रिस्ती होताच थेट मंडळीत स्थान द्यावं. कारण तारण कर्मांनी नव्हे तर विश्वासानं होतं. कुप्रातील सुवार्तिकांनी तर त्यांना त्यांच्या विश्वासावरून बाप्तिस्माही देऊन टाकलेला होता. तेव्हा यरुशलेमातील प्रारंभिक मंडळीनं हे वर्तमान ऐकून बर्णबाला अंत्युखियाच्या मंडळीत पाठवलं. त्यानं सर्व परिस्थिती पाहिली. तारण ही देवाची कृपा असल्याचं सांगून त्यांना एकीनं राहण्याचा बोध केला. पण हा प्रश्न सुटला नाही. पुढे काही कट्टर यहूदी यरुशलेमाहून अंत्युखियास आले आणि पुन्हा त्यांनी सुंता करून यहूदी होण्याच्या मताचा आग्रह धरला. अंत्युखियाची मंडळी त्यामुळे पेचात पडली. त्यानी पौल व बर्णबाला यरुशलेमला पाठवलं. तिथं आगत-स्वागत झाल्यावर मंडळीच्या समितीपुढं त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यांच्या विरोधकांनी म्हणजे अंत्युखियाहून परतलेल्या परुश्यांनी आपलं मत सभेपुढं मांडलं. पौलाने प्रेषितांची भेट घेऊन गलती २:२-९ वरून आपला विश्वास समजावून सांगितला. पुन्हा अधिकृत सभा झाली आणि सुवार्तेच्या मताचा विजय झाला. आणि आजतागायत त्या सभेतील ठरावाने मंडळी चालत आहे. कोणत्याही कर्मकांडाने नव्हे तर कृपेने, येशूवरील विश्वासाने, तारण होत असल्याने कोणत्याही कर्मकांडांची गरज नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याची नोंद प्रे.कृ. १५ मध्ये आहे.

त्यात तारण झाल्यावर सुंता करून यहूदी होण्याची गरज नाही हे पवित्र आत्म्याला व आम्हाला अगत्याचं दिसल्याचं त्यात स्पष्ट केलं आहे. प्रे.कृ. १५:२८ -२९ मध्ये विदेश्यांनाही सांगितलं आहे की “तुमच्या आधी यहूदी ख्रिस्ती झाले आहेत. तेव्हा त्यांची मनं दुखवली जातील अशा गोष्टी तुम्ही करू नका. मूर्तीला अर्पिलेलं मांस, रक्त व गुदमरून मेलेले प्राणी खाणं वर्ज्य करा. आणि आज्ञाही पाळा. त्या आज्ञांची प्रतिनिधी म्हणून ७ वी आज्ञा – जारकर्म करू नका ही आज्ञा आम्ही देतो.” सभेच्या ठरावानं हा सभेत निकाल लागला. पण लोकांच्या मनात निकाल लागला का? नाही. मंडळीच्या ठरावानं माणसांची मनं बदलतात का प्रियांनो? नाही. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानंच त्यांना सत्य समजतं. आणि त्याच्याच सामर्थ्यानं त्यांची मनं बदलतात. तेही स्वत:ला त्याच्या हातात त्यांनी दिलं तरच!

मंडळीत हा ठराव झाल्यावर केफा म्हणजे शिमोन पेत्र अंत्युखियात आला ( गलती २: ११). यालाच शिमोन चांभाराच्या घरी प्रभूनं त्यालाच दृष्टांतात दाखवलं होतं की शुद्ध अशुद्ध असं काही नाही. ते त्यानं मान्य करून यरुशलेमातल्या कट्टर सनातन्यांना त्यानंच ते सांगितलं (प्रे.कृ ११:१७-१८). वरच्या वचनातलं भाषणही त्याचंच. ते काम करायला पौलाला त्यानंच मदतीचा हात दिला (गलती २:९). तरी चंचल मानवाचंच मन ते! आता अंत्युखियाला आल्यावर आपल्या मनाच्या खात्रीनं व मंडळीच्या ठरावाप्रमाणं, विदेशी यहुदीतरांबरोबर तो जेवला देखील! पण यरुशलेमातील कट्टर सनातनी आले. त्यांना तो घाबरला. आणि परत यहुदीतरांना सोडून यहुद्यांबरोबर जेवू लागला. तेव्हा पौल सिंहासारखा त्याला आडवा आला ( गलती २:११). संतश्रेष्ठ पेत्राची ही गत झाली; तर मग इतरांची काय कथा? या प्रश्नाचं महत्त्व आलं का लक्षात? आता या भांडणाशी त्याचा काय संबंध ते पाहू.

२. भांडणातलं खरं खोटं – या भांडणाचा संबंध पौल, बर्णबा नि मार्क योहानाशी संबंध येतो. तो कसा? का? कुणाकुणाचं काय काय चुकलं ते थोडक्यात पाहू.

(अ) पौल – ख्रिस्ती मंडळीचा छळ करणारा, कट्टर परूशी, आवेशी, यहूदी. पण त्याचं संपूर्ण परिवर्तन होतं. त्याच स्वभावानं “त्यानं लागलीच सभास्थानात येशूविषयी गाजवलं की तो देवाचा पुत्र आहे” ( प्रे.कृ ९:२०). पुढं तो यरुशलेमात आला. लोक त्याला भ्याले. जवळ करीनात. त्यावेळी उदार व प्रेमळ बर्णबानं त्याला प्रेषितांकडं आणलं. त्याची हकीगत त्यांच्या कानावर घातली (प्रे. कृ. ९:२७). त्यामुळं त्यांनी त्याला आपल्यात सामावून घेतलं. पुढं त्याला ठार मारण्याचा कट झाल्यावर त्याला कैसरीयाला नेऊन तार्ससला पाठवण्यामध्ये बर्णबाच होता. पुढं अंत्युखियात ग्रीक लोक ख्रिस्ती झाले. शिक्षण देण्याचं काम वाढलं. ग्रीक जाणणारा, शास्त्रात पारंगत असलेल्या तरुणाची बर्णबाला गरज पडली. तो थेट तार्ससला गेला आणि पौलाचा शोध करून त्याला अंत्युखियाला घेऊन आला; आणि वर्षभर त्याच्यासह तिथं काम केलं (प्रे. कृ. ११:२५-२६). दोघांची चांगलीच घट्ट मैत्री जमली. तारलेल्यांचं सुवार्ता कार्यामुळं कामातल्या सहकार्यानं हे नवीन नातं दृढ झालं होतं. पहिल्या फेरीत ते पफेस आले. बर्णबाच्या जन्मभूमीचं हे बेट होतं. रीतीनुसार तिथं “यहुद्यांच्या सभास्थानामध्ये” सुवार्ता सांगितली. तिचा परिणाम रोमी ग्रीक गव्हर्नर सिर्ग्य याच्यावर झाला. त्याच्या पदरी यहूदी नावाचा बर्येशू म्हणजेच ग्रीक नावाचा अलीम जादुगार होता. त्यानं बर्णबा व पौलाला अडवलं. पौलाला सात्विक संताप आला. त्याच्याकडे भेदक नजर लावून तो त्याला म्हणाला, “ तुझं नाव बर्येशू म्हणजे येशूचा पुत्र असं आहे, पण तू तर सैतानाचा पुत्र आहेस…” असं म्हणून प्रथमच आपल्या प्रेषितीय सामर्थ्याचा उपयोग करून त्यानं त्याला अंध केलं. तो आंधळा होऊन चाचपडू लागला. पण कोणी त्याला हात दिला नाही. सिर्ग्य पौल हे सारं पाहून घाबरला. त्यांचे शिक्षण ऐकून चकित झाला व विश्वास ठेवला, पण ख्रिस्ती होऊन बाप्तिस्मा घेतला नाही (प्रे.कृ. १३:६-१२). सातच वचनांची ही हकीगत आहे; पण महत्त्वाची व गंभीर असून तिचे दूरगामी परिणाम झाले.

पौलावर झालेला परिणाम – आपण रोमी गव्हर्नरपुढे उभे आहोत. एक दिवस रोमी बादशहापुढं उभं राहावं, सारं रोम साम्राज्य काबीज करावं ही कल्पना त्याला तिथं आली. तिथंच शौल हे नाव बदलून त्या गव्हर्नरचं पौल हे नावही तिथंच घेतलं. रोमी साम्राज्याप्रमाणं ख्रिस्ती धर्मही जागतिक, सार्वत्रिक असल्याचं चित्र त्याच्यापुढं इथंच उभं राहिलं. नि एका विदेशी यहुदीतर रोमी गव्हर्नरला त्याच्या बोलावण्यावरून त्यानं इथंच सुवार्ता सांगायला सुरुवात केली. त्याच्या दुर्दम्य आवेशाला अपरंपार अवसर मिळाला. त्या आवेशाच्या लाटेच्या उसळीसरशी तो सहज पुढं निघाला, आणि तसाच सर्वश्रेष्ठ पुढारीच राहिला. आणि संतांमध्ये यहुदीतरांचा प्रेषित गणला गेला. या हकीगतीपर्यंत बर्णबाचं नाव पहिलं होतं, शौलाचं नाव दुसरं होतं ( प्रे.कृ. १३:१). पण येथून पुढं ‘पौल व त्याचे सोबतीचे लोक’ असं झालं. बर्णबाचं नाव नाहीसंच झालं. जरी निर्देश आला तरी तो ‘पौल व बर्णबा’ असा येऊ लागला ( उदा,प्रे.कृ १२:२५; १३:४६ व पुढेही पाहा).

पुढे चालू

Previous Article

  “ माझं गौरव”  IV

Next Article

संतापाचं भांडण: पौल व बर्णबा (॥)

You might be interested in …

जेव्हा मला भीती वाटेल मार्शल सीगल

कोणती भीती बहुधा तुमच्या मनात घर करते? तुमचा विवाह कधीच होणार नाही अशी काळजी तुम्हाला वाटते का? किंवा जर तुमचा विवाह झालेला असेल तर तो कधीच सुधारणार नाही अशी? तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार नाही […]

कृपा आणि वैभव: ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव –  लेखांक २

स्टीव्ह फर्नांडिस अ) त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव आपण आता ख्रिस्ताच्या देहधारित व्यक्तित्वामधील तिहेरी गौरव पाहणार आहोत. पहिले म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव . येशू त्याच्या देहधारणामुळे पूर्णपणे एकमेव अपवादात्मक व्यक्ती असा घडला गेला. याचा अर्थ […]

त्याने एकाकरता सर्वस्व विकले डेविड मॅथिस

येशूने एका माणसाबद्दल एका वाक्याचा दाखला सांगितला की “त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले.” तो एक व्यापारी होता. त्याला इतके मौल्यवान काही सापडले की त्याला प्रिय वाटणाऱ्या सर्व खजिन्यापेक्षा ते सरस होते. “स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा […]