२ रे थेस्सलनी – मजकूर
अध्याय १ ला: दुसऱ्या द्वितीयागमनाच्या प्रकाशात भक्त नि शत्रू.
(अ) भक्त
१ ल्या पत्रातील दैनंदिन अनुभूतीचे घटक तेच आहेत. या दोन पत्रांतील काळाचे अंतर फार तर दीड वर्षापेक्षा अधिक नाही ( प्रे.कृ.१८:११). दु:खसहन मात्र आतापावेतो वाढून त्याचा परिणाम खूपच झाला आहे.
(अ) विश्वासाची खूप वाढ झाली आहे.
(ब) प्रीती खूप वाढली आहे.
(क) अंगी धीर त्याच प्रमाणात वाढला आहे.
प्रियांनो, आपल्या दैनंदिन जीवनात वरील ख्रिस्ती अनुभवांची अशीच वाढ झाली आहे का? हा नमुना पाहून आपणही आपली अशीच वाढ करून घेण्याची खबरदारी घेणार आहोत ना?
(१) विश्वासाची गोष्ट घ्या. छळासाठी शत्रू हात धुवून पाठी लागला आहे. मरण येण्याजोग्या दु:खात पाडून भरडत आहे. तरी देखील आपल्या विश्वासाची वाढच होत राहिली आहे का, प्रियांनो? असे असेल, तर धन्य! नाहीतर पहिल्या द्वितीयगमन म्हणजेच लोकांतरणासाठी/ रॅप्चरसाठी आपण अपात्र आहोत. न्यायाच्या दुसऱ्या द्वितीयागमनालाच लायक आहोत. हे तुम्हाला समजलं का?
(२) प्रीतीच्या वाढीची गोष्ट घ्या. कोणाशी प्रीतीनं वागायला जावं, आणि दुष्ट नजरेच्या लोकांची बोलणी ऐकावीत… नकोच ती प्रीती अशी प्रतिक्रिया होते का तुमची? तर मग तुमची मानवी प्रीती असून ती चुकीची आहे हे लक्षात घ्या. देवानं शिकवलेली, तारणात आनंद मानणारी ख्रिस्ती प्रीती निर्भयपणे वाढणारी असते. प्रत्येकाची दुसऱ्यावर, सर्वांची एकमेकांवर, हे तिचं स्वरूप असतं. पाठलागाच्या भरडून टाकणाऱ्या संकटामध्ये ती वाढतच राहून अधिकाधिक होत राहाते.
(३) धीराची गोष्ट घ्या. अगदी वर सांगितल्याप्रमाणेच. दु:खसहनातही धीर.. इतका की पौल त्याविषयी देवाच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो. पण लक्षात राहू द्या, हे सर्व कशासाठी? देवाच्या राज्यासाठी आपण लायक होत राहावं. त्याच्या बोलावण्यास पूर्णपणे पात्र होत राहावं. आपलं विश्वासाचं काम पूर्ण होत राहावं. त्याच्यामध्ये आम्हाला, आमच्यामध्ये त्याला गौरव प्राप्त व्हावं. चांगुलपणाविषयीच्या आपल्या कितीतरी सदिच्छा अपूर्ण आहेत, त्यांची पूर्णता व्हावी. देवाचं राज्य चालवायचं आहे. त्यासाठी थोडासा विसावा प्राप्त व्हावा म्हणून ! ह्या सर्व संकटांच्या साखळीचा शेवट सौख्य समाधानात का होणार? संतांच्या साक्षीवर विश्वास ठेवला म्हणून!
(ब) शत्रू
आता हे दुसरं चित्र पाहा; किती भयंकर आहे ते! अनंतकालिक नाशाची शिक्षा. देहासकट सार्वकालिक मररण! त्याचा आरंभ कशात झाला? आपला प्रभू येशूची सुवार्ता न मानण्यात ! ती समजल्यावर बुद्धीपुरस्सर तिचा धिक्कार करण्यात. त्यामुळं देवाची ओळखच झाली नाही. त्या युगकालिन विनाशाचं स्वरूप तरी किती भयंकर : देवाच्या समक्षतेपासून दूर , त्याच्या सहवासापासून अंतरलेलं, त्याच्या उबेपासून दूर, अशक्यही शक्य करण्याच्या त्याच्या सामर्थ्याच्या वैभवापासून दूर! संतांच्या सामाजिक सहवासाला पारखे, तर सैतानखान्याच्या समुदायासोबत सदैव एकटे, सुने, सनातनचे जिणे. हे होणार द्वितीय पुनरागमनाच्या वेळी.
त्याचं स्वरूप – स्वर्गातून त्याच्या दूतगणांसकट, अग्निज्वालांनी वेढलेलं, आपल्या सामर्थ्याच्या वैभवानं, संतांनी तोंडात बोटे घालून पाहातच राहावं असल्या गौरवानं, विश्वासीयांना वाटावं अशा आश्चर्यानं, न्यायानं, नीतिनं, शत्रुंनी स्वत:च्या हातांनी तयार केलेलं हे असलं सतत सहन करण्याचं जीवन, प्रभूनं हे प्रगटीकरण केलेलं असं सर्व होणारच!
अध्याय २ रा – दुसऱ्या द्वितीयागमनाचा कार्यक्रम
प्रस्तावना
अभ्यास करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की पहिल्या पत्रात त्यानं पहिलं द्वितीयागमन सांगितलं आहे. त्यात त्यांना ते नीटसं न समजलं जो त्यांचा गोंघळ उडाला, त्यामुळं हे दुसरं पत्र तो लिहीत आहे. त्याचं प्रयोजन, त्याचा काळ कोणता? त्याचा परिणाम काय? युगादिकालाच्या संकल्पात त्याचं स्थान कोणतं हे सर्व तो स्पष्ट करत आहे.
तरी ते दोन निरनिराळ्या व्यक्तिंसाठी, दोन निरनिराळ्या काळांसंबंधी, तसेच त्यांना प्राप्त होणाऱ्या दोन गोष्टींसंबंधी लिहीत आहे; हे लक्षात ठेवले तरच घोटाळा होणार नाही.
आणखी एक गोष्ट, सांगितलेल्या गोष्टी दोन दुनियेच्या आहेत. दोन्ही निरनिराळ्या आहेत, पण एकमेकीत गुंतल्या आहेत. त्यापैकी एक दुनिया आहे वर्तमानाची, दुसरी आहे, येऊ घातलेली भावी. त्यांची वर्तमानात गाठ पडली आहे. एकाच जिण्यात एकत्र गुंतलेल्या असून काम करत आहेत. वर्तमानातलं जीवन आहे, पण त्यात भावी शाश्वत तयार होत आहे. त्याला मुदत केवळ द्वितीयागमनाची. पहिल्या द्वितीयागमनात भक्तांची मुदत संपणार.
दुसऱ्यामध्ये शत्रुंची मुदत संपणार. पहिल्यामध्ये भक्तांच्यावर शिक्कामोर्तब होणार. दुसऱ्यामध्ये शत्रुंच्यावर शिक्कामोर्तब होणार. द्वितीयागमनापासून भक्त नि शत्रू अलग अलग होणार. त्यांनी दोघांनी जी निरनिराळी शाश्वते तयार केली आहेत, ती ती जगण्यास ते दोघे विभक्त होणार. भक्त ख्रिस्तसहवासासाठी, शत्रू अग्निसरोवरासाठी तयार होणार. ही गोष्ट आपण चांगली लक्षात ठेऊ या.
१. संतांना इशारा – ( २ थेस्स. २: १-३अ)
संत, शत्रू तत्कालिन एकाच काळात जगत आहेत हे आपण पाहिलं. या वचनांमध्ये तो आता संतांना इशारा देत आहे, की मनाचा खंबीरपणा गमावू नका. कारण प्रभूचं पहिलं द्वितीयागमन म्हणजे लोकांतरण कधीही होईल. आणि आपण सर्व विश्वासी अंतराळात एकत्र होऊ. तिथं आपल्या वैभवीकरणावर शिक्कामोर्तब होईल. आणि सर्वदा प्रभूबरोबर राहण्यासाठी गौरवी शरीर प्राप्त होईल. कामाप्रमाणं प्रतिफळ मिळेल. त्याच्याबरोबर राज्य करायला येईपर्यंत विसावाही मिळेल.
यात चित्त व धैर्य सोडण्यासारखं काहीच नाही. तरीही पौलाला माहीत आहे की ते घाबरले होते. कारण खोट्या शिक्षकांनी त्यांना भासवलं होतं की क्रोध व न्यायाचा काळ सुरू होऊन चुकला आहे. पौलाच्या नावे लिहिलेली बोगस पत्रे दाखवून त्यांनी आपल्याला पवित्र आत्मा व संदेश देण्याचे सामर्थ्य प्राप्त झाल्याचा दावा करीत वरील चुकीचा संदेश दिला. त्यामुळे या मंडळीचा धीर सुटणे सहाजिकच होते. म्हणून पवित्र आत्मा मिळाल्याची बतावणी, लटके शिक्षण, लटकी पत्रे, यांना न घाबरता अज्ञान दुरुस्त करून घ्या व फसू नका असे सांगत पौल इशारे देत आपला या पत्राचा हेतू व प्रभूच्या दिवसाचा कार्यक्रम स्पष्ट करतो.
२- दुसऱ्या द्वितीयागमनाचा कार्यक्रम
(अ) ख्रिस्तविरोधी
दुसऱ्या द्वितीयागमनापूर्वी सर्वसामान्य धर्मभ्रष्टता झाली पाहिजे. लोक विश्वासाच्या मतांगिकारापासून भ्रष्ट होतील. त्या भ्रष्ट वातावरणातूनच ख्रिस्तविरोधी उदय पावेल. तो ऐतिहासिक व्यक्ती, मूर्तिमंत अनीतिचा पुरुष, नाशाचा पुत्र आहे. आपला प्रभू जसा शाश्वत देवाचा पुत्र आहे, तसा तो मूर्तिमंत नाशाचा पुत्र आहे. जिवंत विनाश असा जो सैतान त्याचा पुत्र आहे. देवाचा, त्याच्या पुत्राचा, देवाच्या लोकांचा तो शत्रू आहे. आपणच देव असल्याचं लटकं भासवणारा, स्वत: ला देवाहून श्रेष्ठ उच्च करणारा, देवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वत:च देव असल्याचं प्रदर्शन करणारा तो आहे. प्रगटीकरण १३ मधील श्वापद हेच. ज्या व्यवस्थेत त्याचा उगम व विकास होऊन प्रगटीकरण होणार आहे, त्या विस्तृत व्यवस्थेविषयी पौल सांगतो. देवाच्या महान तारण योजनेशी समांतर प्रतिस्पर्धा करणारी ही व्यवस्था होय. जशी तारण योजना ही एक व्यवस्था रहस्य आहे तशी ही अनीतिची व्यवस्थाही एक रहस्य आहे (इफिस ३: ३-५). ख्रिस्ताच्या व सुवार्तेच्या प्रगटीकरणाबरोबर हे दुसरं रहस्यही प्रगट झालं आहे.आतापर्यंत कोणत्याही धर्मसंस्थापकाला, मुत्सद्याला, देशभक्ताला किंवा राजकारण्याला कदापि न समजलेलं, लक्षातही न आलेलं हे रहस्य आहे.
३- अनीतिचं रहस्य
सुवार्ता, युगादिकालाचा संकल्प, तारणाची योजना, देवाचं राज्य इ. निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असलेली उद्धाराची देवाची महान व्यवस्था जशी आहे, तशीच पण लटकी सैतानाची अनीतिची व्यवस्था आहे. इकडे त्र्येक देव, तीन म्हणजेच एक, नि एक म्हणजेच तीन देवबाप, देवपुत्र, देव पवित्र आत्मा ही त्रयी आहे. तशीच सैतानाची त्रयी आहे. पण ती सुटी सुटी अलग आहे. एक नाहीत.सैतान (अदृश्य), ख्रिस्तविरोधी (दृश्य), आणि खोटा संदेष्टा (दृश्य). जसा सैतानाच्या व्यवस्थेत खोट्या संदेष्ट्याद्वारे आपल्या असत्य प्रचारानं देवाच्या प्रसाराला विरोध व प्रतिबंध करतो, तसा देवराज्याच्या रहस्यामध्येही पवित्र आत्मा सैतानी व्यवस्थेला प्रतिकार करतो, अडवतो, व प्रतिबंध करतो. विश्वासी जनांच्या अवशिष्ट मंडळीतील पवित्र आत्माच सैतानी, अनीतिच्या व्यवस्थेला प्रतिबंध करतो. अनीतिच्या रहस्याचं काम आजही चालू आहे. या अवशिष्ट मंडळीच्या लोकांतरणाच्या वेळी हा पवित्र आत्माही वर जाईल. आणि मग हा पापपुरुष प्रगट होईल.
४- ख्रिस्तविरोध्याचा शेवट
द्वितीयागमन अनेक दृष्टीनं तारण योजनेचा मध्यबिंदू आहे. लोकांतरणासाठी ख्रिस्ताचं पहिलं द्वितीयगमन झाल्याशिवाय मंडळी वर घेतली जाणार नाही. पवित्र आत्मा वर घेतला जाणार नाही व जगात धर्मभ्रष्टता माजणार नाही. आणि ख्रिस्तविरोधी प्रगट होणार नाही. तेव्हा त्याचं हे पहिलं आंदोलन होय. त्याची ऐहिक समाप्ती प्रभूच्या मुखातील आत्म्यानं होईल. त्याच्या ‘मुखातील आत्मा’ म्हणजेच त्याचा ‘शब्द,’ त्याचा ‘ श्वास’ याने तो मारला जाणार आहे. पण त्याचा, कोणाचाच शेवट नव्हे. प्राण जाण्यानं देह व जिव विभक्त होणं याला ‘पहिलं मरण’, ‘शारीरिक मरण’, किंवा ‘झोप’ असं म्हटलं आहे. कुणाला, कशाला, कसलाही शेवट ख्रिस्ती धर्मविश्वासात नाही. केवळ पातकाला आहे, पातकाच्या परिणामांना नव्हे. प्रभू प्रगट होण्याच्या वेळी प्रभू त्याचा नाश करील. नाश याचा ख्रिस्ती अर्थ संपूर्ण नष्ट होणं असा नव्हे तर ‘ देवाच्या समक्षते विरहित असलेलं अनंतकाळ अग्निसरोवरातील दु:खसहनाचं जीवन’ असा अर्थ आहे. ( प्रगटी २०:२०).
५- देवाची योजना नि तिचं कारण
तारणाचा संपूर्ण योजक, संरक्षक, नि कर्ता देव आहे. पण नरकाचा योजकही तोच आहे बरं का! ( मत्तय २५:४१). नर्क स्वत:वर खरं तर पातकी स्वत:च आपल्या आचाराविचारांनी ओढवून घेतो. पण तारण योजनेसह अग्निसरोवराची समांतर योजनाही देवाचीच आहे, हे विसरू नये. पातकी म्हणजे ‘सत्यावर’ म्हणजेच ‘येशू ख्रिस्तावर’ त्याच्या सुवार्तेवर विश्वास न ठेवणारे लोक (प्रगटी २१:८). ते अनीतित आनंद मानणारे, पातकावर प्रीती करणारे, असल्यानेच ते तारणासाठी येशूवर, ‘ सत्यावर’ प्रीती करत नाहीत. म्हणून ते आपल्याच हातांनी स्वत:च्या इच्छेने आपला नाश ओढवून घेतात. पुढचं काम देव करतो. त्यांच्यावर शिक्षेचे शिक्कामोर्तब करतो. सैतानाच्या असत्य महत्कृत्यांवर ते विश्वास ठेवतात. त्यामुळे तेच स्वत:साठी कायमचा अग्निसरोवर मुक्रर करतात. केवढी शहारे आणणारी ही गोष्ट!
क्रमशः
Social