लेखांक ३
ब – प्रार्थना
अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा (मत्तय २६:२०; मार्क १४:१७; लूक २२:१४; योहान १३:५). शेवटच्या भोजनाच्या वेळी त्याच्या बरोबर फक्त बारा प्रेषितच होते. भोजना अखेरपर्यंत बाराही राहिले नाहीत, अकराच राहिले (योहान १३: ३०). त्या अकरांबरोबर तो शहराच्या तटावरून उतरणीनं किद्रोन ओहोळाजवळील बागेत गेला. आठांना आत ठेवलं, तिघांना सोबत नेऊन थोडं पुढं सोडलं, आणि धोंड्याच्या टप्प्याइतकं थोडं पुढं चांदण्या रात्रीच्या सावल्यांच्या एकांतात प्रार्थनेसाठी गेला. एवढं आपण पाहिलं. आता त्याच्या प्रार्थनेच्या आसनाकडं लक्षपूर्वक पाहू या. ख्रिस्ती शास्त्रात प्रार्थनेचं ठरलेलं एकच आसन नाही. जुन्या करारात उभं राहून हात उभारून प्रार्थना करण्याची रीत होती. प्रसंगी गुडघे टेकून ( एज्रा ९:४; १ राजे ८:५४); निकडीची गरज पडून प्रार्थना करायचीही रीत होती ( एज्रा १०:१).
आपल्या प्रभूचं उदाहरण आपल्यासाठी आदर्शच आहे. प्रार्थना जसजशी आग्रहाची, कळकळीची, आगतिकतेची, जिव्हाळ्याची होत जाते तसतसं प्रार्थनेचं आसनही बदलत जातं. आग्रहाच्या प्रार्थनेला आवश्यक असलेली सारीच्या सारी आसनं या चिरस्मरणीय प्रार्थनेत आपल्याला पाहायला मिळतात. जुन्या कराराच्या शिरस्त्याप्रमाणं तो आरंभी उभाच असतो (१ राजे ८:२२). पण त्या गंभीर जबाबदारीचं ओझं त्याच्यावर पडताच आपोआप त्याचे गुडघे टेकले जातात (१ राजे ८:५४). तसंच प्रभूचं झालं. त्या भयाण बागेतल्या गडद सावलीतल्या गाढ अंधाराचा त्याने का आश्रय घेतला, त्याला चहुकडून सृष्टीतील दुष्ट अदृश्य सामर्थ्यानं घेरलं, त्याचा जीव कासावीस झाला, मरणानं क्रूरपणे त्याच्यावर आघात करायला सुरुवात केली. मरण एका पावलावर येऊन उभं राहिलं. पातकाच्या दु:खाचा दरिया अक्रस्ताळ आक्रोशानं भेसूर भयानकतेत कण्हू लागला. रहस्यपूर्ण अंधारानं त्याला लपेटून टाकलं. त्या क्रूर विवरात प्रभू नाहीसा झाला. मरणच तेवढं शिल्लक राहिलं, वितभर अंतरावर, आ पसरून! त्यासाठी प्रभूनं एकांताच्या प्रार्थनेचा आसरा घेतल्याचं आपण पाहिलं. मरणाची कर्दनकाळ काळीकभिन्न लाटेवर लाट प्रभूवर आदळू लागली. जसजसं ते मारक रहस्य अधिकाधिक भीषण होत गेलं, तसं प्रभूचं आसन बदलत गेलं. तो उभा असतानाच या विलक्षण भक्तिला आरंभ झाला होता. तो चालत असतानाच त्याच्यावर आघात झाले होते. पण जेव्हा धोंड्याच्या टप्प्याइतका दूर गेला तेव्हा संकटाचं सारं सामर्थ्य चहुबाजूंनी कोसळताच त्यानं ‘गुडघे टेकले’( लूक २२:४१).
पातकाच्या गहन गूढाचे आघात होऊ लागले. “तो भूमीवर पडला” (मार्क १४ ३५). अखेर संपूर्ण सैतानखान्याचा तो उच्छृंकल खळबळाट जेव्हा त्याच्या भोवती खवळला तेव्हा तो आपला चेहरा धुळीत घालून जमिनीवर सपशेल “पालथा पडला” (मत्तय २६:३९). प्रार्थनेचं कोणाही पिडीत जिवाचं हे अखेरचं आसन होय.
भूमातेच्या वक्षस्थळावर जेव्हा हा देह पडतो, तेव्हा तिची मृदू माती मखमली मार्दवाने मुख कुरवाळते. दुखरा देह तिच्या मायपोटाला ममतेनं मिठी मारतो तेव्हा एक शांत समाधान देहभर खेळू लागतं. प्रार्थनेसाठी, उपासनेसाठी उसंत मिळते…मग मनातल्या मुक्या बोलीनं असो, की आक्रोशानं असो. मोकळ्या मनानं, दिलखुलास देहानं, प्रार्थना, उपासना करता येते. या तिन्ही सहजसुलभ आसनांचा उपयोग प्रभूनं नकळतच केला. एका प्रकारच्या मन:स्थितीतून दुसऱ्या मन:स्थितीत तो जात असता ओझ्यानं, प्रार्थनेच्या भारानं गुडघ्यावरून खाली येऊन जमीनदोस्त झाला. तीन वेळा त्यानं थांबून थांबून प्रार्थना केली आहे.
(१) प्रार्थनेचा विषय
प्रार्थनेचा विषय काय होता? कशाकरता होती ती प्रार्थना? फक्त एखाद्या गोष्टीची मागणी होती त्यात? की आपल्या बापाच्या सहवासाची ती मेजवानी होती? तिथं तो आपल्या शिष्याबरोबर नेहमी जात असे (योहान १८:२). तिथं जाण्याचा परिपाठच होता ( लूक २२:३९). बागेकडं येतानाची उतरण उतरतानाच तो म्हणाला होता, “ माझ्याविषयीच्या गोष्टींचा शेवट, परिपूर्ती जवळ आली आहे. तो अपराध्यात गणला गेला असं जे माझ्याविषयी लिहिलं आहे, ते माझ्याठायी पूर्ण होणं अवश्य आहे” (लूक २२: ३७). म्हणजे या सणात आपल्याला धरणार ( योहान १३:२७). त्यासाठी यहूदा मुख्य याजकाशी संगनमत करायला गेला होताच. तेव्हा ते मरण आता अगदी जवळ आलं आहे, अशी त्याची आत खात्री झाली होती. तेव्हा त्यापूर्वी आपल्या बापाशी आपण एकांत करावा, येणाऱ्या तसल्या मरणासाठी, दु:खसहनासाठी तयार व्हावं, सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं या उद्देशानं त्या मरणासाठी प्रार्थना करायला तो गेथशेमानेकडे चालला होता! परिपाठाप्रमाणं शिष्यांना घेऊन चालला होता. त्यांच्या शिक्षणाचा हा कळस होता. तारणाचं, जगाच्या उद्धाराचं, प्रात्यक्षिक पाहण्यासाठीच शिष्यांना सोबत घेतलं होतं. वधस्तंभाच्या त्या मरणासाठी प्रार्थना करावी, तयार व्हावं, मग बाप जशी वाट दाखवील तशी ती काट्याकुट्यांची वधस्तंभाची वाट चालू लागावी या उद्देशानं तो निघाला होता.
आठ जणांना सोडून तिघांना घेऊन पुढं एकच पाऊल टाकतो, तोच त्याच्यावर अकस्मात अदृश्य आघात होतो. मार्क १०: ३२ मध्ये “फार चकित होण्यास आरंभ झाला” असं म्हटलंय (मार्क १४:३३). चकितसाठी मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ ‘आश्चर्य’ असा आहे. पंडिता रमाबाई भाषांतरात ‘आश्चर्यचकित’ हा अचूक शब्द वापरला आहे. आ: ( उद्गार) + चर्य ( जे करायचं ते) = आश्चर्य. ज्याच्या समक्षतेमध्ये त्याच्या अदृश्य आघातानं आ: असा सहजच उद्गार निघतो, ते ‘आश्चर्य’ असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच ते देवाचं खास नाव आहे. यशया ९:६; किंवा शास्ते १३:१८ मध्ये ( पंडिता रमाबाई भाषांतरात ‘आश्चर्य’ हे नाव वापरलं आहे.) देव त्याच नावानं प्रकट झाला आहे. देव आपल्या समक्षतेनं मनावर, अनुभूतीवर, जेव्हा आघात करतो, तेव्हा तो मनाला धक्का देतो. तेव्हा जिवाला अकस्मात धक्का बसून हेंदकळून आ: या आदर व भीतीपूर्ण उद्गारानं बाहेर सांडतो. अदृश्य देवसृष्टीतल्या भयानक देवद्रव्याचा हा मनावर झालेला आघात होय… पण इथं ह्या रहस्यपूर्ण रात्री त्या भयानक बागेत प्रभू चालला आहे. शिष्यांकडून सरताच सृष्टीतून हे सैतानी सामर्थ्य अकस्मात प्रभूवर आघात करतं. त्यावर विशेष जोर देण्याकरताच मार्क ‘आश्चर्य’ हा शब्द वापरतो. म्हणजे नेमकं काय झालं आलं का लक्षात आपल्या? लवकरच खूनाच्या कटानं येणाऱ्या वधस्तंभावरील मरणाची प्रभू अपेक्षा करीत होता, त्यासाठी सामर्थ्य प्राप्त करायला देवाशी एकांतात प्रार्थना करायला निघाला होता. आणि अकस्मात काही सूचना न मिळता सारा सैतानखाना त्याच्यावर संपूर्ण सामर्थ्यानिशी तुटून पडतो ! काही वेळच त्याची परीक्षा घेतल्यावर तो त्याला सोडून गेलेला असतो, आणि आता या अखेरच्या आणिबाणीच्या वेळी त्याच्यावर तुटून पडतो! त्या प्राणांतिक परीक्षेनं प्रभू विव्हळ होऊन कळवळतो.
प्रश्न असा आहे, सैतान असा पुढं उभा राहिलेला. त्याची येशूची घ्यायची अखेरची परीक्षा, म्हणजे येशूचं त्यानं पुढं धरलेलं मरण. त्याचं म्हणणं आहे: बदलीचं मरण भागच आहे ना तुला? मग ते तुला ते वधस्तंभावरच का मरायचंय हा तुझा आग्रह का? चल.. मरायचं ना? मग आत्ताच हो ना मरायला तयार! इब्री २: १० ते १४ मध्ये या हकीगतीवर स्पष्टीकरण करून प्रकाश पाडला आहे. “ तोही (ख्रिस्त) त्यांच्यासारखा (आपल्या गौरवात आणलेल्या पुत्रांसारखा) रक्तमांसाचा झाला. यासाठी की मरणाची सत्ता गाजवत असलेल्या सैतानाला (ख्रिस्तानं) आपल्या मरणानं संपूर्णपणे
(शून्याप्रत) निकामी करावं.” हे सैतानाचं इथलं समरांगणच आहे, यात काही संशय आहे का? सैतानाला ठाऊक आहे की ख्रिस्ताच्या संपूर्ण संमतीशिवाय त्याच्या मनुष्यासारख्या देहाला त्याला स्पर्शही करता येणार नाही. पण त्याच्या त्या मानवी देहाला करता येईल ते करून तो त्याची प्राणांतिक परीक्षा घेऊ पाहातो. “ख्रिस्त पातकाशिवाय सर्व बाबतीत आमच्यासारखाच पारखला गेला, तरी निष्पाप राहिला” (इब्री ४:१५). हे वचन किती खोल, गंभीर, अर्थपूर्ण आहे! हे लक्षात घेता त्यानं सैतानाच्या या सूचनेला होकार द्यायचा की नाही? हा प्रश्न आहे. पण याचं उत्तर द्यायलाही तो त्याला उसंतच देत नाही. साऱ्या सामर्थ्यानिशी त्याच्या देहावर तुटून पडतो. दैवी प्रतिभेनं पौल रोम ८:३ मध्ये म्हणतो, “देवानं आपल्या पुत्राला पातकी देहासारख्या देहानं , पातकासाठी पाठवून पातकाला त्याच्या देहामध्ये पूर्ण शिक्षा ठोठावली.” त्याचसाठी प्रभू मनुष्य देहानं, माणसाची सोबत, समाधान शोधत, आपल्या बापाला विनंती करतो की, “ही घटका माझ्यावरून टळून जावो” (मार्क१४:३५).
“हा प्याला माझ्यावरून टळून जावो” (मत्तय २६: ३९).
ही घटका? (लूक २२: ५३) होय. हे आत्ताच अकस्मात उगवलेलं अवकाळी मरण ! देवनियुक्त वधस्तंभीचं नव्हे. हे नवीन मरण, कल्पना, सैतानाची सूचना माझ्यावरून टळून जावो, नाहीशी होवो. तीच ही काळघटका आणि प्याला होय. प्याला? कसला हा प्याला? (स्तोत्र २३:५; ११६:१३; यिर्मया १६:७). दुसरा आहे, दु:खाचा प्याला. हे दु:ख दोन प्रकारचं. एक माणसांच्या, दुष्टांच्या शिक्षेचं; दुसरं, देवाच्या क्रोधाचं. ‘अग्नी, गंधक, दाहक वारा, यांचा प्याला’ ( स्तोत्र ११:६). ‘ … त्यातील गाळ दुर्जनांना निथळून प्यावा लागेल’(स्तोत्र ७५:८). त्याचप्रमाणं ‘देवाच्या क्रोधाचा, कोपाचा द्राक्षारस…’ (यशया ५१:१७; प्रकटी १४:१०). वरील मरणाची घटका सैतानानं सुचवलेली, मरणाच्या मालकानं तयार केलेली काळघटका… अवकाळी मरण होय. हा प्याला दुर्जनांचा…पातक्यांचा.. त्यांच्या शिक्षेचा… पण प्रभूसाठी बदलीच्या मरणाचा. त्यानं स्वत: केलेल्या दुष्टाईचा नव्हे तर, दुनियेच्या दुष्टाईचा… त्यांच्या शिक्षेचा प्याला.
“ही घटका तू माझ्यापासून दूर कर…” “ हा प्याला तू माझ्यापासून दूर कर.”
(पुढे चालू)
Social