लेखांक ७
तो बोलत असताच त्याच्या दृष्टिपथात त्याला धरून देणारा यहूदा तिथं आलाही होता. त्याच्याकडे पाहून तो आपल्या शिष्यांना शांत खात्रीनं बापानं योजलेली घटका, मरण, त्याच्या रूपानं जवळ आल्याचं सांगून तो म्हणतो, “ पाहा मला धरून देणारा जवळ आला आहे. मनुष्याच्या पुत्राला पातकी मनुष्याच्या हाती धरून दिलं जात आहे. “पवित्र देवाच्या पवित्रतेला बदलीच्या मरणानं ग्रहण लागण्याची घटका येऊन पोहंचली. पातकाचा कायमचा पराभव होण्यासाठी पातक क्षणभर विजयी होत आहे. पवित्र देवावर पातक्यांची सरशी होत आहे. त्याच्या प्राणांतिक दु:खाची घटका टळली आहे. नुकत्याच मिळालेल्या विजयानं आता त्याची दृष्टी निवळली आहे. आता आपला लढा नेमका कोणता आहे हे त्याला स्पष्ट दिसत आहे. पातक व पावित्र्याची ही निर्णायक झुंज आहे, हे त्याला स्पष्ट दिसतंय.
“ मनुष्याचा पुत्र पातकी माणसाच्या हाती दिला जात आहे !” हे स्पष्ट समजल्यामुळंच तो आता आपल्या सहज शांततेनं पाप्यांच्या हाती पडायला तयार होतो. आणि खात्रीपूर्वक स्वर्गीय शांतीनं व विजयी वैभवानं तो त्यांना पुढच्या दु:खसहनामध्ये वाटेकरी होण्यास आमंत्रण देऊन त्यांना म्हणतो, “ उठा, आपण जाऊ!”
आता तरी आपण जाऊ या का त्याच्याबरोबर? वधस्तंभाच्या, पराजयाच्या रस्त्यानं? पुनरुत्थानाच्या विजयी रस्त्यानं? स्वर्गारोहणाच्या वैभवी रस्त्यानं?
गेथशेमानेची शिकवण: या स्पष्टीकरणाच्या आरंभीच जुन्या करारातील एका वृद्ध बापाची अन् त्याच्या पुत्राची सूचक हकीगत आपण पाहिली. ती नव्या कराराच्या हकीगतीशी कशी जुळते पाहा. हे बापलेक आहेत, देवबाप व देवपुत्र येशूख्रिस्त! त्या हकीगतीप्रमाणंच देवबाप आपल्या पुत्राचा होम करीत आहे. तिथल्याप्रमाणंच या पुत्राचीही त्या मरणापासून सुटका होते. मात्र आता इथे त्या दोन हकीगतींमधील साम्य संपतं. कारण ही तारणाच्या योजनेची परिपूर्ती आहे.
त्यामुळेच ख्रिस्ताच्या या वृत्तांताला विशेष अर्थ आहे. म्हणून देवाच्या नजरेतून अभ्यासपूर्वक त्याचा अर्थ व त्यातील शिकवण आपण पाहू. आपल्या जीवनाला त्याचे लागूकरण काय ते पाहू. इब्री लोकांस पत्रातून जुन्या व नव्या करारातील शिकवण कशी एकच आहे, ते पाहू. गेथशेमानेची शिकवणच हे पत्र आपल्याला देते. इब्री ५: ७ ते १० वचनात म्हटलं आहे 🙁 थेट ग्रीकमधून भाषांतर)
“ त्याच्या देहाच्या दिवसांमध्ये त्यानं, त्याला मरणापासून तारायला जो शक्तिमान होता, त्याला विनंत्या व विनवण्या, मोठ्या आक्रोशानं व आसवं गाळल्यानं केल्या; त्या त्याच्या आदरभावामुळं ऐकण्यामध्ये आल्या; पुत्र असता देखील, त्यानं सहन केलेल्या गोष्टींनी, तो शरणागती शिकला. नि पूर्ण होऊन, त्याची आज्ञापालन करणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारणाचा कर्ता झाला. मलकीसदेकाच्या वर्गाप्रमाणं मुख्य याजक असं नाव त्याला देवाकडून देण्यात आलं.”
या उताऱ्यातील सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे गेथशेमानेचं स्पष्टीकरण ही होय. तेथील हकीगतीला पवित्र आत्मा कोणतं नाव देतो? आदरभाव. त्यासाठी वापरलेल्या मूळ ग्रीकमधील शब्दाचा अर्थ ‘देवाच्या समक्षतेमध्ये मनात उत्पन्न झालेला भीतियुक्त आदरभाव’ असा असून त्याचा अर्थ, उपासना, भक्ती असा आहे. या प्रकाशात प्रभूला गेथशेमानेत आलेला अनुभव ही उपासना आहे का? होय आहे. आदर व खात्रीनं आम्ही हे म्हणतो. का बरं? उत्पत्ती २२:१-८ वाचा. तिथं अब्राहाम आपल्या चाकरांना म्हणतो, “इथं… राहा.. मुलगा व मी पलीकडे जातो नि उपासना करून परत येतो”
( उत्प. २२:५). मत्तय २६: ३६ या हकीगतीविषयी म्हटले आहे, “मी थोडा पुढं जाऊन प्रार्थना करीपर्यंत इथं बसा.” म्हणजे ती उपासनाच होती.
आता इथं शंका येईल की, उपासनेचा अर्थ पातकी मनुष्य नि पवित्र देव यांची देवाण घेवाणाची… देवानं तारण, देवपण, देण्याची नि माणसानं ते घेण्याची हकीगत असा आहे. पण तो एवढाच अर्थ आहे का? नाही. तेवढाच त्याचा अर्थ नाही. मानवी देहाला देवाची परिपूर्णता प्राप्त होण्याकरता देवमानवाची भेट असा अर्थ त्यात का असणार नाही?
येशूनं देवस्वरूप सोडून देऊन, रिकामं होऊन ( फिलिपै २:५) मानवी देहासारखा देह ( रोम ८:३) धारण केला नाही काय? त्याच देहाला पूर्ण होण्याची आवश्यकता नव्हती काय? म्हणूनच वरील वचनात शब्द आहेत ‘तो पूर्ण होऊन.’ पूर्ण होणं हे केवळ देहाच्या बाबतीतच खरं नाही काय? हा उपासनेचा प्रकार देहाबाबतच चालला आहे. ‘त्याच्या देहाच्या दिवसात’ या शब्दांवरून ते स्पष्ट होत नाही काय ? अशा प्रकारे येशूसंबंधात या घटनेतही उपासना शब्द वापरणं गैर नाही.
आता याच वचनांमधील आणखी एक सूचक गोष्ट पाहा. ती म्हणते, गेथशेमानेतील ख्रिस्ताच्या या कृतीबद्दल खुद्द देवबापानं त्याला एक नाव दिलं. ते कोणतं? याजक. कसला याजक? मुख्य याजक. येशू ख्रिस्तापर्यंत अनेक याजक झाले. पण ते दुय्यम होते. हा सर्वांत मुख्य याजक होय. त्याच्यानंतर कोणी याजकच उरत नाही. म्हणून त्या वचनात म्हटलं आहे, “ त्यांचा .. त्याचं आज्ञापालन करणाऱ्या सर्वांचा … तो युगानुयुगाचा याजक… मलकीसदेकाच्या वर्गातील मुख्य याजक तो झाला” ( इब्री ५:६). याजक म्हटलं की उपासना आलीच. तेव्हा ही उपासनाच होती. हे स्पष्ट आहे.
पण उपासना विलक्षण खरी. कारण या उपासनेतील यज्ञपशूही खुद्द येशू ख्रिस्तच आहे. म्हणून म्हटलंय “ त्यानं सहन केलेल्या गोष्टींनी तो शरणागती शिकला.” यज्ञपशू जसा वधासाठी तयार होतो, तसा तो तयार झाला. “ तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” हे ख्रिस्ताच्या बाबतीत गेथशेमानेचं रहस्य होतं. हे दु:खसहन कसलं होतं पाहा: “ विनंत्या… विनवण्या… फार आक्रोश… आसवं गाळणं.” यांनी ते परिपूर्ण होतं. नि देहधारी येशूच्या बाबतीत हे म्हटलं आहे, हे लक्षात ठेऊ या.
या उपासनेत काय झालं पाहा: “ त्याचे आज्ञापालन करणाऱ्या सर्वांचा तो युगानुयुग तारणकर्ता झाला. “ हे करीत असतानाच तो खुद्द ‘पूर्ण’ झाला. त्याला शरणागतीनं पूर्णता प्राप्त झाली. मरणापर्यंत स्वत:ला सोपून देण्यानं तो राजा झाला. त्यानं मरणानंच मुगूट मिळवला.
देहधारी देवाला शरणागती पत्करावी लागते. दु:खसहनानंच परिपूर्ण व्हावं लागतं ( इब्री २:१०). तर प्रियांनो, आपण तर केवळ पातकी माणसं आहोत. आम्हाला तशाच प्रकारे “ आकाशातल्या बापासारखं पूर्ण” होण्याची कशी नि किती गरज आहे बरं? गेथशेमानेचा मुख्य धडा हाच: “ दु:खसहनाकरवी देवपण”.
(समाप्त)
Social