दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 लोकांतरण व द्वितीयागमन १ व २ थेस्सलनी

भाग ३                       

अध्याय २ रा

आपण संतांना इशारा, ख्रिस्तविरोधी, सैतानाचं अनीतिचं रहस्य, ख्रिस्तविरोध्याचा अंत, देवाच्या योजनेचं स्वरूप व त्याचे कारण , हे पाच मुद्दे अभ्यासले. आता पुढे जाऊ.

(६) तारलेल्यांना ताकीद

वरील मुद्यांमध्ये अनीतिच्या रहस्याच्या व्यवस्थेविषयी आपण पाहिलं आहे. आता तारण व्यवस्थेचं विवरण करून पौल मंडळीला दोन गोष्टीची ताकीद देत आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला तोंडी व पत्राद्वारे लिखित दिलेली शिकवण दृढ धरा, आपल्या मनाची डगमग होऊ न देता, जीव खालीवर होऊ न देता स्थिर राहा. दुसऱ्या द्वितीयागमनाचा आणि तारलेल्यांचा काहीएक संबंध नाही. कारण देवानं पहिल्यानं तुमच्यावर प्रीती केली आहे. हा तर आपल्या देवाची सतत उपकारस्तुती करण्याचा विषय आहे. त्यानं आपल्याला तारण होण्यासाठी निवडलेलं असताना तुमच्यावर क्रोध ओतून तो आपला नाश का करील? आपलं तारण येशू या सत्यावर विश्वास ठेवल्यामुळं झालं आहे. तुमचं पवित्रीकरण व्हावं ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तो तुमची विशेष काळजी घेतो. पवित्र आत्मा सतत आपलं पवित्रिकरण करीतच आहे. पुढंही करीत राहील. त्याला दुखवू नका.

(७) संतांचं सांत्वन

दैनंदिन दुनियेच्या जीवनात तुमच्या समाधानाचा सागर सदैव संथच राहाणार. कारण खुद्द देवबाप व देवपुत्र आपले सांत्वन करीत आपल्याला सतत स्थिर करीत राहाणार. त्यामुळं कोणत्याही संकटाचं, भीतीचं वादळ लागून तुम्ही डगमगू नये. ते तुम्हाला स्थिर करीत राहातील. एकदाच बहाल केलेलं समाधान आपल्यासाठी क्षणिक नसून त्याच्या कृपेने युगगनुयुगासाठी आहे. तुमचं या रोजच्या तारणाचं पवित्रीकरणाचं जीवन जगत असताना ते तुम्हाला स्थिर करीत राहातील. यात केवढं समाधान साठलेलं आहे बरं!

अध्याय ३ रा – संतांना बोध व इशारा
पहिल्या पाच वचनांमध्ये संतांच्या वाढत्या कामाच्या क्षेत्राबद्दल पौल त्यांना बोध करतो. तारणााची योजना संपूर्णपणे पूर्ण होईपर्यंत संतांचं सुवार्तेचं क्षेत्र कधीही संपत नाही. सर्व काळामध्ये सर्व अवकाश व व्यक्ती ख्रिस्ताच्या स्वाधीन होईपर्यंत त्यांचा त्यामध्ये समावेश होईपर्यंत संतांचं कार्य सतत पुढे चालू राहाणं अवश्य आहे. ते कशा तऱ्हेने करायचं? तर मध्यस्थीच्या प्रार्थनेनं करायचं, हा पौल अतिशय महत्त्वाचा बोध करीत आहे. “बंधूंनो, आम्हासाठी प्रार्थना करा” (३:१). काम पौलाचं नाही, प्रभूचं आहे. त्या कामात सहकार्य म्हणजे प्रभूला सहकार्य होय. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर भाग घेता येत नसेल तर प्रार्थनेनं ते करायचं. ‘पौलावर आशीर्वाद पाठीव’ अशी मोघम प्रार्थना नव्हे. वैयक्तिक खास एकेक मुद्दा घेऊन ज्या कामात ते गुंतले आहेत, त्यासाठी प्रार्थना. त्याकाळी टपाल सेवा, आपल्याप्रमाणं उपलब्ध नसून सहस्त्रपटीने अतिशय अवघड असताना पौल त्यांचा प्रभूमधील पिता, पुढारी, श्रेष्ठ सुवार्तिक, या नात्याने त्यांच्याकडून जिव्हाळ्याच्या प्रार्थनेची अपेक्षा करतो. काही पत्रे असे ओझे घेऊन प्रार्थना करण्यासाठी असतात. त्यात चहाड्या चुगल्या नसतात. आपल्याला काही सेकंदांत प्रार्थनेची सुविधा उपलब्ध असताना आपण मिशनकार्य, सुवार्तिक, हरवलेल्या आत्म्यांसाठी एकमेकांकरता किती प्रार्थनेच्या विनंत्या करतो?

आपल्या भरभराटीसाठी स्वार्थी विनंत्याच अधिक असतात. आपण आपल्या या विषयासंबंधींच्या विनंत्या इतरांना कळवतही नाही. कारण आम्ही सुवार्तेचं काम तितक्या जिव्हाळ्यानं करतच नाही. आपल्या संपर्कातील लोकांसाठी इतरांच्या प्रार्थनेचा सहभाग कसा घ्यायचा? आणि इथे “प्रभूचे वचन गौरवानं, जलद पुढे जावं” (३:१), याची पौलाला किती तळमळ लागलीय! आहे त्या कामापुरते आपण आत्मसंतुष्ट नसावं किंवा सतत नवीन काहीतरी करत राहावं असंही नसावं. पौल करिंथात दीड वर्ष वचन शिकवत राहिला. (प्रे.कृ. १८:११). इतकेच नाही तर इफिसात दंगा झाल्यावरही तिथं तो बरेच दिवस राहिला ( प्रे. कृ १८:१८), हे लक्षात असू द्या.

दुसरी त्याची प्रार्थनेची विनंती आहे, “त्रासदायक व दुष्ट लोकांपासून प्रभूनं आपल्याला सोडवावं” (२ थेस्स. ३:२). पुढील चित्र नजरेसमोर आणा. पौलाला ओढून न्यायासनासमोर नेलं (प्रे कृ. १८:१२). नवा सभापती सोस्थनेस आला (कारण जुना आपल्या घराण्यासकट ख्रिस्ती झाला होता प्रे कृ १८:८.) त्याला न्यासनासमोर चोप दिला. पण त्या न्यायाधिशानं त्याची पर्वाही केली नाही ( प्रे कृ १८:१७). म्हणजे पौल त्यांच्या प्रार्थनेच्या सहकार्याची अपेक्षा का करतो ते तुम्हाला समजेल. आपल्या क्षेत्रात चालू असलेल्या देवाच्या कामासाठी आपण जबाबदार आहोतच. पण इतरत्र चाललेल्या कामाकरता मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठीही आपण जबाबदार आहोत.

त्याच पहिल्या पाच वचनांत आणखी एक गोष्ट लपलेली आहे. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास ती हरवून जाईल. पहिल्या पत्रात पौलाने जे तीन महत्त्वाचे घटक सांगितले होते, त्यांचा तो पुनरुच्चार करतो; विश्वास, प्रीती व धीर, किंवा सहन करणं. बदललेल्या अधिक संकटकाळाच्या परिस्थितीत तो त्यांचं स्वरूप सांगतो.

विश्वास – पौल फार विलक्षण विधान करतो. ‘ सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही’ (२ थेस्स.३:२). कोणासंबंधानं हे विधाान आहे, लक्षपूर्वक पाहा. तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. तो हे विधान ‘आमचे’ बद्दल म्हणजे पौलाच्या सुवार्तेच्या सोबत्यांबद्दल करतो. ‘त्यातल्या कित्येकांना विश्वास नाही.’ त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कारण त्रासदायक व दुष्ट ( सैतानाचे साथीदार) अशा लोकांच्या त्रासाला ते कंटाळले. त्यांचा विश्वासही डळमळला. फिलिपैमध्ये दंगा, थेस्सलनीकामध्ये दंगा, बिरुयामध्ये दंगा, करिंथमध्येही दंगा, चोहीकडे दंगाच दंगा! त्रासले आहेत ते! पौलाला आहे विश्वास. पण सर्वांनाच तसा विश्वास आहे काय? म्हणून आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करा. हे वाक्य भोसकून गेलं का तुमच्या अंत:करणाला प्रियांनो? किती खरं आहे हे! आपल्या बाबतीतही खरं आहे हे! विशेष करून दु:खसंकटांचा घाला आला असता !

प्रीती नि धीर ( सहन करणे) – पण प्रभुची स्तुती असो. पुढील वाक्यातलं समाधान तर पाहा. आमचा विश्वास ढळेल. पण तोडगा काय त्याच्यावर? “प्रभू विश्वसनीय आहे.” प्रियांनो, हे कध्धी कध्धी विसरू नका. तो प्रभू काय करील? तो स्थिर, बळकट करील, करीत राहील; एवढंच नव्हे तर त्या दुष्टापासून तो तुम्हाला आम्हाला संभाळील, सांभाळीत राहील. देवाची प्रीती .. नि प्रभूचा धीर ? तो तुमची ऱ्हदये ठीकठाक करील. त्यांना वाट दाखवील. स्थगित झालेल्यांना गती देईल. वाकडे तिकडे गेलेल्यांना सरळ मार्गाला लावील. समाधानाची ही पराकाष्ठाच नाही का? अखेर आमचा विश्वास? तो प्रभूनंच दिलेला ना? आमची प्रीती? देवानं दिलेली. आणि आमचा धीर? तोही प्रभूनंच दिलेला असेल.

अव्यवस्थित संतांविषयी इशारा – ( २ थेस्स. ३: ६-१५) हे अव्यवस्थित थेस्सलनीकाकर कोण आहेत? ते काय करीत होते? आपण मागे पाहिलं आहे. हे फाजिल धार्मिक आहेत. कामं करतात, पण फाजिल. धर्मसंजीवन झालेले. घरोघर जाऊन एकेक घर टिपून तासन तास तोच विषय कुटत बसणारे. तिथलंच जेवण बडवणारे, आपली घरकरीण, मुलंबाळं , संसाराकडे दुर्लक्ष करणारे, हे लुडबबुडे लोक आहेत. त्यांना पौल कठोरपणे सांगतो, ज्यांना काम करायला नको, त्यांना खाणंही नको. त्यांची संगत सोबतही नको. तो ऐकतच नाही. तरी त्याला शत्रू म्हणून नव्हे तर भाऊ म्हणून बोध करा. हे सांगताना आपण या बाबतीत कसं वागलो, अंग मोडून रात्रन् दिवस हातांनी कसं काम केलं ते पौल स्पष्ट करतो (२ थेस्स ३:८). तरी अव्यवस्थित वागणाऱ्यांशी शत्रुत्वानं न वागता भाऊ म्हणून त्यांना बोध करावा; कारण प्रभू जसा तुमच्यााबरोबर आहे, तसाच त्यांच्याबरोबरही आहे , अशा अर्थानं ‘तुम्हा सर्वांबरोबर असो’ असे पौल म्हणत आहे.

त्यात एक मोठा मुद्दा आहे. आपलं सामान्य, सहजस्फूर्त, महत्त्वाचं कर्तव्य कोणतं? तर नित्याचं सामान्य, दैनंदिन तारणाचं जीवन जगत राहाणं हे होय. प्रार्थनेने जागे राहून साधेपणे जीवन कंठायचं. द्वितीयागमनासाठी खास काही करायची गरज नाही. ज्यानं देव व मानवात समेट घडवणारं शांतीचं जिणं तुम्हाला बहाल केलं, तोच प्रभू तुम्हाला सर्व प्रकारची शांती देवो. प्रभू तुम्हाबरोबर आहेच. असा आशीर्वाद देऊन पौल पत्राची समाप्ती करतो. लटक्या पत्रानं त्यांचा गोंधळ उडवला होता. म्हणून खरोखरच पौलाकडून पत्र आल्याची खातरजमा करण्यासाठी तो खूणही देतो. मोठ्या अक्षरांनी खुद्द त्याच्या हातांनी लिहिलेला सलाम हीच खूण तो देतो (गलती ६:११).

२ थेस्सलनीचा संदेश

 प्रस्तावना
ख्रिस्ती देवाला एक विशेष विशेषण आहे. त्याला ‘जिवंत देव’ असं म्हणतात. त्यात त्याचं वैशिष्ट्य आहे. तो वाढता, ऐतिहासिक , खराखुरा, तरी न बदलणारा देव आहे. त्यानं स्वत:च आपलं प्रगटीकरण पवित्र शास्त्रात केलं आहे. त्याचं दुसरं प्रगटीकरण आहे की तो बाप, अनंतकालिक पिता आहे. त्यामुळं त्याला अनंतकालिक पुत्रही आहे. तोच येशू ख्रिस्त होय. देवबाप हा यहोवा होय. त्याचा आत्मा हाच पवित्र आत्मा होय. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हा एकच देव त्र्येक देव, तीन असतानाच एक, एक असतानाच तीन आहे. तसेच त्याचं एक कुटुंबही आहे. हे जगातलं सर्वात मूळ आद्य कुटुंब होय. ख्रिस्ती देव एक कुटुंब आहे. ते वाढतं कुटुंब आहे. सृष्टीनिर्मितीच्या, मानवनिर्मितीच्या कितीतरी अगोदर ही निर्मिती सुरू झाली आहे. ‘ परात्पराच्या देवकुमारांचा’ निर्देश पवित्रशास्त्रात आहे ( स्तोत्र ८२:६; ईयोब ३८: ७). “पृथ्वीचा पाया घातला तेव्हा सर्व देवकुमारांनी जयजयकार केला” म्हणजे त्यांची उत्पत्ती सृष्टीनिर्मितीपूर्वीची आहे. (यहेज्केल २८:१३) एवढीच माहिती देवानं आपल्याला दिली आहे. तेवढीच आपण मान्य करायची. प्रगट न झालेलं रहस्य देवाचं आहे. ते प्रभूला भेटू तेव्हा उघड होईल.

देवाच्या कुटुंबाचं स्वरूप असं आहे: देव पवित्र असल्यानं त्याचं कुटुंबही पवित्र आहे ( लेवीय १९:२). देव प्रीती आहे म्हणून ते प्रीतीनं भरलेलं आहे (१ योहान ४:१६). सामर्थ्यही त्याचंच आहे. स्तोत्र ६२:११ नुसार त्यानं तीनदा ते प्रगट केलं आहे. देवाच्या कुटुंबाचं अक्षय जीवन पवित्रता, प्रीती, सामर्थ्य या तीन सत्यांनी भरलेलं आहे. म्हणजेच अमर शील, सनातन नीतिमत्ता, शाश्वत सामर्थ्य हे त्याचं लक्षण आहे. हे त्र्येक देवपण आहे. एकमेकात गुंफलेल्या तीन अविष्कारांनी बनलेली ही एकच व्यक्ती म्हणजे देव आहे. ते त्याचे सद्गुण, त्याच्या बाहेरचे, त्याला बांधणारे नियम, त्याच्यामधली तत्त्वे नाहीत… गुण, नियम, तत्त्वे, ही मानवसृष्टीत असतात. ख्रिस्ती देव हा मूर्तिमंत पवित्रता, प्रीती, सामर्थ्य आहे.

या स्वयंभू देवामध्ये पातकाचा संभव सुतराम शक्य नाही. निर्मित व्यक्तीत मात्र पातक शक्य आहे. ते गर्वाचं, उन्मत्त ऱ्हदयाचं पातक देवकुमारांकडून झालं (यहेज्केल २८:२; १२-१७). तो पूर्णतेची मुद्रा होता… त्याची नेमणूक पृथ्वीवर होती. तो जगाचा सरदार, देव होता. पृथ्वीचं राज्य त्याचं होतं ( मत्तय ४:८).पृथ्वीवरील राष्ट्रांवर त्याच्या दुतांची देखरेखीसाठी नेमणूक होती. पाखर घालणाऱ्या करुबानं देवाविरुद्ध बंड केलं. त्याला व त्याच्या बरोबरच्या दुतांनाही स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. सैतानाच्या पातकाचं कारण त्याचं राज्य होय. त्याच्या पातकामुळंच देवाच्या कुटुंबाचं रूपांतर देवाच्या
‘नीतिमत्तेच्या’ राज्यामध्ये झालं. सैतानाचं राज्य झालं नसतं तर देवाच्या कुटुंबाचं देवाच्या राज्यात रूपांतर होण्याचं काही कारण नव्हतं. आता देवाचं राज्य आहेच आहे. त्याचे पवित्र दूत आहेत. त्यांचं काम तारण पावलेल्यांचं रक्षण करणं हे आहे ( इब्री १:१४; मत्तय १८:१०; २ राजे ६:१६-१७). २ राजेमधली वचनं नीट वाचा. देवाच्या सेवकाचं रक्षण करायला जसं देवाचं सैन्य आहे, तसं अरामी सैन्याची मदत करायला सैतानखान्याचं दुरात्म्यांचं सैन्यही होतं. म्हणून आपल्या या अभ्यासाला “ दुहेरी दुनियेचं रहस्य” हे शीर्षक योग्य वाटतं. त्या दुनिया दिसत नाहीत. पण आहेतच. “आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर या जगाचा अधिपती, आकाशातील दुरात्मासमुह यांबरोबर आहे” ( इफिस ६:१२). आणि “ …तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य नाहीशी केल्यावर ख्रिस्त देवबापाला राज्य सोपून देईल. कारण सर्व शत्रू आपल्या पायाखाली ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे” (१ करिंथ १५: २४-२५). नि अगदी शेवटी देवाची मंडळी म्हणजे त्याच्याबरोबर राज्य करणारे तेवढे राहातील. सर्व देवाच्या परिपूर्णतेनं भरून जाईल. देव आपली परिपूर्णता त्या सर्वांना देईल. ते सर्व मिळून परत देवाचं कुटुंब होतील. पवित्रतेचं, प्रीतीचं, सामर्थ्याचं कधीही न खुंटणाऱ्या सुखासमाधानाचं राज्य सुरू होईल. ते अक्षय चालू राहील. आता या पार्श्वभूमीवर दुसऱ्या थेस्सलनीचा निरोप स्पष्ट समजेल, तो हा :

१- अनीतिचं रहस्य; २-अनीतिचा पुरूष; ३- अनीतिचा अंत.

१. अनीतिचं रहस्य – म्हणजे मानवी बुद्धीच्या टप्प्यापलीकडील मानवाला न समजणारी गोष्ट. पण ख्रिस्ती देव म्हणजे सर्व रहस्यांचा मालक जो देव त्यानं प्रगट केलेली गोष्ट (अनुवाद २९:२९) ती कोणती? पातक, आज्ञाभंग, अनीति. ह्या साऱ्या एकच आहेत. देवाचं जसं राज्य आहे, तसं सैतानाचंही त्याला प्रतिस्पर्धी राज्य आहे. त्याचं ते साम्राज्य आहे. त्याचा सम्राट सैतान आहे. त्यानंच पहिल्यानं पातक केलं.त्याच्या कामाचा, राज्याचा प्रजेचा नायनाट करायलाच देवाचा पुत्र आला. तेच त्याचं काम असत आलं आहे ( १ योहान ३:८). जगात दु:ख का? कुठं बिघडलंय? तर सैतानानं हे केलेलं पहिलं पाप जगाला भोवतंय. कम्युनिझम, लोकशाही, कामगारशाही, किंवा जगातील कोणीही देशभक्त, पुढारी, दलितांचे कैवारी, धर्मसंस्थापक, अथवा आरोग्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, समाजशास्त्र, मानवी विचारातून आलेलं काहीही असो, सर्वांना अनीतिच्या, पातकाच्या रहस्याचं अज्ञानच आहे. हा निरोप थेस्सलनीच्या पत्रांचा आहे

२. अनीतिचा पुरूष : पापपुरुष, नाशाचा पुत्र हा एक ऐतिहासिक पुरुष असणार आहे. कारण हा दीर्घकालीन लढा, प्रदीर्घ झुंज, स्वयंभू त्र्येक देव आणि निर्मितीतून स्वत:हून झालेला सैतान त्रयीमध्ये चालू आहे. इकडे एका बाजूला त्र्येकातील पहिली व्यक्ति स्वयंभू यहोवा आहे. दुसऱ्या बाजूला पूर्णतेची मुद्रा असा निर्माण केला असता पतन पावलेला पाखर घालणारा करूब, सैतानखान्याचा सम्राट सैतान आहे. इकडे सनातन देहधारी पुत्र येशू ख्रिस्त आहे, तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक देहधारी ख्रिस्तविरोधी आहे. इकडे अनीतिच्या रहस्याला प्रतिबंध करणारा अदृश्य पवित्र आत्मा आहे, तर तिकडे ख्रिस्तविरोध्याचा प्रचारमंत्री खोटा संदेष्टा आहे. २ थेस्सलनी मध्ये एक ऐतिहासिक आणीबाणीची घटना सांगितली आहे. त्यावेळी पापपुरुष प्रगट होईल. देवपुत्र येशू ख्रिस्त देखील द्वितीयागमनातील दुसऱ्या पुनरागमनात पृथ्वीवर उतरेल.आणि आपल्या मुखश्वासाने त्याला मारून टाकील.

३. अनीतिचा अंत : त्याला मारलं हा शेवट नव्हे. त्याला तो नाहीसं करील म्हणजे व्यक्ती निकामी करील. संपूर्णपणे अस्तित्व नाहीसं करील. पाप नाहीसं करील. पण पातकी अनंतकाल दु:खसहन करीत शाश्वतभर त्याच स्थितीत राहातील. अनीति नष्ट करण्याचं साधन, देवाची मंडळी होय. ही सारी नाहीशी होतील तेव्हा देव त्याच्या पूर्णतेनं सर्व भरून टाकील.तो देवसमाज व देवकुटुंब, युगानुयुग पवित्रतेचं सर्वकाळ टिकणाऱ्या सामर्थ्याचं, सार्वकालिक समाधानाचं अव्याहत जीवन चालू राहील. धन्य देवबाप, देवपुत्र, देवपवित्र आत्मा! आणि आम्हीही!

समाप्त

Previous Article

लोकांतरण व द्वितीयागमन – १ व २थेस्सलनी

Next Article

ख्रिस्ताला समर्पण करण्याची मला भीती वाटते

You might be interested in …

देव एका अपरिचित गावात वाढला डेविड मॅथिस

जुन्या करारात नाझरेथ गावाचा कुठेच उल्लेख नाही. सर्व वंशावळ्या व ऐतिहासिक वृत्तांताचा विचार करा आणि आज तरी आपल्याला दिसते की त्यामध्ये जरी देश, भूगोल आणि जागा याबद्दल काळजीपूर्वक लक्ष दिले आहे तरी ह्या जुन्या वसाहतीचा […]

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो…”

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” योहान ७:३८. येशूने असे म्हटले नाही की,जोमाझ्यावर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाचा अनुभव येईल. तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून त्याला जे काही […]

लेखांक १: कृपा आणि वैभव – ख्रिस्ताचे परमोच्च गौरव

स्टीव्ह फर्नान्डिस ११ सप्टेंबरला अमेरिकेत ट्वीन टावरवर अतिरेक्यांनी केलेला हल्ल्यानंतर लॅरी किंग यांनी दूरदर्शनवर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात भिन्न विश्वास असलेल्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. त्यांना प्रश्न करण्यात आला की , या […]