लेखक – सॅमी विल्यम्स
प्रस्तावना
भाग २ रा .
ईयोब १:१ ते ५ प्रस्तावनेच्या पहिल्या भागात आपण दोन प्रश्न अभ्यासले. आता ३ रा प्रश्न अभ्यासू.
प्रश्न ३ रा – ईयोब कोण होता?
वचन १- ईयोब मिद्यानास लागून असलेल्या ऊस देशातला होता. हा इस्राएलचा देश नाही. इस्राएल पूर्वीच्या या विदेशीयाला तारणाची संकल्पना किती स्पष्ट होती हे आपण मागील धड्यात पाहिले. त्यामुळे केवळ इस्राएलांनाच नव्हे तर सर्व राष्ट्रांना तारणात सामावले असल्याची साक्ष देणारे हे पुस्तक आहे. त्यामुळे देवाने इस्राएलांनाच का निवडले असा प्रश्न कोणी करू नये. विदेशी त्यापूर्वीच देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा भाग आहेत. विलापगीत ४:२१ वाचा. हाच ऊस देश निर्मितीनंतरच्या इतिहासाच्या किती जवळ होता पहा.
ईयोबाचे मूळ नाव ओयाम होते; त्याचा अपभ्रंश ईयोब. आणि ईयोब या नावाचा अर्थ ‘छळ झालेला’ किंवा ‘हल्ला झालेला’.
देवासमागमे चालणाऱ्या ईयोबाचे स्वभावगुण
त्याची चार वर्णने आहेत. सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा, पापापासून दूर राहाणारा.
१. आंतरिक वाटचाल– सात्विक म्हणजे निर्दोष पूर्ण. तो पापरहित होता असे आपण म्हणू शकतो का? नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत म्हणजे उणे पडले आहेत. रोम ३:२३. ईयोब १३: २३ नुसार इयोबाचा मुळातच आपण पापी आहोत यावर विश्वास आहे. मग तो निष्पाप असणे कसे शक्य आहे? याचा अर्थ तो निर्दोष वागायचा प्रयत्न करत असला पाहिजे. सात्त्विक या शब्दाचा अर्थ समजायला आपण यहोशवा २४:१४ वाचू. येथे हा शब्द प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, मन:पूर्वक या अर्थाने वापरला आहे. आपण ख्रिस्ती वाटचालीत निर्दोष नसलो तर आपण अप्रामाणिक व ढोंगी असतो. देवासमोर वागावे तसे माणसांबरोबर वागत नसतो. त्याचे वागणे स्वच्छ स्पष्ट आंतरिक आत्मिक वाटचाल देवाला भिऊन करणारे होते .
२. बाह्य वाटचाल – सरळ म्हणजे एकात्मतेने, अखंडपणे न बदलणारे, प्रामाणिकपणे परस्परांशी असलेले देवासमोर बाह्य वर्तन. ईयोब ३१:१६ ते २१ मध्ये ईयोबाचे वर्तन वाचा. पूर्ण औदार्याने गरीब व गरजूंसाठी धनाचा वापर करणारा, कृपा दया दाखवणारा, अनाथांना आसरा देणारा, अन्नवस्त्रे पुरवणारा होता.
३. वरील वाटचाल – देवाचे भय बाळगणारा; ही इयोबाची स्वर्गाकडे पाहून होणारी वाटचाल. अनुवाद ६:२ नुसार सुज्ञता, ज्ञान प्राप्त होण्यासाठी देवाचे भय धरणे व त्याचे आज्ञापालन करणे हे तो करत होता. आपल्याच नियमांनी, नीतीने, कल्पनांनी, मतप्रणालीने तो चालत नव्हता तर देवाच्या नियमांनी चालत होता. देवाच्या सत्तेच्या, बलाच्या, सामर्थ्याच्या अधीन रहात होता. हे नियम त्याला कसे समजत असतील? आदामाने पवित्र काळात देवाकडून शिकलेले ज्ञान मौखिक पिढ्यांपिढ्या चालत आलेले असणार. त्याचा अभिमान देवामध्ये होता. ही इयोबाची नित्याची वाटचाल अशी स्वर्गाच्या दिशेने होती.
४. आगेकूच चालू ठेवणारी वाटचाल- पापापासून दूर रहाणारा म्हणजे पापाचा धिक्कार करणारा. सतत आगेकूच करण्याची वाटचाल. अधर्मापासून मागे वळणारा. देवासमागामे त्याचे चालणे असे सतत वृद्धिंगत होत होते. आपल्यालाही रोज पापापासून दूर रहाण्याची जाणीव होत राहाणे गरजेचे आहे. आपण जितके देवाला भिऊन राहू तितके आपण अधर्मापासून दूर राहू; कारण फिलिप्पै २:१३ नुसार आपले देवाच्या योजनेनुसार योग्य इच्छा करणे व कृती करणे आपल्यासाठी देव सिद्धीस नेईल. १ पेत्र १:१७-१९ चा संबंध थेट आपल्या वरील अभ्यासाशी लागतो. त्यानुसार येशूच्या निर्दोष रक्ताने आपण पापमुक्त झालो आहोत म्हणून आपण निर्दोष जीवनाचा आग्रह धरणे अत्यावश्यक आहे. कारण अखेर न्यायी देवापुढे आपल्याला उभे राहावे लागणार म्हणून पाप करताना आपला थरकाप व्हायला पाहिजे.
ईयोबाची देवासमागमे होणारी वाटचाल ही अशी चारपदरी आहे. सारांशाने एव्हरेस्ट शिखराप्रमाणे त्या काळात नम्रपणे कित्तादाखल वागणारा ईयोब ही त्या पिढीतील व्यक्ती आहे. असाच माझ्यामधून येशू दिसू दे अशी आपणही इच्छा करू.
देवाकडून आशीर्वाद पावलेला – वचने इयोब १:२ व ३ त्याला ७ पुत्र व ३ कन्या झाल्या. सात हा पूर्णतेचा आकडा. नामी रुथेला म्हणते, तू मला सात पुत्रांसारखी आहेस १ शमुवेल २:५ पण वाचा. सात पुत्रांची तुलना आशीर्वादाशी करतात. कारण त्यामुळे कुटुंब संपन्न होते.
वचन ३
अ- भौतिक आशीर्वाद
१- सात हजार मेंढरे – वस्त्रे, खाद्य, चर्मोद्योग, व अर्पणासाठी मेंढरांचा वापर होत असे. यावरील सर्व उद्योग चालवणारा तो मोठा उद्योजक होता. त्यातून गरजूंना औदार्याने मदत देणारा होता.
२- तीन हजार उंट – उंटांचा वापर दळणवळण व वहातुकीसाठी केला जाई. हा उद्योग किती प्रचंड प्रमाणात असेल पहा. या उद्योगातही औदार्याने वापर करणारा.
३- बैलांच्या पाचशे जोड्या – चलन म्हणून आणि शेतीसाठी त्यांचा वापर होत असे.
४- शेतीच्या उत्पन्नातून शेती उद्योग, धान्य, भाजीपाला, मोठी कोठारे चालवणे, हा उद्योग.
५- पाचशे गाढवी- यावर धोब्याचा उद्योग व कष्टाच्या कामांसाठी वापर केला जात असे.
ब- पूर्वेकडील सर्व लोकांत तो थोर होता.
क- त्याच्या घरात भरपूर नोकर चाकर असणार.
अशा प्रकारे नीतिमान ईयोब आशीर्वादित होता. मग आशीर्वादाचे कारण ईयोबाचे नीतिमान असणे हे होते का? येशू मत्तय ५:४५ मध्ये म्हणतो देव वाइटांना व चांगल्यानाही आशीर्वाद देतो. धार्मिकांना आशीर्वाद देतो असे म्हटले नाही. तर दुसरीकडे तो म्हणतो, उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाणे सोपे नाही. आणि १ तीम.६:१७-१९ मध्ये धनावर नव्हे तर देवावर भाव ठेवावा असा बोध केला आहे.
वचन १:४ व ५
देवासमोर तो नम्र होता – भोजन समारंभाचे आयोजन करून एकत्र कौटुंबिक ऐक्याने ते सहभागिता ठेवत असत. त्यात प्रार्थना, यज्ञ, जेवण याचा समावेश असे. ईयोबाच्या मुली अविवाहित असाव्यात. ईयोब मध्यमवयीन असावा. ईयोब १५:१० वाचा. देवाच्या क्रोधापासून दूर रहाण्यासाठी ईयोब आपल्या मुलांच्या पापांचाही इतका विचार करत असे की प्रत्येक भोजन समारंभानंतर व रोज प्रात:काळीही उठून प्रत्येक मुलासाठी अर्पण करून त्याचे शुद्धीकरण करी. तो मान्य करतो की तो स्वत: व त्याची मुलेही पापी आहेत. आशीर्वाद प्राप्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नम्रपणे देवावर विश्वास ठेवत राहणे. नीति. १४:२६ सारखी आपली मुले विश्वासी निपजावीत म्हणून ईयोबाप्रमाणे आपल्या घरीही नित्य उपासनेची वेदी असावी आणि आईवडिलांमधील विशेषत: बापाने ही आत्मिक सेवेची भूमिका बजावावी. देवाविषयी मुलांचा योग्य दृष्टिकोन घरातच दृढ केला जावा. कारण देवामध्येच त्यांचे संरक्षण आहे.
Social