मार्शल सीगल
ख्रिस्तजन्माच्या आनंदाचे इतक्या पटकन नव्या वर्षाच्या चिंतेत रूपांतर का होते?
बहुधा याचे कारण असेल की ख्रिस्तजन्माचा जो आनंद वाटत होता तो ख्रिस्तामध्ये खोलवर रुजलेला नव्हता.
ज्या वेळी आपण बक्षिसे वेष्टणात गुंडाळत होतो तेव्हा आपली काळजी आपण छुपवत होतो. त्याला आपण आपल्या मर्जीने आमंत्रण केले, त्याचे स्वागत केले. हे येशूबाळासबंधी आहे असे आपल्याला वाटत होते पण आपण आपली ओझी एक दोन आठवड्यांसाठी रोषणाई, कार्यक्रम, फराळ यामध्ये दडवून ठेवत होतो. त्याच्यावर खऱ्या रीतीने भरवसा टाकायला आणि आपल्या चिंता त्याच्यावर सोपवायला आपल्याला भीती वाटत होती.
मग जानेवारी महिना पुन्हा दार ठोठावू लागला – पुन्हा जबाबदाऱ्या उचलायला, निर्णय घ्यायला, नवे निश्चय करून ते कायम ठेवायला, चालढकल सोडून द्यायला. चिंतेने अचानक आपल्या आनंदावर गडद सावली टाकली आणि आपली ह्रदये त्यापुढे उभी राहायला झगडू लागली.
आपल्यापैकी अनेकांना वर्षाच्या अखेरीस इतके असुरक्षित आणि चिंताग्रस्त वाटण्याचे कारण देव जे सामर्थ्य, आशा, हेतू देऊ शकतो त्याऐवजी बक्षिसे, उत्सव यांनी आपल्याला देवाकडे न्यावे अशी आपण आशा ठेवली.
मी जिवानिशी तुझा शोध करीन
जेव्हा दावीद राजाचा आत्मा शुष्क आणि चिंताग्रस्त होता तेव्हा कुठे जायचे हे त्याला ठाऊक होते. “मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे” (स्तोत्र १४३:६).
तो गर्तेत असताना जेव्हा भविष्य अस्थिर आणि अंधुक दिसत होते तेव्हा दाविदाने जिममध्ये प्रवेश घेतला नाही, किंवा डायट करण्याचे फॅड उचलले नाही, किंवा आणखी एक अल्पकालचा निश्चय केला नाही. त्याला केव्हाही तृप्त करणाऱ्या एकाच एका विहिरीकडे तो रांगत गेला- ते खोल जीवनी पाणी पिण्यासाठी. कमकुवतपणाच्या बिछायतीवर दु:खसहन, विरोध, मनोवेदना यांना त्याने यासाठी मुभा दिली की त्यांनी त्याला देवाकडे घेवून जावे.
जर आपल्या चिंता आणि तृष्णा यांना आपण खुद्द देवाकडे नेण्यास मुभा दिली तर या नव्या वर्षाच्या आरंभी आपल्याला ज्याची खरी गरज आहे ते तो आपल्याला त्याच्या कृपेने पुरवील. दावीद त्या स्तोत्राच्या उरलेल्या भागात जशी साक्ष देतो तसे देव आपल्यालाही शक्ती देईल, पण ती आपली नसेल. आशा देईल जी अमोल असेल, स्पष्ट विचार देईल पण नियंत्रण नाही, गौरव देईल पण ते आपल्यासाठी नसेल.
थकलेल्यांना शक्ती
आज आपल्याला मिळणारी शक्ती आपण आपल्याला मिळणाऱ्या जेवणात किंवा काही मिनिटे मिळणाऱ्या झोपेत मोजतो. पण आपल्याला जी शक्ती अधिक हवी आहे ती नेहमीच आध्यात्मिक सामर्थ्य आणि आपल्या परीक्षा, पापाविरुद्ध लढा आणि मोह यामध्ये टिकून राहण्याचा निर्धार यासाठी असणार.
“वैरी माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहे; त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळी मृत झालेल्यांप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लावले आहे. माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे. मी प्राचीन काळचे दिवस मनात आणतो; तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो; तुझ्या हातच्या कृतींचे चिंतन करतो. मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे” (स्तोत्र १४३:३-६).
जेव्हा दाविदाचे स्वत:चे सर्व उपाय संपले – भीती आणि विरोध यांनी तो गळून गेला – तेव्हा त्याने स्वत:च्या अंतरंगात शोध केला नाही. तर ज्याने त्याला पूर्वी अनेकदा मदत केली आणि त्याच्या बाजूने लढला त्याच्याकडे त्याने आपले रिकामे हात पसरले.
पापी जनांना आशा
दाविदाला ठाऊक होते की त्याच्या विरुद्ध पाप करणाऱ्यांचा केवळ तो बळीच नाही तर तो स्वत:च देवाच्या क्रोधाला पात्र आहे. त्याने केलेल्या पापामुळे देवाची दया व आधार याला तो पात्र नव्हता.
“हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्यांसारखा होईन. प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे”
(स्तोत्र १४३:७-८).
दाविदाच्या आनंदाचे गुपित म्हणजे त्याला ही जाणीव होती की त्याच्यासारख्या पापी माणसाला ह्या प्रकारचे सुख आणि आनंद कधीच मिळायला नको होता. देवाने जर दाविदाकडून आपले मुख फिरवले असते तर ते रास्तच असले असते. पण त्याऐवजी दाविदावर त्याच्या वात्सल्याचा वर्षाव करण्यामध्ये देवाला अत्यानंद आहे.
भविष्यासबंधी स्पष्टता
दाविदाला दररोज शेकडो अशक्य निर्णय घ्यावे लागत होते – तो राजा असल्या कारणाने. पण तो जेव्हा पळून जात होता तेव्हाही. या सर्व वेळी व प्रचंड तणावाखाली आणि भयानक परिस्थितीमध्ये त्याला सुज्ञता व समंजसपणाचा वापर करावा लागत होता.
“प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव; कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो” (स्तोत्र १४३:८,१०).
आज नव्या वर्षात पदार्पण करत असताना कठीण निर्णय घेताना जी स्पष्टता हवी असते ती तपशीलवार योजना करून किंवा अर्थसंकल्प करून किंवा वेळापत्रक आखून येणार नाही तर आपले डोळे देवाकडे वर करून – त्याच्या वचनातून त्याला अधिक जाणून घेऊन, प्रार्थनेत त्याची वाट पाहून आणि आपला त्याच्यावरील आनंद खोल करून येणार आहे.
देवपित्याला गौरव
दाविदाचा देवामधील आनंदाचा मुक्त करणारा भाग हा आहे की हे सर्व अखेरीस त्याच्याविषयी नाही. आपला आनंद आपण पटकन विसरून जातो कारण आपण या सर्वाच्या केंद्रस्थानी आपल्या स्वत:ला ठेवतो. पण खरा व खोल मानवी आनंद हा तशा मोहापासून मुक्त असतो आणि जिवंत देवामध्ये आणि त्याच्यामागे लपण्यास त्याला आवडते.
“हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे; तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटांतून बाहेर काढ.
तू आपल्या दयेने माझ्या वैर्यांचा नायनाट कर; माझ्या जिवाला गांजणार्या सर्वांचा नाश कर; कारण मी तुझा दास आहे” (स्तोत्र १४३:११-१२)
तुझे नाव माझ्याद्वारे महान कर. जगाला दाखव की तू किती दयावान, उदार, सामर्थ्यवान आहेस…जरी दावीद सुटका आणि सुरक्षेची याचना करत आहे तरी त्याला देवाचे गौरव हवे आहे दाविदाचे नाही. त्याला त्याच्या लोकांनी (आणि शत्रूंनी) हे देवाने केले हे पाहण्याची इच्छा आहे. तुम्ही देवाला नेहमी विचारता का की माझ्या जीवनात – माझ्या नात्यांमध्ये, माझ्या शेजाऱ्यांमध्ये, माझ्या सेवेमध्ये, माझ्या कामामध्ये – ये आणि अशा प्रकारे की त्यामुळे तू उंचावला जावास; मी नाही? जर देवाचे महान गौरव हाच आपला महान आनंद असेल तर आपणही दाविदासारखी प्रार्थना करायला सुरुवात करू.
ह्या वर्षाच्या आरंभी आपले अस्तित्व का आहे यावर विचार करणे अगदी उत्तम आहे आणि मग त्या एकाच उद्दिष्टाभोवती आपले जीवन जगण्यासाठी या वर्षात प्रवेश करा. ही शिस्त लावण्याची समस्या नाही तर आनंदाची आहे. त्याच्या नावासाठी जगण्याच्या खोल आनंदापासून कोणत्या गोष्टींनी तुम्हाला वंचित केले यावर विचार करा. आणि जसे तुम्ही आपल्या जीवनाची पुनर्रचना करून देवामधील तुमचा आनंद वाढवत जाल, आणि तुमचा जीव शुष्क भूमीप्रमाणे त्याच्यासाठी तान्हेला होईल. तसे तुम्हाला परीक्षांमध्ये मार्गदर्शन मिळेल, तुम्ही पापापासून दूर जाल, सुज्ञता व समंजसपणामध्ये वाढाल आणि सर्व काही त्याच्या गौरवासाठी असेल.
Social