अगस्त 30, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

त्याचे भग्न झालेले शरीर उठले

ग्रेग मोर्स

… त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू , यावर मी विश्वास ठेवतो.  ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला… (प्रेषितांचा मतांगिकार)

शिष्यांपैकी कोणीच हे पूर्ण होणार म्हणून त्यावर सही केली नव्हती.

जेव्हा येशूचा जयोत्सवाने यरुशलेमेत प्रवेश झाला तेव्हा त्यांना वाटले होते की ही विजयाची कूच आहे. राज्यामध्ये प्रवेश करण्याचा आरंभ. त्यांना वाटत होते की आपण युद्धाहून विजयाने परतत आहोत. आणि द्वारामध्येच  होसान्नाच्या घोषणांनी झालेले स्वागत हे त्यासाठी  उचित होते (मार्क ११:९). त्यांनी क्रूसाची अपेक्षाही केली नव्हती – जरी येशूने अनेकदा हे स्पष्ट भविष्य केले होते. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”… “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” (लूक ९:२२, ४४).

तरीही कोणत्याही शिष्याने हे येणार असल्याचे गणले नव्हते. अगदी पेत्र जो खडक त्याने येशूला बाजूला घेऊन त्याचा निषेध करून म्हटले, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही” (मत्तय १६:२२). येशूने म्हटले त्याचे कारण “देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे”  (मत्तय १६:२३). सैतानाप्रमाणेच पेत्रानेही रक्त न पाडता राज्य मिळवण्यासाठी मोह घातला.

परंतु शिष्यांना विश्वास ठेवण्यास कठीण असणारे मशीहाचे  दु:ख सहन, वधस्तंभ आणि मृत्यू – ही स्वर्गासाठी निरखून ठेवण्याची बाब होती. “संदेष्ट्यांनी तुमच्यावर होणार्‍या कृपेविषयी पूर्वी सांगितले,  ख्रिस्ताची दु:खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी” (१ पेत्र १०-१२); यांकडे देवदूत मोहिनी घातल्यासारखे टक लावून पाहत होते.  मोशे आणि एलिया रूपांतराच्या डोंगरावर खाली आले आणि ते एकाच विषयावर बोलणार होते: “आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते” (लूक ९:३०-३१). त्याचे जाणे – अक्षरश: त्याचे निर्गमन. तर मग यरुशलेमेत येशूने काय मिळवले?

ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दु:ख भोगले

या पुरातन मतांगिकारात मरीया आणि येशू यांच्यासमवेत आणखी एक नाव घालणार असाल तर ते कोणाचे? योसेफ? दावीद? आदाम? इथे एकाच नावाचा उल्लेख आहे; ‘पंतय पिलात.’

आपल्याला ठाऊक आहे की येशूला मरणदंड देण्यास तो कां कू करत होता. तो निर्दोष आहे असे त्याला वाटले. अर्धवट मनाने का होईना पण येशूला जिवंत सोडण्याचे त्याने प्रयत्न केले. आणि जरी त्याने हात धुतले तरी अध्यक्षपदी तोच अधिकारी होता आणि त्याने मुकाट्याने संमती दिली. आणि त्याची अपकीर्ती झाली की: “ज्याने पंतय पिलाताच्या वेळी दु:ख भोगले.” इतिहासाने दाखवून दिले की हा खलनायक देवाविरुद्ध आणि त्याच्या मशीहाविरुद्ध उठलेल्या लोकांचा प्रतिनिधी आहे.

     स्तोत्र २ मध्ये असलेल्या दुष्टपणाशी, पेत्र पिलाताचा  संबंध लावतो. “राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले; कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे” (प्रेषित ४:२५-२८).

पिलात आणि हेरोद यांनी देवाच्या पुत्राला ठार मारण्यासाठी हात मिळवले  (लूक २३:१२). पिलाताला येशू निर्दोष आढळला आणि तरीही जमावाला खूष करण्यासाठी त्याने त्याला मरणदंड दिला (मार्क १५:१४-१५).

आणि हा केवळ मानव नव्हता तर देवाचा जिवलग पुत्र होता.

त्याला वधस्तंभी  दिले आणि जो मरण पावला

पिलाताने येशूला फटके मारून वधस्तंभावर मारण्यासाठी पाठवले. आधुनिक वाचकांना नवल वाटेल की मार्काने हे इतक्या थोडक्यात कसे लिहिले की, “तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले”  (मार्क १५:२४). मार्क हे सत्य केवळ पाच शब्दांत सांगतो. तर तो अजून काही का सांगत नाही? कदाचित ज्यांनी हे पहिले त्यांना अजून तपशील देण्याची गरज नव्हती.

‘वधस्तंभी दिले’ ह्या शब्दांमध्ये इतकी दहशत होती की ती मनापुढे अर्धवट मेलेल्या, झाडाला खिळलेल्या, रक्ताळलेल्या, नग्न मनुष्याचे चित्र डोळ्यासमोर आणत असे.  तेथे ते वेदनेत टांगलेले असत. तेथे ते लांबवलेले  मरण लवकर यावे म्हणून आक्रोश करत असत. तेथे ते पाहत होते, ऐकत होते, जाणत होते – पण हलू शकत नव्हते. मध्यंतर नाही, बाथरुमला जाण्यास संधी नाही. डोळ्यावर येणारा सूर्य झाकण्यास कोणाची मदत नाही, उघड्या जखमांवर बसलेल्या माशा हाकलता येत नाही. तेथे माणूस हूकाला अडकवलेल्या  किड्यासारखा लोंबकळत असतो -उघड्या नरकाचे तोंड त्याला गिळण्यासाठी आ वासून पुढे असते… आणि त्यांनी त्याला वधस्तंभी दिले.

आणि जसा तो वेदनांनी व्याकूळ होत होता तसे त्याचे तुच्छ मरण अनेक डोळ्यांपुढे, कानांनी आणि अपमानाने दिसू लागले ( मत्तय २७:३९-४४). येशूने पराकाष्ठेचे सहन केले. त्याने समाजासमोर सहन केले. त्याने त्याच्या पित्याच्या नीतिमान क्रोधाखाली सहन केले. झाडावर टांगलेला असताना तो देवाच्या शापाखाली होता  
(अनुवाद २१:२२-२३). केवळ लोकच त्याच्याविरुद्ध होते असे नाही. “त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले” (यशया ५३:१०). त्याने  कधीही न केलेल्या पापांसाठी जो देवाच्या क्रोधाचा प्याला तो त्याने पूर्णपणे पिऊन टाकला (मत्तय २६:३९).

आणि तो मरण पावला. त्याने ते टाळले नाही . येशूचे मानवी शरीर त्याच्या मानवी जिवापासून वेगळे झाले. त्याने पात्म बेटावर योहानाला स्पष्ट म्हटले, “भिऊ नकोस; जो पहिला व शेवटला, आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत”
(प्रकटी १:१७-१८).

 जो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला

येशूपुर्वी जे सर्व मरण पावले होते त्यांचे शरीर कबरेत गेले नी कुजले आणि त्यांचा जीव शिओल मध्ये वाट पाहण्यास गेला. पण येशूसबंधी दाविदाने लिहिले, “कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस” (स्तोत्र १६:१०, प्रेषित २:३१). येशूचे शरीर कुजले नाही त्याचा जीव शिओल मध्ये दिला गेला नाही. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला.

कुमारी मरीयेपासून जन्म झाला, पंतय पिलाताच्या वेळी दु:ख भोगले, वधस्तंभी दिले, मरण पावला, पुरले. या सर्वाचे पर्यवसान यामध्ये झाले- “तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे” (कलसै. १:१८). येशूचे निरर्थक भासणारे दु:खसहन त्याच्या लोकांसाठी अनंतकालिक सुखाकडे घेऊन जाते. त्याचे लोक, त्याच्या वधूला त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतले गेले आहे; ते वधस्तंभाबाहेर नाही तर वधस्तंभा मधून. तेथे त्याला स्वर्गातले सर्व होसान्ना बहाल केले जातात (प्रकटी. ५:९-१३).

सर्व इतिहासभर नास्तिक लोकांनी विश्वास ठेवला आहे की मरीयेने येशूला जन्म दिला, त्याला पिलात नावाच्या  ऐतिहासिक व्यक्तीखाली  वधस्तंभावर दिले गेले, पण आपण याहून पुढे विश्वास ठेवतो आणि ठेवणार की, येशू जिवंत आहे. त्याच्या राज्यावर आपण विश्वास ठेवतो. आपण विश्वास ठेवतो की तो कायमसाठी जिवंत आहे. त्याच्या हातात मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत (प्रकटी १:१७,१८). आपण विश्वास ठेवतो की त्याच्या मरणाने, मरणाला उद्ध्वस्त केले. आपण विश्वास ठेवतो की त्याचे भग्न शरीर उठले. आपण विश्वास ठेवतो की त्याच्याबरोबर तो आपलीही शरीरे पुन्हा उठवील.

Previous Article

राजा होण्यास लायक असा पुत्र

Next Article

ईयोबाच्या शरीरावर हल्ला

You might be interested in …

 स्तोत्र १३३ – उपासना (॥)

वर्षातून तीन वेळा देवाने नेमून दिलेल्या सणांसाठी सीयोन डोंगरावरील यरुशलेमातील मंदिरात जाहीर उपासनेसाठी एकत्र जमून डोंगर चढून जाताना उपासक जी स्तोत्रं आळीपाळीनं म्हणत चढण चढत असत; त्या १२० ते १३३ या पंधरा आरोहण स्तोत्रांच्या विषयांची […]

आत्म्याचे फळ – चांगुलपणा

स्टीफन विल्यम्स  चांगुलपणा म्हणजे काय?आजच्या दिवसात चांगुलपणा हा शब्द बऱ्याच प्रकारे वापरला जातो. उत्कृष्टपणाचा दर्जा, सामर्थ्य, दयाळू, अवलंबून राहता येणे, आनंदाचा उपभोग, ताजेपणा इ. बाबींसाठी आपण हा शब्द वापरतो.परंतु ग्रीकमध्ये याचा अर्थ अगदी वेगळा आहे. […]

विश्वासी ख्रिस्ती उत्क्रांतीवादावर विश्वास ठेऊ शकतात का? लेखक : ग्रेग अॅलीसन

उत्क्रांतिवाद हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. मी कॉलेजमध्ये असताना सायन्स शाखा निवडली होती व मी अभ्यास करत असलेला प्रत्येक विषय – बायॉलजी, बॉटनी, इकॉलजी, मायक्रोबायॉलजी – हे सर्व विषय उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून शिकवले जात असत. […]