जुलाई 30, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तरुण मातांना महान आदेशाची गरज आहे

जेसिका बी

पर्समध्ये स्नॅक्स घेऊन  बाबागाडी घेऊन जाणाऱ्या आणि ३३ आठवड्यांच्या गर्भार मातेला हा प्रश्न आहे:  “पुनरुत्थित येशू तुला म्हणत आहे की, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा… आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१८,१९). यावर तुझा विश्वास आहे का?

विश्वास ठेव. येशू तुला पाहत आहे आणि अशीच आज्ञा करत आहे. तुझ्या हातात एक चिमुकला हात आहे आणि झोप कमी मिळाली असतानाही तू काम करत आहेस याकडे त्याने दुर्लक्ष केले नाही.  तुझ्या छोट्यांचा आवाजाने किंवा तुझ्या कामाच्या ढिगाऱ्याने त्याला निघून जावेसे वाटत नाही. आपला प्रभू पेत्र, याकोब आणि योहान यांना जे शब्द दिले  त्याच शब्दांनी मातांनाही तो आज्ञा देतो. या जगात  हा महान आदेश जगून  माता या राष्ट्रांना आणि त्यांच्या मुलांना आशीर्वाद देतात; आणि हे फक्त त्याच करू शकतात.

त्याचा हा आदेश कोणा एका  उष्ण ठिकाणी राहून, किड्या – मकुड्यांना तोंड देत बायबलचे भाषांतर करणाऱ्या मातेसाठीच केवळ नाही.  जर तुम्ही पाश्चिमात्य देशात तेथील जीवनशैलीत अडकून पडला तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही.  तुमच्या स्थानिक परिस्थितीत जे सामान्य वाटते ते खरं तर अगदी थक्क करणारे आहे – अब्राहामाला घेरणाऱ्या   आकाशातल्या लक्षावधी ताऱ्यांसारखे.

कोट्यावधी मातांचा पिता

महान आदेशामध्ये येशू देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराकडे निर्देश करत आहे की, तारण हे आता फक्त यहुद्यांपुरतेच मर्यादित नाही. अब्राहामाला राष्ट्रांना  आशीर्वाद व्हावा म्हणून पाचारण केले होते (उत्पत्ती १२:१-३). मत्तय २८:१८-२० मध्ये राष्ट्रांच्या आशीर्वादाचे साधन आहे येशूचे शिष्य बनवणे. त्याच्यामध्ये तारण हे फक्त यहूदी लोकांकडेच नाही तर विदेशी लोकांकडेही येते आणि विदेशी हे तर सर्वत्र आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या यूथ ग्रूप मधील मुलीला बायबल शिकवता किंवा तुमच्या कौटुंबिक मेळाव्यात येशूसाठी साक्ष होता तेव्हा तुम्ही येशूची आज्ञा पूर्ण करता. येशूने वधस्तंभावर जे पूर्ण केले ते आपल्याला खात्री देते की तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांची देवाला काळजी आहे. त्याचे कार्य, त्याचे ह्रदय हे सर्व लोकांसाठी आहे मग ते  परके असो  अथवा अगदी परिचयाचे.

येथे आपण मातांसाठी असलेले मिशनरी कार्य कमी लेखता कामा नये. मग तो येथे कुठेही असो. त्याच वेळी आपण याचीही आठवण ठेवावी की देव अनेक मातांना तेथे – विश्वाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातही – पाठवतो. त्या त्यांच्या कुटुंबासोबत प्रकाशित गावांप्रमाणे त्या दुर्गम पर्वतावर पोचतात. कारण “ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्‍यांवाचून ते कसे ऐकतील”  (रोम १०:४)?

या स्त्रियांसाठी -माझ्यासाठी- मिशनरी आणि माता असणे म्हणजे शाळेतील नाटकाच्या मंचावर झाडाची भूमिका करणे.  आवश्यक असणारी पण नको वाटणारी भूमिका. आम्हाला तिथे असावेच लागते पण आम्ही फक्त पार्श्वभूमी आणि आधार असतो. आम्ही देवाची आज्ञा पाळतो आणि जातो दुय्यम कामगिरीचे  एक कर्तव्य म्हणून. जिचा हात धरून तिची मुले जात आहेत अशा मातेला देव सर्व राष्ट्रांचे शिष्य बनवणार अशी अपेक्षा आम्ही करत नसतो.

पण सध्या या जगात २०० कोटी माता आहेत आणि प्रत्येक सेकंदाला चार बाळांचा जन्म होतो. जेव्हा मी व माझे पती या जगातल्या दुर्गम भागातील घरांत  सुवार्ता सांगण्यास जातो तेव्हा आम्ही अनेक माता आणि आजींना भेटतो ज्यांच्या मांडीवरची मुले डोळे विस्फारून आमच्याकडे  पाहत असतात. या स्त्रिया येशूच्या  नावाला शून्यतेत प्रतिसाद देतात. त्यांना कोण शिकवणार? पहिल्याच भेटीत तुमच्या हृदयाला आनंद देणाऱ्या त्यांच्या प्रीतीशी कोण नाते साधू शकेल? त्यांच्या जेवणाचा वास आणि आस्वाद घेत, प्रसूतीच्या वेदना, घर चालवताना येणाऱ्या हक्काच्या मागण्या, त्यांच्या मुलांना जोजावण्याचा आनंद या सर्व गोष्टी तुम्ही ऐकू आणि अनुभवू शकता . ज्या माता तुमच्या सोबत आनंद आणि वेदना सांगू शकतात त्यांना ख्रिस्त चागल्या रीतीने कोण सांगू शकणार?

लक्ष वेधून घेणारे –मरण

काही थोडी वर्षे मिशन क्षेत्रावर काम केल्यावर सुवार्ता सांगण्याची मला बहुतेक संधी मिळते ती मी माझी मुले कशी वाढवते या विषयावरून. ते काही आम्ही परिपूर्ण आहोत किंवा आमची दिनचर्या फार धार्मिक आहे म्हणून नव्हे. लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे मरण. मी माझे जीवन माझ्या मुलांसाठी देऊन टाकते कारण ख्रिस्ताने प्रथम तेच माझ्यासाठी केले. माझी मुले जेव्हा अत्यंत वाईट वागतात तेव्हाही मी त्यांच्यावर प्रेम करू शकते कारण माझ्या प्रभूने माझ्यामध्ये  आनंद घेतला- जेव्हा मी त्याच्या थोबाडीत मारली आणि त्याच्यावर थुंकले. हे या जगापलीकडचे आहे.

जेव्हा आपण चुकणाऱ्या छोट्यांना संयमपूर्वक शिस्त लावतो तेव्हा आपण “कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील”  (यशया ४०:११) अशा देवाचे अनुकरण करतो. जेव्हा त्यांनी कसेबसे चितारलेले चित्र आपण पाहतो, जेव्हा त्यांच्या कोलांट्या उड्यांना आपण टाळ्या वाजवतो तेव्हा आपण  आपल्यासाठी आनंदाने गाणाऱ्या           (स्तोत्र १८:१९ , सफन्या ३:१)  देवाची प्रतिमा दाखवतो. आई म्हणून असलेली आपली दुर्बलता हे  आपले सामर्थ्य आहे. मातृत्वाचे चिन्ह असणाऱ्या आपल्या सीमा, मर्यादा , कमकुवतपणा यांच्यामध्ये असे सामर्थ्य आहे की जगातील स्त्रियांसोबत आपण मैत्री करू शकतो. जेव्हा मी गर्भारपणात उलट्यांनी बेजार झाले होते इतकी की बेसिन जवळच बसून असायचे; तेव्हा माझ्या कामवाल्या बाईने स्वत:चे डोळे पुसत माझ्या डोक्याला तेल लावून मालिश केले होते किंवा प्रसुतीनंतर मला  निराशपणा आला असे मी शेजारणीला सांगितले तर मला आवडणारा पदार्थ तिने कसा तळून आणला ह्या गोष्टी मी कधी विसरू शकत नाही. मातृत्वाची दुर्बलता ही सुवार्तेच्या बीजासाठी उत्तम जमीन आहे.

आपल्या भूमिका व जबाबदाऱ्या यांच्याकडे नाखुशीने न पाहता आपण त्या प्रत्येक भाषा वंश राष्ट्र यातील स्त्रियांना जिंकण्यासाठी का वापरू नयेत? आपल्याला जगिक संपत्ती आणि मित्र आणि चांगले भवितव्य असावे म्हणून  लूक १६ मध्ये असलेल्या धूर्त कारभाऱ्याची दृढता आपण का घेऊ नये?  काही चतुराईने मातृत्वाच्या वैशिष्ट्याचा  उपयोग देवाच्या राज्याच्या उन्नतीसाठी का करू नये?

राष्ट्रांना आशीर्वाद द्या – आणि तुमच्या मुलांनाही

जेव्हा माता जातील आणि शिष्य बनवतील तेव्हा राष्ट्रच फक्त आनंदी होणार नाहीत; तर – आपली मुले आशीर्वादित होतील – आता आणि पुढेही. बहुतेक पालकांना वर्तमानच ग्रासून टाकतो. ते आपल्या स्वत:च्या सूर्यमालिकेत  मुलांना केंद्रस्थानी ठेवतात आणि अभ्यासासोबत इतर कार्यक्रम, क्रीडा, विविध क्षेत्रांना भेटी अशा गोष्टींनी त्यांना सतत आनंदी ठेवत ते यशस्वीपणाचा मार्गावर आहेत असे भासवतात. आपण विसरतो की मुलांनीही आपल्यासारखीच देवाची प्रतिमा धारण केलेली आहे. यामुळे फक्त पर्यटन आणि ख्रिसमस  यांमध्ये त्यांची तृप्ती होत नसते त्यांना काही तरी अधिक मिळावे म्हणून निर्माण केले आहे.

गोष्टीतील पायरेटस प्रमाणे त्यांना सोन्याची ओढ आहे – शुभवर्तमानाचे सोने ; त्याहून कमी नाहीच. ते युद्धक्षेत्रात राहत आहेत आणि त्यांना बळ देण्याची गरज आहे. आपण त्यांना फार वर चढवतो, त्यांच्याकडून कमी अपेक्षा करतो  आणि त्यांना फक्त गर्क ठेवण्याचाच प्रयत्न करतो. असे असेल तर  आपण त्यांना अशा वाळूच्या किल्ल्यात बसवतो की पुढे नक्की असणाऱ्या परीक्षांच्या लाटांनी तो सहज कोसळून पडेल.

येशूने डोंगरावर दिलेली आज्ञा जर माता गांभीर्याने घेतील तर काही काळाने त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळेल. ज्या माता विश्वास ठेवतात की या कार्यात प्रभू त्यांच्याबरोबर आहे त्या धोका पत्करतील – पेत्राप्रमाणे जहाजाची सुरक्षा सोडून उचंबळणाऱ्या लाटांमध्ये उतरत.  याचा परिणाम म्हणजे दररोजच्या जीवनात बायबल उतरत असलेले पाहून त्यांच्या मुलांना  आशीर्वाद  मिळेल. त्यांची आई त्या विधवेसारखी आपली शेवटचे नाणे देत आहे किंवा त्यांचे बाबा ते हरवलेले मेंढरू शोधण्यासाठी स्वर्गीय पित्याचे अनुकरण करत आहेत हे ते पाहतात. ते त्यांच्या आईची प्रार्थना ऐकत असतील  आणि देव त्यांना दररोजचे अन्न कसे पुरवतो हे ही पाहतील.

मातानो राष्ट्रांकडे हडसन टेलर किंवा एमी कारमायकल यांचा दुसरा अवतार म्हणून जाऊ नका. त्यांचा मोकळा स्वभाव आणि कीटकांना तोंड देत राहण्याची वृत्ती याचा हेवा करी वेळ दवडू नका. येशू तुम्हाला पाहतो आणि तुमच्या मुलांनाही. तो काही झुरत नाही की हे रांगणाऱ्या मुलांचे दिवस जातील आणि अखेर तुम्ही एखाद्या उत्तम यंत्रासारखे काम करणार. या व्यस्त वर्तमानात तो तुम्हाला आदेश देत आहे की जा आणि शिष्य करा.

तर जे स्वस्थ बसले आहेत, कदाचित तुमच्या टेबलावर जेवणारे लोक, आणि बागेत तुम्हाला भेटणाऱ्या इतर माता यांना शिष्य करा. एका दिवशी राजासनासमोर शुभ्र झगे घातलेल्या लोकांसमवेत तुम्ही स्वत:ला पाहाल, तुमच्या भोवती तुमच्या कष्टाचे फळ – शारीरिक आणि आध्यात्मिक मुले- परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप  (यशया ६१:३) अशी  तुच्यासोबत उभी असतील.  

Previous Article

ईयोब आपल्या यातनांशी झगडतो

Next Article

काहीही होवो

You might be interested in …

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल?

जॉन ब्लूम जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख […]

देवावर विश्वास लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

विश्वसनीय देव देव हा विश्वसनीय आहे या सत्यावर देवावर विश्वास ठेवण्याचा विचार आधारलेला आहे. आतापर्यंत जी सत्ये आपण शिकलो त्यामध्ये आपण दृढ व्हायला हवे. आपली तो सातत्याने काळजी घेतो. याविषयीच्या अभिवचनांचा आपण आधार घ्यायला हवा. […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण २ दुसऱ्या दिवशी दुपारी […]