अक्टूबर 3, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

सामान्य ख्रिस्ती लोकांसाठी  समुपदेशन

स्कॉट हबर्ड

तुमच्या लहान गटातील एक माणूस तुम्हाला सल्ला विचारतो. गेल्या काही आठवड्यांपासून, तो त्याला दुर्बल  करणाऱ्या पाठदुखीने ग्रस्त आहे. त्याला माहीत आहे की मोडणारे शरीर या पतित जगाचा एक अटळ भाग आहे, परंतु तो हे देखील विचारतो की, देव त्याला कशासाठी शिस्त लावत आहे? त्याला काय हवे आहे – पापासाठी हृदयाची काळजीपूर्वक तपासणी, की त्याचे दुःख जरी गूढ असले तरी ते व्यर्थ नाही याची खात्री?

तुमच्या जबाबदारीखाली असलेल्या एका  गटात, एक बंधू पुन्हा पोर्नोग्राफी (अश्लील व्हिडिओ) पाहत असल्याचे कबूल करतो. तो म्हणतो की तो संघर्ष करत आहे आणि लढत आहे. त्याला लाज वाटतेय असे दिसते.  पूर्वीही त्याला लाज वाटली होती पण बदल थोडाच झालाय. त्याला काय हवे आहे – एक प्रेमळ पण दृढ ताकीद, की जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही याची आठवण?

तुमच्या परिचयाच्या एका तरुणीला हृदय आणि मनावर अंधार पसरलेला जाणवत आहे. तिच्या नैराश्यात, ती ख्रिस्ती  सहवास आणि कृपेच्या इतर माध्यमांपासून दूर जाऊ लागली आहे. ती तुम्हाला विचारते की ती खरोखरच ख्रिश्चन आहे का. तिला काय हवे आहे – देव तिच्यासोबत आहे हे उत्तेजन, चर्चमध्ये परत येण्याचा बोध, वैद्यकीय डॉक्टरकडे पाठवणे, किंवा तिन्ही?

” अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा” प्रेषित पौल आपल्याला सांगतो (१ थेस्स. ५:१४). पण कधीकधी अल्पधीराचे लोक आळशी दिसतात आणि आळशी लोक अल्पधीराचे  दिसतात; कधीकधी कमकुवत मनाचे इच्छाशक्ती असलेले दिसतात.  लोकांनी कपाळावर एक चिन्ह घेऊन यायला हवे होते : “बोध आवश्यक आहे”; “कृपया प्रोत्साहन द्या”; “थोडी मदत करा.”

पण ते तसे करत नाहीत. त्याऐवजी, लोक आपल्याकडे येतात जसे आपण इतरांकडे येतो: मिश्र आणि गुंतागुंतीचे, गोंधळलेले आणि गोंधळून टाकणारे. लोक समुद्र आहेत, ज्यांची अंतःकरणे खोलवर लपलेली आहेत. आणि देव आपल्याला पाणबुडे होण्यासाठी बोलावतो.

समुद्राचे सर्वात खोल पाणी

देव खरोखरच आपल्या सर्वांना, आपल्या भावांच्या आणि बहिणींच्या खोलवरच्या अंतःकरणांना ओळखण्यासाठी बोलावतो. नाही. आपण सर्व पाळक किंवा व्यावसायिक समुपदेशक नाहीत. परंतु हृदयाचे काम आणि आत्म्याची काळजी केवळ पाळक आणि सल्लागारांचे काम नाही. पौलाने १ थेस्स. ५:१४ हे संपूर्ण मंडळीला लिहिले, फक्त तिच्या नेत्यांनाच नाही. याचा अर्थ देव आपल्या सर्वांना सूचना देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी, मदत करण्यासाठी – आणि कधी काय करायचे हे ओळखण्यासाठी बोलावतो. तो आपल्या सर्वांना सल्ला देण्यासाठी बोलावतो.

आणि जर तो आपल्याला सल्ला देण्यासाठी बोलावतो, तर तो आपल्याला सल्ला देण्यामध्ये वाढण्यास बोलावतो, ज्याची सुरुवात अनेकदा सल्ला देण्याची आपली प्रवृत्ती इतकी चांगली नाही हे लक्षात घेऊन होते. कदाचित तुम्हाला ज्या सामान्य दोषांना मी बळी पडतो, त्यावरून हे समजू शकेल.

मलाच विचारले असेल तर, मी लगेच सल्ला देतो. तुम्ही बोलत असताना मी चांगले ऐकण्याचे प्रदर्शन करू शकतो, परंतु अनेकदा मी तुमची वाक्ये आधीच पूर्ण केली आहेत आणि माझे उत्तर तयार करत आहे. याकोब लिहितो,  “प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा” (याकोब १:१९). पण मला आधीच काय बोलावे हे माहीत असताना मी माझे बोलणे का धीमे करावे? म्हणून मी विनम्रपणे अधीरतेने मान हलवतो, पुढील प्रश्न सोडून देतो आणि माझ्या ओठांवर आधीच वाट पाहत असलेले उत्तर देतो.

मलाच विचारले असेल तर, ​​मी वरवर सल्ला देतो. “मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते,” असे ज्ञानी माणूस आपल्याला सांगतो (नीतिसूत्रे २०:५), परंतु माझा ओळंबा लहान असतो. बऱ्याचदा मी उथळपणे सल्ला देतो – वागणुकीसंबंधी बोध  करतो, विशिष्ट सवयीसाठी योजना विकसित करतो, पण हृदय तर अजूनही खोलवर लपलेले असते.

मलाच विचारले असेल तर, ​​मी एकतर्फी सल्ला देतो. माझ्या जिभेवर सांत्वन सहज येते; सुधारणे येत नाही. आपल्या चर्चमध्ये असे काही लोक आहेत जे इतरांच्या चुका सहज दाखवतात. अलीफज तेमानीप्रमाणे, ते शब्द वाहू देण्यासाठी वाऱ्याबरोबर संघर्ष करतात (ईयोब ६:२६), ते त्यांना पकडतात, त्यांच्यावर  रोखतात आणि त्यांची टीका करतात. ते आत्मविश्वासाने बोलतात. ते धैर्याने बोलतात. परंतु ईयोबाप्रमाणे, नेहमीच “यथार्थ” बोलत नाहीत (ईयोब ४२:७).


पण मी बहुधा दुसऱ्या बाजूला पडतो. प्युरिटन जॉन ओवेन यांनी माझ्यासारख्या दयनीय सल्लागारांना इशारा दिला होता – ज्या सल्लागारांकडे ” येणाऱ्या सर्वांसाठी तयार आणि चांगले शब्द असतात,” मग तो कोणीही असो. आम्ही पुष्टी करतो; आम्ही प्रोत्साहन देतो; आम्ही आश्वासन देतो आणि सांत्वन देतो आणि उन्नती करतो. आम्ही अशा येशूचे प्रतिबिंब पाडतो जो नेहमीच कोमल असतो, क्वचितच कठोर असतो किंवा कठोर नसतोच. अशा सल्ल्याचे ओवेनचे मूल्यांकन आशादायक नव्हते: “क्वचितच उपयुक्त, बहुतेकदा हानिकारक”

म्हणून, आम्ही वाढण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आपल्या सामान्य मूर्खपणाची जागा आत्म्याच्या मंद, खोल, सर्व प्रकारच्या ज्ञानाने घेण्याचा प्रयत्न करतो. पण कसे?

१. त्या अद्भुत सल्लागाराकडून शिका.

यशया ५०:४ आपल्याला दीर्घकालीन ध्येय आणि दैनंदिन सराव देते. यशया प्रभूचा सेवक, प्रभूचा ख्रिस्त याबद्दल बोलतो, परंतु त्याचा नमुना आपल्याला आकार देतो.

“शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.”

सर्वात शहाणे सल्लागार “ज्यांना शिकविले  गेले आहे, त्यांच्या जिभेने” बोलतात. ते थकलेल्या आत्म्यांना धैर्याने भरू शकतात; ते भटकलेल्या हृदयांना सुधारू शकतात आणि उभारू शकतात. आणि हे सर्व फक्त त्यांचे तोंड उघडून. देवाच्या स्वतःच्या भाषणाचे मंद प्रतिबिंब म्हणून, ते “एका शब्दाने” प्रकाश आणि जीवन आणतात. अशी जीभ असावी हे आपले दीर्घकालीन ध्येय आहे.

तथापि, दररोज ऐकल्याशिवाय आपण ते ध्येय साध्य करू शकणार नाही – आणि प्रथम इतरांचे नाही तर देवाचे ऐकले पाहिजे. तो स्वतः “अद्भुत सल्लागार” आहे (यशया ९:६), आणि “दररोज सकाळी” तो त्याच्या अद्भुत मार्गांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपले कान जागृत करतो – त्याचे अद्भुत, आश्चर्यकारक मार्ग.

देवाने शिकवलेल्या परिपूर्ण भाषेसह जो बोलतो त्या आपल्या प्रभू येशूच्या सल्ल्याचा विचार करा. आपल्यापैकी कोणी श्रीमंत तरुणाला त्याचे सर्व काही विकण्यास सांगितले असते (मार्क १०:२१)? किंवा पेत्राला सौम्यपणे केव्हा दटावायचे, कधी दुर्लक्ष करायचे आणि कधी त्याला सैतान म्हणून संबोधायचे हे कोणाला माहीत असेल (मत्तय १४:३१; १६:२३; १७:४-५)? किंवा बरे झालेल्या पक्षाघाती व्यक्तीला ” आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”  असा इशारा कोणी दिला असता (योहान ५:१४)? किंवा दोष न देता पतन झालेल्या शिष्याला कोणी सुधारले असते (योहान २१:१५-१९)?

निश्चितच, आपल्याला येशूसारखी अंतर्दृष्टी नाही. परंतु जसे आपण त्याचे ऐकतो – आणि शास्त्रवचनांमध्ये देवाचे शब्द ऐकतो – तसे आपल्याला नवीन प्रवृत्ती मिळू लागते. आपल्याला जुन्या समस्यांचे नवीन पैलू दिसतात. आपल्याला जुन्या कुलुपांच्या नवीन चाव्या सापडतात. आपल्याला जाणवते की आपल्या आध्यात्मिक औषधांच्या कपाटात फक्त एक किंवा दोन शेल्फ आहेत, तर देवाच्या दालनातच आपण प्रवेश करतो. आणि हळूहळू, आपण गिलादाच्या  मलमासारखे बनतो, ज्याच्याकडे तर दहा हजार मलम आहेत.

ज्यांना शिकायचे आहे त्यांना, बायबल वाचन आणि मनन हे आपल्या अद्भुत सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली दररोज मार्गदर्शन देते, ते आपल्याला मानवी हृदयाइतके खोलवर शब्द देते.

२. इतरांचे ऐका – खरोखर ऐका.

मग, कालांतराने, समुपदेशनाच्या संधी निर्माण होतात. आपण एका लहान गटातील सदस्याच्या टेबलासमोर बसतो, किंवा आपल्याकडून  मार्गदर्शन घेणाऱ्यासोबत घरी जातो , किंवा गरजू मित्राशी फोनवर बोलतो. आणि बोलण्याचे धाडस करण्यापूर्वी, आपल्याला तोंड उघडण्यापेक्षा कठीण कामाला तोंड द्यावे लागते: तोंड बंद ठेवणे. म्हणून आपण ऐकतो. आपण खरेच ऐकतो.

देवाच्या उपस्थितीत शांतपणे थांबल्यानंतरही खरे ऐकणे आपण सहजपणे टाळू शकतो. याकोब ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा असावे असा सल्ला देतो कारण आपण अनेकदा हा वेग उलट करतो (याकोब १:१९). म्हणून, खरोखर ऐकण्यापूर्वीच आपल्याला आताच सल्ला देण्याची तीव्र इच्छा वाटू शकते. आपण आवेगाने व्यत्यय आणू इच्छितो. आपण द्यायच्या प्रतिसादावरच इतके लक्ष केंद्रित शकतो की दुसऱ्याचे शब्द दबून जातात, त्यांच्या तोंडातून आपल्या कानात येईपर्यंत शब्द कुठेतरी हरवून जातात. आणि ऐकणे, आपण ऐकतच नाही.

आपले कान उघडण्यास दोन निश्चय मदत करू शकतात. पहिले, आपण दुसऱ्याची वाक्ये पूर्ण न करण्याचा निश्चय करू शकतो – मनात किंवा तोंडात. वाक्य पूर्ण करण्याचे अनेक प्रकार असू शकतात. दुसरा बोलत असताना उत्तराचा सराव करणे; एखादी गोष्ट कुठे जात आहे हे आपल्याला माहीत आहे असे गृहीत धरणे; आपल्याला सारांश समजला आहे असे आपल्याला वाटते म्हणून विचारांना भटकू देणे – हे सर्व वाक्ये पूर्ण करण्याचे सूक्ष्म मार्ग असू शकतात जे आपण अद्याप ऐकले नाहीत. आणि ते आपल्याला नीतिसूत्रे १८:१३ च्या अज्ञानाच्या धोक्याजवळ घेऊन जातात: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”

दुसरे, आपण प्रश्न विचारण्याचा निश्चय करू शकतो.  जलद जिभेसाठी प्रश्न हे  गतिरोधक आहेत. ते आपल्याला मंदावतात, आपल्याला गृहीत धरण्याऐवजी स्पष्टीकरण देण्यास भाग पाडतात, इतरांना त्यांची स्वतःची वाक्ये पूर्ण करण्याचा आणि स्पष्टीकरण देण्याचा मान देतात. शहाणपणाने विचारलेले प्रश्न आपल्याला लपलेल्या खोल समुद्राच्या हृदयाकडे घेऊन जातात, कारण आपण वर्तनाच्या पृष्ठभागाखाली डुंबायला आणि गडद खोलीवर विचार करायला शिकतो. आणि हळूहळू, शब्दांच्या या समुद्रात पोहताना, आपण एक मोती पकडू लागतो.  ऐकत असताना, आपण ऐकतो.

चांगले ऐकण्यासाठी आपण इतर कोणत्याही रणनीती वापरल्या तरी, सुज्ञ सल्लागार संभाषणात प्रवेश करतात आणि मानवता किती गुंतागुंतीची आहे यामुळे  आश्चर्यचकित होण्यास, तोंड देण्यास आणि आकर्षित होण्यास तयार असतात.

३. प्रार्थना करा, समजून घ्या, प्रतिसाद द्या.

आतापर्यंतची प्रक्रिया काहीशी निष्क्रिय वाटू शकते, परंतु खऱ्या श्रोत्याला तसे नाही. प्रश्नांच्या आणि शांत वर्तनाच्या मागे प्रार्थनेचा आत्मा आहे. तो भाग एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतो. संभाषणाच्या विरामांमध्ये तो “उत्तर कसे द्यावे याचा विचार करतो” (नीतिसूत्रे १५:२८). आणि तो ओळखतो.  आळशी माणसाचा आळस प्रकाशात येत असल्याचे त्याला दिसू लागते; हृदयाचा कमकुवतपणा त्याला  दिसून येते; तो काही गंभीर कमकुवतपणाला स्पर्श करतो.

अर्थात, आपण नेहमीच योग्यरित्या ओळखू शकणार नाही. आपले ऐकणे आणि आपले प्रश्न, हृदय प्रकट करू शकतात, परंतु ते हृदय वाचू शकत नाहीत. आणि जर प्रेषित देखील मानवांच्या हृदयांचा चुकीचा अंदाज लावू शकले (प्रेषितांची कृत्ये ८:१३, २०-२३; २ तीमथ्य ४:१०), तर आपण निश्चितच तेच करू.

पण आपण वाढू शकतो.  जेव्हा आपण जे बोलतो त्यावरून आपल्याला आश्चर्य वाटू लागते तेव्हा आपण वाढत आहोत हे आपल्याला कळेल. एखाद्या विशिष्ट संघर्षामध्ये बोलताना, आपण नेहमीच सांत्वन दिले होते ; आता आपण स्वतःला बोध करताना ऐकतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी बोलताना, आपण बहुधा  चुका दाखवल्या होत्या; आता आपण तिला व्यावहारिक मदत देत असल्याचे पाहतो. वाढत्या प्रमाणात, आपल्या समोरच्या लोकांमध्ये आपले शब्द खोली वाढवतात. आपण गुंतागुंतीला शहाणपणा आणि सर्जनशीलतेने प्रतिसाद देतो. आणि आपल्या तारणाऱ्यासारखे कुशलतेने प्रीती दाखवू लागतो.

आणि जेव्हा शंका असते – जेव्हा काय बोलावे याची खात्री नसते, जेव्हा गोंधळलेले असतो, शब्द बाहेर पडत नाहीत – तेव्हा आपण अजूनही देवाचे स्वतःचे शब्द उच्चारू शकतो, हे जाणून की त्याचे प्रत्येक अक्षर, योग्यरित्या हाताळले गेले तर  त्यात आध्यात्मिक शक्ती असते. होय, एकमेकांची काळजी घेणे गुंतागुंतीचे असू शकते, परंतु इतके गुंतागुंतीचे नाही की सामान्य विश्वासणारे नम्रतेने देवाची वचने सांगून आणि प्रामाणिक प्रार्थनेद्वारे एकमेकांची खोलवर सेवा करू शकत नाहीत. बायबलचे शब्द, आपले नाहीत, ते देवाने प्रेरित केलेले आहेत आणि कधीकधी सर्वोत्तम सल्ला म्हणजे त्याचा श्वास घेणे.

पण आपण देवाच्या आकाराचे शब्द बोलतो किंवा देवाचे स्वतःचे शब्द बोलतो, आपण जितके जास्त ज्ञानात वाढतो तितकेच आपल्याला हे नीतिसूत्रातील वचन  प्रत्यक्षात उतरताना दिसेल: “मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!!” (नीतिसूत्रे १५:२३). आपल्या सल्लागाराच्या अद्भुत ज्ञानाने,  प्रेमाने भरलेले, दयाळूपणे शोधलेले आणि नंतर कुशलतेने संबोधित केलेले ह्रदय अनुभवणे खरोखर किती चांगले आहे.

Previous Article

तुम्ही कोठेही असा ख्रिस्त तुमचा होऊ शकतो

You might be interested in …

धडा ५. १ योहान १:८-९    खरे शुद्धीकरण – स्टीफन विल्यम्स

  तुम्ही कधी लोकाशी (अविश्वासीयांशी देखील) पापाविषयी बोलला आहात का? लोकांच्या पापाविषयी काही चुकीच्या कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही पापाची कशी व्याख्या कराल? •           या अभ्यासात आपण पाहणार आहोत की जर आपल्याला देवाची तारणातील महानता व्यवस्थित […]

ख्रिस्तजन्म- गव्हाणीचा अर्थ जॉन पायपर

  काही विहिरी कधीच कोरड्या पडत नाहीत. काही क्षितीजं तुम्ही त्यांच्या निकट जाताना अधिकच विस्तारू लागतात. काही गोष्टी अनंतकालापर्यंत  मागं पोचतात, अनंतापर्यंत पुढे जातात आणि त्यांचे रहस्य खोल खाली जात राहते अन् त्यांची उंची वैभवाला […]

सहजतेने केलेली उपासना

ग्रेग मोर्स त्या उज्ज्वल दिवसाची सुरवात मोठ्या आशेने आणि खात्रीने झाली होती. पतनानंतर एदेन मधील मनुष्याच्या जीवनाशी सदृश्य असणारा हा दिवस होता: देवाचे  पुन्हा मनुष्यांमध्ये निवासस्थान झाले होते. इस्राएल लोकांच्या मुक्कामामध्ये निवासस्थान उभे होते. आपल्या […]