एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण २
दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही सेतु वोपू या विस्तीर्ण अरण्यात पोहंचलो. एके काळी तेथे वास्तव्यास असणाऱ्या सेतु लोकांचा हा ओसाड प्रदेश होता. ते गाव आता नामशेष झाले होते. बागायतीचे व प्राचीन झाडांचे अवशेष राहिल्यामुळे आता तेथे घनदाट अरण्य माजले होते आणि प्राण्यांसाठी खाद्य मिळत असल्याने व तेथे रानडुकरांचा विशेष वावर असल्याने शिकारीसाठी ते उत्तम स्थान होते.
माझे पाय पार गळून गेले होते. पण विसाव्याला कामाच्या यादीत स्थानच नव्हते. काम तर प्रचंड होते.
आम्हाला आसऱ्यासाठी आडोसा तयार करायचा होता. ओरडा चालू होता, “खांब रोवायला बांबू आणा.
छपरासाठी डहाळ्या व झावळ्या आणा. पाचोळा आणा. दगड आणा. पाणी आणा. सरपण आणा.” काहींनी साबुदाण्याच्या झाडाच्या खोडाला खाचे पाडून त्याचा चीक गोळा केला. अंधार पडेपर्यंत पाऊस सुरू झाला. पण दुपारपर्यंत दोन जंगली डुकरे, पक्षी, चित्ता, कांगारू व आणखी काही शिकार मिळाली होती आणि खाण्यापिण्याची सोय झाली होती. फोलोपो लोकांसारखा जल्लोशाने कोणी दंगा करीत नसेल; इतका की मरायला टेकलेल्याच्या ऱ्हदयाची स्पंदनेही सुरू व्हावीत! शेकोट्या पेटल्या आणि स्वयंपाक सुरू झाला. कातडी सोलणे, मांस भाजणे, घरी नेण्यासाठी ते नीट राहील याची तजवीज करणे आणि मेंदूसारखे न टिकणारे तेथेच खाऊन संपवण्यासाठी बनवणे हे सारे पाहणे माझ्यासाठी पर्वणीच होती. खाटिकाच्या दुकानातील दर्प, केस जळाल्याचा उग्र वास, धूर, स्वयंपाकाचा वास आणि भरीत भर आमच्या घामट शरीराचा वास. त्यात आम्ही सारे खेटून बसलेलो. त्या मांडवाला भिंती नव्हत्या. फक्त ३० फूट लांबीचे छप्पर होते. स्वयंपाकाच्या जळणाची शेकोटीच आम्हाला ऊब देत होती. मी मूकपणे पाचोळ्यावर बसलो होतो. अधून मधून एखादा प्रश्न शेजाऱ्याला विचारत होतो. कांगारू व चित्त्याची चिरफाड करताना आणि बांबूला डुक्कर बांधून भाजताना होणारी त्यांची कसरत पाहून मी अवाक् झालो. थोडे खाऊन बाकीचे त्यांना घरी न्यायचे होते.
माझ्या पायाजवळ बसलेल्या सोपीयाने पानात लपेटलेले चेंडूसारखे पुडके उघडले. इतरांकडे पण अशी पुडकी दिसली. पण त्यात काय आहे हे कळायला काही मार्ग नव्हता. सोपीयाच्या पुडक्यातले हालचाल करत होते; म्हणजे ते काहीतरी जिवंत होते. लवकरच मला कळले, ते होते बीटल्स. अक्रोडपेक्षा मोठ्या आकाराचे. शंभर तरी असतील. फुसफुसत ते एकमेकांच्या अंगावर चढत होते. सोपीयाने त्यातून एक घेऊन विस्तवात धरले.
उलट सुलट केले. काही क्षणात ते फुगले. मग तळहातावर त्याने ते हलकेच घोळले आणि तोंडात टाकून चावून खाल्ले. तो असे काही खात होता की मला आपली नजर दुसरीकडे वळवावी असे वाटले.
माझी नजर अपुसी अलीवर गेली. द्राक्षांच्या द्रोणातून आणलेले रहस्यमय काहीतरी त्याने बाहेर काढून समोर पसरले. दोन इंच लांबीच्या त्या साबुदाण्यात होणाऱ्या अळ्या वळवळ करीत एकमेकांवर चढत होत्या. मी विचार केला; “देवा, आता या मांडवात बसून मी हे असले भोजन चाललेले पाहू?” अपुसी अलीने ह्या साबुदाण्यासह त्या अळ्या हाताचा चमचा करून एका बाजूने बांबूच्या नळीत ठासून भरायला सुरूवात केली. मग बांबूच्या नळीचे तोंड केळीच्या पानाची घडी कोंबून त्याने बंद केले. आणि ती नळी विस्तवाच्या ओंडक्यांवर भाजायला ठेवली.
आता मी पुन्हा माझी नजर दुसरीकडे वळवावी म्हणून छतापलीकडे पाहू लागलो. तरी तिरक्या नजरेने मी अपुसी अलीची हालचाल टिपतच होतो. त्याने नळीचे तोंड उघडले व आतील माल केळीच्या पानावर ओतला. हसऱ्या व विजयी मुद्रेने तो निरागसपणे माझ्याकडे पाहात होता. ते पान माझ्या पुढ्यात ठेऊन तो मला म्हणाला, “ हे खा! मस्त लागतं.” अचानक साऱ्या मंडपात शांतता पसरली. सोपीयाचा घास त्याने तसाच तोंडात धरून ठेवला होता. कांगारुचे मांस भाजणारा स्तब्ध झाला आणि माझ्यावर नजर रोखून पाहू लागला. होतेरेने दोन पायात डुकराचे मस्तक पकडून माझ्यावर डोळे रोखले. माझ्या मांडीवरील पानाकडे मी कटाक्ष टाकला व म्हटले, “हे काय पदार्थ आहेत तेच मला ठाऊक नाही तर मी हे कसे खाऊ?” अपुसी अली म्हटला, “ मी दाखवतो ना कसे खायचे.” आणि त्याने मला प्रात्यक्षिक करून दाखवले आणि म्हटले, “अस्से खायचे;” आणि मोठ्ठा घास घेतला. माझा घसा तर इथे कोरडा पडला होता. बाळपणापासून मला साबुदाणा आवडला नव्हता. पण मूठभर घेऊन तो तोंडात टाकून बराच वेळ चावत राहिलो. अखेर तो घशाखाली उतरला. सर्व जण मला न्याहाळत असता मी तो घास संपवला. होतेरे शेकोटीवरून ओणवून ओरडला, ‘ छान लागते ना?’ मी स्मितहास्य करीत उद्गारलो, ‘हो, छान लागतं’. सर्वांना केवढा आनंद झाला! कोण माझी पाठ थोपटत होता तर कोणी मला हात पालवून आनंद व्यक्त करत होता. ते म्हणत होते, “आम्हाला वाटलंच तुम्हाला ते आवडणार.”
हळूहळू एकेक नवा पदार्थ माझ्या पुढ्यात येऊ लागला. कोणी काडीला भाजलेल्या आतडीचा घास आणला, तर कोणी डुकराच्या मेंदूचा घास. मला जेवण आवडल्याच्या समजुतीने त्यांना काय आनंद झाला होता. त्यामुळे आणखी जे काही समोर येईल ते खाणे मला भागच पडले. असाच एक पदार्थ समोर येताच मी म्हटले, “हे आहे तरी काय?” सगळे आश्चर्याने माझ्याकडे पाहून म्हणाले; “हे तुम्हाला माहीत नाही?” किमा म्हणाला, “अकाओनी ओ फो कारातापो.” बीटल्स विषयी हा काही बोलतोय एवढेच मला कळले. पण त्याने वापरलेले क्रियापद कारातापो याचा अर्थ ‘प्रारंभ’ असा होतो का याची मला खात्री करून घ्यावी असे वाटले. म्हणून मी पुन्हा विचारले, “ तू काय म्हणालास?’ तेव्हा तो साबुदाण्याविषयी काहीतरी बोलला. पण मला हवे ते बोललाच नाही. म्हणून मी पुन्हा खोदून विचारू लागलो. अखेर सर्वांनी मिळवून मला त्यातील बारकावे समजावून सांगितले. मला कळले की, ‘हे बीटल्स साबुदाण्यामध्ये अळ्या बनवण्याचा प्रारंभ करण्यास कारण होतात.’ मला हवे ते मला सापडत होते.
मी म्हणालो, “ मला त्या कारातापो क्रियापदाचा अर्थ समजावून सांगा.” सारेच उडी मारून उदाहरणासह स्पष्टीकरण द्यायला सरसावले. ते म्हणाले, “फुलपाखराचा प्रारंभ सुरवंट करतात. माश्यांची सुरवात अळीने होते” – जरा गलका शांत होताच किमा म्हणाला, “जग सुरू झाले ना, तेव्हा तसेच काहीसे झाले होते.” मी अवाक् होऊन म्हटले, “काय?” तो म्हणाला, “हो. फार फार वर्षांपूर्वी हे जग काही असेच सुरू झाले नाही. त्याचा प्रारंभ व्हायला हवा होता आणि तो कोणीतरी केला.” इसा आणि हेपल हे सर्व संभाषण निमूटपणे व काळजीपूर्वक कान देऊन ऐकत होते. मग मी सर्वांना उद्देशून म्हटले, “आम्ही एका शब्दाचा शोध घेत होतो. तुम्ही जे बोलत आहात तशा अर्थाचा शब्द. देवासाठी आपण कोटो हा शब्द वापरला, ने हा शब्द तो देव कृती करत असल्याचे सूचित करण्यासाठी वापरला, रा हे क्रियापदात मध्यभागी टाकले, आणि प्रारंभ ऐवजी ‘कारण झाला’ म्हटले तर असे होईल: ‘केले नाले अलिमो कोटोने तारो हाएतामो कारालिपाकालेपो.’ ‘प्रारंभी देव भूमी व आकाश अस्तित्वात आणण्यास कारण झाला.’ सर्वांनी एकमताने होकार दिला, ‘अगदी अस्से. चुटकीसरशी?’ सर्व शब्द कसे चपखल बसत आहेत हे पाहून मीच चकित झालो. ते म्हणाले ‘अगदी बरोबर; अस्से चुटकीसरशी.’
देवाने जसे चुटकीसरशी आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली तसेच त्याने हे वर्णन करणारे शब्द आम्हाला चुटकीसरशी पुरवले.
रात्री बिछान्यावर पडून असता हे सर्व कसे घडून आले याची मी मनात जुळवाजुळव करू लागलो. आमच्या बायबल खोलीपासून आम्ही कित्येक मैल दूर आलो होतो. मी दोन व्यक्तींच्या मध्ये बसलो होतो. एक खात होता बीटल्स तर दुसरा खात होता बीटल्सच्या अळ्या. आणि शेकोटीपाशी चौफेर बसलेल्या या गावकऱ्यांपासून मी घेत होतो भाषेचे धडे. माझ्या मांडीवर असलेल्या जेवणाप्रमाणेच मी शोधत असलेले शब्दही माझ्या पुढ्यातच होते. पहिल्या दिवशी जे शब्द मिळावेत म्हणून आम्ही प्रार्थना केली होती त्याचे अनपेक्षितपणे उत्तर मिळाले होते. उत्पत्ती १:१ लिहून झाले. प्रारंभ झाला होता.
Social