जॉन पायपर
एका पित्याने हा प्रश्न मला पाठवला आहे.
“माझ्या चवदा वर्षांच्या मुलीने नुकतेच ईयोबाचे पुस्तक पहिल्यांदाच वाचलं आणि इथं देवाचे जे चित्रण आहे ते पाहून ती गोंधळून गेली आहे. कारण आतापर्यंत तिने देव प्रेमळ व न्यायी आहे हेच ऐकले आहे आणि त्याच देवाने ईयोब त्याची मुले, नोकर यांना इतक्या विध्वंसातून का जाऊ दिले हे तिला समजत नाही. देवाने जाणीवपूर्वक सैतानाला ईयोबाकडे निर्देश केला आणि या नीतिमान पुरुषाचे सर्वच हिरावून घेण्यास मुभा दिली यामुळे ती अस्वस्थ होते. आणि हे कशाकरता? सैतान व त्याच्या दूतांना फक्त हेच सिद्ध करण्यासाठी की त्याची देवावरील श्रद्धा अढळ होती?
मी तिच्याशी बोललो आहे की पतनापासूनच दु:खसहन व मरण हा मानवी अस्तित्वाचा भाग आहे व तो अप्रत्यक्ष किंवा थेट पापाचा परिणाम आहे. आम्ही हे हो बोललो की, सैतानाच्या क्रूरतेमुळे ईयोबाला हे सहन करावे लागले व ते देवाच्या सार्वभौम इच्छेच्या मर्यादेतच झाले. तसेच या जगातल्या दु:खाची अनंतकालच्या वैभवाशी तुलनाच करता येत नाही. आम्ही हे ही बोललो की खुद्द देवाने आपल्यासाठी किती सहन केले आहे आणि आपली पापे वधस्तंभावर वाहून नेली आहेत. तसेच आपल्या पापाने त्याला कितीही दु:ख दिले तरी दुष्टाच्या मरणाने देवाला आनंद होत नाही.
पास्टर जॉन यावर तुम्ही आणखी काय म्हणाल?”
उत्तर
या पित्याने शांतपणे आपल्या मुलीला जी सत्ये दाखवली आहेत त्याबद्दल मी त्याची वाखाणणी करतो. ती बायबलमधील भक्कम सत्ये आहेत. आता काही गोष्टींची मी त्यात भर घालू इच्छितो.
१. देवाचे सर्वोच्च मोल समजून घ्या.
प्रथम मी तिला हे पाहायला मदत करीन जे फक्त दैवी मदतीनेच समजू शकते. ते असे की देवाचे मोल व त्याचे गौरव हे आतापर्यंत होऊन गेलेल्या व होणार्या सर्व मानवांच्या एकत्रित मोलापेक्षा अमर्यादपणे खूप महान आहे. जोपर्यंत हे देवाचे अपार मोल व्यक्तीला समजत नाही, वाटत नाही तोपर्यंत बायबल किंवा ईयोबाचा विशेष अर्थ तिला कळू शकणार नाही.
उदा. देवाच्या अपार मोलाचे तत्त्व यशया ४०:१५, १७ मध्ये या शब्दांत सांगितले आहे. “पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो. सर्व राष्ट्रे त्याच्यापुढे काहीच नाहीत; त्याच्या हिशोबी ती अभाव व शून्यता ह्यांहूनही कमी आहेत.”
आता देवाची योग्यता व इतर वास्तवांची योग्यता यातील अमाप फरक हा देवाच्या प्रीतीच्या विरोधात नाही. यामुळेच देवाची प्रीती अद्भुत आहे. देवाच्या व आपल्या मोलातील फरक कमी करून जर तुम्ही त्याचे प्रेम ठळक करू लागलात तर वास्तवाला काल्पनिक कराल आणि कृपेचा नाश कराल.
२. देवाच्या प्राधान्यांपासून सुरुवात करा.
जेव्हा या जगात आपण बरे आणि वाईट, चूक आणि बरोबर, सुंदर आणि कुरूप, न्याय व अन्याय यांचा न्याय करू लागतो तेव्हा आपल्याला समजलेल्या बऱ्या – वाईटाच्या, सुंदर – न्यायी यांच्या अर्थाने कधीही सुरुवात करू नये. तर देवाने बायबलमध्ये प्रगट केलेल्या कृत्यांनी सुरुवात करावी. आणि तेथून खरे, चांगले, योग्य , सुंदर, न्याय्य काय आहे यावर विचार करावा.
मला आठवते की १९७९ आणि १९८० च्या दरम्यान मी रोम. ९:१४-१५ याचा अर्थ जाणून घेण्यासाठी झगडत होतो. ते वचन असे आहे,
“तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”
आणि मी कित्येक महिने त्या वचनाकडे पाहत म्हणत होतो, “हे कसे घडते, हा युक्तिवाद कसा चालतो?” मी कित्येक महिने या बायबलच्या युक्तिवादाशी झगडत होतो व म्हणत होतो, “हे मला नीट समजून घ्यायलाच हवे. ह्या परिच्छेदाचा अर्थ मी स्पष्ट करणार नाही. हे देवाचे वचन आहे. समस्या माझ्या डोक्यात आहे देवाच्या वचनात नाही.”
मी लिहिलेले दुसरे पुस्तक “देवाचे न्यायीकरण” हे मला त्या प्रश्नाला मिळालेले उत्तर आहे. हे २०० पानांचे पुस्तक त्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यावेळी मला पक्के समजले की, “जॉन पायपर, जर तू स्वत:पासून सुरुवात केली आणि देवाचा न्याय करू लागलास तर देवाच्या सत्याचे तुला कधीच आकलन होणार नाही. बायबल तुला कधीच समजणार नाही. त्याऐवजी तू देवापासून सुरुवात कर व स्वत:चा न्याय कर.”
३. आपण कशासाठी पात्र आहोत हे समजून घ्या.
बायबलनुसार असलेल्या या देवकेंद्रित वृत्तीसोबतच येणारी पुढची खात्री म्हणजे मानवाच्या पापीपणाचे वास्तव. माझे पापीपण हे मला देवाच्या योग्य न्यायासाठी खास जबाबदार धरते. पौलाने म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण “क्रोधाची प्रजा” आहोत (इफिस २:३). दुसर्या शब्दांत आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासासाठी आपली लायकी नाही. या जीवनात देवापासून मिळणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक देणगी, सुख, कृपा मिळणे हे आपल्या पात्रतेपेक्षा खूप अधिक आहे.
यामुळेच देवाकडून कोणत्याही मानवावर कधीही अन्याय झालेला नाही. या पृथ्वीवर आपल्या प्रत्येकाला देवाने आपल्या लायकीपेक्षा खूप चांगले वागवले आहे. मानवा – मानवातील नातेसंबंधामध्ये भयाण अन्याय होत असतात. आणि देवाला ते तुच्छ वाटते कारण देव पापाचा द्वेष करतो. जर देवाच्या हातून येणाऱ्या दु:खास आपण पात्र नाही असे जर आपल्याला वाटत असेल तर देवाची महानता व आपला देवाविरुद्धचा आपला अपराध याची गहनता आपल्याला कळलेली नाही.
यामुळेच उत्पत्तीच्या सहाव्या अध्यायातील जलप्रलयात देवाने आठ व्यक्तीखेरीज जगातील प्रत्येक मानवाला, आबाल-वृद्धाला बुडवले तेव्हा तो परिपूर्णपणे योग्य आणि न्यायी होता. त्याने कोणाचेही वाईट केले नव्हते. या न्यायामध्ये तो परिपूर्ण न्यायी होता. जोपर्यंत पापाची भयानकता आणि गहनता या प्रकारे आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत बरेचसे बायबल आपल्याला समजणारही नाही.
४. तुमच्या परोपकारी पित्यावर भरवसा टाका.
बायबलमधील ईयोब आणि इतर धार्मिक जणांचे दुखसहन आपल्याला आपल्या दुखसहनासाठी तयार करते. व अशी खात्री देते की हे कोणाच्या लहरीवर, निसर्गावर, पापी माणसावर अथवा सैतानावर अवलंबून नाही तर सर्वसुज्ञ, सर्वसमर्थ, अति चांगल्या अशा देवाच्या हातात आहे.
वरील प्रश्नात ती मुलगी म्हणते की देवामागे जाण्याचा परिणाम अशा विध्वंसात होईल हा विचार काही समाधानकारक नाही. मी त्याला असा प्रतिसाद देईन की : त्याच्यामागे जाण्याने येणाऱ्या दु:खाने आपले समाधान व्हावे अशी देवाची अपेक्षा नाही. तर त्याने नेमलेले प्रत्येक दु:ख आपल्या अंतिम भल्यासाठी आहे या विचाराने आपले समाधान व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्याचे हेतू पुढे केले जावेत आणि या सर्वातून तो आपल्याला राखील हे समजून घ्यायला हवे.
जर येशूने दु:खसहन केले तर त्याच्या शिष्यांनाही दु:ख सहन करावे लागेल हे आपण समजून घ्यायला हवे. हे अभिवचन आहे. पौल २ थेस्स. १:५ मध्ये म्हणतो; “ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दु:ख सोसत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.” तसेच १ थेस्स. ३:३ मध्ये नवविश्वासी जनांना त्याने म्हटले. “ह्या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत, हे तुम्ही स्वत: जाणून आहात.” आणि आता हे घडत आहे. त्याला तो “देवाच्या यथार्थ न्यायचे प्रदर्शक” म्हणतो – आपण स्वर्गाला लायक व्हावे म्हणून.
पाळक आणि उपदेशक यांनी येशूच्या आज्ञापालनामध्ये ख्रिस्ती दुखसहनाची आवश्यकता हे तत्त्व शिकवण्याची किती मोठी गरज आहे! त्यांनी तरुणांना सांगायला हवे की येशू त्यांना आरामशीर जीवनासाठी पाचारण करत नाही. पण एक गंभीर आनंदासाठी, मूर्ख आनंदासाठी नव्हे – बोलावत आहे. आणि तरुण ज्या गोष्टींसाठी आता जगत आहेत त्या सर्व खऱ्या जीवनापुढे वाफेप्रमाणे विरून जातील
५. देव जसा पाहतो तसे पाहण्यासाठी प्रार्थना करा.
म्हणून या मुलीला शेवटची गोष्ट सांगतो की माझ्यासोबत, बाबांसोबत रोज रोज अशी प्रार्थना कर की, देवाने आपल्या मनाचे डोळे उघडावे की आपण त्याला आणि जगाला पाहू शकू. आणि देव जगात गोष्टी कशा करतो हे आपण पाहावे यासाठी की तो करतो तसाच सुज्ञ न्याय आपणही करावा.
Social