नवम्बर 17, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग

१६८३-१७१९

लेखांक ११                                            
                                                         

आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा रे. म. बोहिम याच्या पत्नीला जाते. मिशनरींना अशा प्रकारे पाठिंबा मिळवून देण्याचे कामही किती मोलवान आहे, हे आजच्या मंडळीने लक्षात घ्यावे. त्या पत्रामुळे युरोपीयन देशांना भारताची दैवते, तत्त्वज्ञान, भाषा, रीतीभाती, धर्मांतरातील अडचणी मिशनरींची कार्यपद्धती व देवाची या देशावरील कृपा याविषयी माहिती समजली. इंग्लंडमधील एस.पी.जी. संस्थेने भारतातील डॅनिश मिशनचे संवर्धन केले. त्यांनी झिगेन्बाल्गला नौदलाच्या जहाजाने २५० नव्या कराराच्या प्रती, कागद, छापखाना व एक मुद्रकही पाठवला. पण वाटेत संकट आले. एका फ्रेंच लढाऊ जहाजाने या जहाजावर हल्ला केला. जहाज व माल जप्त केले गेले. फक्त कागद व छापखाना हाती आला. त्यांना खंडणी देऊन जहाज सोडवून घेतले. पुढचा प्रवास सुरू झाला. पण वाटेत तो मुद्रक मरण पावला. ॲागस्ट १७१२ मध्ये छापखाना व कागद त्रिंकोबारला पोहंचले. पण मुद्रकाचा प्रश्न उभा राहिला. देवाच्या कृपेने डॅनिश कंपनीत छपाईकाम शिकलेला एक शिपाई सापडला. वरिष्ठांच्या परवानगीने त्याला छापखान्याचे काम दिले व एकदाचा छापखाना मार्गी लागला.

प्रियांनो, आज पुष्कळ मंडळ्यांना सध्याचे सुवार्ताकार्य, मिशनकार्य, त्यातील आव्हाने, मिशन क्षेत्रे याविषयी काहीही माहिती नाही. मिशनरी परिषदा भरवून मंडळ्यांनी याविषयी लोकजागृती करणे गरजेचे आहे. त्या राणीप्रमाणे एका व्यक्तीचे पत्र, लोकांसमोर आणल्याने केवढे काम झाले व मिशन कार्याला गती आल्याचा हा रोचक इतिहास आपण पाहिला. आज वैयक्तिक सुवार्ताप्रसारात पुष्कळ मंडळ्या उदासीन आहेत हे पाहून खेद वाटतो.

छापखाना सज्ज होताच प्रथम लहान मुलांचे पाठ्यपुस्तक व तारणाचा मार्ग ही पुस्तके छापली. पुढे १७१३ मध्ये झिगेन्बाल्गच्या जर्मन मित्रांनी दुसरा छापखाना देणगी म्हणून दिला. तर एका हुशार कारागिराने तामिळ लिपीचा खोल अभ्यास करून तामिळ अक्षरांच्या खिळ्यांचा संच बनवला. आणि आपल्या भावाला सोबत घेऊन या छापखान्यासह तो त्रिंकोबारला आला. तामिळ भाषेत नवा करार छापण्याचे काम सुरू झाले. १७१४ मध्ये चारही शुभवर्तमाने छापून झाली. ही तामिळ ख्रिस्ती जगतातील अविस्मरणीय गोष्ट होती. अविश्रांत सलग ८ वर्षांच्या  श्रमामुळे  झिगेन्बाल्गला ताण आला होता. त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला. याचमुळे त्याचा सोबती प्लुटशॅा यालाही युरोपात माघारे जावे लागले होते. तो भारतात परतणे शक्यच नव्हते. पण देवाने योग्य वेळीच त्याला युरोपात भारताच्या सेवेला उचलून धरण्यासाठी ठेवले असे प्रत्ययास येते. त्याच काळात सेवेस अडखळण ठरणारा बोहिंग डेन्मार्कला परतला होता. तो तेथे लोकांना दिशाभूल करणारी खोटी माहिती देत होता. तेव्हा लोकांच्या मनातील किल्मिश दूर करण्यासाठी पुराव्यांसह खरी माहिती देण्याचे मोलाचे काम प्लुटशॅाने केले.

यावरून धाडसाने सत्यासाठी एकट्याने लढा द्यायचा धडा आपण शिकतो. प्लुटशॅाने सोबत आपल्याबरोबर एका तामिळ तरुणालाही नेले होते. त्याला घेऊन त्याने इंग्लंड व जर्मनीत दौरे काढले. त्यामुळे भारतातील सेवेला अधिक साह्य मिळू लागले. त्यामुळे झिगेन्बाल्गला हुरूप आला. त्याने आपले मिशनक्षेत्र वाढवून श्रीलंकेपर्यंत नेण्याचे ध्येय आखले. पण त्याचा देह मन व आत्मा अथक परिश्रमामुळे शिणल्याने त्याला तरतरीसाठी विसाव्याची गरज भासू लागली. १७१४ मध्ये एका स्थानिक तामिळ तरुणाला घेऊन तो युरोपला निघाला. तो तरुण भारतातील सेवेचे दृश्य फळ असल्याचा पुरावाच होता. वाटेत त्या दीर्घ प्रवासात झिगेन्बाल्ग जुन्या कराराचे भाषांतर करण्याचे व शब्दकोषातील दोष दुरुस्त करण्याचे काम करत होता. या कामी त्या तरुणाने त्याला खूप मदत केली. पूर्वी भारतातील रोमन कॅथोलिक ख्रिस्तीच प्रवासात दिसायचे. आता झिगेन्बाल्ग प्रॅाटेस्टंट मिशनच्या यशाचा अहवाल घेऊन निघाला होता. तेव्हा मंडळीत २२१ बाप्तिस्मा घेतलेले प्रॅाटेस्टंट ख्रिस्ती होते. तर २२ लोक बाप्तिस्मापूर्व शिक्षण घेत होते. दानावर पाच वसतीगृहे चालवली जात होती. त्यात ७८ मुले शिकत होती. एक मंदिर बांधले होते. एक मिशनगृह बांधले होते. स्थानिकांसाठी तामिळ भाषेत ३२ पुस्तके छापली होती. हा अहवाल घेऊन आठ महिन्यांच्या प्रवासानंतर १ जून १७७५ ला तो युरोपात पोहंचला.

आता डॅा. लुटकेन वारले होते. तो प्रथम डेन्मार्कच्या राजाच्या भेटीला गेला. तेव्हा डेन्मार्क व स्वीडनमध्ये युद्घ चालू होते. प्रशिया डेन्मार्कच्या मदतीला धावून आला होता. तर राजा स्ट्रॅालसंडला वेढा देऊन बसला होता. तेथे राजा व झिगेन्बाल्गची भेट झाली. रुबाबदार, भारदस्त, तेज:पुंज, निश्चयी, शांत वृत्तीचा, कुशाग्र बुद्धीचा, चमकदार डोळ्यांचा, पण प्रेमळ व सौजन्यता आणि मनमिळाऊपणाची पावलागणिक साक्ष पटवणारा हा कोणी राजाच्या मेहरबानीसाठी आलेली परकीय व्यक्ती नसून प्रसिद्ध मिशनरी झिगेन्बाल्ग असल्याचे सैनिकांच्या तोंडी पसरले. पाच तास त्यांची मुलाखत चालली होती. भारतात परतण्यापूर्वी कोपनहेगनला मिशनबोर्ड स्थापण्याचे काम राजाने त्याच्यावर सोपवले.

ते त्याने चोख बजावले. तेथून आता त्रिंकोबारची सूत्रे हलू लागली. राजाच्या हुकमाने अधिकारी वर्गाचा विरोध बंद झाला. गव्हर्नर हेल्युअसला बडतर्फ करून मायदेशी परत बोलवण्यात आले. तेथे असताना झिगेन्बाल्गने डेन्मार्क, जर्मनीचा दौरा काढून भारतातील मिशनकार्याची मंडळ्यांना माहिती दिली. लोकांना मिशनकार्याविषयी आस्था व प्रेम वाटू लागले. त्याचा श्रमपरिहारही झाला. याच सुमारास त्याचा विवाह डॅारथीया सॅाल्ट्झमनशी झाला. ही सुदृढ, सुसंस्कृत, धार्मिक स्त्री ८ वर्षांपूर्वी ज्या शाळेत होती, तेथे हा शिक्षक होता. विवाहानंतर दोघे इंग्लंडला आले. तेथे मिशनकार्याची कीर्ती चहुकडे पसरली होती. त्यांचे तेथे उत्तम स्वागत झाले. लोकांची कळकळ व सहानुभूती लाभली. एस.पी.सी.के. संस्थेने पैसे व मानपत्र देऊन त्याचा गौरव केला व नित्यनेमाने मदत करण्याची हमी दिली. ४ मार्च १७१६ला निघून १९ ॲागस्टला ते दोघे चेन्नईला पोहंचले. त्याचा रजाकाळ फार अल्प होता. तो उत्साही होता; त्या रजाकाळातही त्याने कामेच केली. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली नाही. याचे परिणाम पुढे प्रत्ययास येतात.

झिगेनबाल्गच्या अनुपस्थितीत ग्रंडलरने सर्व कामे उत्तम प्रकारे केली व वाढवली. आता झिगेन्बाल्ग परतल्यावर ९ फेब्रुवारी १७१७ ला अधिक मोठ्या नवीन मंदिराची पायाभरणी झाली. ‘नवे यरुशलेम’ या नावाच्या या नवीन मंदिराचा उद्घाटन सोहळा ११ ॲाक्टोबरला संपन्न झाला. ते क्रुसाच्या आकाराचे असून मधल्या भागात व्यासपीठ आहे. वेदीच्या दोन अंगांना झिगेन्बाल्ग व ग्रंडलरच्या कबरी आहेत. आज प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोक या स्थळाला भेट देतात.

आता झिगेनबाल्गने स्थानिक पाळक व शिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली. त्यात आठ विद्यार्थी होते. त्याने डॅनिश वसाहतीत दोन ठाण्यांवर एकेक मिशनरी नेमला. गव्हर्नरच्या विनंतीवरून कडलूर व चेन्नईमध्ये अशा दोन शाळा काढल्या. ब्रिटिशांचे ख्रिस्ती शिक्षणातील हे पहिले पाऊल होते. शब्दकोष पूर्ण झाला. जुन्या कराराचे रूथपर्यंत

भाषांतर झाले. काम वाढले तसा विरोध वाढला. एक दिवस एस.पी.सी. के. च्या अध्यक्षाचे झिगेन्बाल्गला पत्र आले. त्यात मानमरातबाने आरामदायी सेवा न करता, ज्यांनी ख्रिस्ताचे नाव कधीच ऐकले नाही अशांसाठी अथक त्यागाने काम केल्याबद्दल, त्यासाठी संकटे व अपमान सहन केल्याबद्दल झिगेन्बाल्गची प्रशंसा करण्यात येऊन त्याला सदिच्छा देण्यात आल्या होत्या. हे पत्र वाचून त्याला व त्याच्या सहकार्यांना उत्तेजन व समाधान मिळणार होते. पण ते पत्र त्यांच्या हाती पडण्यापूर्वीच झिगेन्बाल्गची जीवनयात्रा संपली होती.

१७१८ च्या अखेरीस तो फार खंगत चालला होता. अथक परिश्रम हे एक कारण होतेच. पण दुसरे कारण म्हणजे स्वदेशीय अधिकारवर्गाशी निष्कारण होणारा संघर्ष. मिशन बोर्डचा अध्यक्ष बेन्डट धार्मिक पण संकुचित वृत्तीचा होता. त्याच्यावर बोव्हिंगचा प्रभाव पडला होता. त्याने केवळ साध्या पद्धतीने सुवार्ताप्रसार करण्याचे धोरण ठेऊन पुस्तके लिहिणे, छपाई, मंदिर, प्रशिक्षणवर्ग, ज्ञानप्रसार ही झिगेन्बाल्गची कामे नापसंत ठरवली. झिगेन्बाल्ग व त्याच्या सहकार्यांनी दारिद्र्य पत्करून जोडीजोडीने बाहेर पडून सुवार्ताप्रसार करावा असे फर्मान त्याने काढले. ही मूर्ख आज्ञा ऐकून झिगेनबाल्गचे काळीजच फाटले. अर्थात पुढे बोर्डाला ही चूक कळून आली व त्यांनी ही आज्ञा मागे घेतली. पण तोवर झिगेन्बाल्ग व ग्रंडलरला मृत्युमुखी पडावे लागले.  नंतर त्यांच्याच पद्धतीने काम चालू राहिले. जरी हा कटू अनुभव आला नसता तरी झिगेन्बाल्ग वाचला नसता हे तितकेच खरे आहे. शक्तिबाहेर काम केल्याने दीर्घायुष्य लाभण्याची अपेक्षा करणे चूक ठरेल. देवाचे हे काम तातडीने करणे गरजेचे आहे. देवाला काळजी आहे या भावनेने त्यांनी काम केले होते.

१७१८ च्या नाताळ व नवीन वर्षाच्या उपासनेत झिगेन्बाल्गने उपदेश केला. पण झपाट्याने त्याची प्रकृती खालावत गेली. पौलाप्रमाणे प्रभूच्या सन्निध्यात जाण्याची उत्कंठा बाळगत २३ फेब्रुवारी १७१९ रोजी तो प्रभुघरी निघून गेला. अखेरीस तो म्हणाला, “मी दररोज तुझ्या हाती स्वत:ला सोपवत असतो. आता जेथे माझा बाप आहे, तेथे तुझा सेवक असावा अशी मी इच्छा करतो”… ‘मला तीव्र प्रकाश सहन होत नाही’… असे म्हणत असता त्याने आपला हात कपाळावर आडवा धरला व म्हणाला, “कडक ऊन पडल्यासारखा प्रकाश माझ्या डोळ्यांवर कुठून येत आहे?” तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सौंदर्यपूर्ण शांती फुलत होती.

त्याच्या विनंतीवरून त्याच्या जवळच्या लोकांनी व्हॅायोलीन वाजवून त्याचे आवडते गीत गायला सुरुवात केली. ते ऐकत असता मूल आपल्या आईच्या मांडीवर झोपावे तसा तो प्रभूच्या बाहूत शांतपणे विसावला. त्याला महानिद्रा लागली. केवळ ३६ व्या वर्षी त्याचे मरण झाले. पण आपल्या अल्पायुषी पायाभूत कार्यातून त्याने भारताला महान देणगी दिली. त्याने सुरू केलेली कार्यपद्धत आजही चालू आहे. कालपरत्वे त्या कार्यात अनेक सुधारणा होत गेल्या. पण कामाची दिशा देण्याचे काम झिगेन्बाल्गनेच केले.

एकच गोष्ट तो हाताळू शकला नाही, ती म्हणजे जातीवाद. कॅथॅालिक मिशनरींनी जाती भेदाला भलतेच महत्त्व दिले होते, त्यामुळे तो टोकाला गेला होता. हे असेच असते असा स्थानिकांचा ग्रह झाला होता. पण पुढे प्रॅाटेस्टंट मिशनरींनी ख्रिस्ती मंडळीत जातिभेदाला मुळीच थारा दिला नाही. त्रिंकोबारच्या मंडळीत शुद्र व हरिजन वेगवेगळे बसत. हरिजनांच्या आधी सर्व शुद्र आधी भोजन वाढून घेत. पुढे हे सारे बंद झाले. पण झिगेन्बाल्गची इतर सर्व कामे पुढे चालू राहिली. विशेष म्हणजे मिशन कार्यपद्धती व त्याचा उद्देश त्याने भारतीयांना दाखवून दिला. यापूर्वीच्या ‘रोमन ब्राम्हण’ पद्धतीमुळे ख्रिस्ती मिशन कार्याविषयी ढोंगी व लबाड अशी जी प्रतिमा तयार झाली होती, ती दूर होऊन ख्रिस्ती कार्याविषयी आदरभाव निर्माण झाला. हे महत्त्व मिळवून देण्याचे कार्य झिगेन्बाल्गने केले. ख्रिस्तीतरांचाही तो आवडता होता. त्यांचे मन ख्रिस्ताकडे वळवून त्याच्या कळपात त्यांना आणण्याचे काम तो करत होता. गूढ विधींनी नव्हे तर खऱ्या सुवार्तेचा पूर्ण खुलासा करून तो त्यांना ख्रिस्ताकडे आकर्षित करायचा. बाप्तिस्म्यापूर्वी पूर्ण पवित्र शास्त्र देण्याचा त्याचा आग्रह असे.

धर्माविषयी त्याने राजरोस मुक्त चर्चा घडवून आणली. कसलीच गुप्तता ठेवली नव्हती. हा बदल झिगेन्बाल्गने लोकांच्या लक्षात आणून दिला. असा आदर्श ठेवणारा हा पहिला मिशनरी होता. सर्व प्रॅाटेस्टंट मिशनऱ्यांचा हा मुकुटमणी होय. सर्वच त्याची आदराने प्रशंसा करतात. त्याचा मिशनकार्यासाठी असलेला उत्साह, आवेश, देवावरील दृढ निष्ठा, धाडस, परिश्रम, कामसुपणा, नि:स्वार्थीपणा, तन मन धन ओतून त्यागाने काम करण्याचा सेवाभाव यामुळे तो मिशन क्षेत्रातला ‘प्रभाततारा’ असे संबोधण्यास पात्र ठरतो.

Previous Article

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग 

Next Article

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

You might be interested in …

आमच्या अशक्तपणात आमच्यामध्ये कार्य करण्यास देवाला आवडते

ट्रेवीस मायर्स गेल्या मार्चमध्ये माझ्यावरचा कॅन्सरचा उपचार संपला तरीही मला खूपच अशक्त वाटत होते. पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून माझे काम तसेच माझे घरातील व मित्रांशी असलेले  नातेसंबंध  या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यास मी मर्यादित आहे […]

पवित्र स्थानातील पडदा

तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मत्तय २७:५१. इतका जाड व मजबूत पडदा फाटून दुभागणे हा काही हलकाफुलका चमत्कार नाही; तसेच तो फक्त सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याकरताही केला नाही – यामध्ये बरेच धडे […]

देवाचे गौरव येशू

जॉन मकआर्थर “परमेश्वराचे गौरव प्रकट होईल” (यशया ४०:५), हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. येशूचा जन्म हा यशयाच्या अभिवचनानुसार देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण आहे. ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचा आशय देवाचे गौरव आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव हे गाणे देवदूतांनी गायले, प्रभूचे […]