वनीथा रिस्नर
इस्राएलच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ टिकलेल्या चमत्काराला एका प्रश्नावरून नाव देण्यात आले. जेव्हा वाळवंटात भाकर प्रथम दिसली, तेव्हा लोकांनी विचारले, “हे काय आहे?” मोशे त्यांना म्हणाला, “जी भाकर यहोवाने तुम्हाला खायला दिली ती ही आहे” (निर्गम १६:१५). त्यांनी तिला मान्ना म्हटले—स्वर्गातून आलेली भाकर, जिचा अर्थ त्यांना कधीच पूर्णपणे समजला नाही, पण त्यांना हे माहीत होते की ती खाऊन त्यांचे पोट भरेल.
चाळीस वर्षांनंतर, जेव्हा मोशेने त्या अरण्याकडे मागे वळून पाहिले, तेव्हा त्याने या चमत्काराचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक दशकांच्या भटकंतीनंतर, मोशेला लोकांना सांगायचे आहे की, देवाने त्यांना वाळवंटातून का आणले आणि ही रहस्यमय भाकर दररोज का खाऊ घातली. तो म्हणाला, “यहोवा तुझा देव याने तुला नम्र करायला, आणि तू त्याच्या आज्ञा पाळशील किंवा नाही याविषयी तुझ्या ह्रदयात काय आहे ते जाणण्यासाठी तुझी परीक्षा करायला ही चाळीस वर्षे रानाच्या मार्गाने तुला चालवले आहे त्या सर्वांची तू आठवण ठेव. आणि त्याने तुला नम्र केले व तुला भूक दिली, आणि जो मान्ना तुला ठाऊक नव्हता व तुझ्या पूर्वजांनाही ठाऊक नव्हता तो तुला खाऊ घातला, अशासाठी की, मनुष्य केवळ भाकरीने वाचत नाही, तर जे काही यहोवाच्या तोंडातून निघते त्याकडून मनुष्य वाचतो हे तुम्हाला कळवावे” (अनुवाद ८:२-३). आणि त्याने पुढे स्पष्ट केले की, “तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे ” (अनुवाद ८:१६).
मोशे इस्राएल लोकांना केवळ देवाने त्यांना अन्न दिले होते याची आठवण करून देत नव्हता. तर देवाने त्यांना त्या प्रकारे अन्न का दिले, हे तो स्पष्ट करत होता. देवाने त्यांना उपाशी राहू दिले, ते त्याने त्यांचा त्याग केला होता म्हणून नव्हे, तर जे ते दुसऱ्या कोणत्याही मार्गाने शिकू शकत नव्हते ते त्यांना शिकवण्यासाठी केले. त्यांचे जीवन भाकरीपेक्षा आणखी कशावर तरी अवलंबून होते आणि ते म्हणजे देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर.
उलटसुलट पुरवठा
स्तोत्र १०५ इस्राएलच्या अरण्यातल्या वर्षांचा आढावा घेते आणि काही वचनांमध्ये देवाने कशी काळजी घेतली याचा सारांश देते: “त्यांनी मागितले, तेव्हा त्याने लावे आणले, व आकाशाच्या भाकरीने त्याने त्यांना तृप्त केले. त्याने खडक फोडला तेव्हा जले भळभळ बाहेर निघून वाहिली; नदीसारखी ती कोरड्या ठिकाणांवर वाहत चालली” (स्तोत्र १०५:४०-४१).
मॅथ्यू हेन्री यांनी निरीक्षण केले: “सामान्यतः आकाशातून पाण्याचा पुरवठा आणि जमिनीतून भाकरीचा पुरवठा होतो. परंतु इस्राएलांसाठी देवाच्या सामर्थ्याने ढगांमधून भाकर आणि खडकांतून पाणी दिले: निर्मितीचा देव निसर्गाच्या नियम आणि चक्राच्या बंधनात नसून त्यापासून फार दूर आहे.”
अपेक्षित हे आहे की, भाकर जमिनीतून आणि पाणी आकाशातून येते. वाळवंटात, देवाने या दोन्ही गोष्टी उलट केल्या. त्याचे लोक अशा ठिकाणी भटकत होते जिथे पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही आणि देवाने गारगोटीच्या खडकातून पाणी बाहेर काढले. त्यांनी गहू पेरला नाही किंवा भाकरी भाजली नाही. ती स्वर्गातून खाली आली. अरण्यातील देवाची तरतूद पूर्णपणे उलटी होती.
इस्राएल लोक कालच्या मान्नावर आज जगू शकत नव्हते. दररोज सकाळी त्यांना ताजी भाकर गोळा करावी लागत होती. प्रत्येक सूर्योदय हा विश्वास ठेवण्याचे एक नवीन आमंत्रण होते की, ज्या देवाने काल पुरवले होते, तो आजही पुरवेल. आणि त्याने त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवल्या.
तरीही लवकरच इस्राएल लोकांना मान्ना विषयीचे आश्चर्य वाटेनासे झाले. त्यांनी तो गृहीत धरला.
त्यांनी कुरकुर केली की आम्हाला मान्नाशिवाय दुसरे काहीच खायला नाही आणि त्यांना मिसरमधील जेवणाची आठवण आली आणि त्यांनी त्याची हाव धरली. चमत्कार कधीच बदलला नाही, पण त्यांची अंतःकरणे मात्र बदलली. ते देवाच्या या तरतुदीशी इतके परिचित झाले की त्यांना ती आता देणगीच वाटेनाशी झाली. ती त्यांना मामुली आणि कंटाळवाणी वाटू लागली. लवकरच, त्याने जे काही पुरवले होते ते त्यांना नकोसे वाटू लागले.
कदाचित याचे कारण असे असेल की मान्ना मिळतो यात नाट्यमय काहीच नव्हते. तो तांबडा समुद्र दुभागल्यासारखा थरारक नव्हता. मान्ना पडताना पाहून लोक श्वास रोकून अवाक झाले किंवा शत्रू भीतीने पळून गेले असे काही घडले नाही. तांबड्या समुद्राने एका अविस्मरणीय क्षणात परमेश्वराचे सामर्थ्य प्रकट केले. मान्नाने चाळीस वर्षे दररोज देवाची विश्वसनीयता आणि अथक करुणा प्रकट केली.
खरा विश्वास सामान्य गोष्टींमधून वाढतो
अनेकदा क्षुल्लक आणि किरकोळ गोष्टी, ज्याकडे आम्ही सहज कानाडोळा करतो त्यातूनच खरा विश्वास वाढतो. आपण दिव्य अनुभवांची अपेक्षा करतो, पण प्रभूसोबत घालवलेला रोजचा वेळच आपला विश्वास दृढ आणि अधिक सखोल करतो. जेव्हा मी पहिल्यांदा ख्रिस्ताकडे आले, तेव्हा बायबल पाहून मी स्तंभित झाले. त्यात शोधण्यासारखे आणि शिकण्यासारखे खूप काही होते. या विश्वाच्या देवाने मला त्याचे स्वतःचे शब्द दिले होते आणि मी ते अधाशीपणे वाचले. पण कालांतराने, बायबल वाचणे हा जीवनदायी अनुभव न राहता, एक कर्तव्य म्हणून करावे लागणारे काम बनले.
ते जमिनीवर पडलेल्या सामान्य मान्नासारखं — सहज दुर्लक्षित करता येण्याजोगे वाटू लागले. अनेकदा ते शुष्क, अगदी कंटाळवाणं वाटायचं; ते मेजवानी वाटेना, उलट ‘हे काय आहे?’असा प्रश्न विचारला. मी परिचित परिच्छेदांवर वरवर नजर फिरवायचे परंतु देवाने त्यात माझ्यासाठी काही खास काहीतरी ठेवले हे मी विचारातही घेतले नाही. जसे इस्राएली लोकांचे अति परिचयामुळे मान्नाचे आकर्षण कमी होत गेले तसे माझे झाले. मला असे वाटले की माझे हृदय संजीवित करण्यासाठी आणि बदलण्यासाठी मला अद्वितीय अनुभवांची गरज आहे. एक हृदयस्पर्शी वक्ता. पर्वताच्या शिखरावरील एकांत. देवाशी गाठभेट.
ते अनुभव अद्भुत आणि विश्वास वाढवणारे असू शकतात. पण अशा कोणत्याही गोष्टींपेक्षा देवाच्या वचनाचे दैनंदिन सेवन केल्यानेच माझा विश्वास सबळ झाला, विशेषतः दुःखाच्या समयी, माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात, मला नवीन आध्यात्मिक अनुभवांपेक्षा देवाचा आवाज पुन्हा ऐकण्याची जास्त गरज होती. “माझा जीव धुळीस चिकटून राहतो, तू आपल्या वचनाप्रमाणे मला सजीव कर.” स्तोत्रसंहिता ११९:२५ ही माझी रोजची विनवणी होती. आणि न चुकता, त्याने त्याच्या वचनातून माझी भेट घेतली आणि मला टिकवून ठेवले. मला आठवतंय, मला असं वाटायचे की, मी जणूकाही भट्टीत जगत असून गुदमरलेली आहे. पण दररोज सकाळी बायबल वाचल्याने आणि प्रभूजवळ बसल्याने मला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू मिळाला.
शास्त्रलेखाच्या पानापानांमधून देवाचे बोल ऐकत राहणे आणि देवाच्या वाचनाने रूपांतर होणे यासारखा दुसरा रोमांच नाही. माझ्या परिस्थितीत बदल होत नसला तरीही, देवाच्या वचनाकडे मी असहाय्य होऊन येत होते आणि उत्तेजित होऊन जात होते. वाचताना माझे अंतःकरण आतल्या आत उकळत होते. माझा जीव धुळीस चिकटून आहे असे वाटत असताना तो मला सजीव करत होता. माझ्या भयांपेक्षा देवाच्या वचनांवर, माझ्या परिस्थितीपेक्षा देवाच्या स्वभावावर आणि मला उत्कंठेने हव्या असलेल्या परिणामांपेक्षा देवाच्या सदोदित उपस्थितीवर मी अधिक विश्वास ठेवावा हे देव मला शिकवत होता
वाचनासह लिखाण
प्रभूने त्याचे वचन समजून घेण्यासाठी आपले मन उघडणे, हा एक उल्हासदायी अनुभव आहे. जरी हे कार्य अलौकिक असले तरी, त्याची सुरुवात बायबल उघडण्याच्या सामान्य कृतीने होते. वाचण्यासाठी वेळ काढणे. शब्दांवर लक्ष केंद्रित करणे. परिच्छेद आणि वाक्यांशांना जोडणे. त्यातील नमुने लक्षात घेणे. तपशिलांकडे बारकाईने पाहणे आणि नंतर व्यापक चित्र मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी एकत्रित करून त्यावर अभ्यासपूर्वक विचार करणे या सर्व गोष्टी करायला हव्या.
देवाचे वचन समजून घेण्यासाठी मला लेखणी हवी असते. हे केवळ वाचनच नाही, तर विचार करणेही जरुरीचे आहे. मी माझ्या बायबलच्या मोकळ्या जागेत किंवा माझ्या वहीत नोंद करते. जेव्हा मला न समजणारे परिच्छेद माझ्यासमोर येतात, तेव्हा मी देवाकडे ज्ञानाची याचना करते. माझ्या असे लक्षात आले आहे की, सहजपणे, घाईगडबडीने आणि वरवर वाचल्याने मला कधीच प्रेरणा मिळाली नाही. मला स्वतःला माहिती टिपून घेण्याची, मनन करण्याची, लक्ष देण्याची गरज आहे. होय, यासाठी जास्त वेळ लागतो. पण यातून मी जे काही कमावले त्याचे मूल्य मी त्याऐवजी इतर कोणत्याही गोष्टी केल्या असत्या त्यातून मिळणाऱ्या मुल्यांपेक्षा अधिक चिरस्थायी आहे.
देवाच्या वचनातून काहीतरी नवीन मिळवण्यासाठी आपल्याला ग्रीक आणि हिब्रू भाषा माहीत असण्याची गरज नाही. देव आपले वचन केवळ विद्वानांसाठीच प्रकाशित करत नाही. ख्रिस्तामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती खऱ्या मनाने अशी विनंती करतो की, “मी तुझ्या नियमशास्त्रातली आश्चर्ये पाहावीत म्हणून माझे डोळे उघड” (स्तोत्र.११९:१८). त्या प्रत्येकासाठी तो ते प्रकाशित करतो. तुम्ही कदाचित नवीन विश्वासणारे असाल, आणि पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या वचनातील अशी एखादी गोष्ट दाखवू शकेल, जी इतरांनी दुर्लक्षित केली असेल.
आमची सर्वात मोठी गरज
मान्ना अन्नापेक्षा श्रेष्ठ होता. देवावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा आस्वाद घेण्याचे ते एक आमंत्रण होते.
ख्रिस्त आजही तेच आमंत्रण देत आहे. तो जीवनाची खरी भाकर आहे, आणि तो आजही भुकेल्या लोकांना तृप्त करतो. स्वतः ख्रिस्त हाच जीवनाची भाकर आहे, तीच तो दिवसेंदिवस आम्हाला खाऊ घालतो आणि आम्हाला शिकवतो की, हीच आमची नेहेमीची सर्वात मोठी गरज आहे.


Social