नवम्बर 3, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मुलांचा नाश करणारी महत्त्वाकांक्षा

स्कॉट हपबर्ड

काल सकाळी मी माझ्या दोन आठवड्यांच्या मुलाला पाळण्यात झोका देताना, निर्गम १:२२ मधील फारोचे शब्द पुन्हा वाचले: “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत टाका.”

त्या काळात, माझ्यासारखे जन्मदाते आपल्या बालकांना बाहूत घेऊन छातीशी घट्ट कवटाळीत असतील. त्यांचे बाहू जणू एक अभेद्य भिंतच होती. तरीही फारोचे क्रूर सैनिक त्यांच्या घरात घुसून त्यांचे हालहाल करून ती बाहूंची अभेद्य भिंत मोडत. बाप, आया आणि बहिणी यांच्या आक्रोशाचा हाहाकार! आणि ह्या तान्ह्या मुलांच्या शिरच्छेद केलेल्या शवांनी नदी रक्तासारखी लाल होऊन वाहात होती. माझ्या मन:पटलावर अमेरिका आणि इतर अनेक राष्ट्रांमधून वाहणाऱ्या रक्तमय लाल नद्या उभ्या राहिल्या.

आजच्या काळात माझ्या वयाचे पती पत्नी डॉक्टरकडे जाऊन म्हणतात, “आम्हाला गर्भपात करून द्या.” देवाने मातेच्या  गर्भाशयात विणलेल्या जिवाचा अंत करायला डॉक्टर पुढे सरसावतात. जगातील अदृश्य नदी अशा लाखो जिवांच्या  रक्ताने लाल होऊन वाहाते. होय, हाच तो आजचा काळ!

फारोने केलेल्या बालहत्या आणि आजची गर्भहत्त्या यांचा शेवट एकच. बालकांच्या शवांचा कचऱ्यासारखा ढीग. अनेकदा याचे कारण अधार्मिक महत्त्वाकांक्षा जी अंधकारमय प्रेरणेतून उगम पावते.

फारोची अधार्मिक महत्त्वाकांक्षा

एके काळी बलाढ्य मिसर राष्ट्राने याकोब आणि त्याच्या पुत्रांना आश्रय दिला. फारोने त्या कुलपुरुषाचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्या कुटुंबाला देशातील सर्वोत्तम जमीन देऊ केली (उत्पत्ती ४७:५-७). जन्माने हिब्रू आणि राजकीय अधिकार असलेला योसेफ हा मिसरी आणि हिब्रू लोकांमधील दुवा होता.

“नंतर ज्याला योसेफाची माहिती नव्हती असा नवा राजा मिसरावर आला” (निर्गम १:८). ज्याने एकेकाळी त्याच्या राष्ट्राला उपासमारीपासून वाचवले, त्याला तो ओळखत नव्हता; पण “बहुतपट होऊन फारच शक्तिमान” (निर्गम १:७) झालेल्या इस्त्राएलच्या संतानाला तो ओळखत होता.

अनेक राजांनी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचे सामर्थ्य ओळखून त्यांच्यासोबत करार केला आणि देवाने अब्राहाम व त्याच्या संतांनाशी मैत्री करणाऱ्यांना दिलेल्या आशीर्वादांचा उपभोग घेतला (उत्पत्ती १२:३). परंतु फारो मुत्सद्दी नव्हे तर  हुकूमशहा होता. त्याच्या महत्त्वाकांक्षेपुढे शांतीला थारा नव्हता.

त्याने शक्कल लढवली,“चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर ते बहुतपट होतील; आणि असे होईल की, एखादी लढाई होईल तेव्हा तेही आमच्या शत्रूंस मिळतील व आम्हाविरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील” (निर्गम १:१०). फारोला शहरे बांधायची होती आणि त्यासाठी गुलामांची गरज होती. फारोला आपले राज्य वाढवायचे होते आणि त्याला त्याच्या अधीन असलेल्या प्रजेची गरज होती. फारोला आपल्या सिंहासनाचे रक्षण करायचे होते आणि त्याला कोणताही प्रतिस्पर्धी नको होता.

प्रथम त्याने कठोर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला, पण हिब्रू मुले जन्माला येतच राहिली (निर्गम १:११-१२). त्यानंतर त्याने हिब्रू सुईणींना आपल्यासाठी बालहत्या करण्याची आज्ञा दिली, पण त्यांनी तसे केले नाही. आणि हिब्रू मुले जन्माला येतच राहिली (निर्गम १:१५-१७). म्हणून त्याने त्याच्या महत्त्वाकांक्षेचे विष त्याच्या लोकांना पाजले: “मग फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, त्याने म्हटले, जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत टाका” (निर्गम १:२२). मुलग्यांना ठार मारा. एकालाही सोडू नका.

अधार्मिक महत्त्वाकांक्षा

अर्थातच, गर्भहत्त्येच्या हक्काचे समर्थन करणारे अनेक जण फारोच्या काळातील बालहत्या आणि आजच्या गर्भहत्त्येच्या तुलनेवर आक्षेप घेतील. पण स्त्रीच्या उदरातील गर्भ हा जन्मलेल्या बाळाइतकाच मानवी आहे, असा ज्यांचा विश्वास आहे त्यांना वरील तुलना क्षुल्लक वाटेल. गर्भाशयातील बाळ आणि आईच्या कुशीतील बाळ  काही महिन्यांनी, काही इंचांनी वेगळे असू शकते, पण ते बाळच आहे.

“फारोला वाटले की तो एका शापाचा वध करत आहे; पण प्रत्यक्षात तो एका आशीर्वादाची हत्या करत होता.”

त्याहूनही अधिक, तेव्हाची अर्भकहत्या आणि सध्याची गर्भाची हत्त्या हे फारोची अमानुष वृत्ती दाखवतात. बऱ्याच वेळा, गर्भाची हत्त्या करणाऱ्याच्या कातरीने ठार केलेली बालके ही अधार्मिक महत्त्वाकांक्षेचे बळी असतात.

स्त्रिया आणि पुरुष

अनेक स्त्रिया द्विधा मन:स्थितीत गर्भपात करणासाठी जातात. गर्भपाताच्या निवडीच्या समर्थनार्थ केलेल्या अनेक लिखाणांमधूनही गर्भातील जिवासाठी तळमळ दिसून येते, गर्भाची हत्त्या केल्यानंतर एका महिलेने अशाच प्रकारे लिहिले: “विज्ञान मला सांगते की,  बाळा तू माझ्या नसानसांतून अजूनही कुजबुजत आहेस.”

पण हेही खरे आहे की, ‘गर्भहत्त्या हक्कांचे जनक’ लॉरेन्स लॅडर यांनी अनेकांना पटवून दिले होते की, ‘जोपर्यंत स्त्रीचे तिच्या प्रजननक्षमतेवर पूर्ण नियंत्रण नसेल, तोपर्यंत ती स्वतंत्र असू शकत नाही.’ दुसऱ्या लाटेतील स्त्रीवादाच्या नेत्या बेट्टी फ्राइडन यांची तर खात्रीच होती आणि त्यांनी व इतरांनी ‘गर्भहत्त्येला स्त्रीवादाचा केंद्रबिंदू’ बनवण्यासाठी प्रयत्न केले.

लॅडर यांनी १९६६ साली ‘अबॉर्शन‘ हे पुस्तक प्रकाशित केले. तेव्हापासून वारंवार स्त्रियांच्या डोक्यात भरवले जाते की, मातृत्वापेक्षा महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे बालकांकडे स्त्रीच्या यशाचे शत्रू असेच पाहिले जाते. काही स्त्रिया हा कार्यक्रम राबवतात आणि गर्भपाताची घोषणा करतात; काही स्त्रिया शांतपणे ऐकून घेतात, तरीही मुलांपेक्षा महत्त्वाकांक्षेचीच निवड करतात.

परंतु जसे ज्या स्त्रियांना मातृत्व नको असते त्यांच्यासोबत असे पुरुषही असतात ज्यांना पितृत्व नको असते. काय करावे याबद्दल पूर्णपणे गोंधळलेल्या किती स्त्रियांनी प्रियकर किंवा पतीच्या दबावाखाली गर्भहत्त्या केली आहे? १८३० च्या दशकात, न्यूयॉर्कमधील एका तरुण पाळकाच्या निदर्शनास आले की, गर्भपातासाठी महिलांना दोष दिला जातो, परंतु बहुदा पुरुषच ही समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात पैसे देतात. आजचे पुरुष स्वतःच्या महत्त्वाकांक्षा बाळगून, अनियोजित गर्भधारणेवर पैसा आणि हेराफेरीचा वापर करतच आहेत.

निश्चितच, जर प्रत्येक पुरुषाने पितृत्वाला महत्त्व दिले असते, जर त्याला मोठमोठ्या पदांपेक्षा ‘पिता’ हे बिरुद अधिक श्रेष्ठ वाटले असते, तर दरवर्षी हजारो मुले गर्भाबाहेर जीवन जगली असती. पण पुरुषांच्या महत्त्वाकांक्षेत सुध्दा गर्भहत्त्येची कातरी आहे.

गर्भहत्त्यावादी आणि त्यांचे समर्थक

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, ‘मादाम रेस्टेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲना लोहमन यांनी गर्भाशयातील बालकाची हत्या करून इतके पैसे कमावले की त्या जाहिरातींवर वर्षाला २० कोटी रुपये म्हणजे आत्ताचे ६० कोटी रुपये खर्च करू शकल्या. एका शतकानंतर, गर्भाशयातील बालकाची हत्या करणारी इनेझ बर्न्स इतकी श्रीमंत झाली की तिने आपल्या कमाईचा जवळजवळ अर्धा भाग लाच देण्यात आणि काळी कृत्ये करण्यात गुंतवला: दोघींना तुरुंगवासाची शिक्षा झाली. तरीही सुटल्यानंतर त्यांनी गर्भाशयातील बालकांची हत्या करणे चालूच ठेवले.

आजही, कायद्यानुसार गर्भहत्त्या ही एक सेवा समजत असले तरी, तो एक महत्त्वाकांक्षी धंदा बनला आहे. २०१५ मध्ये  एका वरिष्ठ डॉक्टरने गर्भाशयातील अर्भकाचे अवयव अचूकपणे विच्छेदन केले तर संशोधनासाठी कसे वापरता येतात, हे एका व्हिडिओमध्ये दाखवले, ते पाहून सध्याची अमेरिकेतील राजकारणी टेरिसा बुकोविनाक खडबडून जागी झाली. आणि “गर्भहत्त्या म्हणजे एक औद्योगिक संकुलच” असे म्हणाली.

व्यापक दूरदृष्टी

जेव्हा आपण आधुनिक जगाची तुलना प्राचीन मिसराशी करतो, तेव्हा साम्य दिसून येते. अर्थातच जगात कोठेही असा कोणीही नेता नाही जो आपल्याला आपल्या शेजाऱ्यांची मुले त्यांच्या हातातून हिसकावून घेण्याची आज्ञा देतो. तरीही, करिअर, स्वायत्तता, लैंगिक स्वातंत्र्य, पैसा आणि पद मिळवण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेमागे एक फारोची वृत्ती खदखदत आहे. नदीत हिब्रू मुलांची शवे जशी फारोची मनोवृत्ती दाखवत होती तसेच गर्भपात केलेल्या मृत मुलांच्या शवांची रांग महत्त्वाकांक्षांच्या मागे लागलेल्यांची वृत्ती दाखवते.

फारोला कशाची गरज होती? आणि आपल्याला कशाची गरज आहे? दोन गोष्टींची: मोठी दूरदृष्टी आणि उत्तम रक्त. फारो “योसेफाला ओळखत नव्हता” (निर्गम १:८), पण अरे, त्याने त्याला ओळखायला हवे होते! जर त्याने त्याला ओळखले असते, तर त्याला हे कळले असते की ज्या हिब्रू लोकांना तो इतका भीत होता त्यांच्यामुळेच मिसर देश अस्तित्वात होता. त्याला हे कळले असते की, मिसराने देवाच्या लोकांना आशीर्वाद दिल्याबद्दल देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता. आणि आता पुन्हा एकदा त्याने मिसराला आशीर्वाद दिला असता (उत्पत्ती १२:३). रक्तपिपासू फारोला वाटले की तो एका शापाला मारत आहे; परंतु तो प्रत्यक्षात एका आशीर्वादाची हत्या करत होता.

गर्भह्त्त्येमध्येही तोच संकुचित दृष्टिकोन नाही का? हे नको असलेले बाळ म्हणजे एक शाप, एक घुसखोर, आयुष्यभराची अडचण वाटते. आणि गर्भहत्त्या सुटकेचा मार्ग वाटतो. पण जसे फारोच्या बाबतीत होते, तसेच आपल्या बाबतीतही आहे: जी गोष्ट आपल्याला घातक ठरेल असे वाटते, तीच आपल्या भल्यासाठी असते. न उघडलेल्या भेटवस्तू तुडवणाऱ्या, आपले वतन जाळून टाकणाऱ्या, दागिने शौचालयात फेकणाऱ्या, आणि आपल्या मित्रांना ठार मारणाऱ्या फारोंसारखी गर्भहत्त्या करणाऱ्यांची वृत्ती असते. मिसरमधील योसेफाप्रमाणे, बाळे आपले भले करण्यासाठीच जन्माला येतात.

खरोखर, मुले ही उत्तम महत्त्वाकांक्षांची शत्रू नसून मित्र आहेत. “तुमच्या मुलांना जगू द्या” ही महत्त्वाकांक्षेचा त्याग करण्याची नसून; मोठी महत्त्वाकांक्षा बाळगण्याची हाक आहे. सुरुवातीला आदाम आणि हव्वा यांना फारोच्या महत्त्वाकांक्षेपेक्षाही मोठी महत्त्वाकांक्षा मिळाली: पृथ्वी हस्तगत करा आणि तिच्यावरील सजीवांवर धनीपण करा. ते हे कसे करणार होते? तर “सफल व्हा आणि बहुपट व्हा” (उत्पत्ती १२:८). या दिलेल्या आज्ञेच्या पालनाने.

जरी आपण आता एदेन बागेत राहत नसलो तरी, मुले असणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हा आपल्या जीवनात मोठा बदल घडवतो. बायबलनुसार मुले म्हणजे टिकणारी घरे, युद्ध जिंकणारे बाण आणि आपल्या वृद्ध डोक्यांना शोभा देणारे मुकुट आहेत. जगातील फारो त्यांच्या महत्वाकांक्षेनुसार काय बांधतील; तर लवकरच कोसळणाऱ्या झोपड्या. पण प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवणारे सामान्य मातापिता एका भव्य मंडळीची बांधणी करत आहेत.

हो, आपल्याला एका मोठ्या दूरदृष्टीची गरज आहे. पण त्यासोबतच आपल्याला आणखी काहीतरी हवे आहे.

उत्तम रक्त

काल सकाळी, मी माझ्या दोन आठवड्यांच्या मुलाला कवेत घेतले आणि एका वेगळ्याच मुलाचा विचार केला. कारण एक काळ असा होता, जेव्हा एका मुलाचा फारोसारख्या राजाकडून पाठलाग केला जात होता, तरीही तो निसटला. जेव्हा तो मुलगा मोठा झाला आणि लोकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्याचा विश्वासघात झाला. अनेकांचा मत्सर आणि भीती त्याच्या रक्तासाठी आक्रोश करत होती. आणि त्याचे  रक्त वधस्तंभावरून नदीसारखे वाहिले.

आणि एक वेळ अशी आहे, आता आणि नेहमीच – जेव्हा ते रक्त गर्भहत्त्या केंद्रात गेलेल्या प्रत्येक स्त्रीला, तिला तिथे जाण्यासाठी दबाव टाकणाऱ्या प्रत्येक पुरुषाला, त्यांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला, आणि त्यातून फायदा मिळवलेल्या प्रत्येकाला- आणि आपल्या सर्वांना, ज्यांनी गर्भपात केला नाही पण तरीही मुलांपेक्षा अधार्मिक महत्त्वाकांक्षेला अधिक महत्त्व दिले, या सर्वांना क्षमा करण्यास पुरेसे आहे. आपल्या हातांना कोणत्याही रक्ताचे डाग लागले असले तरी, येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला शुद्ध करते.

Previous Article

मला बायबल वाचायला वेळ नाही

You might be interested in …

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.   उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर                             […]

संपादकीय

ख्रिश्चन जीवन प्रकाश वाचण्यामध्ये तुम्हाला आनंद लाभत आहे अशी माझी खात्री आहे. हा अंकही नेहमीप्रमाणेच विविध प्रकारचे लेख, वृत्त, मुलांचे पान अशा सदरांनी युक्त असून या नव्या वर्षात पाऊल टाकताना तुम्हांला प्रेरणादायी ठरेल अशी आशा […]

पालकांचा आदरआणि सन्मान

जॉन पायपर एका किशोरवयीन मुलाचा प्रश्न: पास्टर जॉन, मी माझ्या पालकांचा मान राखत नाही तर त्यांचा मी आदर कसा करू? की त्यांचा मान राखण्यातच आदर देणे हे गृहीत धरले आहे? उत्तर :आदर करणे व  मान […]