अक्टूबर 27, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मला बायबल वाचायला वेळ नाही

सॅम्युएल जेम्स

“तू खूप घाई करतोयस. तुझ्याकडून निष्काळजीपणाच्या चुका होत आहेत.”

माझे वडील मला तळघरात गणिताचा अभ्यास करताना मदत करत असताना त्यांनी काढलेले हे शब्द मला आजही आठवतात. आमच्यासमोर गणिताची एक चाचणी होती आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती: मला ती गणितं सोडवता येतात; फक्त मी ती काळजीपूर्वक सोडवत नाहीये. “बापरे,” मी वैतागून म्हणायचो, “याला तर खूप वेळ लागतोय! हे कधी संपणार?”

अनेक दशकांनंतर, आज मी माझ्याच स्वयंपाकघरातील टेबलावर बसलो आहे आणि माझ्या मुलांची गणिताची चाचणी माझ्यासमोर आहे. या पत्रिकेतूनही २५ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रिकेसारखाच संदेश मिळतोय: हुशार पण निष्काळजी विद्यार्थी. “बापरे, याला तर खूप वेळ लागतोय! हे कधी संपणार?”

विचित्र गोष्ट म्हणजे, ‘घाई’ स्वतः मात्र संयमी असते. ती एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेक दशके रेंगाळत राहू शकते आणि पुन्हा बाहेर पडण्याची वाट पाहू शकते.

घाईचे दुष्परिणाम सर्वश्रुत असूनही, अमेरिकन समाजात ती काही वाईट गोष्ट मानली जात नाही. सतत कामात मग्न असण्याप्रमाणेच, घाई करणे ही एक सामाजिक जमेची बाजू मानली जाते; ते गांभीर्य आणि ध्येयनिष्ठेचे लक्षण समजले जाते. “मी इथे फक्त थोडा वेळच थांबू शकतो,” असे एखादी प्रतिष्ठित आणि मागणी असलेली व्यक्ती म्हणते. एखादी बुद्धिमान आधुनिक व्यक्ती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक अनावश्यक मिनिट वाचवण्याचा प्रयत्न करते. अगदी फावल्या वेळेतही आपण अति-कार्यक्षमतेचा आग्रह धरतो; उदाहरणार्थ, पुस्तके वाचण्याऐवजी आपण एआय कडून त्यांचा सारांश करून घेतो किंवा पॉडकास्टवर दीडपट स्पीडने ऐकतो.

काम आणि फावला वेळ याव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींत आपण घाई करतो, नाही का? गेल्या आठवड्यात वाचलेल्या बायबलमधील नेमके किती भाग आपल्याला खरोखर आठवतात; असा आपण स्वतःला  प्रश्न विचारला तर काय होईल?  हे खरे आहे की सकाळचा वेळ अमर्याद नसतो. काही सकाळी बायबल वाचणे म्हणजे वेळेविरुद्धची शर्यत वाटते; मुलांना लवकर जाग येण्यापूर्वी किंवा दिवसभराची न थांबणारी धावपळ सुरू होण्यापूर्वी ते वाचून पूर्ण करायचे असते. पण वेळेच्या कमतरतेवरचा उपाय नेहमीच ‘घाई करणे’ हाच असतो का?

घाई ऐकत नाही

समस्या इथेच आहे. घाईमुळे आपल्याला गोष्टी लवकर ऐकू येत नाहीत; उलट ती आपल्याला ऐकण्यापासून पूर्णपणे रोखते. घाई ही कदाचित कार्यक्षमतेची मैत्रीण असेल, पण ती एकाग्रतेची शत्रू आहे. जेव्हा आपण थोडा वेळ थांबून, देवाचे लोक म्हणून त्याने आपल्याकडून काय अपेक्षा केली आहे हे खऱ्या अर्थाने समजून घेतो, तेव्हा आपल्याला दिसते की त्याचे राज्य हे ‘मायक्रोवेव्ह’सारखे (झटपट परिणाम देणारे) नसून एखाद्या बागेसारखे आहे. सुदृढता आणि मुळावले जाणे यांच्या तुलनेत वेग आणि कार्यक्षमता यांना तो फारसे महत्त्व देत नाही. जर आपल्याला पवित्र शास्त्रातील देवाचा आवाज खरोखर ऐकायचा असेल, तर आपल्याला घाईशी सामना करावा लागेल.

घाईमुळे ऐकण्यात अडथळा का येतो याची तीन कारणे आणि घाईपेक्षा अधिक चांगले असे तीन पर्याय मी तुम्हाला सांगतो.

१. घाईघाईने केलेले वाचन वरवरचे असते.

ही गोष्ट इतकी उघड आहे की आपण ती अनेकदा विसरतो. जॉर्ज ऑरवेलने म्हटल्याप्रमाणे, आपल्या अगदी समोर असलेल्या गोष्टी पाहणे हा एक सततचा संघर्ष असतो. जेव्हा आपण बायबलकडे येतो आणि मुख्यत्वे हा विचार करतो की आपला अनुभव कसा वेगवान किंवा अधिक कार्यक्षम करता येईल, तेव्हा आपण शब्दांच्या केवळ वरूनच पुढे जातो—जसे तलावाच्या पाण्यावर दगड टप्पा खात पुढे जातात तसे आपण वचनांवरून केवळ नजर फिरवतो; त्या वचनांमध्ये मन लावून बसण्याऐवजी किंवा त्यांचा सखोल विचार करण्याऐवजी, आपण शक्य तितक्या लवकर ‘मुख्य मुद्द्यापर्यंत’ पोहोचण्याचा प्रयत्न करतो.

गोष्ट अशी आहे की, देवाचे वचन इतके जिवंत आणि समृद्ध आहे की, अशा प्रकारे दुर्लक्ष करून वरवर नजर फिरवली तरीही त्या क्षणी समाधान मिळू शकते. आणि असे काही दिवस असू शकतात जेव्हा, देवाच्या योजनेनुसार त्याच्या वचनांवरून केवळ वरवरची नजर फिरवणे हेच आपल्यासाठी शक्य असते. पण कुबडी ही काही ‘पाय’ होऊ शकत नाही; तसेच पवित्र शास्त्राचे घाईघाईने केलेले वरवरचे वाचन या जगात आपला आध्यात्मिक प्रवास समर्थपणे पुढे नेण्यासाठी पुरेसे नसते.

२. घाईघाईने केलेले वाचन विस्मरण घडवणारे असते.

तुमच्या काही आवडत्या आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या आठवणींचा विचार करा—उदा. पदवीदान समारंभ, लग्न किंवा मुलाचा जन्म. जरी ते दिवस काही बाबतीत धावपळीचे आणि गोंधळाचे असले, तरी तुम्ही कदाचित काही क्षण जाणीवपूर्वक अनुभवले असतील; कारण तुम्हाला माहीत होते की त्या दृश्यांची आणि आवाजांची आठवण तुम्हाला पुढील अनेक वर्षे जपून ठेवायची आहे. ज्या गोष्टींमुळे आपण सर्वात जास्त वेळ थांबतो किंवा संथ होतो, त्या गोष्टी आपल्याला उत्तम प्रकारे लक्षात राहतात. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जागच्या जागी थांबवते, तेव्हा आपण तिथे आपल्या पाऊलखुणा उमटवतो.

जेव्हा आपण घाईच्या मनस्थितीत देवाचे वचन वाचायला घेतो, तेव्हा आपण वाचलेली गोष्ट अनेकदा विसरून जातो. आपले ध्येय केवळ त्या दिवशी बायबलच्या संदर्भात काहीतरी केल्याची खूण (किंवा ‘टिक मार्क’) करणे हे असते आणि ते काम आपण जितक्या लवकर पूर्ण करू, तितके आपल्याला बरे वाटते. आपल्या वेळापत्रकाच्या दृष्टीने हे कदाचित कार्यक्षम वाटू शकते, परंतु यामुळे संकट, मोह किंवा नैराश्याच्या प्रसंगी देवाचे वचन आठवणीत आणण्यासाठी आपण तयार नसतो.

३. घाईघाईने केलेले वाचन तात्पुरते असते.

थोड्या वेळासाठी वरवरचे आणि विस्मरणात टाकणारे वाचन केल्यावरच आपण स्वतःला (कदाचित नकळतपणे) विचारतो, “याचा काय उपयोग आहे?” बायबलमधील वचनांवर केवळ एक नजर टाकण्यासाठी आपण झोप किंवा मोबाईलचा किती त्याग करू शकतो हे महत्त्वाचेआहे, नाहीतर ही वचने आपण एका तासानंतर विसरून जाणार असतो.

जेव्हा आयुष्यातील परिस्थिती आपल्याला वेळेबाबत निवडक राहण्यास भाग पाडते, तेव्हा काय होते हे आपल्यापैकी बहुतेकांना अनुभवाने माहीत असते. कष्टाने मिळवलेल्या सवयी आणि जाणीवपूर्वक केलेल्या आवश्यक गोष्टी सहसा टिकून राहतात, आणि अधूनमधून, अर्धवट मनाने केलेल्या गोष्टी सोडून दिल्या जातात. आपण जितके जास्त बायबल वाचनाला शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचे काम मानू, तितकेच ते आपल्याला मुळातच एक अनावश्यक काम आहे असे वाटू लागेल.

घाईशी कसे लढावे

जर घाई आपल्याला ऐकण्यापासून रोखत असेल, तर पर्याय काय आहे? मी तीन साधनांच्या मदतीने आपले ऐकणे घाईपासून मुक्त करण्याचा सल्ला देतो: योजना, चिंतन आणि संयम.

योजना

जेव्हा आपण एखादी गोष्ट जबरदस्तीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा अनेकदा घाई डोकावते. पण बायबल वाचन केवळ एक गोष्ट म्हणून नसावे, आणि तसे असण्याची गरजही नाही. त्याऐवजी आपण देवाच्या वचनात घालवलेल्या आपल्या दैनंदिन वेळेकडे एक अत्यावश्यक, एक आधारस्तंभ असलेली सवय म्हणून पाहू शकतो, ज्याभोवती आपल्या उरलेल्या दिवसाला आकार मिळतो.

जेम्स क्लियर त्यांच्या ‘ॲटॉमिक हॅबिट्स’ या उपयुक्त पुस्तकात नमूद करतात की, “एखादी सवय टिकवून ठेवण्याची एक गुरुकिल्ली म्हणजे, ती सवय अधिक सोपी आणि आपोआप होण्यासाठी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची रचना करणे.” जर तुम्ही सकाळी निवांतपणे वाचन करण्याचे ध्येय ठेवत असाल, तर आदल्या रात्री पुरेशा लवकर झोपा. रात्री फोन बेडरूमच्या बाहेर ठेवा, जेणेकरून जागे झाल्यावर पहिली तीस मिनिटे स्क्रोलिंगमध्ये वाया जाणार नाहीत. खोलीत एक उघडे बायबल ठेवा, जेणेकरून ते तिथेच असेल. निवांतपणे वाचन करण्याची योजना करा, मग तुम्ही ते वाचण्याची अधिक शक्यता आहे.

मी एकदा आध्यात्मिक शिस्तीवरील सर्वोत्तम पुस्तकांपैकी एकाचे लेखक, डोनाल्ड व्हिटनी यांना विचारले की, ज्या व्यक्तीकडे शांत वेळेसाठी फक्त वीस मिनिटे आहेत, तिला ते काय सल्ला देतील. क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, “पाच मिनिटे वाचा; मग पंधरा मिनिटे मनन करा.” अनेक विश्वासी लोकांसाठी, मनन ही एक कमी लेखली जाणारी आणि अपुऱ्या वापरातील आध्यात्मिक शिस्त आहे. परंतु अनेक अनुभवी संत, मननाशिवाय देवाच्या वचनातील आपल्या वेळाबद्दल बोलू शकत नाहीत.

बायबलमधील चिंतन कसे असते आणि ते कसे करावे, याबद्दल चांगली माहिती उपलब्ध आहे. मला इथे फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे: मनन आणि घाई या परस्परविरोधी गोष्टी आहेत. एकाचा ध्यास धरलात, तर दुसऱ्यापासून दूर जाल. शक्य तितके जास्त शास्त्रवचन वरकरणी वाचण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, दोन किंवा तीन उतारे निवडा आणि त्यांवर मनन करत बसा. ते मोठ्याने वाचा आणि प्रत्येक वेळी विशिष्ट शब्दांवरचा भर किंवा आवाजातील चढ-उतार बदलून पहा. लेखकाने एखादा विशिष्ट शब्द किंवा तुलना का निवडली असेल, याचा विचार करा. घाईघाईने वाचलेल्या एखाद्या अध्यायापेक्षा, हृदयाच्या खोलवर रुजलेली दोन वचने तुमच्या आध्यात्मिक जीवनात अधिक मोलाची ठरतील.

संयम

“बापरे, याला तर खूप वेळ लागतोय! हे कधी संपणार?”

कधीकधी मला वाटते की माझ्या आध्यात्मिक अस्तित्वाचा एक भाग अजूनही, माझ्या तळघरातील टेबलावर बसून गणिताच्या कागदावरील निष्काळजीपणामुळे झालेल्या चुकांकडे पाहत आहे. मला फक्त हे सर्व संपवायचे असते: पापाविरुद्धचा संघर्ष संपवायचा असतो, येशूची वचने विसरणे थांबवायचे असते, आणि दररोज भरले जाणे व पुन्हा रिकामे होणे (अर्पण करणे) या प्रक्रियेतून मुक्त व्हायचे असते. मी या सर्वांतून घाईने पुढे जाऊ शकत नाही का?

स्तोत्रसंहिता १ मध्ये,देवाच्या  नियमशास्त्रात आनंद मानणाऱ्या धन्य माणसाची तुलना पाण्याच्या प्रवाहाकाठी लावलेल्या झाडाशी केली आहे. याउलट, दुष्ट लोक वाऱ्यात उडून जाणाऱ्या भुश्यासारखे असतात. भुश्याची गोष्ट अशी की तो खरोखरच खूप वेगाने हालचाल करतो. एक चांगला वारा सुटला की तो अतिशय वेगाने खूप दूरवर पसरतो. पण देवाने आपल्या लोकांसाठी ही उपमा निवडलेली नाही. त्याऐवजी, आपण झाडांसारखे आहोत: हळूहळू, दिवसेंदिवस, जवळजवळ कोणाच्याही लक्षात न येता वाढणारे आणि कालांतराने बहरून फळे देणारे.

आपल्या प्रभूचे ऐकणे आणि त्याचे अनुसरण करणे या दीर्घ, कठीण आणि घाईरहित जीवनाचा स्वीकार करू या. असा दिवस लवकरच येईल जेव्हा काळाविरुद्धचा लढा संपेल आणि केवळ आनंद व तो अनुभवण्यासाठी अनंतकाळ उरेल. त्या दिवशी आपल्या तारणाऱ्याच्या चरणांशी घालवलेल्या प्रत्येक घाईरहित क्षणाबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटेल.

Previous Article

अश्लील साहित्य आणि जगासाठीचा संघर्ष

You might be interested in …

मी असले कृत्य करणार नाही लेखक: मार्शल सेगल

  लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात चांगली […]

जर देवाने मला मुलगी दिली तर

ग्रेग मोर्स “ ते तिचं नाव काय ठेवणार असावेत बरं?” माझी पत्नी म्हणाली. “मला काही कल्पना नाही बुवा, पण जर आपल्याला मुलगी झाली तर मी तिचं नाव प्रथम एलिझाबेथ (अलीशिबा), यायेल किंवा अबिगेल ठेवायचा विचार […]

पत्नीच्या अविश्वसनीय जखमा

अबिगेल डॉड्स “शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही” (२ शमुवेल ६:२३).  दाविद राजाची पत्नी मीखल हिच्या हकीगतीतला हा गंभीर निर्णय शेवटचा शब्द बोलतो. प्रेमकथेने झालेली सुरुवात दुःखद घटनेत कशी झाली? एकेकाळी आपल्या […]