Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 1, 2017 in जीवन प्रकाश

सर्वात मोठे आध्यात्मिक युध्द              

सर्वात मोठे आध्यात्मिक युध्द              

जॉन ब्लूम

ज्या नातेसंबंधामध्ये विश्वासाची सुपीक जमीन असते तिथेच प्रीती जोमदार वाढू शकते. जोपर्यंत नात्यामध्ये पुरेसा विश्वास असतो तोपर्यंत प्रीती ही निरोगी आणि संवेदनशील असू शकते. पण जेव्हा विश्वास कमी होऊ लागतो तसे प्रेम कोमेजून जाऊ लागते. विश्वास एकदमच कमी झाला तर प्रीती मरून जाते.

सैतानाला हे ठाऊक आहे. म्हणूनच तो परिश्रमाने, बारकाईने आणि कावेबाजपणाने एकमेकांमधील विश्वास कमी होत जावा म्हणून चिथावणी देतो, उत्तेजन देतो. आपल्यातील प्रेम मारून टाकण्याची त्याची इच्छा आहे.
सर्वात समर्थ सत्य
देव प्रीती आहे (१ योहान ४:७-८). प्रीती ही जगातील सर्वात मोठी बाब आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्र्येकत्त्वाच्या नात्यामध्ये प्रीती हा एकत्र बांधणारा गाभा आहे. जेव्हा त्र्येक देवाने निर्मिती करताना आपले गौरव प्रदर्शित केले तेव्हा त्यामागची स्फोटक प्रेरणा होती प्रीती! (योहान १७:२४-२६; योहान १: १-३; कलसै १:१५_१७; योहान १५:९-१०; ३:३५ ही वचने वाचा.)

हरवलेल्या व देवाविरुद्ध बंड केलेल्या अशा लोकांना खंडून घेण्याच्या पित्याने केलेल्या योजनेमागे प्रीती हीच प्रेरणा होती (योहान ३:१६). पुत्राने त्याचे जीवन आपल्यासाठी देण्यासाठी प्रीतीनेच त्याला उद्युक्त केले (योहान १५:१३). देवावर व इतर लोकांवर प्रीती करणे ह्या जुन्या करारातील सर्वात मोठ्या आज्ञा होत्या (मत्तय २२:३६-४०) आणि नव्या करारातही त्या तशाच मोठ्या आज्ञा राहिल्या आहेत (योहान १४:१५; १५:१२).

येशूच्या शिष्याची एकमेव व सर्वात विशिष्ट खूण म्हणजे प्रीती होय (योहान १३:३५). ज्याचा देवापासून जन्म झालेला आहे त्याला समजते  की देव प्रीती करतो (१ योहान ४:७). पवित्र आत्म्याच्या फळाचा पहिला भाग आहे प्रीती (गलती ५:२२-२३). पवित्र आत्म्याच्या कोणत्याही कृपादानापेक्षा किंवा चमत्कारापेक्षा प्रीती अधिक उत्कृष्ट आहे( १ करिंथ १२:३१). तुम्हाला किती आध्यात्मिक दाने आहेत किंवा तुम्हाला किती यश मिळते किंवा आपण येशूच्या नावामध्ये  किती त्याग करतो हे महत्त्वाचे नाही. जर आपल्यामध्ये प्रीती नाही तर आपण कोणीच नाही, आपल्याला काहीच लाभ नाही (१ करिंथ १३:१-३). ख्रिस्तासारखी त्यागमय, सहन करणारी, आशादायी , टिकणारी प्रीती ही देवाचे अस्तित्व व स्वभाव सिध्द करणारी बाब आहे. योग्य प्रकारे सादर केलेल्या कोणत्याही तर्क वितर्कापेक्षा ती अधिक गळ घालणारी आहे. तसेच चिन्हे व चमत्कारांपेक्षा ती अधिक सामर्थ्यवान आहे. आणि कोणीही आध्यात्मिक ख्रिस्ती व्यक्ती मग ती कोणत्याही लिंग, वंश, सामाजिक स्तर, वय बौद्धिक पातळी किंवा आध्यात्मिक दाने मिळवलेली असो, ती प्रीती दाखवू शकते.
सैतानाच्या राज्यासाठी सर्वात भीतीदायक शक्ती म्हणजे ख्रिस्ती प्रीती होय. म्हणूनच तो तिला निर्बल आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.

सैतान एकमेकांमधील विश्वासावर घाला घालतो

पण जेव्हा सैतान प्रीतीला ठार मारायला पहातो तेव्हा बहुदा त्याचे लक्ष्य असते आपला एकमेकांवरील विश्वास. आपल्यापेक्षा त्याला चांगले ठाऊक आहे की विश्वासाचा प्रीतीवर कसा परिणाम होतो.
जितका आपण एखाद्यावर जास्त विश्वास टाकू तितके आपल्याला त्या व्यक्तीवर प्रेम करणे सोपे जाते. ज्यांच्यावर आपण विश्वास टाकतो त्यांच्यासोबत आपल्याला आत्मविश्वास वाटतो आणि सुरक्षित वाटते. आणि त्यांचा मूर्खपणा, त्यांचा वेडेपणा आणि पापी अडखळणे सुद्धा आपण सहन करू शकतो. आणि त्यांच्याकडून आपल्या चुका सुधारण्याचेही ऐकू शकतो.
पण जर कोणावर आपल्याला विश्वास टाकायला जड जाते तर त्यांच्यावर प्रीती करणे पण कठीण होते. त्यांची मते ऐकताना त्यांना प्रश्न करण्याची आणि आपल्याला सांभाळण्याची आपली प्रवृत्ती असते. त्यांचा मूर्खपणा, वेडेपणा आणि पापी अडखळणे यात संभाव्य नैतिक धोके आपल्याला सहज दिसतात आणि आपल्या चुका  सुधारणास करणारे त्यांनी काही सांगितले तर त्यामागचा त्यांचा अंतिम हेतू काय आहे याची शंका आपण घेतो. विश्वासाच्या अभावाचा परिणाम दुरावलेले, तणावाचे नातेसंबंध यामध्ये होतो व भंगलेल्या  विश्वासाची परिणती नातेसंबंध तुटण्यात होते.

याचा अर्थ आपले नातेसंबंध सहज तुटतील इतके असुरक्षित आहेत. विश्वासाची खराबी करून एकमेकांमधील प्रीती थंड करायला फारसा वेळ लागत नाही. आपण तर अत्यंत मर्यादित, क्षुल्लक मानवी प्राणी आहोत पण आपल्या पापी स्वभावाचा अहंपणा हा राक्षसी स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळे गुन्हा करण्याकडे आपली साहजिक प्रवृत्ती होते. थोडीशी गैरसमजूत किंवा तर्क आपल्या एकमेकांमधील विश्वासाचा चष्मा बदलायला पुरेसे होतात. जेव्हा विश्वासात घट होऊ लागते तेव्हा प्रीती शुष्क होते. आणि जेव्हा प्रीती खंगू लागते तेव्हा देवाचा स्वभाव व खरेपणा याचा पृथ्वीवरील सर्वात मोठा पुरावा अस्पष्ट होऊ लागतो.

यामुळेच सैतान हा नेहमी देवावरील विश्वास व परस्परांवरील विश्वास खंगवण्याचा प्रयत्न करतो. प्रीतीला मारून देवाचे गौरव अस्पष्ट करण्याचा तो प्रयत्न करतो. जर त्याने असे केले तर आपली सुवार्तेची साक्ष तो दुर्बल करतो, आपल्या मंडळ्यामध्ये फुटी पाडतो, त्याच्या मोहाला सहज  फशी पडण्यास कमकुवत करतो आणि त्याच वेळी आपल्याला दुसऱ्यांवर संशय घेऊन स्वत:चे समर्थन करण्यात गर्क ठेवतो.

प्रीतीचा पाठ्पुरावा करा
इतर कोणत्याही – कोणत्याही- गोष्टीपेक्षा प्रीती हेच तुमचे ध्येय असू द्या (१ करिंथ १४:१). येशूच्या गौरवासाठी आणि मंडळीची उन्नती व भल्यासाठी आपण प्रीती हेच ध्येय ठेवायला पाहिजे. आपण ठरावपूर्वक, आग्रहाने, न ढळता प्रीतीचा पाठपुरावा केला पाहिजे. कारण सैतान आपल्या एकमेकांवरील विश्वासावर  नेम धरून आपल्यातले नातेसंबंध बिघडवण्याचा प्रयत्न करील किंवा प्रीतीचा ऱ्हास करीत राहील. विशेषकरून मंडळीतील नातेसंबंधामध्ये हे तो करीतच राहील. आपण त्याला आपल्यावर मात करायला संधी देऊ नये किंवा त्याच्या योजनांबद्दल अज्ञानी असू नये (२ करिंथ २:११). क्षुल्लक मतभेद प्रमाणाबाहेर वाढू न देण्याची आपण काळजी घ्यायला हवी. आपल्या गृहीतानुसार पापी प्रेरणांची कृतीमध्ये परिणती न होण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. जर आपल्याला पापाच्या अस्तित्वाची शंका  झाली तर आपण शांत बसू नये आणि त्या शंका चिघळू देऊ नये. आपल्याच आकलन शक्तीवर आपण भरवसा ठेवू नये तर नम्रतेने स्प्ष्टीकरण होईल असे प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आणि जर आपल्याला जाणीव झाली की आपल्याविरुद्ध कोणाला काही कागाळी आहे तर लगेच आपण त्यांच्याकडे जाऊन निराकरण केले पाहिजे (मत्तय ५:२३-२४). विश्वास खंगल्याने जर ख्रिस्ती जनांतील नातेसंबंध बिघडले असतील तर ख्रिस्त आणि प्रेषित आपण समेट घडवून आणावा – प्रीतीचा पाठपुरावा करावा यासाठी पाचारण करतात. ह्याला पर्याय नाही. शक्य तोवर सर्वांशी शांतीने राहा कारण ते आपल्यावर अवलंबून आहे (रोम १२:१८).

काही प्रकरणामध्ये एखाद्या खऱ्या गंभीर  पापामुळे घोर नाश झालेला असतो अशावेळी बायबलनुसार पाळकीय सल्ला घ्यावा व शांती करणारे समुपदेशन मिळवण्याचा प्रयत्न करावा. पण आपल्या विश्वासाला भंग करणारे, ऐकणारे जे सर्वसामान्य पाप विविध रूपात बाहेर येते ते म्हणजे गर्व. टीकाखोर मते, कंड्या पिकवणे, निंदा करणे, चीड या गोष्टींद्वारे तो प्रकट होतो आणि सैतान याचा उपयोग करून त्याचे स्वरूप मोठे करतो.

त्याच्यावर आक्रमण करा

आध्यात्मिक युद्धाच्या या महान कृतीला आपण आताच सुरवात करणे शक्य आहे. सैतानाला आपण प्रथम सर्वात मोठा ठोसा मारू शकतो ते म्हणजे प्रीती हे ध्येय ठेवून. हे स्वत:ला नम्र करून जे ख्रिस्तातील बंधू-भगिनी  दुरावलेले  आहेत किंवा ज्यांच्याशी नाते बिघडलेले आहे त्यांच्याशी समेट करण्याद्वारे केले जाईल.  अशा आज्ञापालनाने कदाचित या लोकांमध्ये देवाच्या कार्याला सुरुवात होऊ शकेल.

या जगात सर्वश्रेष्ठ बाब म्हणजे प्रीती आहे. आणि देव प्रीती असल्याने प्रीती त्याच्यापासून येते (१ योहान ४:७-८). प्रीती करा ही देवाने दिलेली सर्वात मोठी आज्ञा आहे. आणि आपण ज्या प्रकारे प्रीती करतो त्यावर ख्रिस्ताचा गौरव, सुवार्तेची घोषणा आणि त्याच्या शिष्यांची साक्ष हे सर्व अवलंबून आहे.
आपल्या सर्व शक्तीने आपण प्रीती करू या आणि सैतानावर हल्ला करू या.