Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 1, 2017 in जीवन प्रकाश

एका बळीचा विजय    

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल

(संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.)
जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत बळी होता अशी माझी कल्पना होती. माझ्याकडे बायबलचे काही ज्ञान नसल्याने माझे ज्ञान अँग्लीकन चर्चच्या स्टेन ग्लास विंडोज आणि कॅथोलिक मित्राच्या घरातील चित्रांच्या पलीकडे गेलेले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी येशू हा एक केवळ  दुर्दैवी बळी होता आणि या स्वार्थी जगात दयाळू लोकांचे काय होते ह्याची तो मला आठवण करून देत होता.

जेव्हा “द पॅशन्स ऑफ ख्राइस्ट” हा चित्रपट लागला तेव्हा येशूच्या दुबळेपणाची मला अधिकच प्रकर्षाने जाणीव झाली. त्याच्या जीवनाचा घेतलेला बळी या माझ्या तत्त्वात आणखी भरच पडली. ख्रिस्ताला वधस्तंभी देताना जो क्रूरपणा केला गेला त्यामुळे माझ्या संवेदनांवरच घाव घातले गेले. एका दुष्ट कटकारस्थानाचा येशू बळी गेला यामुळे त्याची कींव केल्याशिवाय त्या चित्रपटगृहातून बाहेर पडणे अशक्य होते.

पण येशूच्या मरणाचा आपण असा विचार करण्याची गरज आहे का? अशा तीव्र शारीरिक  यातना व पित्याशी झालेली आध्यात्मिक ताटातूट सहन करत असताना तो खरंच का कुणाचा बळी होता?

हेरोद, सुभेदार पिलात, सभास्थानाचे अधिकारी एकत्रितपणे त्याला धरून द्यायला दोषारोप करून वधस्तंभावर खिळण्यास कारणीभूत ठरले. पण शास्त्र लेख स्पष्ट सांगतात की प्रभूचे मरण हे काही त्यांच्या योजनेचा परिणाम नव्हता: “खरोखर ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू याच्याविरुध्द या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे” (प्रेषित ४:२७-२८).

ख्रिस्त हा यहूदी आणि रोमी कपटकाव्याचा बळी नव्हता . त्याच्या जीवनाचा हेतू हाच त्याच्या मृत्यूचे अभिवचन होते. त्याचा जन्म यासाठी झाला होता की आपल्याऐवजी  त्याने मरावे व त्याद्वारे आपल्या पापासाठी असलेले एकमेव अर्पण म्हणून तो स्वीकारला जावा व त्याद्वारे त्याने आपली भूमिका पूर्ण करावी.

आणि सर्व सृष्टीचा निर्माता म्हणून त्याची अटक, खटला, आणि मृत्यू यांच्या प्रत्येक तपशिलावर त्याचा अधिकार होता.

येशूच्या अटकेवर खुद्द त्याचेच नियंत्रण  होते
इतर सर्व शिष्यांसमवेत यहूदा मिसळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण तो खरा कोण आहे हे येशूला सर्ववेळ माहीत होते (योहान ६:७०-७१). जेव्हा यहूदाने येशूला येशूला धोका देण्याचा कट रचला तेव्हा सुद्धा प्रभूचे त्याच्यावर नियंत्रण होते (योहान १३:२-३).
येशूची अटक होण्याच्या काही तासांपूर्वीच माडीवरच्या खोलीत जिवलग मैत्रीने येशूने इतर शिष्यांसह यहूदाचेही पाय धुतले – त्याच्या मनात काय आहे हे ठाऊक असताना सुद्धा. आणि जेव्हा या धोकेबाज शिष्याला प्रभूने पाठवून दिले तेव्हाही तो आता काय करणार आहे याची पूर्ण माहिती त्याला होती (योहान १३:२१-३०).

येशूने व त्याच्या शिष्यांनी वल्हांडणाचे भोजन संपल्यावर येशू त्याच्या नेहमीच्या ठिकाणी प्रार्थना करायला गेला  (लूक २२:३९). आपल्या अटकेची पूर्वकल्पना असतानाही येशू लपला नाही – यहूदा त्याला सहज शोधू शकेल अशाच ठिकाणी तो गेला (योहान १८:२).
अटकेच्या वेळीही ख्रिस्त विचलित झाला नाही (योहान १८:४). पळून जाण्याचे किंवा लपण्याचे काही कारणच नव्हते. त्याच्या योजनेची ही पूर्तता होती..
यहूदा व त्याच्या कटात सामील असणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या सार्वभौम अधिकाराच्या बाहेर काहीही कृती केली नाही. येशूने यहूदाला शिष्य होण्यास बोलावण्याच्या क्षणापासून ते त्याच्या फसव्या चुंबनापर्यंत येशूचाच अधिकार दिसून येतो.
येशूचे त्याच्या खटल्यांवर नियंत्रण होते.

सुभेदार पिलात हा यहुदियाच्या कायद्याचा चालक होता. कैसराचा अधिकार तो काटेकोर रीतीने बजावत होता व त्याच्या अंमलाखाली जीवन मरणाचा अंतिम न्यायाधीश तोच होता. पण ख्रिस्ताच्या खोट्या खटल्याच्या वेळी त्याचा ऐहिक अधिकार हा आपल्या प्रभूला काहीही धोका देवू शकत नव्हता.
म्हणून पिलात येशूला म्हणाला, “माझ्याबरोबर तू का बोलत नाहीस?तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभवर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय?” येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता” योहान १९:१०-११).

पिलात आणि त्याच्या मोठ्या सैन्यापुढे येशू मुळीच ढळला किंवा डगमगला नाही. देवाच्या पूर्व योजनेमुळेच ते त्याच्यावर अधिकार गाजवत होते हे त्याला ठाऊक होते. आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी मरणदंडाच्या शिक्षेच्या तो अधीन झाला.
पिलात जरी देवाच्या सार्वभौम इच्छेखाली कार्य करीत होता तरी निष्कलंक कोकर्याला या शिक्षेचा हुकुम दिल्याने तो दोषपात्रच आहे. पिलाताचे हे पाप देवाने त्याच्या तारणाच्या योजनेसाठी वापरले. जरी पिलात हा नैतिक साधन म्हणून जबाबदार होता व त्याच्या कृतींसाठी जबाबदार होता तरी देवाच्या पुत्राशी ज्या घटना संबंधित होत्या त्यावर त्याचा अंतिम ताबा नव्हता. जे काही घडते – ख्रिस्ताचे मरणही- ते सर्व देवाच्या सार्वभौम अधिकाराखालीच घडते.

शिष्यांसाठी वधस्तंभ हा त्यांच्या मशीहासाठी उंचावलेल्या आशांची एक शोकांतिकेची  अखेर होती. पण येशूसाठी तोच वधस्तंभ हा त्याचा विधिलेख होता आणि तो त्याच्याकडे निश्चित ध्येयाने  चालत गेला. क्रूसावर जाण्याचे त्याने कवटाळले एवढेच नाही पण त्याचा प्रत्येक तपशील त्याने आखला होता.

येशूचे त्याच्या मृत्यूवर नियंत्रण होते
प्रभूला ठार मारण्यासाठी अनेक लोक सर्व सामर्थ्याने प्रवृत्त झाले होते. त्याच्या सत्यतेच्या  शिक्षणाने परूशांच्या उपजीविकेचे साधन आणि खोटा धर्म  धोक्यात आले होते. त्याच्या स्वर्गीय राज्याने हेरोद राजाला दहशत बसली होती . त्याच्या नीतिमान कायद्याची  रोमी राजाला भीती वाटत होती. आणि त्याच्या तारणाऱ्या सामर्थ्याने सैतानाच्या महान कारस्थानाला दहशत बसली होती. त्या सर्वांनाच तो मरायला हवा होता.

पण लोकांना – अनेक लोकांना तो मरावा असे वाटत होते याची येशूला कधीच पर्वा नव्हती. जीवनाच्या प्रभूला मृत्यूची कधीच भीती वाटली नाही . तो तर त्याच्या जीवनाचा हेतू होता. आपल्या त्यागपूर्वक मरणाकडे निर्देश करताना त्याने शिष्यांना म्हटले,माझा प्राण कोणी माझ्यापासून घेत नाही तर मो होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे, ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे”  (योहान १०:१८).
हा अधिकार तो वधस्तंभावर असताना स्पष्ट दिसून आला.
यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ‘मला तहान लागली आहे’ असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.येशूने आंब घेतल्यानंतर ‘पूर्ण झाले आहे’ असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.  (योहान १९: २८-३०).

मानवाला अत्यंत वेदनांमध्ये मारण्यासाठी वधस्तंभ ही रोमी लोकांनी तयार केलेली शिक्षा होती. हे अत्यंत तीव्र यातना सहन करत मरणे असे. तरीही अशा असह्य शारीरिक यातनांमध्ये देवाच्या पुत्राने आश्चर्यकारक अशी मनाची  स्थिरता  व शांतता दाखवली. एक भविष्य पूर्ण होण्याचे राहिले आहे हे त्याला समजले. दाविदाच्या शब्दातील स्तोत्र ६९:२१ मधील मशीहाला त्याच्या तहानेसाठी आंब दिली जाईल हे भविष्य! हे झाल्यावर आपल्या प्रभूने आपला मनावरचा अधिकार दाखवून मोठ्याने ओरडून “पूर्ण झाले आहे” असे म्हणून प्राण सोडला (मत्तय २७:५०, मार्क १५:३७). ती विजयाची घोषणा होती. विजेत्याचा जाहीरनामा होता. पित्याने दिलेले सुटकेचे कार्य त्याने पूर्ण केले होते. पापासाठी प्रायश्चित्त भरले होते (इब्री ९:१२, १०:१२). सैतानाचा पराभव करून त्याला शक्तिहीन करण्यात आले होते (इब्री २:१४, १ पेत्र १:१८-२०; १ योहान ३:८). देवाचा प्रत्येक नीतीनियम पूर्ण केला होता , पापविरूद्ध असलेला देवाचा क्रोध शमवला गेला होता (रोम ३:२५; इब्री २:१७; १ योहान २:२; ४:०); प्रत्येक भविष्य पूर्ण केले गेले होते. ख्रिस्ताचे सुटकेचे कार्य पूर्ण झाले याचा अर्थ त्यामध्ये आता काहीही अधिक जोडण्याची गरज नाही.
ख्रिस्ताने दैवी रीतीने त्याची अटक, खटला, त्याचा मृत्यू याभोवतीच्या सर्व घटनांचा सूत्रधार होता. आपला नीतिमान आपल्या बदली पाप वाहणारा म्हणून त्याला वधस्तंभावर जाण्यापासून कोणीही रोखू शकले नसते.

आणि ज्याला आपला जीव परत घेण्याचा अधिकार होता त्याला त्याची कबर धरून ठेवू शकली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याचे पुनरुत्थान हे त्याच्या अधिकारची शेवटची कृती नव्हती तर पित्यासमोर आपला कायदेशीर प्रतिनिधी म्हणून त्याच्या कार्याची सुरुवात झाली होती.

तुमच्या अनंतकाळावर ख्रिस्ताचे नियंत्रण आहे  

१ योहान २:१ मध्ये खिस्ताला “पित्यासमोर आपला कैवारी” म्हटले आहे , त्याचे ह्या कामाचे इब्री लोकांस पत्राचा लेखक वर्णन करतो; “ते पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे.पण हा याजक ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे’ (इब्री ७:२३-२५).
तो नेहमी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आपल्या तारणाची सुरक्षितता म्हणजे येशूची सततची आपल्यासाठी मध्यस्थी. जसे ख्रिस्ताला आपल्याला तारण्याचे सामर्थ्य आहे तितकेच त्याला आपल्याला राखण्याचे सामर्थ्य आहे. तो पित्याजवळ आपल्यासाठी सतत, अनंतकाळची, कायमची विनंती करतो. जेव्हा जेव्हा आपण पाप करतो तेव्हा तो म्हणतो, “ते माझ्या खाती मांड, मी त्याची किमत आधीच  भरलेली आहे. येशूद्वारे आपण पतनापासून राखले जाऊन त्याच्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात नोर्दोष असे उल्लासाने उभे राहू  (यहूदा२४). आता आपण पित्याच्या दृष्टीने पुत्रामध्ये निर्दोष आहोत. आपले गौरवीकरण झाल्यावर आपण त्याच्या समक्षतेमध्ये निर्दोषी असू.
खिस्त हा कोणाचाच बळी नव्हता. त्याने देवाची अनंतकालापूर्वीची  योजना पूर्णपणे पार पाडली. त्याला मरणापर्यंत नेणाऱ्या प्रत्येक घटनेवर पूर्ण नियंत्रण ठेवून त्याच अधिकाराने तो मरणातून विजयी होऊन उठला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे. तो आपल्या वतीने पित्याकडे विनंती करतो व आपल्या खाती  त्याचे नितीमत्त्व मांडतो.

ख्रिस्ताचे योग्य चित्र आपण साकारू या. तो वधस्तंभाचा बळी नव्हता तर वधस्तंभ हा त्याचा अंतिम विजय होता.