Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 1, 2017 in जीवन प्रकाश

वधस्तंभाचा अभिमान

वधस्तंभाचा अभिमान

स्टीव्ह फर्नांडीस

शिक्षण देऊन वधस्तंभावरच्या ख्रीस्ताविषयीची तळमळ वाढवण्याची गरज आहे. असे जीवन जगावे आणि अशा प्रकारे बोलावे की वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचे मोल अधिकाधिक लोकांच्या दृष्टीस पडेल व त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. येशुप्रमाणेच आपल्यालाही ते महागात पडेल. वधस्तंभाचा अभिमान बाळगण्याचे एकच स्थान म्हणजे वधस्तंभावरील स्थान .गलती ६:१४. ‘आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे ’ वधस्तंभाचा अभिमान बाळगणे  हे तुम्ही वधस्तंभावर खिळलेले असाल तरच घडते. जग मला व मी जगाला मेलेलो आहे, का? कारण मी वधस्तंभावर खिळलेला आहे. हे घडले असेल तरच  तुम्ही वधस्तंभाचा अभिमान बाळगू शकाल. आपले मीपण तेथे खिळलेले नसेल तर आपला अभिमान केवळ स्वत:विषयीच असतो.

हे केव्हा व कसे घडले? जेव्हा ख्रिस्त मरण पावला तेव्हा आपण मरण पावलो. जेव्हा विश्वासाने आपण त्याच्याशी जडले जातो तेव्हा हे घडते. रोम  ६;५वाचा.

आपण मृत होतो आणि आता आपण जिवंत आहोत . मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे –म्हणजे मी मेलेलो आहे. आता मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे (गलती २;२०) . –म्हणजे मी जिवंत आहे- पण पूर्वी होतो तो मी नाही, तो मी मरून गेलो आहे- आता मी देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. म्हणजे आता जो मी जगतो तो मी विश्वासाने नवा मी आहे. नवीन उत्पत्ती जगतोय तो जुना मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मरण पावलो. देव त्याच्या पुत्राशी तुम्हांला विश्वासाने जोडतो तेव्हा देवाच्या पुत्राशी तुमचे ऐक्य होते. म्हणजे त्याच्याशी तुम्ही संयुक्त होता. त्यामुळे त्याचे मरण तुमचे मरण होते आणि त्याचे मरण तुमचे जीवन होते.

गलती ६:१४ नुसार वधस्तंभाचा अभिमान बाळगणे म्हणजे काय? वधस्तंभ उंचावणारे आपण कसे बनतो? वधस्तंभामध्ये आनंद करणारे आपण कसे बनू शकतो? उत्तर: जो जुना स्वभाव इतर गोष्टींमध्ये बढाई मारण्यात ,उत्सव ,उल्हास  करण्यात आनंद मानत होता तो मेला आहे. विश्वासाने आपण ख्रिस्ताशी संयुक्त होऊन जडून गेलो आहोत. त्याचा मृत्यू म्हणजे आपल्या स्व ला उंचावण्याचा मृत्यू होतो. आपण त्याच्याबरोबर जीवनाच्या नाविन्यात उठविले जातो. आता जो जगतो तो नवीन उत्पत्ती जगत असतो. त्याची एकमेव तळमळ असते  की ख्रिस्त व त्याचा वधस्तंभ उंचावणे . दुसऱ्या शब्दात सांगायचं झाले तर जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर आपला विश्वास ठेवता तेव्हा तुमचे जगाशी असलेले संबंध आणि जगाचे वर्चस्व चालवणारे आकर्षणही तुटते. आता जगासाठी तुम्ही एक शव असता आणि जग तुमच्यासाठी एक शव असते.  तुम्ही नवी उत्पत्ती आहात. जुने तुम्ही मृत पावले आहात नवीन तुम्ही जगत आहात . नवे तुम्ही विश्वासी आहात . हा विश्वास जगाचा अभिमान बाळगत नाही तर ख्रिस्ताचा विशेषकरून वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो. मग तुम्ही पौलाबरोबर म्हणता, ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो.

मग मला सुरक्षितता ,आरोग्य किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीबद्दल आनंद वाटतो आणि या जर जगाच्या गोष्टी आहेत तर मी जगाला मेलेला आहे का? होय, कारण जगाला मरणे म्हणजे जगाविषयी कोणत्याच भावना नसणे असा नाही. (योहान २:१५,१ तीम.४:३). याचा अर्थ जगाचा सार्थ आनंद ख्रिस्ताच्या प्रीतीने, त्याच्या  रक्ताने विकत घेतल्याचा बनतो आणि वधस्तंभाचा अभिमान बाळगण्याचा प्रसंग ठरतो.जेव्हा पैशामध्ये आपले समाधान नसते तर ते देणारा ख्रिस्त व वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त यांच्यामध्ये आपले समाधान असते तेव्हा जगिक फायद्याला आपण मेलेलो असतो.

कवडसे व त्यामागे असणारा तळपणारा सूर्य– आपल्या जीवनातील आशीर्वादांचे कवडसे तेजस्वी असतात. त्यांच्यातून येणारा प्रकाश आपण चालू त्या भूमीवर पडतो. पण त्या आशीर्वादांचा उद्देश उच्च असतो. त्या कवडशांबाहेर राहून ते कसे दिसतात याविषयी कौतुक करण्यापेक्षा देव अधिक अपेक्षा करतो. त्याच्या दानांचे फक्त कौतुक करावे असे नाही तर त्याच्या तेजस्वीतेची प्रतीक्षा करावी हा देवाचा उद्देश आहे.

आपण ख्रिस्ताच्या झळाळत्या गौरवाच्या प्रकाशात  जगाला मेलेलो आहोत. ख्रिस्ताचे गौरव त्याच्या मरणात आणि पुनरुत्थानात आहे. हे गौरव त्याचे जे आशीर्वाद आपण भोगतो त्याच्यापेक्षा अत्यंत उंचीवर आहे,आपल्यासाठी जे म्हणून उत्तम ते सर्व त्याने विकत घेतले आहे. त्याच्या गौरवाच्या ठिकाणी आपला प्रेमाचा शोध संपला पाहिजे. बाकी सर्व गोष्टी या प्रेमाकडे इशारा करणाऱ्या व त्याचे दाखले देणाऱ्या आहेत. जेव्हा आशीर्वादाच्या कवडशातून आपले ह्र्दय वधस्तंभाच्या गौरवी तेजाच्या त्या उगमाप्रत धावू लागते तेव्हा आशीर्वादाचे अरण्य मरून जाते आणि वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्तच सर्वकाही होतो.

वेदना व मरणातून ख्रिस्त विस्तृत करून दाखवणे

काल् वरीच्या प्रीतीच्या मार्गावर  दु:ख सहन करणे हे ख्रिस्त विस्तृत करून दाखवण्याचे एक साधन होय. आपण त्याच्या ठायी इतके संतुष्ट असतो की तो उंचावत जावा म्हणून आपण आपले आप्तजन, मालमत्ता आणि हे विनाशी जीवन यावरही पाणी सोडतो.आणि त्याच्या प्रीतीस्तव दु:ख सहन करतो. त्याच्या सौंदर्याला जेव्हा आरोग्य संपत्ती व जीवनापेक्षाही जतन केले जाते तेव्हा ते अधिक प्रखरतेने झळाळते.म्हणूनच येशूने आपल्याला यासाठीच पाचारण केले. तो आपल्यावर प्रीती करतो आणि प्रीती म्हणजे आपले कोडकौतुक करणे अगर जीवन सुखकर करणे नव्हे तर प्रीतीचा अर्थ कितीही किंमत भरून द्यावी लागली तरी सदासर्वदा त्यालाच महत्व देण्यात  आनंद मानणारे असे आपल्याला बनवणे. जेव्हा आपण वधस्तंभसहन करतो तेव्हा आपण त्याचा उत्तम प्रकारे त्याचा  अभिमान बाळगू शकतो.  त्यासाठी आपल्याला मोठी किंमत द्यावी लागते. जो कोणी आपला वधस्तंभ… वधस्तंभ सहन करणे असे साधन आहे की त्यामुळे आपण वधस्तंभाचा अभिमान बाळगण्यासाठी मुक्त होतो. या पापमय जगात दु:खसहन ही देवाने केलेली तरतूद आहे (रोम ८:२०) . दु:खसहन पापाचा भयंकरपणा जगापुढे चित्रित करते. जे आपला वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताचे अनुयायी होतात , त्यांच्यासाठी पापाच्या सामर्थ्याचा ते बिमोड करते. पाप देवाच्या गौरवाचे महत्व कमी करते तर दु:खसहन पापाच्या सामर्थ्याचा बिमोड करते . ही अपरंपार दया होय.

ज्या कोणत्या गोष्टींमुळे देवाला महत्त्व देण्यातील आनंद लुटण्यास आपल्याला अधिकाधिक सामर्थ्य मिळते , ती देवाची दयाच होय. कारण देवाच्या महानपणामधील आनंदापेक्षा महान आनंद कशातच नाही. आणि ही गोष्ट पहावी व सखोलपणे तिचा आस्वाद घ्यावा म्हणून आपण दु:खसहन केले तर ते दु:खसहन म्हणजे  आपल्यावरील दयाच होय. ख्रिस्ताला कालवरीच्या रस्त्यावर जाऊन मिळण्याचे पाचारण प्रीतीचे आहे.

ख्रिस्ताला महत्त्व देण्यासाठी वाहून घेतलेले जीवन जगणे फार मोलाचे आहे.मोठी किंमत भरून द्यावी असे आहे. आणि त्या किमतीत त्याचे परिणाम आणि त्याला महत्त्व देण्याचे साधन या दोन्ही बाबींचा समावेश होतो. जर आपण आनंदमय व वेदनामय प्रीतीच्या मार्गाला आलिंगन देणार नाही तर आपले जीवन व्यर्थ जाईल. पौलाबरोबर आपण जर ख्रिस्ताला उंचवणाऱ्या विरोधाभासयुक्त जीवनाचा धडा घेणार नाही तर आपण फुटणाऱ्या बुडबुड्यांचा पाठपुरावा करण्यात करण्यात आपले दिवस उधळून वाया घालवू . पौल तर दु:खी असला तरी सर्वदा आनंद करणारा ,दरिद्री असा मानलेला तरी तरी बहुतांना सधन करणारा ,कफल्लक मानलेला तरी सर्ववस्तू संपन्न अशी आपली लायकी तो पटवतो. (२ करिन्थ ६:१०). कालवरीचा रस्ता किंमती आणि वेदनादायी आहे पण तो आनंदविरहित नक्कीच नाही. प्रेषित पौलाच्या जीवनात एकच तळमळ होती ती त्याने विविध प्रकारे बोलून दाखवली. ख्रिस्त आणि वधस्तंभ याशिवाय तो कशाचीच गणती करत नाही (१ करीन्थ २:२), तो फक्त वधस्तंभाचाच अभिमान बाळगतो (गलती ६:४).

जीवन व मरणाविषयी पौलाची एकच तळमळ

तो फिलीपै येथील मंडळीला म्हणतो, ’कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने , नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा …माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाउक आहे. कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे मला लाभ असे आहे ( फिली. १:१९-२१). येथे एक प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तरही दिले आहे. – तुम्ही मरणाने ख्रिस्ताचा सन्मान कसा करता? जगातील सर्व काही गमावण्याची किंमत देणे हे ख्रिस्ताचा महिमा करण्याचे साधन कसे बनू शकते? पौल म्हणतो, ख्रिस्ताने त्याच्या गौरवासाठी आपल्याला जगण्यास व मरण्यास पाचारण केले आहे. जर योग्य प्रकारे कसे मरावे हे आपल्याला ठाउक असेल तर योग्य प्रकारे कसे जगावे हे ही आपल्याला कळेल.