Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 1, 2018 in जीवन प्रकाश

नंदनवनात कुरकुर

नंदनवनात कुरकुर

असमाधानावर विजय कसा मिळवावा 

                                                                                                                                                                लेखक : स्कॉट हबर्ड

१४ जून २००० हा दिवस माझ्या स्मरणातून कधीही पुसणार नाही. कारण त्यापूर्वीची दोन वर्षे मी असमाधान, शंका आणि रोगट आत्मनिरीक्षण यांच्या आध्यात्मिक शुष्क भूमीत भरकटत होतो.

पण या दिवशी देवाने माझ्या शुष्क आणि भग्न ह्रदयामध्ये हळूवार झुळकेचा श्वास फुंकला. त्या दुपारी मी जॉन पायपर यांच्या ‘प्लेजर्स ऑफ गॉड’ या पुस्तकाचा एक अध्याय वाचून संपवला होता.  हा अध्याय देवाचा त्याच्या निर्मितीमध्ये आनंद या विषयावर होता. त्या एअर कंडीशनच्या मंद प्रकाशातील कॅफेमधून मी उन्हाळ्याच्या उष्म्यात प्रवेश करत असताना ते शब्द मला स्पष्ट होऊ लागले. देवाचा आनंद पक्षांच्या चिवचिवाटात, पानांच्या सळसळीमध्ये, धुळीच्या लोटात, गुरांच्या हंबरण्यात मला ऐकू येऊ लागला. आकाश व पृथ्वी देवाची स्तुती व महिमा एकसुराने गात होती आणि अनेक दिवसानंतर आज प्रथमच मी संगीत ऐकत होतो. माझ्या उरात आनंद भरून राहिला आणि मी सहजस्फूर्त हसू लागलो. माझी अंतर्मुख दृष्टी एकदम बाहेर पडली आणि तिला विश्वाचे आश्चर्य दृष्टीस पडले. पहाटे पळून जाणाऱ्या चोराप्रमाणे माझ्या असमाधानाने पलायन केले. दुसऱ्या शब्दांत मला आनंद व समाधानाचे हरवलेले शस्त्र गवसले: विस्मय !

नंदनवनात कुरकुर

विस्मय म्हणजे निर्मितीची जाणीव जी आपल्याला डोळे विस्फारून नि:शब्द करते. आपण स्वत:ला विसरून जातो आणि कृतज्ञतेने भरभरून वाहतो. जेथे विस्मय राज्य करतो तेथे समाधान फुलते. जेथे विस्मयाला खाली पाडले जाते तेथे असमाधान मूळ धरते.

प्रवेश अ: एदेन बाग

हे दृश्य असे आहे. आदाम आणि हवा सौख्यानंदाच्या बागेत राहत आहेत. येथे “देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे उगवली. देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा” (उत्पत्ती २:९,१६). हे पहिले जोडपे आध्यात्मिक परमानंद, वैवाहिक जवळीकता आणि निर्मितीचे सौदर्य यात न्हाऊन गेले होते.
पण येथे एक लबाड प्राणी सरपटत येतो आणि त्याचे तोंड उघडतो. आणि काही सेकंदातच आदाम आणि हवेचे सौख्याने भरभरून वाहणारे विश्व एका पडीक अंगणात संकुचित झाले. आकाशगंगांचा निर्माता आता त्या बागेत प्रवेश करतो. पक्षी आणि प्राणी त्याचे स्तवन करीत आहेत. त्यांचा शोध घेत आनंद मिळवण्यासाठी जग वाट पाहत आहे. पण आदाम आणि हवा कुरकुर करीत आहेत.

आपलेही असेच आहे. दर सकाळी आकाशाच्या व्यासपीठावर देवाच्या गौरवाचा उपदेश करण्यासाठी सूर्य प्रवेश करतो (स्तोत्र १९:१) आणि आपण हवामानाविषयी कुरकुर करतो. दर संध्याकाळी एका निळ्या आच्छादनावर देव रत्नांप्रमाणे तारे विखरून देतो (स्तोत्र १४७:४) आणि आपण जेवणासाठी कुरकुर करतो. प्रत्येक क्षणाला निर्मितीच्या स्पीकर मधून देवबाप, पुत्र व पवित्र आत्मा यांचे सुमधुर गीत ऐकू येते आणि आपण ट्रॅफिकमुळे उसासे टाकतो.

ऑगस्टीनने म्हटल्याप्रमाणे आपण गुडघ्यात डोके खुपसून बसलो आहोत. आपले डोळे देवाला व त्याच्या देणग्यांना पाहण्यात तृप्त होत असत, आता आपण आपल्याच निरीक्षणात इतके गर्क आहोत की ह्या कशाकडेच आपण लक्ष देत नाही. आपण आदाम व हवेची मुले आहोत. विस्म्ययाच्या जगामध्ये आपण ठेचाळतो आणि आपल्या जिभेवर कुरकुर असते.

सापाकडे पाहून हसा

जर पतनामुळे देवाच्या जगाच्या तेजाला आपले अंत:करण अंधकारमय झाले असेल तर नव्या जन्माने त्यावर पुन्हा प्रकाश उजळतो. गुडघ्यात मान खुपसून बसलेल्या, देवाच्या निर्मितीचे वैभव पाहू न शकणाऱ्या पाप्याचे जेव्हा  देव तारण करतो तेव्हा तो त्याचे डोळे दैवी तेज पाहण्यास उघडतो. प्रथम शुभवर्तमानाच्या प्रकाशाद्वारे ख्रिस्ताचे गौरव पाहण्यासाठी (२ करिंथ ४:४) आणि मग सर्वत्र पाहण्यासाठी सुद्धा.

पवित्र आत्म्याच्या आनंददायी प्रभावाखाली आपण जीराल्ड हॉपकिन्स या कवीप्रमाणे “अवघे जग देवाच्या भव्यतेने भरलेले आहे” असे ओळखू शकतो — एव्हरेस्ट व अटलांटिक अशा भव्य गोष्टीत आणि खार किंवा चहाचा कप अशा छोट्या गोष्टीत. आपण आनंदाने कबूल करतो की “जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही देतो” (१ तीम. ६:१७). देवाने आपल्यापासून जे राखून ठेवले त्याबद्दल पुटपुटत न बसता त्याने उदारपणे जे दिले त्याबद्दल आपण विस्मित होत राहतो. आणि विस्मय हा जसे खमीर गोळ्याला फुगवते तसे आपले समाधान वाढवतो.

एदेन बागेत घडले अगदी त्याच्या विरुध्द देवाचा आत्मा ख्रिस्ती लोकांना शिकवतो की सापाकडे पाहून कसे हसावे. जेव्हा फसवणारा फुत्कार टाकतो “तुझा देव कंजूष आहे — तो राखून ठेवतो” तेव्हा विस्मयाने भारावलेला संत उत्तर देतो, “हा! हा! माझा प्रभू कंजूष? तू मजा करतोस की काय? त्याने तर त्याचा पुत्र सुध्दा राखून ठेवला नाही (रोम ८:३२), आणि त्याने त्याच्या प्रीतीने या जगाला मुगुटमंडित केले आहे. तुझे डोळे उघड! या  बापाच्या घरात केवळ जगणे हीच किती आनंदाची बाब आहे.”

अमाप उत्तेजन

एकपत्नीत्वाविरुध्द कुरकुर करणाऱ्यांना जी. के. चेस्टरनॉट यांनी त्यांच्या दिवसात काय प्रतिसाद दिला यावर विचार करा:
“सध्या असलेल्या एकपत्नीत्वाविरुध्दच्या तक्रारीसंबंधी मी कधीच गफलत होऊ देणार नाही. कारण सेक्सवर नियंत्रण नसणे हे किती विचित्र आणि अनपेक्षित वाटते. विवाहामध्ये पत्नीशी एकनिष्ठ असणे ही फारच थोडी किंमत आहे. माझा विवाह एकदाच का व्हावा याबद्दल कुरकुर करणे म्हणजे माझा जन्म एकदाच का झाला यासंबंधी कुरकुर करण्यासारखे आहे. हे विवाहाचा गैरवापर करण्यासारखे आहे. ह्यामुळे शरीरसंबंधाबाबत अधिक संवेदनशीलता दिसत नसून एक अविचारी भावशून्यता दिसून येते. असा मनुष्य एदेन बागेत मला एकाच वेळी पाच दारांनी प्रवेश करता येत नाही अशी तक्रार करणाऱ्या मनुष्यासारखा मूर्ख आहे.”
जो मनुष्य विवाहबाह्य संबंधात आनंद शोधतो त्याने खऱ्या रीतीने आपल्या पत्नीला पाहिलेलेच नाही मग जवळीकता तर बाजूलाच राहो. हेच तत्त्व आपण आणखी पुढे लावू शकतो: जे अधाशी आहेत त्यांनी खऱ्या रीतीने ‘वाह’ म्हणत अन्नाची चवच घेतलेली नसते: जर त्यांनी घेतली असती तर थांबून त्याला दाद दिली असती. तसेच लोभी व्यक्तीने खऱ्या रीतीने सृष्टीसौंदर्यातून देवाचा आंनद घेतलेलाच नसणार नाहीतर आपला प्याला किती भरून वाहत आहे या जाणीवेने त्यांना आनंदाचे भरते आले असते.

नव्या जन्माने मिळालेल्या तुमच्या संवेदना धारदार करा.

अर्थातच कोणीही अशा साध्या प्रकारे स्वत:ला शिकवेल. पण आपण आपल्या मनात आणि ह्रदयात असा नमुना तयार करू की नव्या जन्माने मिळालेल्या आपल्या संवेदना धारदार बनतील आणि प्रार्थना करा की सर्व अद्भुत गोष्टींचा जनक जो देव तो त्या फलदायी करील.

प्रथम आपण ख्रिस्ताच्या गौरवावर मनन करू शकतो. निर्मितीतील अद्भुत गोष्टी ह्या काही एकाकी कृती नाहीत. तर त्र्येक देव त्याच्या रंगमंचावर सांगत असलेले हे देखावे आहेत. त्यांचा नेत्रदीपक अर्थ त्यावेळी समजणार नाही पण जर “सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्याप्रीत्यर्थ निर्माण झाले” ह्याची आठवण झाली तरच समजेल. (कलसै १:१६). तुमचे मन ख्रिस्ताच्या सौंदर्याने भरून टाका. आणि मग जे काही स्तुतीला पात्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला  त्याचे प्रतिबिंब दिसेल (फिली. ४:८).

दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला हे दाखवू शकतील अशा लेखकांची पुस्तके वाचा. त्यासोबतच जे तुम्हाला बायबलमध्ये खोल नेऊ शकतील त्यांचे वाचन करा. तसेच जे लेखक तुम्हाला निसर्गमय वातावरणात नेऊन तुम्ही काय गमावलेत याची जाणीव करू देतील त्यांचे लेख  वाचा. यामध्ये प्रवास वर्णन, देश-विदेश पर्यटन यांच्या लेखांचा समावेश होईल.

तिसरी गोष्ट म्हणजे आपण बाहेर जाऊ शकतो. निर्मितीचे एखादे स्तोत्र पाठ करा (स्तोत्र ८, १९, १०४) आणि हे गीत तुम्ही पुढे चालू ठेवा. मनाचे स्वास्थ्य राखण्यासाठी क्लाइड किल्बी यांनी निर्धार केला होता, “दिवसातून एकदा तरी मी आकाशाकडे पाहीन व जाणीवपूर्वक आठवण करीन की पृथ्वी हा ग्रह अवकाशात भ्रमण करत असताना मी त्याच्यामध्ये आहे आणि त्यासोबत विस्मयजन्य गोष्टी माझ्या सभोवताली व माझ्यासाठी आहेत्त.

अखेरीस आपण देवाला धन्यवाद देवू शकतो. पौल इफिस ५:२० मध्ये म्हणतो, “सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा : प्रत्येक गोष्टीत यामध्ये पापांची क्षमा व तुमच्या मऊशार चादरी यांचाही समावेश होतो. स्वर्गाबद्दलची आशा ही दुसरी बाब होऊ शकेल. तुम्ही प्रार्थना करताना थोडा वेळ तरी देवाचे उपकार माना. त्याने निर्माण केलेल्या देणग्या व त्या तुम्हाला त्याच्याबद्दल  काय सांगतात हे त्याला सांगा. तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट आनंदासाठी व किती मुबलक रीतीने देतो म्हणून त्याचे उपकार माना. आणि मग जेव्हा तो सर्प तुमच्या कानात असंतोषाचे फुत्कार टाकील तेव्हा पुढे व्हा आणि त्याला हसा.